Followers

Tuesday, February 15, 2022

एक अपूर्ण भेट...

 १७ डिसेंबर २०२१ आईच्या पुस्तकाचं प्रकाशन पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या हातून झालं. त्याही पूर्वीपासून लतादीदींच्या भेटीचा योग जुळवून आणण्यासाठी आई-बाबांचे प्रयत्न सुरूच होते. "दीदींच्या भेटीचा प्रयत्न करूया" असं पंडितजीसुद्धा बोलले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात लतादीदींना दवाखान्यात भरती करण्यात आलं. अनेक लोकांप्रमाणे आम्हीसुद्धा देवाकडे दीदींचे आयुष्य मागत होतो. पण देवालासुद्धा आता लतादीदीचं गाणं प्रत्यक्ष ऐकायचं असावं आणि ६ फेब्रूवारी २०२२ रोजी सकाळी दीदी गेल्याची बातमी आली. बातमी ऐकून आम्ही तिघंही अस्वस्थ झालो. त्यादिवशी घरातला टी.व्ही. पुर्ण वेळ सुरु होता. फक्त जेवायचं म्हणून जेवण झालं. टी.व्ही.वर लतादीदींच्या आठवणी आणि गाणे दाखवणं सुरु होतं. संध्याकाळी दीदींच्या अंत्यविधी होत असतांना पंडितजींचा उदास चेहरा आणि भीरभीरती नजर पाहून आम्हालासुद्धा अनाथ झाल्यासारखं वाटत होतं. तो दिवस गेला. रात्री झोप येत नव्हती. "एक भेट तरी व्हायला हवी होती" असं माझच मन मला म्हणत होतं. त्यारात्री खूप वेळ झोप लागलीच नाही.

दीदीचं पार्थिव शरीर शिवाजी पार्कमध्ये नेत असतांना हजारो लोकं रस्त्यावर उभे होते. तेवढेच लोकं तिच्या गाडीच्या मागेही चालत होते. अनेक लोकांनी फुलांचा वर्षाव केला. सर्वच लोकांचे डोळे त्यावेळी पाणावलेले होते. "मृत्यू असावा तर असा !" मी मनातच बोललो. गायक म्हणून लतादीदीबद्दल काही लिहायचं किंवा बोलायचं म्हंटलं तर 'भारतरत्न लता मंगेशकर' या तीन शब्दांशिवाय पुढे जाता येत नाही. यातच लतादीदीची श्रेष्ठता आहे. आपण लतादीदीला 'गानसम्राज्ञी' असंही म्हणतो. परंतु 'गानसम्राज्ञी' होण्याआधी दीदी एक व्यक्ती म्हणूनही कशी श्रेष्ठ होती ? या प्रश्नावर आपण चिंतन करायला हवं. ऐन तारुण्यात व्रतस्त आणि संघर्षमय जीवन जगून दीदीने स्वतःचा परिवार पुन्हा उभा केला. स्वतःसोबत तिने सर्व भावंडांनाही समोर आणलं. मोठ्या बहिणीला आपण आईचं स्थान देत असतो, त्याचं कारण समजून घ्यायचं असेल तर दीदीचं जीवन आपण अभ्यासलं पाहिजे. सिनेमासाठी पार्श्वगायन करतांना दीदी पायात चप्पल घालत नसे. कारण ती गायन करत नसून संगीतकलेची पूजा व उपासना करायची. एखादं कार्य उत्तमप्रकारे करण्यासाठी ते कार्य करणारा आधी समाधानी होणं आवश्यक असतं. दीदी स्वतःला समाधान मिळेपर्यंत गायनासाठी पूर्ण शक्ती लावायची. स्वतःच्या कार्याबद्दल प्रेम, निष्ठा आणि समर्पणभाव हे गुण दीदीकडून आत्मसात करायला हवे. लतादीदी व्यक्तीपेक्षा कार्याला श्रेष्ठ मानायची त्यामुळेच अनेकवेळा तिने वयाने लहान पण कार्याने मोठे असलेल्या लोकांचेसुद्धा आशीर्वाद घेतले आहे. दीदीजवळ असलेली ही नम्रता बघून तिचा मोठेपणा कळतो.

अतिशय प्रतिकुल परिस्थिती बघितल्यामुळे दीदीला सदैव हसत राहण्याची सवय झाली असावी. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर शांतता किंवा हास्य हे दोन भाव नेहमी असायचे. लतादीदीने अनेक लोकांशी मनाचं नातं जोडलं होतं. सचिन तेंडुलकर व राज ठाकरे यांना दीदी मुलं मानत. माझे आजोबा डॉ. राम शेवाळकर यांना दीदी 'बाबा' म्हणून आवाज देत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीदीने भाऊ मानलं होतं. अशा अनेक लोकांना दीदीचं प्रेम लाभलं. फक्त मोठ्या पदावर असलेले किंवा असामान्य लोकं नव्हे तर अतिशय सामान्य लोकांनासुद्धा संपूर्ण मंगेशकर कुटुंबाकडून प्रेम आणि वात्सल्य लाभलं आहे. दीदीची  देशभक्ती सर्व जगाला कळेल असे अनेक प्रसंग घडले आहेत. अनेकवेळा दीदीने स्वतःच्या कार्यक्रमांचे पैसे खेळाडू, सैनिक आणि पीडितांसाठी दिले आहेत. दीदीने स्वतःसाठी आलेले अनेक गाणे नवोदित गायकांकडे पाठविले. जगातील सर्व घडामोडींची माहिती लतादीदी घेत असत. शेवटपर्यंत लतादीदी तरुण गायकांना 'फेसबूक' आणि 'ट्विटर' वरून प्रोत्साहन व आशीर्वाद देत होती. संपूर्ण जगासाठी असामान्य असलेली लतादीदी वैयक्तीक जीवनात आपल्या सर्वांप्रमाणे सामान्य जीवन जगत होती.

मला संगीतकलेचे ज्ञान नाही, पण गाणे ऐकायला आवडतात आणि लोकांच्या जीवनकथांचे वाचन करण्याची आवड आहे. त्यामुळे लतादीदीबद्दल जे थोडं वाचलं आणि विविध मुलाखतीतून ऐकलं त्यावरील चिंतन या लेखामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ६ फेब्रूवारी २०२२ ला लतादीदी देहरूपाने आपल्यातून निघून गेली, पण 'लता मंगेशकर' या नावाची कधी न संपणारी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण सृष्टीत पसरली आहे. प्रत्येकजण गायन करू शकत नाही, परंतु लतादीदीच्या व्यक्तिमत्वातील विविध गुण आत्मसात करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. लतादीदीचे अजरामर गाणे आपल्याला जगण्यास मदत करतात, पण लतादीदीच्या जीवनातील प्रसंग आपल्याला जगणं शिकवू शकतात. २००६ साली राम आजोबा(डॉ. राम शेवाळकर) यांच्या अमृतमोहोत्सवी कार्यक्रमामध्ये आम्हाला लतादीदीचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्याची संधी लाभली. त्यानंतर विविध मुलाखती व लेखांमधून लतादीदीची अपूर्ण भेट झाली. जर आता लतादीदीला प्रत्यक्ष भेटता आलं असतं तर ही अपूर्ण भेट पूर्णत्वास गेली असती आणि दीदीकडून बरच काही शिकायला मिळालं असतं.

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

2 comments:

  1. अतिशय अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या भाषेत लेखन केलेले आहे.
    सुंदर👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुरेख लेख

    ReplyDelete