उन्हाळ्याच्या सूट्या सुरू असल्यामुळे निवांतपणे घरातले कामं करता येतात. २ मे चा दिवससुद्धा असाच होता. सकाळी मी आणि विश्राम घरातले कामं करत होतो. गंधार परीक्षेच्या कामासाठी कॉलेजमध्ये गेला होता. स्वयंपाक घरातले कामं झाल्यावर मी मोबाईल बघितला तर त्यात आशुदादाचा मेसेज आला होता. मेसेज वाचून विजुकाकू गेल्याचं कळलं. २३ तारखेपासून दवाखान्यात भरती असलेली विजुकाकू आमच्यातून निघून गेली होती. मन सुन्न झालं होतं. पहिले रामकाका, नंतर माझे वडील (दादा), त्यानंतर माझी आई आणि आता काकू या सर्वांच्या जाण्यामुळे परिवारातील चैतन्य, वैभव, आधार निघून गेला होता. संध्याकाळी ५ वाजता काकुची अंतिम विधी होणार होती. आम्ही १२:३० वाजता घरून निघालो. प्रवासात असतांना रस्त्यावरील झाडांप्रमाणे प्रत्येक जुनी आठवण डोळ्यांपुढे येत होती आणि क्षणात धूसर होत होती.
१९९५ च्या जुलै महिन्यात माझं लग्न विश्रामसोबत जुळल्यावर, मला पहिली साड़ी देणारी विजुकाकू एकदम माझ्या डोळ्यासमोर आली आणि माझे डोळे पाणावले. १९९७ साली गंधारचा जन्म झाला तेव्हा रामकाका आणि विजुकाकू अमेरिकेला गेले होते. दादांनी रामकाकांना गंधारच्या जन्माची बातमी कळवली. तेव्हा विजुकाकुला इतका आनंद झाला की तिने अमेरिकेतून गंधारसाठी ड्रेस आणले होते. गंधार चार महिन्याचा होता तेव्हा विश्रामचा फार मोठा अपघात झाला. आजही ते दिवस आठवले की अंगावर काटा उठतो. पण अशा कठीण काळातसुद्धा विजुकाकू अतिशय खंबीरपणे आमच्यासोबत होती. अपघाताच्या स्थळावरून विश्रामला नागपूरच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेव्हा आम्ही दवाखान्यात पोहोचण्याआधी विजुकाकू तिथे उपस्थित होती. पुढे आमच्या संघर्षाच्या काळातसुद्धा विजुकाकुने विश्रामचा मुलाप्रमाणे सांभाळ केला.
पुढे आमच्या घरांचे वास्तु, गंधारचा उपनयन संस्कार या सगळ्या आनंदाच्या क्षणी तारे व कुलकर्णी परिवारातील वडीलधाऱ्या व्यक्तींप्रमाणे रामकाका व विजुकाकू आम्हाला आशीर्वाद द्यायला उपस्थित होते. रामकाका व काकुंमुळे आमचा मंगेशकर परिवाराशी संबंध आला आणि मला पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतावर संशोधन करण्याची परवानगी मिळाली. संशोधनाचे कार्य सुरू असतांना दादा आणि रामकाका माझ्यासोबत होते. पण जेव्हा या संशोधन प्रबंधावरील पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा दादा आणि रामकाकांची उणीव विजुकाकुने भरून काढली. माझ्या आग्रहासाठी विजुकाकू, आशुदादा आणि मनीषा वहिनीने त्यांच्या नागपूरच्या घरी पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा संपन्न करून घेतला. तेव्हा विजुकाकुने स्वतः माझ्या 'हृदय संगीत' पुस्तकाचे प्रकाशन केले होते. पुढे एकदा विजुकाकू भारती मंगेशकर (हृदयनाथ मंगेशकरांच्या पत्नी) यांना आमच्या घरी घेऊन आली होती. तो दिवस तर फारच अविस्मरणीय आणि अवर्णनीय आहे.
कोरोनानंतर विजुकाकू अतिशय थकली होती. तरीही मोठ्या महाराजांच्या (भाऊसाहेब शेवाळकर) पुण्यतिथीला स्वतः इथे यायची आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्व विधी करून घायची. माझ्याकडे या पुण्यतिथी उत्सवात ब्राम्हणांना सोवळ्यात वाढण्याचं काम असतं. सर्व काम झाल्यावर आमचे जेवणं होईपर्यंत समोर थांबणारी विजुकाकू, अधून-मधून माझी आणि विश्रामची गंमतसुद्धा करायची. गंधारने लिहिलेल्या लेख व कवितांचे तिला फार कौतुक होते. गंधारने रामकाकांवर लिहिलेली कविता विजुकाकू सर्वांना आवर्जून दाखवत असे.
विजुकाकू उत्कृष्ट शिक्षिका झाली असती, असे माझे दादा मला नेहमी सांगायचे. कारण काकुला मुलांना शिकविणे फार आवडत होते. पण रामकाकांचा एवढा मोठा व्याप, नावलौकीक, त्यात घरातील सण, उत्सव त्यामुळे घरात सतत पाहुण्यांची वर्दळ असायची. शेवाळकरांचा हा डोलारा सांभाळत असतांना विजुकाकुने आपली आवड बाजूला ठेवली. कारण रामकाकांच्या चेहऱ्यावरील आनंद तिला सर्वात जास्त महत्वाचा होता.
एकदा रामनवमीच्या उत्सवाला काकू अचलपूरला आली असतांना, घरी जेवायला आली, आम्हा तिघांनाही खूप आनंद झाला. पुढे उत्सवाचे काम करतांना ती माझ्याकडे कौतुकाने बघत होती, मग मी काकूच्या गळ्यात पडून माझा लोभ करुन घेतला.
'नेहमी सर्वांचं कौतुक करणारी, नेहमी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी विजुकाकू आज आपल्यात नाही.' या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. अजूनही असं वाटतं की मोठ्या महाराजांच्या उत्सवाच्या दोन दिवसआधी काकुचा फोन येईल आणि ती म्हणेल,"तुम्हाला तिघांना इकडेच यायचं आहे बरं !" असं असलं तरी यावेळी मोठ्या महाराजांच्या उत्सवात डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसलेली विजुकाकू आता तिथे दिसणार नाही. याचं दुःख नेहमीकरीता राहिल...
© डॉ. जयश्री विश्राम कुलकर्णी
संपर्क क्र. - ९२८४५८३७९७