Followers

Monday, June 15, 2020

आदर्श संपल्यावर...

काल दुपारी सिनेसृष्टीतील अतिशय चर्चीत आणि यशस्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी आली. सर्व देश या बातमीने हादरून गेला. सर्वांनी श्रद्धांजली द्यायला सुरवात केली. सोशल मीडियाच्या प्रत्येक माध्यमाचा वापर करून प्रत्येक व्यक्ती स्वतःचे दुःख व्यक्त करत आहे. काल ही विचित्र बातमी आल्यावर मी सुद्धा इतर लोकांप्रमाणे थोडा उदास झालो. दिवसभर फक्त त्याच्याशी संबंधीत बातम्या पाहात होतो. काही वेळानी मृतदेहाचे फोटो सुद्धा पाहिले. जो व्यक्ती अनेक युवकांचा आदर्श आहे, जो व्यक्ती स्वतःच्या सिनेमाद्वारे संपूर्ण देशाला प्रेरणा देतो, त्यानेच अश्याप्रकारे स्वतःचे जीवन संपवावे. अशी घटना पाहून जे प्रश्न निर्माण झाले, त्याचाच विचार करत मी पहाटे ५ वाजेपर्यंत जागा होतो.

आपण एखाद्या व्यक्तीला आदर्श का मानतो ? या प्रश्नाचे भरपूर उत्तरे मिळतील. एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्या विचारांशी जुळणारे असतात, जीवनातला संघर्ष, जीवनातले प्रसंग आपल्या जीवनाशी मिळते-जुळते असतात, एखाद्याची जीवन जगण्याच्या पद्धतीमुळेही आपण त्याला आदर्श मानतो, असे अनेक मुद्दे सांगता येतील. प्रत्येक व्यक्तीनुसार हे मुद्दे बदलू शकतात. आजच्या युगात 'एखाद्या व्यक्तीला आदर्श मानून स्वतःचे जीवन जगणे' ही बाब मोठ्या प्रमाणात आढळते. पण ज्या व्यक्तीला आपण आदर्श मानतो आणि प्रेरणा घेऊन जगतो, त्यानेच आत्महत्या केली तर पुढे काय ? हा प्रश्न परत निर्माण होतो. यामुळे तणाव वाढतो. म्हणून 'तणाव' सुद्धा इतर काही आजारांप्रमाणे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पसरणारा आजार आहे. असं आपण म्हणू शकतो.

आज आपण(यामध्ये युवक जास्त प्रमाणात) मित्र शोधायला बाहेर जातो, स्वतःच्या मनातल्या गोष्टी बोलायला सुद्धा बाहेरचे मित्र शोधतो, मग खरे मित्र कोण, निखळ मैत्री कोणाची, अश्या अनेक परीक्षा करून मित्र आपण बनवतो. 'बाहेरचे मित्र वाढले आणि घरातले संवाद कमी झाले' यामुळे सुद्धा तणाव वाढतो. असं मला वाटतं. संवाद कमी झाला आणि मनमोकळेपणाने व्यक्त होणे सुद्धा कमी झाले. त्याचा परिणाम म्हणून अशी एखादी आत्महत्या झाली की सगळे लोकं 'व्यक्त होण्याच्या' मुद्द्याला धरून भाषण द्यायला सुरवात करतात आणि काही दिवसांनी स्थिती परत 'जैसे थे' ! बाहेर मित्र शोधणे, मग मैत्रीमध्ये विश्वास पाहिजे, त्यासाठी मित्रांसोबत सहवास पाहिजे. या सर्व खटपटी करतांना आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे विश्वास, निरपेक्ष प्रेम आणि भरपूर सहवास असलेले दोन मित्र आपल्या घरातच असतात. ते म्हणजे आपले आई-वडील. आपल्याला तणाव असला की एकदा आई-वडीलांना सांगा. त्यांनी प्रेमानी डोक्यावरून फिरवलेल्या हाताच्या स्पर्शाने सुद्धा आपला तणाव कमी होतो. कितीही तणाव असला, वाईट परिस्थिती असली, वाईट विचार मनात आलेत, तरीही आपल्या लोकांसाठी जीवंत राहण्याचा आणि जीवन जगण्याचा आदर्श आई-वडीलांपेक्षा चांगल्याप्रकारे इतर कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे बाहेरचे आदर्श संपल्यावर सुद्धा घरातले आदर्श आपल्याला उपाय व प्रेरणा देऊ शकतात. फक्त आपण त्यांच्या पर्यंत गेलो पाहिजे.

© गंधार कुलकर्णी
दि. १५ जून २०२०

6 comments:

  1. छान लेख ✍️👌🌷

    ReplyDelete
  2. तुझा याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन मला आवडला असं बऱ्याचदा घडत कि आपण बाहेर सुख शोधतो पण खरे विश्वासू आपल्याला ओळखणारे आई बाबा हे जास्त जवळचे वाटतं नही हि आजची आधुनिक म्हणवणाऱ्या युवकांची खरी परिस्थिती आहे. तू त्यावर अगदी बोट ठेवलेस गंधार. असाच लिहीत रहा आणि आम्हालामार्गदर्शन कर. धन्यवाद मित्रा

    ReplyDelete
  3. खरे आहे!मित्रांपैकी पहिले हितचिंतक आणि खरे मित्र हे आई-वडिलच.💐👍

    ReplyDelete