Followers

Saturday, March 26, 2022

हिमगाथा : भाग १

बैतुलवरून प्रवास करणारे :

मी : गंधार कुलकर्णी
ऋषीदादा : मामेभाऊ
सर्वेश : मामेभाऊ
राधा : मावसबहिण

पुण्यावरून प्रवास करणारे :

अथर्व : मामेभाऊ
आराध्य : मामेभाऊ
इंद्रायणी : मावसबहिण
अदितीताई : मावसबहिण
मयुरेशदा : जावई
चिन्मय : मयुरेशदाचा भाऊ
प्रथमेश : मयुरेशदाचा भाऊ

कोरोनाकाळात लिहिलेल्या जवळपास माझ्या सर्वच लेखांची सुरवात 'कोरोना' या शब्दाने झाली आहे. याला तुम्ही कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्तितीमुळे आलेलं फ्रस्ट्रेशन सुद्धा म्हणू शकता. महाविद्यालयीन कामं, अभ्यास आणि जणू मानवी शरीराचाच एक भाग बनलेलं मास्क यामुळे मी फार कंटाळलो होतो. "कुठे तरी बाहेर फिरायला जायचं" अशी चर्चा घरात तीन-चार महिन्यापासून सुरु होती. असं सर्व असतांना एका दुपारी ऋषीदादाचा कॉल आला आणि त्याने हिमाचल प्रदेश टूरविषयी सांगितलं. "मार्च महिन्याचं शेड्यूल पाहून सांगतो" असं त्याला सांगून मी कॉल बंद केला. कारण आतापर्यंत असे अनेक प्लान्स बनले पण काहीना काही कारणांमुळे माझं जाणं होत नव्हतं. अगदी जवळ असलेल्या मेळघाटात सुद्धा मी जावू शकलो नव्हतो. पण यावेळी पहिल्या कॉलपासूनच माझी टूरवर जाण्याची इच्छा होती आणि सर्व कामं सोडून स्वतःला वेळ देण्याची गरज सुद्धा वाटत होती. आई-बाबांना या टूरविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी पण "हो जावून ये" असं म्हंटलं आणि माझं टूरवर जाण्याचं पक्क झालं. तेव्हापासून दर एक-दोन दिवसाआड ऋषीदादा, सर्वेश आणि माझी टूरबद्दल चर्चा होवू लागली, सामानाची यादी बनू लागली, नवीन खरेदी सुद्धा झाली. बॅग भरणं सुरु झालं आणि कपड्यांच्या आधी मी डायरी बॅगमध्ये ठेवली. 'हिमगाथा' लिहिण्याच्या विचाराचा जन्म तेव्हाच झाला होता. शेवटी निघण्याचा दिवस उजाडला. १३ मार्च या दिवशी दुपारी बैतुल स्टेशनवरून आमची गाडी होती. सकाळी ११च्या सुमारास आम्ही घरून निघालो.

बैतुल रस्त्याला लागल्यावर पिवळ्या गवतामुळे आणि निष्पर्ण झाडांमुळे उन्हाचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवत होतं. पण त्यात अधून मधून लाल-गुलाबी-केशरी झालेले पळसाचे झाडं पाहून थोडं बरंही वाटत होतं. गाडीत आम्ही चौघं सामानसहित एकदम फिटोफिट बसलो होतो, त्यामुळे मान आणि डोळ्यांशिवाय इतर कोणत्याही प्रकारची हालचाल अशक्य होती. दुपारी १च्या सुमारास आम्ही बैतुलला पोहोचलो. स्टेशनवर गाडी यायला वेळ असल्यामुळे ऋषीदादाने घरून आणलेला धापड्यांचा डबा उघडला आणि तेव्हापासून आमच्या पूर्ण प्रवासातला एक अतिशय महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे 'दणकून खाणं' सुरू झाली. थोड्यावेळात गाडी आली. आम्ही गाडीत बसलो आणि दिल्लीचा प्रवास सुरु झाला. सामान घेऊन आत गेलो तर दोन्ही बर्थवर एक बाई आणि एक माणूस झोपले होते. आमचे दोन मिडल आणि दोन अप्पर असे बर्थ असल्यामुळे आम्हाला लगेच आडवं व्हावं लागलं आणि प्रवासात सर्वजण बसून मस्त पत्ते खेळण्याचा आमचा बेत सुद्धा आडवा झाला. शेवटी मी आणि ऋषीदादा अप्पर बर्थवर गेलो आणि खाली झोपलेल्या दांपत्त्याचे बंद डोळे उघडण्याची वाट बघू लागलो.

स्टेशनवर काढलेला फोटो लगेच स्टेटसवर टाकून "आम्ही टूरसाठी निघालो" ही गोष्ट जगजाहीर केली. एक-दीड तास गेल्यावर आम्हाला खाली बसायला भेटलं. मगाशी खाली झोपलेलं दांपत्त्य जागं झालं होतं. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांचं अडनाव खंडेलवाल आहे हे कळलं. चेहऱ्यावरून अतिशय धार्मिक दिसणारे खंडेलवाल काका-काकू मथुरेला जात होते. काहीवेळानंतर आम्ही दरवाज्याजवळ जावून एक-दोन चांगले फोटो घेतले आणि आपण प्रवास करतोय अशी जाणीव स्वतःलाच करून दिली. खंडेलवाल काका-काकू आमच्यासोबत फार कंफर्टेबल नव्हते हे माझ्या लक्षात आलं. मात्र आम्ही त्यांच्यासोबत बऱ्यापैकी कंफर्टेबल होतो. गाडीतल्या इतर लोकांचं निरीक्षण करण्यात आम्ही मग्न असल्यामुळे कोणी कितीही अनकंफर्टेबल असला तरी आम्ही कंफर्टेबल होतो. संध्याकाळी खंडेलवाल काका-काकूचे इतर नातेवाईक मधल्या एका स्टेशनवरून बसले. दुपारभर शांत असलेले खंडेलवाल काका-काकू संध्याकाळी एकदम बोलायला लागले. तेव्हा मला दोन पीढीतला फरक जाणवला. फेसबूक आणि व्हाट्सएप यामुळे इतक्या अनोळखी लोकांशी आपण जुळतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी बोलायला आताच्या तरुणांना फार वेळ लागत नाही. तेच आधीच्या पीढीतले लोकं एकदम कोणाशी बोलत नाही. स्वभावातील फरक सुद्धा असू शकतो. यावर विचार करत असतांना ऑर्डर केलेलं जेवण आलं, त्यामुळे सगळे विचार बाजूला सारून आम्ही जेवणावर फोकस केला.

रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा गाडीचे चाक आणि रुळाच्या घर्षणाचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. मी काही गाणे ऐकले. नंतर दिवसभरातले मुद्दे डायरीत लिहिले आणि डोळे बंद करणार तेवढ्यात घोरण्याचा आवाज आला. खाली बघितलं तर काही लोकांची स्पर्धा सुरू झाली होती. शेवटी मी इयरफोन कानातच लावून ठेवले आणि झोपण्याचा प्रयत्न केला. सकाळी ७ वाजता आम्ही दिल्ली स्टेशनला पोहोचलो. अतिशय भव्य नव्या दिल्लीचं स्टेशन आणि त्यापेक्षा जास्त तिथे असलेली लोकांची गर्दी. आम्ही स्टेशनच्या बाहेर येताच टॅक्सीवाल्यांनी आम्हाला घेरलं होतं. ज्या मास्कचा मला अचलपूरात कंटाळ आला होता, आता ते मास्क लावणे आवश्यक झाले होते. आम्हाला लोकं चालतांना दिसत नसून धावतांनाच दिसत होते. आमच्याप्रमाणे जो चालत असेल तो दिल्लीचा रहिवासी नाही असं मी मानत होतो. दिल्ली स्टेशनसमोर एका रस्त्याच्या छोट्या बोळीमध्ये गुड डे नावाचं हॉटेल होतं. आम्ही चालत-चालत हॉटेल शोधत होतो. जेव्हा ती छोटी बोळ दिसली तेव्हा "हॉटेल कसं असेल ?" असा एक चिंताजनक प्रश्न मनात निर्माण झाला. कारण त्या बोळीत एकावेळी एकच माणूस जावू शकेल एवढीच जागा होती. आम्ही समोर-समोर चालत गेलो आणि हॉटेल बघितलं तेव्हा बरं वाटलं. बोळीच्या मानाने हॉटेल खूपच चांगलं होतं.

हॉटेल गुड डे मध्ये आमच्या तीन खोल्या होत्या. खोलीत जावून मोठ्या बेडवर आम्ही सामान ठेवलं नव्हे आपटलच ! अंघोळ वगैरे होईपर्यंत आमचे बाकीचे भाऊलोकं (पुण्यावरून निघालेले) पोहोचले. सर्वांचं एकामेकांना बिलगणं झालं आणि आम्ही दिल्लीतले प्रसिद्ध छोले-कुल्चे खायला निघालो. सकाळी बघितलेली गर्दी आता अजूनच वाढलेली वाटत होती. पुन्हा गल्ल्या-बोळीतून फिरत-फिरत आम्ही छोले कुल्चे मिळतात त्या ठिकाणी पोहोचलो. 'राधेश्याम छोले कुल्चे' अशी मोठी पाटी लागली होती. ते छोटं हॉटेल लोकांनी खचाखच भरलेलं होतं. जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून लोकं छोले कुल्चे खात होते. छोले म्हणजे काळ्या चण्याची झणझणीत उसळ आणि कुल्चे म्हणजे मोठ्या आकाराची पुरी पण त्यात आतमध्ये पनीर किंवा चीज लावून बनवतात. इतक्या दिवसांपासून चालू असलेल्या भाकरी, भाजी आणि वरणाच्या डायटचा या प्रवासात पूर्णत: विसर पडणार आहे हे पहिल्याच दिवशी असा भयंकर नाश्ता केल्यावर मला जाणवलं. पोटभर छोले कुल्चे आणि त्यावर मोठ्या कुल्लड़भर लस्सी पिल्यावर "आता संध्याकाळपर्यंत काहीच खायचं नाही" असं आम्ही सर्वांनीच ठरवलं. नाश्ता झाल्यावर आम्ही मेट्रो स्टेशन पर्यंत चालतच गेलो. मेट्रोमधून प्रवास करतांना जितका आनंद होतो, त्यापेक्षाही जास्त आनंद मेट्रो स्टेशनवरील स्वच्छता आणि नियमांचं पालन करणाऱ्या लोकांना पाहून होतो. मेट्रोतून उतरल्यावर "पहिले कुठे जायचं ?" अशी चर्चा सुरू होती. आम्हाला बाजूला 'दिल्ली पब्लिक लायब्ररी' दिसली आणि सर्वात आधी तिथेच आम्ही गेलो.

लायब्ररीसमोर फोटो काढले आणि आत शिरलो. "विजिट के लिए आए है" असं सांगितल्यावर तिथल्या माणसाने आम्हाला लायब्ररीचं प्रत्येक दालन दाखवलं. अलीबाबासमोर पूर्ण खजाना असावा त्याप्रमाणे माझ्यासमोर पुस्तकं होती. १९५१ साली स्थापन झालेल्या या लायब्ररीच्या दिल्लीत चार शाखा आहेत. भारतात प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत या लायब्ररीत येते. दिल्लीत कुठेच लाभणार नाही अशी शांतात त्या लायब्ररीत आम्हाला लाभली. फिरते ग्रंथालय, लहान मुलांना वाचनाची सवय लागावी म्हणून एक वेगळी चळवळ असे विविध उपक्रम ही लायब्ररी घेत असते. "टूरचे ९ दिवस इथेच घालवावे." असाही विचार आम्ही केला होता. शेवटी पुस्तकांच्या खूप जास्त मोहात न पडता आम्ही तिथून लाल किल्ल्याकडे निघालो. लाल किल्ला आणि समोर चांदनी चौक रोड होता. आता इथेच आमचा राहिलेला दिवस जाणार होता. लाल किल्ला लोकांसाठी बंद असल्यामुळे आम्ही बाहेरूनच काही फोटो काढले. तिथेही दिल्ली दर्शन करवून देणारे गाडीवाले आमच्याभोवती गर्दी करतच होते. लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा दिसला आणि आम्ही सगळं विसरलो. आम्ही भरभरून तिरंग्याला बघितलं. वाऱ्याच्या मिठीत जावून नृत्य करणारा तिरंगा बघून एक वेगळा आनंद होत होता.

त्याच रस्त्यावर समोर जैन मंदीर होतं. त्यानंतर हिंदू मंदीर आणि त्यानंतर गुरुद्वारा होता. एकाच रस्त्यावर तीन वेगवेगळे धार्मिक स्थळं आम्ही बघितले. त्यापैकी आम्ही गुरुद्वारामधे सर्वाधिक वेळ घालवला. गुरुद्वारात गेल्यावर दर्शन केलं आणि थोडावेळ तिथेच बसलो. दिव्यांचा झगमगाट, स्वच्छता, सतत सुरू असलेलं अतिशय सुंदर भजन आणि अतिशय नम्रपणे सगळ्या सेवा देणारे लोकं. मनाला प्रसन्नता आणि समाधान देणारा हा अनुभव घेवून आम्ही पुढे 'पराठेवाली गली'कडे निघालो. तिथे पोहोचल्यावर पराठ्यांच्या सुगंधामुळे "संध्याकाळपर्यंत काहीच खायचं नाही" हा आमचा निर्णय बदलला आणि तिथे आम्ही भेंडी, मिर्ची आणि मिक्सवेज असे तीन वेगवेगळे पराठे खाल्ले. इतकं खाल्ल्यावर चालणं अशक्य असल्यामुळे तिथून गाडीकरून आम्ही पुन्हा हॉटेलला आलो आणि आराम केला. संध्याकाळी दिल्लीवरून मनालीला जाण्यासाठी वॉल्वोबसचं बुकिंग होतं. 'मजनू का टीला' या जागी आमची बस येणार होती. संध्याकाळी आम्ही जरा लवकरच हॉटेल सोडून 'मजनू का टीला'कडे निघालो. कोणासाठीच न थांबणारा दिल्लीचा ट्राफिक बघत आम्ही झिंगबसमध्ये बसलो आणि मनालीसाठी निघालो. दिल्लीत फिरतांना अनेकजण कुतुब मीनार, लाल किल्ला, जंतर मंतर वगैरे बघतात. पण दिल्लीचा आणि दिल्लीच्या लोकांचा अनुभव घ्यायचा असेल तर गल्ल्या-बोळीतील दिल्ली बघावी. 'ये जवानी है दिवानी' सिनेमातील रणबीर कपूरच्या डायलॉगप्रमाणे दिल्ली माणसाला धावणं, उडणं, पडणं शिकविते पण थांबणं शिकवित नाही. असं मला वाटतं.

बाकी गोष्टी पुढील भागात...

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८
दि. २७ मार्च २०२२

16 comments: