Followers

Friday, July 10, 2020

देशमुख सर आणि त्यांचा 'भांजा'...

२५ जूनला माझा वाढदिवस झाला, पण २६ तारखेला सुद्धा खूप लोकांच्या शुभेच्छा येत होत्या. संध्याकाळी आईच्या मोबाईलवर एक कॉल आला, तो थोडा अस्वस्थ करणारा ठरला. आईचे बंधू आणि माझे मामा, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांना कँसर झाला आणि डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. ही गोष्ट कळल्यावर आई, बाबा आणि मी अस्वस्थ झालो होतो. काही सुचत नव्हते. त्याच अस्वस्थतेत आम्ही झोपायला गेलो, पण झोप येत नव्हती. डोळे बंद केले तर देशमुख सरांसोबतच्या आठवणी स्पष्ट दिसू लागल्या.

मी नुकताच १० व्या वर्गात गेलो होतो. देशमुख सर त्यावेळी प्राचार्य म्हणून आमच्या संस्थेच्या महाविद्यालयात रुजू झाले होते. कडक प्रेसचा शर्ट-पँट घालून प्राचार्य कक्षेत खुर्चीवर बसून आपले काम करत राहायचे. समोर १५-१६ खुर्च्या आणि त्यांच्या मोठ्या टेबलवर त्यांचा लाल पाषाणाचा गणपती ठेवलेला असायचा. कॉलेजमध्ये आल्यावर सर्वांना आवाज देत यायचे. प्राध्यापकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना रागवणारे आणि तितक्याच हक्काने जवळ घेणारे पहिलेच प्रचार्य मी बघत होतो. एखाद्या विद्यार्थ्याला एखादी गोष्ट समजावून सांगतांना लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवून देशमुख सर प्राचार्यांच्या भूमिकेतून क्षणातच मित्राच्या भूमिकेत येत असत. कॉलेजच्या ग्राउंडवर गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असतांना, मागे उभे असलेले देशमुख सर गमतीने म्हणायचे, "पायजो रे बा, गरीबाची गाडी आहे मागे". १० वी ची सराव परीक्षा झाली आणि माझा बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू झाला. "भांजे कितने परसेंट चाहिए १० वी में ?" देशमुख सरांनी विचारले. मी म्हणलो, "८० च्या जवळपास". तेव्हा सर मला थोडे रागवतच बोलले, "आपले प्रत्येक वाक्य अगदी स्पष्ट असायला हवे भांजे. स्पष्ट बोलण्यावरून आपले विचार आणि आत्मविश्वास लोकांना दिसत असतो. नेहमी स्पष्ट बोलायचं." १० वी, ११ वी, १२ वी आणि बी.ए. च्या सर्व परीक्षांचे पेढे देशमुख सर अतिशय आनंदाने घेत असत. पहिला पेढा ते स्वतः मला देत आणि नंतर माझ्या हातून स्वतः घेत असत. अमरावती विद्यापीठात सर कुलसचिव पदावर गेले. त्या नंतर जेव्हाही मी विद्यापीठाच्या कोणत्याही कार्यक्रमाला गेलो, की देशमुख सर "भांजे-भांजे" म्हणत जवळ घ्यायचे. इतर लोकं तेव्हा आश्चर्याने बघायचे. २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात घरच्या एका कार्यक्रमाला देशमुख सर आले होते. कॉलेजच्या काही वादांमुळे मी थोडा अस्वस्थ होतो. तेव्हा सुद्धा नेहमीप्रमाणे जवळ घेत मला म्हणाले, "भांजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. प्रतिक्रिया देण्यापेक्षा क्रिया करण्यावर भर द्यायचा. अशी क्रिया करायची की समोरच्या व्यक्तीला आपण लक्षात राहिलो पाहिजे." देशमुख सरांच्या प्रत्येक वाक्यात खूप ऊर्जा असायची. ते प्रत्येकाला इतक्या जिव्हाळ्याने जवळ घेत होते, की नाराज व्यक्ती आनंदीत व्हायची आणि रागात असलेली व्यक्ती शांत होऊन जायची. इतकी प्रभावी 'जादू की झप्पी' तर मुन्नाभाईला सुद्धा भेटली नसेल, जी मला अनेकवेळा देशमुख सर द्यायचे. देशमुख सरांची आणि माझी शेवटची भेट १७-१८ जानेवारी २०१९ ला झाली. "बेधडक आणि बिनधास्तपणे राजासारखी प्रत्येक गोष्ट करायची. तुला खूप समोर जायचं आहे" मी सरांना नमस्कार केला. "२४ जानेवारीला मुंबई विद्यापीठात कुलसचिवाच्या खुर्चीवर बसतो आहे" असं सांगून, जाण्याआधी माझे आजोबा दादासाहेब तारे यांचा आशीर्वाद घेतला, आई-बाबांची भेट घेतली आणि नंतर गाडीत बसले.

त्यानंतर कधी फोनवरून तर कधी whatsapp वर सरांशी बोलणं व्हायचं. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही देशमुख सरांशी संपर्कात होतो. २ जुलैला संध्याकाळी सर झोपले असतांना, संजय काकांनी त्यांचा एक फोटो काढून आम्हाला पाठवला. शरीरात इतका त्रास होत असतांनाही देशमुख सर अतिशय शांत झोपलेले होते. नंतर काही तासांनी सर गेल्याचे कळले. त्यारात्री आम्हाला कोणालाच जेवण गेलं नाही. आपले आयुष्य खूप विचित्र आहे. या आयुष्यात आपल्याला काही असे लोकं भेटतात, की जे अत्यंत कमी वेळात आपल्या जवळचे होऊन जातात. त्यांच्या बोलण्याचा, वागण्याचा आपल्यावर खूप लवकर परिणाम होत असतो. देशमुख सर सुद्धा अश्या लोकांपैकी एक होते. अतिशय बेधडक, बिनधास्त आणि राजासारखे जीवन जगणारे व्यक्तिमत्व. शेवटच्या ४-५ दिवसातही "आता हे दिवस सुद्धा जगून पाहू" असे देशमुख सरांचे वाक्य होते. इतका संघर्ष, इतकी मेहनत करून सत्ता आणि संपत्ती मिळवावी आणि जेव्हा खरं आयुष्य जगायला सुरवात करावी, तेव्हा आयुष्यानेच असा दगा करावा. अश्यावेळी ५४ वर्षाचं आयुष्य सुद्धा क्षणभंगूर वाटायला लागतं. आपल्या जीवनात येणारे लोकं परागकणांप्रमाणे असतात. काळाच्या हवेसोबत ते निघून जातात, पण मागे सुगंधासारख्या आठवणी ठेवून जातात. अजयमामांच्या जाण्याने 'परागकणांचे हवेतील क्षणिक वास्तव्य' आणि 'माणसाचे क्षणभंगूर जीवन' या दोन विषयांची तुलना करण्याकडे मी वळल्या गेलो. कॉलेजच्या ऑफिसमधील अजयमामांचा गणपती ३ जुलैला आम्ही घरी घेऊन आलो. अजयमामा जिथेही असतील तिथून नक्कीच त्यांच्या गणपतीकडे आणि 'भांज्या'कडे लक्ष ठेवत असतील.

© गंधार विश्राम कुलकर्णी
दिनांक - १० जुलै २०२०

1 comment:

  1. Harshoo kaka BoshamJuly 11, 2020 at 5:33 AM

    Very touching, Gandhar. Well expressed.

    ReplyDelete