Followers

Sunday, October 20, 2019

आसवांचे समीक्षण

महत्वपूर्ण असतात ही आसवे.
कारणांच्या श्रृंखलेसह गळणारे.
त्यामागे असते एखाद्याच्या भूकेची तळमळ.
त्याच आसवांनी शमवलेली तहान.
शरीरावरील जखमांची वेदना आणि अंत:करणाच्या
घावातुन उत्पन्न होणारी ज्वाळा.
भविष्याकडे डोळे वटारून पाहणारी चिंता,
अस्तित्वावर हसणारे प्रश्न आणि मनाला लागलेले न्यूनगंडाचे ग्रहण.
या नकारात्मक कारणांच्या श्रृंखला तुटल्यावर सुद्धा,
सावली प्रमाणे मानवा सोबत असतात ही आसवे.

© गंधार कुळकर्णी

Saturday, July 13, 2019

पावन

मारू सैतान सारे
झेलू बाणांचे तारे
घेऊ शपथ शिवाची
घोडखिंड लढवा रे

ऋण फेडाया मातेचे
हाती तलवार घ्या रे
वाचविण्या या धर्माला
म्लेंच्छावर तुटून पडा रे

झाले भगदाड जिवाला
त्यात शिवराय पाहा रे
रक्ताचे सिंचन करूनी
त्यात स्वराज्य उगवा रे

संपली जरी ही शक्ती
लढतो बाजी कसा रे ?
शब्द दिला शिवबाला
तो फक्त आता पाळा रे

गाठला गड शिवबानी
तोफांचे झाले इशारे
कोसळून बाजी खिंडीत
पावन होवून गेला रे

© गंधार कुलकर्णी

Tuesday, March 19, 2019

सती

पहा पहाट झाली
अंधार जीणे माझे
माझे सखे सोयरे
वाटेत उभे सारे

आधी तयार झाली
फसण्यास या संसारे
आता तयार होते
पाहण्यास मृत्यू या रे

होते जे स्वप्न माझे
राहिले स्वप्न तेचं
आता आसवे फक्त
दुःखात वाहणारे

स्त्रीचा जन्म माझा
यातनांचाच सारा
विचित्र हे जीवन
अचानक संपणारे

थांबेल आता श्वास
तुटतील सर्व नाते
मी सती निघाली
ते समोर निखारे

© गंधार कुलकर्णी

Sunday, March 10, 2019

आधारस्तंभ

माझे आजोबा दादासाहेब तारे हयात असतांना त्यांच्यावर लिहिलेली ही माझी कविता...

आधारस्तंभ

सात वार ते सात घरी
सात घरचे कामं करी
लहान वय होते जरी
भलीमोठी जबाबदारी

न सुटली साथ घराची
न सोडला मार्ग ध्येयाचा
गरज होती शिक्षणाची
प्रश्न होता तो पोटाचा

ज्ञानाची तपश्चर्या करून
परदेशाचे भ्रमण झाले
अभ्यासाची सोय करून
डुबणाऱ्यांना दादांनी तारले

मित्र गेले पण मैत्री नाही
बळ गेले पण इच्छा नाही
दादांच्या या एकांततेवर
आज आहे का उपाय काही ?

संस्थेला आज गरज तुमची
वाडा रोज प्रतीक्षा करतो
आधारस्तंभ हा आपुला आता 
आपणास थोडा आधार मागतो

© गंधार कुलकर्णी

Thursday, February 14, 2019

वक्त आया है...

वक्त आया है फिर से
गोलियोसे बात करने का
वक्त आया है फिर से
मारके वापिस आने का

वक्त आया है फिर से
जान की बाज़ी लगाने का
वक्त आया है फिर से
कायरो को काट खाने का

वक्त आया है फिर से
लहूमें हथियार भिगाने का
वक्त आया है फिर से
शहीदों का बदला लेने का

वक्त आया है फिर से
इंसानो को बाग़ी बनने का
वक्त आया है फिर से
उनकी नींद उडाने का

वक्त आया है फिर से
तिरंगे की शान बचाने का
वक्त आया है फिर से
वहा तिरंगा लहराने का

© गंधार कुलकर्णी