जीवनात आपल्याला अनेक असे लोकं भेटतात की जे नात्याने आपल्या जवळ असतात पण परिस्थिती आणि घटनाप्रसंगांमुळे त्यांचा सहवास आपल्याला कमी लाभतो. अशाच काही लोकांपैकी एक म्हणजे माझी आजी ननाई. ननाईचं माहेरचं नाव 'कमल शेष' होतं. नंतर कुलकर्णी परिवारात आल्यावर ती 'रजनी कुलकर्णी' झाली. पुढे 'रजनीआई' आणि नंतर नातवांच्या बोबड्या उच्चारांमुळे 'रजनीआई' या शब्दाला 'ननाई' असं एक निराळं रूप लाभलं. तेव्हापासून रजनीआईला घरातले सर्वजण 'ननाई' म्हणू लागले. खरं तर मी ननाईसोबत फारच कमी राहिलो. महालक्ष्मीचे तीन दिवस, उन्हाळ्यातले दोन-तीन दिवस आणि काही कार्यप्रसंग असले तर तेव्हा तीन-चार दिवस. असे वर्षभरात आठ-नऊ दिवस मी ननाईसोबत घालवायचो. ननाईच्या या सर्व आठवणी शब्दातून मांडण्याचं प्रयोजन म्हणजे ५ जून २०२१ रोजी मध्यरात्री ननाई आम्हाला कायमची सोडून गेली. तेव्हापासून एखादा सिनेमा पडद्यावर यावा तसे ननाईसोबत घालवलेले सर्व क्षण डोळ्यांपुढे येऊ लागले.
महालक्ष्मीसाठी आम्ही यवतमाळच्या घरी पोहोचलो की हॉलमध्ये पलंगावर बसलेली ननाई "आला का रे बेटू !!" असं म्हणून जवळ घ्यायची. तुळशीसमोर ठिपक्यांची रांगोळी काढायची, महालक्ष्मीसाठी घरातल्या पांढऱ्या फुलांचा हार करायचा असला की तिचा ठरलेला पिवळा दोरा सुईतून ओवून मागायची. एकदा मी आणि ननाई बंगईवर बसलो होतो. नानाकाका कुंडीतल्या छोट्या झाडांना पाणी देत होते. तेव्हा ननाई मला म्हणाली,"आपण लावलेल्या झाडांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतली पाहिजे." आतापर्यंत तिने जे-जे झाडं लावले ते सर्व जगले. त्यामागे हेच कारण असावं. ननाईचं झाडांवर खूपच प्रेम होतं. अचलपूरच्या घरी लावायला सुद्धा तिने अनेक रोपं दिले होते. माणसांवर आणि झाडांवर समसमान प्रेम करणारे ननाईसारखे लोकं फार दुर्मिळ असतात. यवतमाळहून निघतांना घरच्या झाडाचे आंबे, पपई व घरी केलेला चिवडा नेहमी सोबत द्यायची. रोज प्राणायाम करायची, शेवटपर्यंत तिचे दोन्ही तळहात पायाच्या बोटांना टेकत होते. मात्र गेल्या एक-दीड वर्षापासून हृदय कमकुवत झाल्यामुळे ननाईचा व्यायाम बंद झाला होता.
ननाईला प्रत्येकाच्या कला-गुणांचं खूप कौतुक होतं. सगळेजण एकत्र जमले की "चला होऊ द्या न काही तरी" असं म्हणून ती प्रत्येकाला गायला लावायची. माझ्या कविता आवडीने वाचायची. आपले मुलं, सुना, नातवंड सगळे एकत्र डोळ्यासमोर बघितल्यावर स्वतःचं शारिरीक व मानसिक दुःख विसरून जायची. दोन वेळा पडल्यामुळे ननाईच्या एका पायात रॉड होता तर दुसऱ्या पायात बॉल होता. उठ-बस करतांना तिला त्रासही व्हायचा. तरी हसतमुखाने सर्वांच्या कार्यप्रसंगात ती सहभागी व्हायची. माझे आजोबा, सर्वात मोठे काका आणि आत्त्या यांचं अकाली जाणं ननाईने बघितलं, बाबांचा जीवघेणा अपघात आणि त्यांचा त्रास बघितला. हे सर्व बघून सुद्धा ननाई खचली नाही. जणू ती सर्वांना जीवन जगणं शिकवत होती. अतिशय लहान वयात ननाई राधास्वामी संप्रदायाशी जुळली. तेव्हापासून तिने राधास्वामी संप्रदायाच्या आचार-विचारांचे पालन केले. आपला धर्म व संस्कृती जपण्यासाठी आवश्यक ते सण-उत्सव ननाईने केले पण कोणत्याच गोष्टीचं अवडंबर तिने केलं नाही आणि दुसऱ्याला करायलाही लावलं नाही. धर्म आणि कर्माचा योग्य समतोल साधून ननाई सुखी व समाधानी जीवन जगली.
५ तारखेला ननाई गेली. तेव्हा काकांनी आम्हाला तिने लिहून ठेवलेलं एक पत्र दाखवलं. २०१२ साली लिहिलेल्या त्या पत्रात ननाईने लिहिलं होतं,"मी पूर्ण समाधानी आहे. माझी तेरवी, श्राद्ध काही करू नका. आप्तमंडळींना प्रेमाने जेऊ घाला. मला नेत्रदान, अवयवदान, देहदान करायची आहे." ८७ वर्षाचं वय आणि कोरोनाचं वातावरण बघता ननाईची नेत्रदान, देहदानाची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण बाकी सर्व तिच्या इच्छेप्रमाणे झालं. आज अनेक लोकं आधुनिक असण्याचा आव आणतात. मात्र फक्त पाश्चिमात्य होऊन बसतात. १९३४ सालचा जन्म असूनही ननाई विचारांनी अतिशय आधुनिक होती. 'अगदी साधं-सरळ जीवन जगून सुद्धा माणूस सुखी व समाधानी होऊ शकतो' ही शिकवण ननाई आम्हाला देऊन गेली. ननाई शेवटपर्यंत चालती-फिरती होती आणि हसतमुखाने गेली, या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे. मात्र आता यवतमाळच्या घरी गेल्यावर "आला का रे बेटू !!" असं म्हणून जवळ घेणारी ननाई तिथे नसणार, याचं दुःख नेहमीकरीता राहील...
© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८
छान व्यक्त केलं आहेस, गंधार. तिच्या अशा लाघवी आणि दिलदार व्यक्तिमत्वामुळेच ती सर्वांनध्ये प्रिय झाली होती.
ReplyDeleteआयुष्यातील एक अविस्मरणीय पर्व आहे रजनी आत्या.
ReplyDeleteबालपणापासून निरागस प्रेम करणारी व्यक्ती.
माझ्या पुत्र भारतीचे या पहिल्या पुस्तकाची पहिली प्रत तिने कौतुकाने मुद्दाम " विकत" घेतली. ती नोट मी कित्येक दिवस पाकिटात जपून ठेवली होती. पुण्यात बसमध्ये गर्दीत एका विकृताने ती पाकिटासह लंपास केली.पण आठवण कायम राहील.
विनम्र श्रद्धांजली.
काका, ती प्रत अजूनही बाबांकडे यवतमाळला आहे. मी ती वाचून खूपच प्रभावित झालो होतो. ननईमुळे मला ते पुस्तक वाचायला मिळाले हे आत्ता कळले.
Deleteअतिशय मर्मस्पर्शी ... आज्जी आणि नातवाचे नाते म्हणजे दूध आणि सायीच्या नात्या सारखे असते. आज्जी च्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कालौघात भरून येईलच ...परंतू आता आपली आज्जी नाही आणि ती "आला का रे बेटू" अशी प्रेमळ हाक पुन्हा कानावर येणे नाही हे शल्य मात्र राहील ... पण कालाय तस्मैनमहा या उक्तींनुसार चालत राहणे हेच आपल्या हातात असत. परमेश्वर आज्जी ला सद्गती प्रदान करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना ... नमस्कार.
ReplyDelete