कोरोनाची दीर्घ सूटी लागल्यापासून आम्ही सर्व घरातच बसून होतो. १६ मार्च पासून सर्व बंद झालं आणि एक-दोन दिवसातच घर नकोसे व्हायला लागले. पण काही उपाय नसल्याने पुढच्या एक-दोन दिवसात माझ्या दिनचर्येत मोठा बदल झाला, नव्हे तो मीच केला. विचित्ररात्रयोग व अवेळीनिद्रायोग अशा दोन योगांचा माझ्या कुंडलीत शिरकाव झाला आणि पहाटे ४ वाजता झोपणे, सकाळी ११ वाजता उठणे, पाहिलेले सिनेमे पुन्हा पुन्हा पाहून कंटाळाशी झुंज देणाऱ्या मनाला थोडे रमवून घेणे हेच सुरू होतं. दिवसातून एकदा थोडा अभ्यास करून अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न मी करत होतो. 'Whatsapp वर आलेले कोडे सोडवणे' हा एक नवीन उपक्रम तिघांच्याही दिनचर्येचा भाग झाला होता. आई-बाबांनी केलेल्या विविध पदार्थांवर रोज ताव मारणे सुद्धा सुरू होते. अशातच २३ मार्चला दुपारी हर्षू काकाचे "येशु ख्रिस्तावर कविता करतो का ?", "आवडली तर यु ट्युबवर येईल" असे मेसेज आले. मी सुद्धा होकार दिला आणि कवितेसाठी विचारप्रक्रिया सुरू झाली. ख्रिस्ताची माहिती मिळवण्याची मोहीम मी हाती घेतली. रात्रीपर्यंत 'ख्रिस्त दिसतो मला' असे शीर्षक ठरले.
२४ मार्चचा दिवस येशू ख्रिस्ताचे दोन सिनेमे, त्याच्या जीवनावरील अनेक प्रसंग व लियोनार्डो दा विंसीने रेखाटलेले चित्र अभ्यासण्यात गेला. रात्रीपर्यंत सुद्धा शीर्षकापुढे पेन काही गेला नाही. जेवण झाल्यावर कुसुमाग्रजांचे विशाखा व समिधा हे दोन काव्यसंग्रह चाळलेत. ख्रिस्त दिसतो, पण कुठे दिसतो ? कोणामध्ये दिसतो ? असा विचार करत असतांना पहिल्या काही ओळी जन्माला आल्यात आणि समाजातील असहाय्य स्त्रीमध्ये मला ख्रिस्त दिसला. तेव्हा रात्रीचे ३:३० वाजले होते. दुसऱ्या दिवशी 'The Last Supper' या प्रसंगाचा संबंध आजच्या वृद्ध माणसाच्या अंतिम स्थितीशी जोडून त्यावर दुसरे कडवे लिहून झाले. सद्य परिस्थितीत वर्तमान आणि भविष्याच्या प्रश्नामध्ये अडकलेला तरूण व क्रुसाच्या प्रतिमा एकत्रित झाल्या. कविता पूर्ण झाली होती पण मी असमाधानी होतो. २५ तारखेला संध्याकाळी कविता हर्षू काकाला पाठवली. आता परत कवितेची डागडुजी सुरू होऊन तिसऱ्या कडव्यात बदल केला. आजही आपल्याला ख्रिस्त समजला नाही असा शेवट करून, जुडासाचा दोष स्वतःवर घेउन कविता पूर्ण झाली. ही कवितेची प्रक्रिया चालू असतांना 'क्रुसाच्या कविता' या यू ट्यूब चॅनलचे संचालक डॉ. अमित त्रिभुवन ह्यांच्या सोबत संपर्क साधला होता. त्यामुळे २६ तारखेला सकाळी त्यांना कविता, अल्पपरिचय व एक फोटो Whatsapp वर पाठवला.
२७ तारखेला सकाळी उठलो तेव्हा कवितेचा वीडियो यू ट्यूब चॅनलवर आल्याचे नोटिफिकेशन स्क्रीनवर झळकत होते. Whatsapp, Facebook वर वीडियोची लिंक पाठवली. दिवसभर सर्वांचे कौतुकाचे मेसेज येत होते. वीडियो पाहण्याऱ्यांची संख्या वाढत होती. अनेक विद्वान व अभ्यासू लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. संध्याकाळी हिस्लॉप कॉलेजचे माजी प्रचार्य डॉ. सुभाष पाटील सरांसोबत बोलणे झाले. वृद्ध बापासाठी येशूच्या प्रतिमेचा उपयोग त्यांना विशेष आवडला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील एक विद्वान व्यक्ती म्हणजे डॉ. अनुपमा उजगरे यांच्याशी भरपूर चर्चा झाली. सूर्याने एखाद्या छोट्या दिव्यासोबत उजेडाची चर्चा करावी तसा अनुभव मला डॉ. अनुपमा उजगरेंसोबत बोलतांना आला. रात्री अमित सरांनी दिवसभरात आलेल्या प्रतिक्रिया मला पाठवल्या. त्यात विजय कोल्हटकरांचा (समाजशास्त्रज्ञ डॉ. उषादेवी कोल्हटकर यांचे पती) मेसेज होता. आई-बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि इतक्या विद्वान लोकांच्या प्रतिक्रिया पाहून, एका नवीन विषयावर कविता केल्याचे समाधान डोळ्याच्या वाटेने अलगद गालावर उतरले. त्या रात्री सुद्धा मी उशीरा झोपलो. पण झोप न येण्याचे कारण होते सूटीतील सोन्याचा दिवस जगल्याचे समाधान...
© गंधार कुळकर्णी
९१५८४१६९९८