Followers

Wednesday, May 3, 2023

ग्रंथालय : माझं दुसरं घर

शाळा किंवा महाविद्यालय म्हंटलं की प्रत्येकाच्या जीवनातील अनेक गोड आठवणींना उजाळा मिळतो आणि एखाद्या चलचित्राप्रमाणे सर्व आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. माझ्याही बाबतीत असच काहीसं घडलं, जेव्हा मला जगदंब महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. वानखडे मॅडम यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनुभवांवर लेख लिहायला सांगितला. तेव्हापासून गवतावर असंख्य दवबिंदू जमावे त्याप्रमाणे मनाच्या विविध कोपऱ्यात असलेल्या अनेक आठवणी एकत्र जमू लागल्या. सततचे कामं आणि न लाभणारी शांतता यामुळे आठवणींना कागदावर उतरवणं कठीण होऊ लागलं. शेवटी "शनिवार-रविवारमध्ये लेख लिहून पूर्ण करायचा" असं ठरवलं आणि लिहायला सुरवात केली.

२०१८ मधील जून महिन्याच्या शेवटी-शेवटी जगदंब महाविद्यालयामध्ये माझा प्रवेश झाला आणि दोन-तीन दिवसानंतरच मी महाविद्यालयात जाण्यास सुरवात केली. एम. ए. इतिहासाची प्रवेशप्रक्रिया सुरू असल्यामुळे इतर विद्यार्थी महाविद्यालयात अद्याप येत नव्हते. त्यामुळे सुरवातीचे बरेच दिवस मी एकटाच इतिहासाच्या वर्गात बसायचो. आमचे विभागप्रमुख प्रा. टाले सर अनेकवेळा विनोदाने म्हणायचे,"यावर्षी गंधार आपला एकटाच विद्यार्थी आहे" प्रा. माहोरे सर व प्रा. भटकर सरांनी मला अभ्यासक्रम आणि पुस्तकं सांगितले. 'एक विद्यार्थी असला तरी वर्ग घेणं' ही गोष्ट इतिहास विभागाने मला शिकवली. वर्ग झाल्यावर इतर विद्यार्थी नसल्यामुळे मी ग्रंथालयात पुस्तकं घेण्यासाठी गेलो. तेव्हा कला शाखेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं देणाऱ्या ग्रंथालयातल्या नाना काकांनी बी.टी. कार्ड काढण्यासाठी पावती मागितली आणि "दोन-तीन दिवसांनी ये" असं सांगितलं. मी टाले सरांना सांगून घरी आलो. पुस्तकं न मिळाल्यामुळे नोट्स लिहायला सुरवात होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सकाळी ग्रंथालयामध्ये पोहोचलो. नाना काका आणि स्वप्निल दादा समोरच बसले होते. "बी.टी. कार्ड तयार झालं का काका ?" मी विचारलं आणि बी.टी. कार्ड मिळेपर्यंत तिथेच उभा राहिलो. शेवटी काकांनी मला बी.टी. कार्ड दिलं. त्यानंतर पुस्तकं घेतले आणि वाचन सुरू केलं. जेव्हा मी पहिल्यांदा ग्रंथालयात गेलो, तेव्हा समोर हजारो पुस्तकं पाहून खेळण्याच्या दुकानात गेल्यावर लहान मुलाची जशी अवस्था होते, तशी अवस्था माझी झाली होती. त्यामुळे 'रोज वर्ग झाल्यावर आपण ग्रंथालयामध्ये एक चक्कर मारायचाच' असं मी मनाशी ठरवलं.

त्यानंतर रोज वर्ग झाल्यावर मी ग्रंथालयात जायला लागलो. नाना काका, स्वप्निल दादा, डॉ. बेलसरे सर, मारुती काका यांच्यासोबत रोज बोलणं सुरू केलं. त्यामुळे ग्रंथालयातील पूर्ण स्टाफसोबत माझी चांगली ओळख झाली. जेव्हा आमची पुस्तक बदलवण्याची तारीख असायची तेव्हा मी नाना काकांना, "तुमची मदत करू का ?" असं विचारायचो आणि काकांनी होकार दिला की पटापट विद्यार्थ्यांना पुस्तकं बदलवून द्यायचो. नाना काकांची पुस्तक वाटण्यात मदत केल्याचे मला अनेक फायदे झालेत, ते म्हणजे ग्रंथालयातील खूप पुस्तकांची व त्यातील मजकूराची मला माहिती झाली, पुस्तकांची नोंदणी व विषयानुसार विभागणी कशी करतात ते कळलं, महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसोबत ओळख झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला माझ्या बी.टी. कार्ड वर दोनपेक्षा जास्त पुस्तकं मिळू लागले. बेलसरे सर आणि नाना काकांनी माझ्यातला 'पुस्तकप्रेमी' हेरला आणि "पाहिजे तेवढे पुस्तकं वाच !" असं विश्वासाने मला सांगितलं. त्यानंतर ग्रंथालयाच्या समितीसाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली. रंगनाथन जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. ग्रंथालयासाठी पुस्तकं मागवण्याच्या वेळी बेलसरे सर मला आवर्जून सांगायचे आणि माझ्याकडून पुस्तकांची यादी मागवायचे. एका विद्यार्थ्याचे मत विचारात घेऊन ग्रंथालयात पुस्तकं आणणे. ही एका विद्यार्थ्यासाठी फार मोठी गोष्ट असते आणि अशा गोष्टींमुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत असतो.

'हा विद्यार्थी नेहमी ग्रंथालयात बसलेला असतो.' असं लक्षात आल्यावर तत्कालीन मराठी विभागप्रमुख डॉ. गडकर मॅडम यांनी मला काही ठराविक पुस्तकं वाचायला दिले. स्वामी विवेकानंदांवरील अनेक पुस्तकांचं वाचन झाल्यामुळे इंग्रजी विभागातील प्रा. पाटील सरांनी वक्ता म्हणून मला पहिली व्याख्यानाची संधी दिली. एवढच नव्हे तर संस्थेचे अध्यक्ष श्री. रमाकांतजी शेरकार सर, प्राचार्य डॉ. रोहणकर सर तसेच महाविद्यालयातील प्रा. मुळे सर यांच्यासोबत सुद्धा एक-दोन वेळा पुस्तकांविषयी चर्चा झाली. ग्रंथालयाशिवाय माझा महाविद्यालयातील इतर सर्वच विभागांशी जवळून संबंध आला. पण त्याची सुरवात ग्रंथालयापासून आणि ग्रंथालयामुळे झाली, म्हणून लेख लिहितांना ग्रंथालयाविषयी अनुभव लिहावे असं मी ठरवलं होतं. माझं विद्यार्थी जीवन संपलं आणि तासिका तत्वावरील प्राध्यापक म्हणून मी पुन्हा जगदंब महाविद्यालयात काम करायला सुरवात केली. महाविद्यालयातील माझी भूमिका थोडी बदलली. पण विद्यार्थी असतांना सर्व प्राध्यापक व क्लरीकल स्टाफसोबत जे मैत्रीचं नात जुळलं ते अजूनही तसच कायम आहे.

हे सर्व लिहिण्याचं तात्पर्य म्हणजे की 'प्रेमानी बोलून सुद्धा महाविद्यालयातील आपले सर्व कामं होऊ शकतात' ही गोष्ट आजच्या विद्यार्थ्यांना जाणून घेण्याची आणि आचरणात आणण्याची फार आवश्यकता आहे. कारण विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यामुळे त्यांचे होत असलेले कामं बिघडतांना मी पाहिले. खरं सांगायचं झालं तर शाळा-महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठीच असतात आणि हेच लोकं विद्यार्थ्यांचे चांगले मित्रही बनू शकतात. फक्त आपल्यामध्ये मैत्री करण्याची कला व हिम्मत असायला हवी. कोणत्याही मुलाला त्याचे पहिले मित्र घरातून भेटतात आणि ते त्याचे आई-वडील असतात. या तत्वानुसार विचार केल्यास महाविद्यालयामधील मला माझे पहिले मित्र ग्रंथालयात भेटले. म्हणून जगदंब महाविद्यालयातील ग्रंथालयाला मी माझं दुसरं घर समजतो.

गंधार विश्राम कुलकर्णी
   (९१५८४१६९९८)
     इतिहास विभाग
जगदंब महाविद्यालय,
         अचलपूर