लॉकडाउन सुरू होऊन जवळ-जवळ पाच महीने होत आहेत. परीक्षांचे निर्णय घड्याळाच्या पेंडुलम सारखे लटकलेले आहे. रोज सिनेमा बघणे सुद्धा कंटाळवाणे झाले. जे छंद आहेत जसे चित्र काढणे, कविता लिहिणे, वाचन करणे यासाठी मनस्थिती आणि वेळेचं गणित जुळणं अतिशय आवश्यक असतं. अश्यावेळी बोर होत असलं की आजीकडे जाणं, वाड्यात टाइमपास करणं आणि याचाही कंटाळ आला तर थोड्यावेळ अभ्यास करणं अशी दिनचर्या सध्या झाली आहे. गेल्या ३-४ दिवसापासून माझ्या खूप चांगल्या मित्रांपैकी एक असलेल्या माझ्या मामीसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची चर्चा सुरू होती. पण दिवस निश्चित होत नव्हता. शनिवार-रविवार जनता कर्फ्यू असतो. शनिवारचा पूर्ण दिवस घरात घालवला आणि रविवारी सकाळी मी मामीकडे गेलो. "कुठे जायचं ?" याच प्रश्नावर आमची गाडी थांबली होती. शेवटी ठरलं की दुपारी ३ वाजता कुठेतरी जायचं. घड्याळ पाहिले तर १ वाजला होता, मी लगेच मामीकडून घरी गेलो आणि जेवण करून मी व आई तयार झालो.
दुपारी ३ वाजता दोन मोठ्या गाड्या घेऊन आम्ही सात लोकं मेळघाटाच्या रस्त्याला लागलो. अजूनही कोणत्या ठिकाणी आम्ही जात होतो, हे कोणालाच माहीत नव्हतं. मी पण "कुठे जायचं ?" हा प्रश्न बाजूला केला आणि सातपुड्याचा घाट, गर्द हिरवे जंगल आणि झाडांच्या वरच्या भागाला झाकणाऱ्या धुक्याचा आनंद घ्यायला लागलो. एखादे चांगले ठिकाण दिसले की गाडी थांबवायची आणि फोटो काढून पुढे जायचं. कितीतरी महिन्यांपासून घरात असल्यामुळे मेळघाटातल्या ओलसर बोचऱ्या हवेचा त्वचेला विसर पडला होता. पण आता त्या हवेचा आनंद फक्त त्वचा नव्हे, तर मन सुद्धा घेत होतं. ३-४ ठिकाणी थांबून फोटो काढले. एका ठिकाणी सोबत आणलेला आणि थोडा कोमट झालेला चहा घेतला. त्यावेळी भूरभूर येणाऱ्या पावसामुळे तो कोमट चहासुद्धा आनंद देत होता. पुढे एका छोट्या मंदीराजवळ थांबून सोबत आणलेला कच्च्या चिवड्याचा आस्वाद घेतला.
संध्याकाळचे ६ वाजले होते. आम्ही परत यायला निघलो. पहाडी भागात लवकर अंधार पडतो, हे माहीत असल्यामुळे आम्ही स्वतःचा मोह आवरून घराकडे निघलो. उजेडात जे धुकं मनाला आनंद देत होतं, आता अंधारात तेच गाडी चालवतांना त्रास द्यायला लागलं. अंधार, धुकं आणि त्यात गाडीचे लाइट्स यामुळे समोरचा रस्ता बरोबर दिसत नव्हता. शेवटी त्या धुक्यातून आम्ही बाहेर आलो आणि गावात पोहोचलो. १५-२० मिनीटांत आम्ही घरी पोहोचणार होतो. पण आता "कुठे जायचं ?" आणि "आम्ही कुठे गेलो होतो ?" या दोन प्रश्नांचे उत्तरे माझ्याकडे होते. कधी-कधी काहीच नियोजन न करता बाहेर फिरून येणे, यातूनही खूप आनंद मिळतो. मन फ्रेश होतं, ऊर्जा मिळते आणि शांतताही मिळते. आजही मला कोणी विचारलं, "तुम्ही रविवारी कुठे गेले होते ?" तर मला ठिकाण सांगता येणार नाही. फक्त एवढच सांगता येईल, "फ्रेश होण्यासाठी गेलो होतो मेळघाटात कुठेतरी..."© गंधार वि. कुळकर्णी
दि. १० ऑगस्ट २०२०
आनंददायी प्रवास अचानक मिळालेला आनंद अविस्मरणीय असतो . पुढील सहलीकरिता शुभेच्छा ! फोटो पाठविणे .
ReplyDelete