Followers

Saturday, August 23, 2025

कवितेतून समजणारे सावरकर

दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्य मे महिन्यात जगभरात विविध व्याख्यानमालांचं आयोजन होत असतं. त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील विविध टप्प्यांची सविस्तर चर्चा होत असते. बालपण, तारुण्य, क्रांतिकार्य, अंदमानातील वास्तव्य, रत्नागिरीतील सामाजिक व राजकीय कार्य अशा अनेक विषयांवर शेकडो वक्ते दरवर्षी बोलतात. विविध कार्यक्रम, स्पर्धा, साहित्य या माध्यमातून सावरकरांच्या जीवनावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्याचे कार्य सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातून क्रांतिकारक सावरकर, राजकारणी सावरकर, इतिहासकार सावरकर, भाषाशुद्धीची चळवळ चालवणारे सावरकर, समाजसुधारक सावरकर अशा विविध रूपांमध्ये आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांना बघतो. परंतू स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्याला माहीत नसतात. उदाहरणार्थ कवितांतून व्यक्त होणारे तत्वज्ञ सावरकर. आपल्याला सावरकरांच्या निवडक दोन-तीन कविता माहीत आहेत. त्यातही ज्या कवितांना भारताचं भूषण असलेल्या मंगेशकर परिवाराने चाल लावून गीतांचं रूप दिलं अशाच कविता आपल्याला परिचित आहेत. कदाचित वाचायला आणि समजायला कठीण असल्यामुळेही इतर कविता अभ्यासण्याचे कष्ट आपण घेत नाही. सावरकरांच्या कवितांची पार्श्वभूमी समजावून घेण्यासाठी माझे प्रयत्न सतत सुरूच होते आणि अशातच एका व्याख्यानाची माहिती मिळाली. 'महाकवी सावरकर' या विषयावर महाराष्ट्रातील ज्येष्ठ निरूपणकार आशुतोषजी अडोणी यांच्या व्याख्यानाचे आयोजन झाले होते. आता याला भगवंताची कृपा म्हणावी की योगायोग म्हणावा ते आपण ठरवावं. अडोणी सरांचं 'महाकवी सावरकर' हे व्याख्यान मला सावरकरांच्या कवितेतील सौंदर्य आणि तत्वज्ञान समजण्यास मार्गदर्शक ठरलं.

सावरकरांच्या कविता म्हणजे त्यांचं जीवन. त्यामुळेच फक्त त्यांच्या कवितांचा अभ्यास केला तरी आपल्याला सावरकरांच्या जीवन चरित्राची बऱ्यापैकी ओळख होवू शकते. हे सुद्धा सावरकरांच्या कवितांचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. वयाच्या ११ व्या वर्षापासून सावरकरांनी कविता रचण्यास प्रारंभ केला आहे. सुरवातीला सावरकरांनी अनेक व्यक्तींवर कविता रचल्या. त्यात सवाई माधवराव, लोकमान्य टिळकांचे व्याही बापूराव केतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कविता रचली. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात गेल्यावर तारुण विनायकाने भरपूर कविता लिहिल्या. त्यातली एक अतिशय महत्वाची कविता म्हणजे 'श्री शिवरायांची आरती'.

'त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन्‌ भगवद्‌गीता सार्थ कराया या
जयदेव जयदेव जय जय शिवराया'

या कवितेत सावरकर शिवाजी महाराजांना पुन्हा जन्म घेण्याची विनवणी करतांना दिसतात. जेव्हा देशावर प्लेगची आपत्ती ओढवली होती. तेव्हा त्रस्त जनतेचं दुःख 'विधवांची दुःखे' या कवितेतून सावरकरांनी मांडलं. पण सावरकर फक्त दुःख मांडून थांबत नाहीत तर 'बालविधवांना पुनर्विवाहाची संमती द्या' असं कवितेच्या शेवटी लिहितात. या कवितांमधून एकीकडे सामान्य जनांच्या दुःखामुळे हळहळणारे सावरकर आपल्याला दिसतात तर दुसरीकडे 'तुजसाठी मरण ते जनन । तुजवीण जनन ते मरण ।' असं 'स्वतंत्रतेचे स्तोत्र' लिहून स्वराज्याची स्वप्नं आणि अभिनव भारताची महत्वाकांक्षा बाळगण्याची शिकवण देणारे सावरकरही आपल्याला दिसतात. पुढे तानाजी मालुसरे व बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा लिहून इतिहासातून प्रेरणा घेण्याचा मंत्र सावरकर देतात. 

लंडनला शिकायला गेल्यावरही भरपूर काव्यलेखन सावरकरांनी केलं आहे. आपल्या चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, भावांना अटक झाली, परिवाराची वाताहात होत आहे. असं थोरल्या वहिनीच्या पत्रातून कळल्यावर सावरकर त्यांचे सांत्वन करतांना लिहितात 'अमर होय ती वंशलता । निर्वंश जीचा देवाकरिता ।' आपण देवकार्यासाठी आणि देशकार्यासाठी निर्वंश झालो तर आपण अमर आहोत हे लक्षात ठेवा. असं सांगून सावरकर आपल्या वहिनीला धीर देतात. पण स्वतःला धीर कोण देणार ? जेव्हा आपल्या प्रियजनांच्या व मातृभूमीच्या आठवणीने व्याकुळ होवून सावरकर म्हणतात 'ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ।' त्यावेळी ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर निरंजन पाल (बिपिन चंद्र पाल यांचा मुलगा) जर सावरकरांसोबत नसता तर कदाचित ही कविता आपल्याला ऐकायलाही मिळाली नसती. सर्व क्रांतिकारकांना देशासेवेची प्रेरणा देणारे सावरकर, जाहीरपणे क्रांतीची भाषा बोलणारे सावरकर, स्वतःचं दुःख समुद्राकडे एकांतात व्यक्त करतात. कारण दुःखाचा बाजार मांडून जगणाऱ्या लोकांपैकी सावरकर नाहीत. ही बाब आपण जाणली पाहिजे.

पुढे सावरकरांनी 'आत्मबल' ही कविता रचली. इंग्रजी जहाजातून निसटण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला. म्हणून आता इंग्रज आपला अमानुष छळ करणार हे कळल्यावर स्वतःलाच धैर्याचा पुरवठा करतांना सावरकर लिहितात -

'अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला
अट्टहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो'

'आत्मबल' कवितेतून आत्म्याचं गर्वगीत लिहून 'आत्मा अमर आहे' अशा प्राचीन हिंदू धर्माचं तत्वज्ञान आपल्या कवितेत मांडणारे सावरकर पुढे १९१९-२० दरम्यान अतिशय अशक्त होतात आणि अनेक महीने शय्येवर पडून घालवल्यावर पुन्हा मृत्यूशी संवाद साधतात -

'ये मृत्यो ये । तूं ये ! यावयाप्रती
निघालाचि असशिल जरी ये तरी सुखें !'

'मरणोन्मुख शय्येवर' या कवितेत मृत्यूला आपल्या जीवनाचा सार सावरकर सांगतात. त्यात जीवनातील ऋणांचा हिशेब देतात, प्रभाकराच्या जाण्याचं दुःख व्यक्त करतात परंतू सोबतच 'अभिनव भारत' म्हणजेच माझा पुत्र आहे असंही मृत्यूला सांगतात. शेवटी होणाऱ्या यातनांशी झगडणे हे देखील मानवाच्या कर्तव्यपालनाचा एक भाग आहे. असं सावरकर या कवितेत सांगतात. आधी यातना सहन करण्यासाठी 'आत्मबल' कवितेतून स्वतःचे धैर्य वाढवणारे सावरकर आणि नंतर 'मरणोन्मुख शय्येवर' या कवितेतून यातना सहन करणं कर्तव्यपालनाचा भाग आहे असं स्वतःला सांगणारे सावरकर असे दोन स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला दिसतात. शारिरिक व मानसिक स्थितीनुसार माणसाच्या विचार आणि तत्वांमध्येही बदल होत असतो ही बाब इथे प्रकार्षाने समोर येते. मरणोन्मुख शय्येवर, सप्तर्षी, जगन्नाथाचा रथ या कवितेतून परतत्वाचा स्पर्श लाभलेल्या एका प्रज्ञावान तत्वज्ञाचं दर्शन आपल्याला घडतं. मानवी जीवन, त्याचं सृष्टीशी असणारं नातं, त्याचा परमात्म्याशी असणारा संबंध, मानवी जीवनातील कर्मरहस्य, त्याचं जगतातील स्थान, त्याचं जन्म प्रयोजन असा तत्वज्ञानाचा विशाल पट या कवितांमधून सावरकर आपल्यासमोर उभा करतात.

मृत्यूला आव्हान देणारे सावरकर तुरुंगात असतांना 'कमला' हे दीर्घकाव्य सुद्धा लिहितात. पानीपत युद्धाच्या काळातील एका कथानकाचा आधार घेऊन 'कमला' काव्य लिहिल्या गेलं. 'कमला' काव्यातून सावरकरांच्या प्रतिभाविलासाचा प्रत्यय येतो.

'प्रतिपत्‌ चांदण्या येता व्योमी चंद्रकला जशी  
चंद्रिकेच्या प्रभाताच्या मिश्रणात उषा जशी'

बालपण आणि यौवन यांच्या सीमेवर असलेल्या कमलेचं वर्णन करतांना सावरकर रात्रीचं चांदणं आणि प्रभातीचा प्रकाश यांच्या मिश्रणात शोभणाऱ्या उषेची उपमा वापरतात. अशा अनेक श्रृंगारीक वर्णनांनी नटलेलं 'कमला' पुढे वीर रसातही रंगून जातं. मात्र 'कमला' या काव्यचा शेवट अतिशय नाट्यमय पद्धतीने होवून हे काव्य शोकांतिका ठरतं. अतिशय यातना आणि प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत असतांना सावरकरांनी हे काव्य रचलं. त्यामुळे 'कमला' हे दीर्घकाव्य म्हणजे सावरकरांच्या प्रतिभाशक्तीचा एक सुंदर असा आविष्कार ठरतो.

खरं तर सावरकरांच्या कविता म्हणजे जीवन जगण्याची पद्धतीच आहे. सर्व मानवी भाव-भावना आणि साहित्य रसांनी नटलेले सावरकरांचे काव्य म्हणजे इतिहास, साहित्य आणि तत्वज्ञान यांचा संगम आहे. सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची वाताहात होतांना आपण बघत आहोत. अशा स्थितीत आपलं मनोबल खचू न देता एक चांगलं जीवन जगण्यासाठी आणि मानवतेला जपण्यासाठी आपल्यातील सर्व भेद नष्ट करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं साहित्य अभ्यासणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. फक्त एक साहित्यप्रकार म्हणून नाही तर जीवन जगण्याची मार्गदर्शक पद्धती म्हणून आपण सावरकरांच्या कवितांचा अभ्यास केल्यावर आपल्या व्यक्तिमत्वाला निश्चितच सकारात्मकतेचा सुगंध प्राप्त होईल. शेवटी एवढच लिहितो की साहित्य आणि इतिहास या दोन विषयांना आपण आपल्या जीवनात व्यवसाय म्हणून किंवा छंद म्हणून तरी स्थान दिलं पाहिजे कारण हे दोन विषय मानवाला जगणं शिकवित असतात.

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८

Sunday, June 1, 2025

व्रतस्थ

खालील कथा रविवार, दि. १ जून २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या साप्ताहिक जनमंगलच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

व्रतस्थ

"मुंबईतील कामठीपूरा जिथे सकाळ-संध्याकाळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि नृत्यांगनांच्या मेहफीलीसाठी लोकांची रेलचेल असते. आता तिथे परत जाण्याचा योग आला. तो म्हणजे असा की आमच्या वृत्तपत्राच्या संपादक साहेबांनी मागील एक दीड वर्षात प्रसिध्दीस आलेली याच कामठीपूऱ्यातील एक नृत्यांगना, 'इरा' हिचा 'इंटरव्यू' घेण्यासाठी माझी निवड केली. खरे तर ही जबाबदारी माझ्यावर थोपवण्यातच आली होती. काही वर्षाआधी तिथे गेलो होतो व नंतर न जाण्याचा निश्चय सुध्दा केला होता. पण कामामुळे आता परत कामठीपूरा गाठावा लागत आहे."


"कामठीपुऱ्याकडे जाण्याआधी मी रिपोर्टरच्या कपडयातून एका सामान्य माणसाच्या कपडयात आलो. दाढी, केसं थोडे जास्तच वाढले असल्यामुळे जास्त काही करण्याची गरज भासली नाही. टॅक्सी केली आणि कामठीपूऱ्याचा रस्ता धरला. थोडयाचं वेळात तिथे पोहचलो आणि इराच्या मेहफीलीकडे निघालो. कोणी स्त्रिया दरवाज्यात उभ्या राहून पाहात होत्या. तर कोणी हात दाखवत होत्या. काही स्त्रिया कमरेवर हात ठेऊन पुरुषांसोबत सौदा करत होत्या. दोन्ही बाजूंनी छोट्या-मोठ्या खोल्या, मधातच लहानश्या गल्ली बोळ्या होत्या. भोग लालसेच्या तर कोणी नृत्यांगनांवर नोटा उधळण्याच्या उद्देशाने आलेल्या लोकांमधून मी इराच्या मेहफीलीकडे चालत होतो. इतर मुलींच्या किंवा स्त्रीयांच्या खोल्या होत्या पण इराचा मेहफीलीचा दरबारचं होता. दरवाज्यातच आतील अत्तर, उद्दत्त्यांचा सुगंध येत होता. मी दरवाजा ढकलला आणि आत शिरलो. आतमध्ये मोठा हॉल होता गोलाकार गाद्या, तक्तपोस टाकले होते. मध्यभागी मखमलीचा मऊ गालीचा टाकला होता. तिथेच ही इरा आपल्या कलेचे प्रदर्शन करुन रसिकांना मोहून टाकत होती. पण आज या नृत्य दरबाराचा रंग थोडा ओसरल्यागत झाला होता. मी आत पाय टाकणार तेवढ्यात माझा सहकारी नितीन मागून आला" "तू जेव्हा त्या इराचा इंटरव्यू घेशील तेव्हा तिचे फोटो आणि व्हिडीयो काढण्यासाठी मला संपादक साहेबांनी तुझ्या मागे पाठवले" असे त्यानी सांगितले. "आमच्या चाळीशीच्या जवळपास असणाऱ्या हुशार संपादक साहेबांना एका वेश्या वस्तीतील इरामध्ये इतका इंटरेस्ट का असावा ? हे आमच्या डोक्यावरुन चालले होते. म्हणून संपादक साहेबांनी जे सांगितले ते जास्त डोकं न चालवता करणे आणि या वस्तीतून लवकरात लवकर बाहेर पडणे, असे आम्ही मनाशी ठरवून आतमध्ये शिरलो"

"आतमध्ये अंधार होता तक्तपोस आणि गादयांवरील चादरीवर अजून वळी पडल्या नव्हत्या. तबकही पूर्णपणे भरुन तयार होते. त्यातील विडयाच्या पानाला रसिक श्रोत्यांच्या हातांचा स्पर्श होणे अजुन शिल्लक होते. तबला, पेटी, सतार सर्व वाद्य जणू वादकांची प्रतिक्षा करत होते. ऐन मेहफील रंगण्याच्या वेळी या नृत्य दरबाराचे असे चित्र पाहून मी आणि नितीन थोडे विचारातच पडलो. "का रे संजय आपण चुकीच्या वेळी तर इथे आलो नाही ना?" असा प्रश्न मला नितीनने विचारला. मी काही बोलणार तेवढ्यात आतमधून एक तरुणी बाहेर आली. आम्हाला बघून एकदम थांबली. "कोण तुम्ही ? आज इथे नाच गाणे बंद असतात साहेब ! उदया याल, आज काहीच भेटणार नाही इथे" असे ती आम्हाला म्हणाली. "नाही हो, आम्ही 'मुंबई जनमत' या वृत्तपत्रासाठी इराचा इंटरव्यू घेण्यासाठी इथे आलो आहे. मी नितीन आणि हा संजय तुम्हीच इरा आहात का?" नितीनने तिला असे विचारताच ती हसतचं म्हणाली "नाही हो साहेब मी रुपा आहे इराची मैत्रिण. इरा आतमध्ये आहे. या माझ्या सोबत" रुपा आम्हाला इराच्या खोलीत घेऊन गेली. तिथेही पण बाहेरच्या हॉल सारखेच वातावरण होते. त्या खोलीमध्ये सुगंधी मेणबत्यांचा मंद प्रकाश होता. लाल दिव्याचा लाल प्रकाश सर्व खोलीभर पसरला होता. खाली पैजण पडल्या होत्या. समोरच एका मोठ्या बिछान्यावर एखाद्या महाराणीने आराम करावा तशी इरा आपले अंग सैल टाकून तक्के आणि उश्यांना रेटून बसली होती. बाजूला मोगऱ्याचा गजरा पडला होता. इराचे लांब आणि मोकळे केस खाली झुलत होते. सडपातळ आणि लचकदार अंगाची, गोऱ्या वर्णाची, घारे डोळे असलेली इरा आपला नाजूक तळहात बिछान्यावर अंथरलेल्या मखमलीच्या चादरीवरुन फिरवत होती. तिचे डोळे पाणावलेले होते. माझी नजर तिच्यावर स्तब्ध झाली होती. तेवढ्यात रुपा इराला म्हणाली. "इरा दीदी हे दोन लोकं आले आहे तुझ्याकडे, तुझा इंटरव्यू घ्यायचा म्हणतात आहेत" "त्यांना समोर बसव, पाणी सरबत दे, मी येतेच" असे रुपाला सांगून इरा तिथून उठून दुसऱ्या खोलीत गेली"

"आम्ही समोर येऊन बसलो पाणी सरबत सुध्दा झाले. नितीन कॅमेरा सेट करु लागला. मी सुध्दा माझी प्रश्नांची यादी काढली. तेवढ्यात लाल रंगाची साडी परिधान केलेली इरा आमच्या समोरच्या तक्तपोसावर येऊन बसली. आम्ही तिला आमचा परिचय आणि इथे येण्याचे प्रयोजन सांगितले. "ठीक आहे. विचारा जे काही विचारायचे आहे तुम्हाला" असे ती म्हणाली. मी माझे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. नितीन कॅमेरा सांभाळत होता. इरा प्रत्येक प्रश्नावर तिचे अनुभव सांगत होती. इराच्या प्रत्येक उत्तरासोबत, तिच्या शब्दांमध्ये, चेहऱ्यावरच्या भावांमध्ये एका वेगळ्याच दुःखाची चाहूल भासत होती. तब्बल दीड तासाच्या प्रश्नोत्तरांनंतर "इरा तुम्ही आजच्या दिवशी मेहफील बंद का ठेवली आहे?" हा शेवटचा प्रश्न मी विचारला. माझा प्रश्न ऐकताच तिच्या डोळ्यातील दुःख तीव्र झाले आणि डोळ्यातच रोखून ठेवलेले आसवे अलगद तिच्या गालावर उतरले. "आपण काही चुकीचे तर विचारले नाही" असे क्षणभर मला वाटले. पण इराने या प्रश्नाचे उत्तर देण्यास सहमती दर्शवली आणि सांगायला सुरुवात केली. "चार वर्षा आधी याच जागी मी नृत्य करत होती. मेहफील रंगली होती. वादयांचा ध्वनी, पैंजणांची छनछन, मोगऱ्याचा सुगंध आणि या झुंबराच्या सोनेरी प्रकाशात मी नृत्य करत होती. रसिकजन विडयाचा आस्वाद घेत होते. ठरलेल्या वेळेवर मी नाच थांबवला, वादय थांबले आणि मेहफील संपली. आलेले सर्व लोक जायला लागले. मी सुध्दा पैंजण काढले व त्यांना नमस्कार केला. वादयांना नमस्कार केला आणि आत जायला लागली. तेवढ्यात "मी आत येऊ शकतो का ?" असा आवाज ऐकू आला. मी मागे वळून पाहिले तर दरवाज्यात पांढऱ्याशुभ्र कपडयांमध्ये एक अनोळखी व्यक्ती उभा होता. मी त्याला आतमध्ये बोलवले. तो एक टक माझ्याकडे पाहात होता. अतिशय देखणा, उंचपुरा तो तरुण माझ्या समोर येऊन उभा राहिला. "मला तुमच्यासोबत थोडे बोलायचे होते म्हणून सर्व लोक गेल्यावर आलो आहे" असे तो म्हणाला. "अहो साहेब, पहिले बसा आणि मग बोला जे बोलायचे आहे" असे मी सुध्दा त्याला म्हणाली तो खाली बसला मी त्याला पाणी दिले. पाणी पिल्यावर, "मी बरेच दिवसापासून तुम्हाला पाहात होतो. शेवटी आज हिम्मत केली आणि आतमध्ये आलो. मला तुम्ही मनापासून आवडता" असे त्याने म्हणताच मी हसायला लागली. "मला अनेक लोक दररोज हे वाक्य ऐकवतात तुम्ही पण त्यातलेच एक आहात वाटते" मी असे म्हणत असतांना तो माझ्याकडे पाहात होता. शांत बसला होता. "थोडा दाम वाढवा साहेब, घ्या हा विडा. उदया थोडे लवकर याल मेहफीलीला". "मी हसूनच असे बोलली आणि त्याला विडा दिला. त्याचा चेहरा उतरला होता. आता त्याच्या चेहऱ्यावर थोडी निराशा अवतरली होती. तो उभा राहिला आणि एक शब्दही न बोलता, विडा न घेता जसा आला होता तसाच परत निघून गेला"

"आकाशातून एखादा तारा तुटावा त्याचप्रमाणे तो अनोळखी व्यक्ती क्षणात या मेहफीलीतून बाहेर पडला. त्याने जातांना एक नजरही मागे वळवली नाही. तो या दरबारात आल्यापासून मी त्याचे निरीक्षण करत होती. तेच आता तो परत जातांना मला समजत होते. इथे येणाऱ्या सर्व लोकांच्या बुभूक्षीत नजरा माझ्या शरीरावर, पायापासून तर गळ्यार्पत असतात. परंतु तो अनोळखी व्यक्ती आल्यापासून तर परत जाईपर्यंत फक्त माझ्या डोळ्यांमध्ये पाहात होता. मी इथे दररोज लोकांसमोर नशेत असल्यासारखी नाचते. लोक माझ्यावर पैसे उधळतात. माझ्या अंगाला हात लावतात. वासनेनी भरलेल्या त्यांच्या नजरा नित्य माझ्या शरीराला टोचत असतात. ज्या ठिकाणी रोज शरीराचा व्यापार होतो. अब्रुची निलामी होते. अशा या दुशीत ठिकाणी प्रेमाचे शुध्द वारे घेऊन तो आला होता. या अपवित्र देहावर पवित्र प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी तो आला होता. जो पर्यंत त्याच्या या महान प्रेमाचा अर्थ मी जाणला तो पर्यंत तो अनोळखी माझ्या समोरुन निघून गेला होता. मी त्याला त्याचे नाव सुध्दा विचारले नव्हते. वेश्या वस्तीतील वातावरण आणि हा धंदा यामुळे आम्हाला कधी निर्मळ आणि पवित्र प्रेम दिसलेच नाही. परंतु जेव्हा ते माझ्या समोर आले तेव्हा मी त्या प्रेमाला ओळखण्यास व समजण्यास अपात्र ठरली. हाच तो दिवस आहे. याच दिवशी मी त्या अनोळखी व्यक्तीच्या वेडया प्रेमात काही वेळेसाठी का होईना पण सहभागी झाली होती. म्हणूनच आजच्या दिवशी इराचा दरबार इतरांसाठी बंद असतो. आजच्या दिवशी माझ्या अंगाला कोणाचाही हात लागत नाही. हा एक दिवस मी आणि माझी मेहफील व्रतस्थ राहून त्या अनोळखी व्यक्तीची वाट बघतो"

"एवढे बोलून जेव्हा इरा थांबली तेव्हा मी आणि नितीन सुध्दा सुन्न झालो होतो. आता आम्हाला पण ती मेहफील शांत वाटत होती. एखादया ध्यानस्थ साधूच्या चेहऱ्यावर जी शांतता असते. त्याच शांततेचा संचार त्या मेहफीलीत झाला होता. त्यानंतर जास्त काही न बोलता आम्ही परत 'मुंबई जनमत' च्या ऑफीसचा रस्ता धरला. ऑफीसमध्ये पोहोचल्यावर इंटरव्यूची सी.डी. आणि फोटो संपादक साहेबांकडे दिले आणि घरी जाण्यास निघालो"

"इंटरव्यू होऊन तीन दिवस झाले होते. मी संध्याकाळच्या मेहफीलीची तयारी करत होती. तेवढ्यात रुपा धावतच माझ्या खोलीत आली. "इरा दीदी त्या इंटरव्यू घेणाऱ्या दोघांपैकी एकजण आला होता. पेपर आणि लिफाफा माझ्या हातात देऊन परत गेला" मी पेपर उघडला तर 'मुंबई जनमत' च्या दुसऱ्याच पानावर माझा फोटो आणि पूर्ण मुलाखत छापून आली होती. रुपानी माझ्या हातातला पेपर घेतला आणि सर्वांना दाखवायला गेली. तेव्हा माझे लक्ष त्या पांढऱ्या पाकीटावर गेले जे पेपर सोबत आले होते. मी ते पाकीट उघडले आणि त्यातले पत्र काढले. त्या पत्रात फक्त चारच ओळी लिहील्या होत्या.

"हसून तू तेव्हा टाळले मला
मीही मागे फिरलो नाही
तुझ्याचसाठी व्रतस्थ राहिलो
दुसऱ्यांसाठी उरलो नाही

                     जयदेव पुरंदरे
                        संपादक,
                      मुंबई जनमत"

◆◆◆◆◆

© गंधार जयश्री विश्राम कुळकर्णी
संपर्क क्र. ९१५८४१६९९८

Friday, May 2, 2025

वक्तादशसहस्त्रेषु

निघाला होता एक प्रवासी
ध्येय त्याचे साहित्य नगरी
पुस्तकांची शिदोरी सोबती
शंभर पानांची भूक जबरी

भाषेवर प्रभुत्व मिळवून
शब्दांनाही गुलाम केले
छंदाचीच सवय करून
दहा पानं रोज लिहिले

उत्स्फूर्तपणे जे-जे सुचले
तेच त्यांचे काव्य झाले
कवितेच्या संसारात त्यांच्या
असोशी,रेघा,अंगारा जन्मले

जरी यशाचे स्वामी झाले
सोडीले नाही जन्मक्षेत्र
श्रोत्यांनीच करून पारख
ठरवले त्यांना सरस्वतीपुत्र

जरी दुःखाची झळ लागली
तरी सदानंदी जीवन जगले
दुःखालाही विषय मानून
दुःखावरही व्याख्यान दिले

सहवास तुमचा आज नाही
ही एकच माझी खंत ठरली
वक्तादशसहस्त्रेषुस दिलेली
कविताच माझी श्रद्धांजली

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८