Followers

Tuesday, November 16, 2021

यवतमाळला जातांना...

यावर्षी आमच्या घरचा महालक्ष्मी उत्सव सप्टेंबरमध्ये न होता दिवाळीमध्ये होईल असं ठरलं. त्याचं कारण म्हणजे कुलकर्णी परिवाराच्या कुंडलीत आणि शरीरात बसलेले कोरोना व डेंगू हे दोन राहू केतू. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आम्ही दिवाळी, पाडवा आणि पाडव्याच्याच दिवशी भाऊबीज आटोपून सहा नोव्हेंबरला सकाळी यवतमाळसाठी निघालो. खरं तर सकाळी सात वाजता निघायचं ठरलं होतं, पण पहाटे-पहाटे स्वतःचं बोचरं अस्तित्व दाखवणाऱ्या थंडीमुळे अंगावरील पांघरूण काढण्याची हिम्मत झाली नाही. परिणामी, आम्ही सकाळी नऊ वाजता घरुन निघालो. रस्त्यात पेट्रोल भरणे, हवा चेक करणे अशा खटपटी शिल्लक होत्याच.

शेवटी एकदाचा अचलपूरचा नाका सुटला आणि चांगला सपाट रस्तासुद्धा सुटला. त्यानंतर गाडीमधल्या प्रत्येक घटकाचा ''खडखड-खडखड'' असा आवाज होईल अशा रस्त्याचा प्रवास आम्ही यवतमाळला पोहोचेपर्यंत केला. रस्ता म्हणजे अगदी दिवाळीच्या अनारस्यांप्रमाणे खडबडीत होता. "वेगात गाडी चालवून तर दाखवा !" जणू असा चॅलेंज तो रस्ता आम्हाला करत होता. इयरफोन लावूनसुद्धा गाणे बरोबर ऐकू येत नव्हते. त्यामुळे मी गाणे ऐकणं सोडून बाहेरची हिरवळ, सकाळी तारांवर एका रांगेत बसलेले पक्षी, झाडांमधून येणारी सूर्यकिरणे या सर्वांचा आनंद घ्यायला लागलो.

खराब रस्त्यामध्ये थोडा-थोडा चांगला रस्तासुद्धा होता. एक-दोन वेळा तर गाडी चांगलीच उसळली. शेवटी आम्ही एकदाचं यवतमाळ गाठलं. गाडी घरासमोर थांबली आणि पूर्ण प्रवासभर सुरू असलेले सर्वच आवाज बंद झाले. सगळ्यांसोबत दोन दिवस मजेत घालवल्यानंतर आम्ही अचलपूरसाठी निघालो. यावेळी खराब रस्त्याचा विचारसुद्धा डोक्यात नव्हता. कारण यवतमाळला जातांना याच खराब रस्त्याने एक चांगली गोष्ट मला शिकविली होती. आपण कितीही घाई केली, कितीही वेगात गाडी चालविली तरीही ध्येयप्राप्तीचा प्रवास आवश्यक तेवढा वेळ घेईलच. मग तो प्रवास अचलपूर ते यवतमाळचा असो किंवा जीवनाचा असो. मार्ग कधी खराब असेल तर कधी चांगला असेल पण सातत्याने चालत राहणं हे आपलं काम आहे. शेवटी आपण फक्त प्रवास करणारे प्रवासी आहोत. ध्येय ठरवून चालत राहणं आपलं काम आहे. मात्र ध्येयावर नेऊन थांबविणारा कोणी तिसराच करत असतो. या आणि अशा सर्वच गोष्टी, तत्व किंवा विधानं आपल्याला ठाऊक असतात पण आपण त्यांना समजून घेत नाही म्हणूनच सगळा गोंधळ होतो.

© गंधार वि. कुलकर्णी
दि. १६ नोव्हेंबर २०२१
संपर्क : ९१५८४१६९९८

7 comments: