Followers

Tuesday, February 15, 2022

एक अपूर्ण भेट...

 १७ डिसेंबर २०२१ आईच्या पुस्तकाचं प्रकाशन पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या हातून झालं. त्याही पूर्वीपासून लतादीदींच्या भेटीचा योग जुळवून आणण्यासाठी आई-बाबांचे प्रयत्न सुरूच होते. "दीदींच्या भेटीचा प्रयत्न करूया" असं पंडितजीसुद्धा बोलले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात लतादीदींना दवाखान्यात भरती करण्यात आलं. अनेक लोकांप्रमाणे आम्हीसुद्धा देवाकडे दीदींचे आयुष्य मागत होतो. पण देवालासुद्धा आता लतादीदीचं गाणं प्रत्यक्ष ऐकायचं असावं आणि ६ फेब्रूवारी २०२२ रोजी सकाळी दीदी गेल्याची बातमी आली. बातमी ऐकून आम्ही तिघंही अस्वस्थ झालो. त्यादिवशी घरातला टी.व्ही. पुर्ण वेळ सुरु होता. फक्त जेवायचं म्हणून जेवण झालं. टी.व्ही.वर लतादीदींच्या आठवणी आणि गाणे दाखवणं सुरु होतं. संध्याकाळी दीदींच्या अंत्यविधी होत असतांना पंडितजींचा उदास चेहरा आणि भीरभीरती नजर पाहून आम्हालासुद्धा अनाथ झाल्यासारखं वाटत होतं. तो दिवस गेला. रात्री झोप येत नव्हती. "एक भेट तरी व्हायला हवी होती" असं माझच मन मला म्हणत होतं. त्यारात्री खूप वेळ झोप लागलीच नाही.

दीदीचं पार्थिव शरीर शिवाजी पार्कमध्ये नेत असतांना हजारो लोकं रस्त्यावर उभे होते. तेवढेच लोकं तिच्या गाडीच्या मागेही चालत होते. अनेक लोकांनी फुलांचा वर्षाव केला. सर्वच लोकांचे डोळे त्यावेळी पाणावलेले होते. "मृत्यू असावा तर असा !" मी मनातच बोललो. गायक म्हणून लतादीदीबद्दल काही लिहायचं किंवा बोलायचं म्हंटलं तर 'भारतरत्न लता मंगेशकर' या तीन शब्दांशिवाय पुढे जाता येत नाही. यातच लतादीदीची श्रेष्ठता आहे. आपण लतादीदीला 'गानसम्राज्ञी' असंही म्हणतो. परंतु 'गानसम्राज्ञी' होण्याआधी दीदी एक व्यक्ती म्हणूनही कशी श्रेष्ठ होती ? या प्रश्नावर आपण चिंतन करायला हवं. ऐन तारुण्यात व्रतस्त आणि संघर्षमय जीवन जगून दीदीने स्वतःचा परिवार पुन्हा उभा केला. स्वतःसोबत तिने सर्व भावंडांनाही समोर आणलं. मोठ्या बहिणीला आपण आईचं स्थान देत असतो, त्याचं कारण समजून घ्यायचं असेल तर दीदीचं जीवन आपण अभ्यासलं पाहिजे. सिनेमासाठी पार्श्वगायन करतांना दीदी पायात चप्पल घालत नसे. कारण ती गायन करत नसून संगीतकलेची पूजा व उपासना करायची. एखादं कार्य उत्तमप्रकारे करण्यासाठी ते कार्य करणारा आधी समाधानी होणं आवश्यक असतं. दीदी स्वतःला समाधान मिळेपर्यंत गायनासाठी पूर्ण शक्ती लावायची. स्वतःच्या कार्याबद्दल प्रेम, निष्ठा आणि समर्पणभाव हे गुण दीदीकडून आत्मसात करायला हवे. लतादीदी व्यक्तीपेक्षा कार्याला श्रेष्ठ मानायची त्यामुळेच अनेकवेळा तिने वयाने लहान पण कार्याने मोठे असलेल्या लोकांचेसुद्धा आशीर्वाद घेतले आहे. दीदीजवळ असलेली ही नम्रता बघून तिचा मोठेपणा कळतो.

अतिशय प्रतिकुल परिस्थिती बघितल्यामुळे दीदीला सदैव हसत राहण्याची सवय झाली असावी. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर शांतता किंवा हास्य हे दोन भाव नेहमी असायचे. लतादीदीने अनेक लोकांशी मनाचं नातं जोडलं होतं. सचिन तेंडुलकर व राज ठाकरे यांना दीदी मुलं मानत. माझे आजोबा डॉ. राम शेवाळकर यांना दीदी 'बाबा' म्हणून आवाज देत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीदीने भाऊ मानलं होतं. अशा अनेक लोकांना दीदीचं प्रेम लाभलं. फक्त मोठ्या पदावर असलेले किंवा असामान्य लोकं नव्हे तर अतिशय सामान्य लोकांनासुद्धा संपूर्ण मंगेशकर कुटुंबाकडून प्रेम आणि वात्सल्य लाभलं आहे. दीदीची  देशभक्ती सर्व जगाला कळेल असे अनेक प्रसंग घडले आहेत. अनेकवेळा दीदीने स्वतःच्या कार्यक्रमांचे पैसे खेळाडू, सैनिक आणि पीडितांसाठी दिले आहेत. दीदीने स्वतःसाठी आलेले अनेक गाणे नवोदित गायकांकडे पाठविले. जगातील सर्व घडामोडींची माहिती लतादीदी घेत असत. शेवटपर्यंत लतादीदी तरुण गायकांना 'फेसबूक' आणि 'ट्विटर' वरून प्रोत्साहन व आशीर्वाद देत होती. संपूर्ण जगासाठी असामान्य असलेली लतादीदी वैयक्तीक जीवनात आपल्या सर्वांप्रमाणे सामान्य जीवन जगत होती.

मला संगीतकलेचे ज्ञान नाही, पण गाणे ऐकायला आवडतात आणि लोकांच्या जीवनकथांचे वाचन करण्याची आवड आहे. त्यामुळे लतादीदीबद्दल जे थोडं वाचलं आणि विविध मुलाखतीतून ऐकलं त्यावरील चिंतन या लेखामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ६ फेब्रूवारी २०२२ ला लतादीदी देहरूपाने आपल्यातून निघून गेली, पण 'लता मंगेशकर' या नावाची कधी न संपणारी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण सृष्टीत पसरली आहे. प्रत्येकजण गायन करू शकत नाही, परंतु लतादीदीच्या व्यक्तिमत्वातील विविध गुण आत्मसात करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. लतादीदीचे अजरामर गाणे आपल्याला जगण्यास मदत करतात, पण लतादीदीच्या जीवनातील प्रसंग आपल्याला जगणं शिकवू शकतात. २००६ साली राम आजोबा(डॉ. राम शेवाळकर) यांच्या अमृतमोहोत्सवी कार्यक्रमामध्ये आम्हाला लतादीदीचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्याची संधी लाभली. त्यानंतर विविध मुलाखती व लेखांमधून लतादीदीची अपूर्ण भेट झाली. जर आता लतादीदीला प्रत्यक्ष भेटता आलं असतं तर ही अपूर्ण भेट पूर्णत्वास गेली असती आणि दीदीकडून बरच काही शिकायला मिळालं असतं.

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

Sunday, February 13, 2022

मास्टर दीनानाथांची हृदया - भारतरत्न लता मंगेशकर

 स्वरांना स्त्रीचा जन्म घेण्याची इच्छा झाली आणि २८ सप्टेंबर १९२९ ला लतादीदींचा जन्म झाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर यांना एकूण पाच अपत्य झालीत. असा सप्तसुरांचा मंगेशकर परिवार. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची जेष्ठ कन्या दीदी ही त्यांची अतिशय लाडकी होती. त्यामुळे दीनानाथ, दीदीला हृदया म्हणत असत. पण तिचे व्यावहारिक नाव 'हेमा' होते. 'भावबंधन' नाटकात दीदीने 'लतिका'ची भूमिका केली होती. या नाटकामुळे प्रभावित होऊन दीनानाथ यांनी दीदीचे नाव 'लता' ठेवले. लता म्हणजे 'वेल' वेल ही भिंतीच्या किंवा झाडाच्या आधाराने वाढत असते. पण आता या वेलीनेच सर्व परिवाराला आधार दिला. कारण १९४२ मध्ये मास्टर दीनानाथ यांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण परिवाराची पालनपोषणाची जबाबदारी १३ वर्षांच्या लतादीदीवर आली. तेव्हा तिला दीनानाथांचे सन्मित्र, मास्टर विनायकांनी आधार दिला. सुरुवातीला दीदीला मराठी चित्रपटातून गायिका आणि अभिनेत्री म्हणून काम करावे लागले. १९४२ सालचा 'पहिली मंगळागौर' या चित्रपटात दीदीने अभिनय केला व एक गाणंही गायलं होतं. १९४४ मध्ये दीदी मास्टर विनायकांसोबत मुंबईत आल्यात आणि उस्ताद अमानत अली खाँ यांचेकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेत. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूपश्चात तिला बराच संघर्ष करावा लागला. या दरम्यान तिला गुलाम हैदर यांनी बरीच मदत केली.


१९४८ मध्ये मजदूर चित्रपटात तिने पहिलं हिंदी गाणं गायलं. १९४९ मध्ये 'महल' साठी हिंदी गाणं गायलं आणि त्यानंतर १९५० पासून मात्र लतादीदींना मोठ्या संगीतकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. जसे अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, एस्. डी. बर्मन, खय्याम, सलील चौधरी, मदन-मोहन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, पंडित हृदयनाथ मंगेशकर ते आत्ताचे ए. आर. रहमान पर्यंत. दीदींनी सर्व संगीतकारांसोबत काम केले. सोबतच अनेक दिग्गज गायकांसोबत गाणे गायले. जसे हेमंत कुमार, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, मन्ना डे, किशोरकुमार, सुरेश वाडकर ते आताचे उदित नारायण पर्यंत. तीस हजाराहून अधिक एकूण ३६ भाषांमध्ये दीदींनी गाणी गायली आहेत. जसे विविध गीतकार-संगीतकार, गायक-गायिकांसोबत काम केले. त्याचप्रमाणे विविध अभिनेत्री, जसे नर्गिस, मीनाकुमारी, मधुबाला, रेखा, हेमा मालिनी, परवीन बॉबी, झिनत अमान, रीना रॉय, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा, काजोलपर्यंत सर्वांना दीदीने आपला आवाज दिला आहे.

लतादीदीचा स्वच्छ, निकोप, मधुर स्वरांच्या आवाजाचं रहस्य काय असू शकतं ? का बरं दीदी इतरांपेक्षा वेगळी आहे ? याबद्दल श्रवण-चिंतन-मनन केलं तर असं लक्षात येतं की तिची संगीत कलेविषयीची निष्ठा, श्रद्धा, प्रामाणिकपणा, तपस्या, साधना या सर्व गोष्टी आहेत. प्रत्येक गाणं रेकॉर्ड करण्यापूर्वी ती स्वत: रियाज करून मनाचे समाधान झाल्यानंतरच गाणं रेकॉर्ड करत असे. मराठी सारखाच हिंदी, उर्दू भाषेचा अभ्यास तिने स्पष्ट शब्दोच्चारांसाठी केला होता. प्रत्येक सूर हा परफेक्ट लागलाच पाहिजे असा तिचा नियम होता. त्या चित्रपटातील प्रसंग, त्यामधील भावभावना, त्यातील अभिनेत्री, तिचा आवाज या सर्व गोष्टींचा विचार, चिंतन-मनन करून ते सर्व संस्कार ती आपल्या आवाजावर करत असे म्हणून ते गाणे गात असतांना प्रत्यक्ष ती अभिनेत्री स्वतः गाते आहे असं सर्वांनाच वाटायचं. मास्टर दीनानाथ यांच्या गळ्यातील सहजता दीदीच्या गळ्यात होती. त्यामुळे ताना सुद्धा तिच्या गळ्यातून सहजच निघत असत. दीदीच्या आवाजाची रेंज इतकी मोठी होती की ती हाय पीच मध्ये गायची त्यामुळे संगीतकारांना सुद्धा संगीत देताना भरपूर काम करता येऊ लागले. त्यांचा आवाका व्यापक होत गेला. गाणं रेकॉर्ड करताना दीदीच्या पायात कधीच चप्पल नसे. कारण ती प्रत्यक्ष सरस्वतीची पूजा करीत असे. प्रत्येक गायकाला दीदीचं श्रेष्ठत्व तिच्यासोबत गाणं रेकॉर्ड करतांनाच कळत होतं. कारण तिची योग्यताच तेवढी होती. उदाहरणादाखल मी या लेखात दोन गीतं देत आहे. एक म्हणजे 'अर्पण' चित्रपटातील 'लिखने वाले ने लिख डाले' या गीताचा राग मिश्र यमन कल्याण आणि मारुबिहाग आहे. सुरूवातीला 'लिखने वाले' दीदीने एकदम हाय पीच मध्ये गायलं आणि जेव्हा गीतातील सुरेश वाडकर यांचे कडवं आलं तेव्हा संगीत एकदम खाली उतरत आणल्या गेलं. यावरून आपल्याला दीदीची महानता आणि वेगळेपण दिसून येतं. त्याचप्रमाणे दुसरं गाणं म्हणजे 'बदलते रिश्ते' या चित्रपटातील 'मेरी सांसो को जो मेहेका रही है' हे गीत पुरीयाधनाश्री या रागातील आहे. हे गाणं सुरवातीला तारसप्तकात होतं आणि जेव्हा महेंद्र कपूर म्हणतात तेव्हा खालच्या सप्तकात गायल्या जातं. मला प्रत्येकच कलाकार वंदनीय आणि पूजनीय आहे. पण दीदी येथे सर्वश्रेष्ठ जाणवते.

संत ज्ञानेश्वर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही मंगेशकरांची श्रद्धास्थानं आहेत. या दोन महान लोकांनी जणू काही काव्य मंगेशकर भावंडांसाठी लिहीलीत. संत ज्ञानेश्वरांच्या विराण्या मुळातच गेय आहेत आणि मंगेशकर भावंडांनी त्यांना अजरामर करून ठेवले. दीदी देशभक्त होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवाजी महाराजांची गीतं गाऊन प्रत्येक गाण्याचे सोने दीदीने केले. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदीपर्यंत प्रत्येकाला दीदीचा भगिनीप्रमाणे स्नेह मिळाला. फक्त भारत देशातच नव्हे तर विदेशातही दीदी पूजनीय होती नव्हे राहणारच. अवघ्या जगावर आपल्या सुमधुर आवाजाने अधिराज्य गाजवणारी दीदी तपस्विनी होती. पितृछत्र हरपल्यानंतर परिवाराचे पालनपोषण करणारी दीदी, स्वतःसोबत आपल्या लहान भावंडांना ही पुढे नेण्यास प्रोत्साहन देणारी दीदी, आयुष्यभर कडक ब्रह्मचर्य व्रत पाळणारी दीदी, आपले संपूर्ण आयुष्य संगीत कलेला वाहून ऋषितुल्य जीवन जगणारी दीदी प्रत्यक्ष दैवी चमत्कारच होती. नोव्हेंबर २००६ मध्ये डॉ. रामकाका शेवाळकर यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या नागरिक सत्काराला लतादीदी नागपूरला आल्या होत्या. तेव्हा दीदींचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. त्याचं श्रेय माझे वडील दादासाहेब तारे आणि रामकाका शेवाळकर यांनाच आहे. तो दिवस आमच्या आयुष्यातील सुवर्ण दिवस आहे. दीदीने अपार कष्ट, संघर्ष करून संपूर्ण दुनियेला आपल्या गाण्यातून आनंद दिला. दीदी भरभरून जीवन जगलीस. आता परत 'लता मंगेशकर' होणे नाही. भूलोकीच्या आमच्यासारख्या सर्वांना दुःख सागरात लोटून आता स्वर्गातील लोकांना मात्र आनंद देणार आहेस. जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तो पर्यंत दीदीचं सुमधुर गाणं या विश्वात सर्वांना ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील. 'लतादीदी मंगेशकर' तुला आता दुसरा जन्म मिळू नये. तू आता परमेश्वराच्या चरणाशी बसून अमृताचे फळं चाखावीत आणि जगातल्या तुझ्या सर्व लेकरांना भरभरून आशीर्वाद द्यावेत. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुला विनम्र आदरांजली वाहते.
ॐ शांती

© डॉ. सौ. जयश्री विश्राम कुलकर्णी
संपर्क क्रमांक : ९२८४५८३७९७