खीरगंगा ट्रेक
तोशच्या कॅंपवरून आम्ही सकाळी खीरगंगा ट्रेकसाठी निघालो. कॅंपसाईट सोडल्यावर आमचा पहिला स्टॉप बारशायनी गावाजवळ होता. त्या ठिकाणी आम्हाला ट्रेकिंगसाठी आवश्यक असलेले बूट आणि काड्या घ्यायच्या होत्या. बूट आणि काड्या घेतल्यावर तिथे डिपॉझिट म्हणून आमच्यापैकी चारजणांचे बूट दुकानात ठेवून घेतले. आता सगळ्यांच्या जवळ एक-एक लाकडी काडी आणि पाठीवर बॅग होती. वेगवेगळ्या टुरिस्ट स्पॉटवर बिझनेस कसा होऊ शकतो हे आम्ही बघत होतो. साधी लाकडी काडी जी कोणत्यातरी झाडाची तोडलेली असेल त्याचे आम्हाला भाडे द्यावे लागत होते. आता खीरगंगाच्या ट्रेकला सुरुवात झाली. गगन नावाचा मुलगा आमचा गाईड होता. एकोणीस वर्षाचा हा मुलगा साठ-सत्तर लोकांच्या ग्रुपला घेऊन खीरगंगाचा ट्रॅक करणार होता. कसोलच्या कॅंपवर भेटलेले एक-दोन मुलांचे ग्रुप आम्हाला ट्रेकला जाताना पुन्हा भेटले. साठ-सत्तर लोकांमध्ये आमच्या अकराजणांची ओळख व्हावी म्हणून आम्ही होळीचे रंग चेहऱ्यावर लावण्याचा ठरवलं. त्याप्रमाणे सर्वेश आणि आराध्यने सर्वांना रंगाचा एक-एक टिक्का आणि गालावर दोन दोन बोट लावले. आम्ही सर्वांनी आर्मी कलरच्या टी-शर्ट घालण्याचा ठरवलं होतं. त्यामुळे आमच्यापैकी कोणी मागे राहिला तर दुरूनच ओळखणं शक्य होत होते. तसेच अथर्वने सगळ्यांना आवाज देण्यासाठी 'मनी हिस्ट' या प्रसिद्ध वेबसीरिजमधल्या पात्रांचे नावं दिले होते. आमच्यापैकी अथर्व, प्रथमेश आणि ऋषीदादा यांना चालण्याची खूप सवय होती. अथर्व आणि प्रथमेश तर पट्टीचे ट्रेकर्स होते आणि ऋषीदादाला मेळघाटात २०-२० किलोमीटर रोज चालण्याची सवय होती. या तिघांच्या तुलनेत आम्ही ट्रेकिंगसाठी फारच नवीन होतो. त्यामुळे त्या तिघांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आम्ही पुढे-पुढे जात होतो. चालत असताना वाटेत दिसणाऱ्या हिमाचली केसाळ कुत्र्यांना अथर्व गोंजारत होता.
जस-जसे आम्ही वर चालत होतो तस-तसे रस्त्याचे रूपांतर पायवाटेत होत होतं. ट्रेक पूर्ण करता येईल की नाही ? वरचं तापमान कसं असेल ? तापमान आपल्याला सहन होईल की नाही ? टेंटमधे राहता येईल की नाही ? असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन आम्ही एक-एक पाऊल पुढे टाकत होतो. सुरुवातीला तर ऋषीदादा आणि अथर्व यांच्यात पुढे जाण्याची स्पर्धा सुरू होती. कधी-कधी तर ते गाईडच्यासुद्धा समोर जात होते. समोरचा रस्ता गाईडला विचारून ते पुढे जाऊन आमच्यासाठी थांबत होते. हळूहळू आमच्यातील उत्साहाचं प्रमाण कमी होऊन थकव्याचं प्रमाण वाढत होतं. आम्ही मनालीत होतो तेव्हाच अथर्वने आम्हाला ट्रॅकमध्ये येणाऱ्या समस्यांची पूर्वकल्पना दिली होती. आपल्याला किती थकवा येऊ शकतो ? चालतांना कोणत्या समस्या येऊ शकतात ? हे सर्व त्याने आधीच सांगितलं होतं. त्यामुळे चालताना अथर्वचा प्रत्येक शब्द आम्हाला आठवत होता. धूळ आणि ऊन यामुळे पाऊल टाकणे कठीण होत होते. या सर्व गोष्टीची कल्पना अथर्वने आम्हाला दिली होती. त्याने सांगितलेली एक गोष्ट मला जास्त लक्षात राहिली ती म्हणजे "पहिला एक तास तुम्हाला वाटेल की आपण कशालाच या ट्रेकला आलो, तेव्हाच आपल्याला आपली पूर्ण शक्ती लावायची आहे. त्यानंतर आपल्या शरीराला सवय होऊन जाईल आणि नंतर चालणं कठीण वाटणार नाही." आम्ही एक-एक पाऊल समोर टाकत होतो पाठीवर बॅग असल्यामुळे टी-शर्ट मागून पूर्ण भिजली होती. आमच्या पावलांचा आवाजा सोबत पार्वती नदीच्या पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. पहाडातल्या आणि जंगलातल्या नद्या रात्री फार भयावह वाटतात मात्र सूर्यकिरणांचा त्यांना स्पर्श होताच अतिशय सुंदर दिसतात. कसोलच्या कॅंपवर भयावह वाटणारी नदी आता अतिशय सुंदर दिसत होती. स्वच्छ पांढरं शुभ्र पाणी खरोखरच खीरीसारखं दिसत होतं. दगडांना चिरुन निघालेले छोटे-छोटे झरे जागोजागी दिसत होते. नदी पार करण्यासाठी असलेला एक लाकडी अरुंद पूल बघितल्यावर अंगावर रोमांच उभे झाले. चालत असताना आम्हाला छोटे-छोटे महादेवाचे मंदिर दिसत होते. खरंच हिमाचल म्हणजे देवभूमी ! इथल्या लोकांची भगवान शंकरावर नितांत श्रद्धा आहे.
या ट्रेकमधला आमचा पहिला महत्वाचा स्टॉप म्हणजे रुद्रनाग होता. सत्तरजणांचा ग्रुप म्हटलं की काही लोकं समोर, काही लोकं मागे अशी आमची स्थिती होती. त्यामुळे आम्ही रुद्रनागला पोचल्यावर इतर लोकं येईपर्यंत त्या ठिकाणी थांबलो. सत्तरजणांचा ग्रुप होता त्यामुळे ठराविक अंतरावर एका ठिकाणी सर्वांना एकत्रित येणे गरजेचे होते. मागे राहिलेले लोकं येईपर्यंत आम्ही तिथे काही फोटो काढले आणि त्यानंतर पुन्हा सत्तरजणांचा ग्रुप पुढे चालायला लागला. दुपारी साडेचारच्या सुमारास आम्ही नाकथानला पोहोचलो त्या ठिकाणी लिंबूपाणी, चहा बिस्किट घेतल्यावर पुन्हा पुढे चालायला लागलो. पुन्हा थंडी जाणवायला लागली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी बॅगमधले स्वेटर काढले नाकथान वरून ट्रेकचा अंतिम स्पॉट सहा किलोमीटर अंतरावर होता आणि त्या सहा किलोमीटर पैकी शेवटचे दोन ते अडीच किलोमीटर अगदी उभी चढाई होती. परंतु आता पायांना सतत चालण्याची सवय झाली होती त्यामुळे थकवा येत नव्हता. जेवढे आम्ही वर चढत होतो तेवढेच आजूबाजूचे दृश्य अधिक सुंदर दिसत होते. ते निसर्ग सौंदर्य पाहून आम्हाला वर चढण्यासाठी ऊर्जा मिळत होती. हवेत एक बोचरा गारवा आला होता. त्या थंड हवेमुळे मला विदर्भातल्या बोचऱ्या थंडीची आठवण आली. अंधार पडत होता आणि त्यासोबतच वाढत असलेली थंडी यामुळे आमचा चालणं अधिक कठीण होऊ लागलं होतं. सगळेच एकमेकांचा उत्साह वाढवत होते "one step at a time" असं म्हणून सगळेजण समोर जात होते. त्यामुळे मागे असलेल्यांचा पण उत्साह वाढत होता. पुढे आम्ही अजून एका ठिकाणी थांबलो. तिथे एक छोटा ब्रेक घेतला आणि आम्हाला प्रेरक ठरणारी एक गावातली बाई भेटली. अथर्व तिच्याशी बोलत होता. तिच्याशी बोलल्यावर आम्हाला कळलं की कॅंप साइटवर तिचं एक छोटं कॅन्टीन आहे आणि रोज कॅन्टीनचं सामान वर नेण्यासाठी ती बाई रोज हा पहाड आपल्या पायांनी तुडवते. आमच्यासाठी जो ट्रेक होता ते म्हणजे या बाईचं दैनंदिन काम होतं. जे आम्ही एक दिवस करणार होतो ते काम ही बाई रोज करत होती. स्वतःच्या मोठ्या मुलाला शाळेत पाठवून लहान मुलाला सोबत घेऊन पहाड चढणारी ही बाई आमच्या पूर्ण ग्रुपसाठी प्रेरक ठरली. तिच्याशी बोलल्यावर आम्ही आमच्या ट्रेकमधल्या सर्वात कठीण टप्पा चढण्यासाठी सज्ज झालो आणि पुढे निघालो. शेवटच्या दोन किलोमीटरची चढाई पार करण्यासाठी आमची पूर्ण शक्ती पणाला लागणार होती आणि आम्ही ती लावली. एकदाचा शेवटचा दगड चढलो आणि खीरगंगाच्या शिखरावर पाय ठेवला. शिखरावर आल्यावर प्रत्येकाला आपल्या हृदयाचे ठोके अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते. आम्ही एका ठिकाणी बसलो आणि समोरचा निसर्ग पाहू लागलो.
सूर्य मावळत असल्यामुळे भगवं, पिवळं, निळं झालेलं आभाळ खीरगंगा शिखरावर आमचे स्वागत करत होतं. तो धुलीवंदनचा दिवस होता आणि आम्ही रंग खेळण्याआधी निसर्गच रंग खेळला आहे असं त्या आभाळाकडे पाहून वाटत होतं. कितीतरी वेळ आम्ही फक्त त्या आभाळाकडे बघत होतो अनेक रंगाने सजलेलं आभाळ, त्यात बर्फानी माखलेले पर्वत, सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि त्यात असलेले आमचे टेंट इतकं सुंदर दृश्य पाहून आमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात नकळत अश्रू तरुन गेले. सकाळपासूनचा थकवा एका क्षणात नष्ट झाला. त्यानंतर आम्ही टेंटमध्ये जाऊन बसलो. एक-दिड तास मनसोक्त गप्पा केल्यावर खीरगंगाचं वैशिष्ट्य असलेला गरम पाण्याचा झरा पाहायला गेलो. साठ ते सत्तर पायऱ्या चढून गेल्यावर जाऊन बघतो तर तिथे खूप गर्दी झाली होती. त्यामुळे आम्ही फक्त गरम पाण्यात पाय टाकून बसलो. गरम पाण्याने पाय शेकले जात होते, त्यामुळे तिथून उठण्याची इच्छा होत नव्हती. बाहेरच्या बोचऱ्या थंडीमध्ये नैसर्गिक गरम पाण्याचा शरीराला होणारा स्पर्श अधिक हवाहवासा वाटत होता. काही वेळानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो आणि पुन्हा कॅम्प साईट वर आलो. "शेकोटीची तयारी सुरू आहे" असं तिथल्या व्यवस्थापकाने सांगितल्यावर आम्ही पटापट चांगल्या जागा बळकावल्या. तिथे डीजे सुद्धा सुरू होता. पण त्यावर आम्हाला हवे तसे गाणे वाजत नव्हते. थोड्यावेळ ते गाणे सहन केल्यानंतर ऋषीदादाने सूत्र स्वतःच्या हातात घेतले आणि पुष्पा सिनेमातल्या गाण्यांवर आम्ही सगळे नाचायला लागलो. ऋषीदादाचा नाच पाहून सगळे अवाक झाले आणि आमच्यासोबत येऊन नाचायला लागले. पुष्पा सिनेमातील 'सामी सामी' गाण्याने तर वेगळाच समा बांधला ! आम्ही जेवायला बसलो तेव्हा ऋषीदादाच्या नाचण्याने प्रभावित झालेले बरेच लोकं आमच्याशी येऊन बोलत होते. आराध्यला तर राजस्थानी, पंजाबी, केरळी असे दोन-तीन मित्रही भेटले. ती पौर्णिमेची रात्र होती, बसल्या बसल्या कविता लिहावी असा तो चंद्र अतिशय सुंदर व आकर्षक दिसत होता. अशा धमाकेदार पद्धतीने पूर्ण दिवस घालवल्यावर आम्ही आपापल्या टेंटमध्ये झोपायला गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच उठून खीरगंगाच्या गरम पाण्याकडे गेलो. तिथे जाऊन मनसोक्त अंघोळ केली. त्यावेळी तिथली पौराणिक कथाही आम्हाला समजली. गणपती, कार्तिकेय, महादेव आणि पार्वती यांची ती पौराणिक कथा आहे. त्या कथेमुळेच ही जागा इतकी प्रसिद्ध आहे. गरम पाण्यात चांगलं वाटत होतं, परंतु बाहेर ऑक्सिजन अतिशय कमी असल्यामुळे चालताना आणि बोलताना सुद्धा खूप दम लागत होता. सकाळची तिथली शांतता आणि प्रसन्नता दैवी स्वरूपाची होती. खाली उतरल्यावर आमचा परतीचा प्रवास सुरु होणार होता. त्यामुळे सकाळी सर्व तयारी करून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. उतरतांनाच्या सूचना अथर्वने सगळ्यांना आधीच दिल्या होत्या. त्यामुळे न थांबता सर्वजण खाली उतरत होते. खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा आमचा गाईड गगन एका विशिष्ट अंतरापर्यंत आमच्यासोबत होता. त्यानंतर आम्ही स्वतःहूनच उतरायला लागलो. गेल्या चोवीस तासापासून आम्ही कोणीच घरच्यांशी बोललो नव्हतो. त्यामुळे खाली उतरत असताना जिथे नेटवर्क मिळेल तिथून आधी घरच्यांना फोन करायचा असा आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे नेटवर्क मिळाल्यावर सर्वांनीच आपापल्या घरी कळवलं. खाली उतरतांना आमच्या सर्वांच्याच चेहर्यावर कधी न मिळणारा आनंद आणि समाधान होतं. "आपण अद्वितीय आणि अविस्मरणीय अनुभव सोबत घेऊन चाललो आहोत" अशी भावना सर्वांचीच होती. मात्र सर्वांपैकी आमच्या तीन बहिणींचा आनंद जास्त असेल कारण साठ-सत्तरजणांच्या पूर्ण ग्रुपमध्ये फक्त पंधरा-सोळा मुली होत्या आणि त्यातही इंद्रायणी, राधा व अदितीताई इतर मुलींपेक्षा जास्त सक्रिय होत्या. राधा तर प्रथमेश आणि ऋषीदादाच्या बरोबरीने चढत होती. येताना आम्ही साडेतीन तासातच खाली उतरलो आमच्या गाडीचा ड्रायव्हर ज्ञान गाडी घेऊन आम्हाला आधी सोडलं त्याच ठिकाणी उभा होता. आम्ही सर्वजण गाडीत बसलो आणि 'हर हर महादेव'चा गजर करून परतीचा प्रवास सुरू केला. ज्ञान आम्हाला कुल्लूच्या स्टॉप पर्यंत सोडणार होता.
बाकी गोष्टी पुढील भागात...
© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८
Followers
Friday, April 22, 2022
Thursday, April 21, 2022
हिमगाथा : भाग ४
तोशचा कॅंप
कसोलची पहाट लक्षात राहण्यासारखी होती. रात्रभर टेंटमधे बल्ब सुरु असल्यामुळे मी चश्मा लावून झोपलो होतो. त्यामुळे झोप बरोबर झालीच नव्हती. पहाटे आम्ही टेंटच्या बाहेर आलो तर सर्वत्र रक्त गोठविणारी थंडी होती. न कळत आमच्या दातांचा सांगीतिक कार्यक्रम सुरु झाला. एखाद्या चेन स्मोकरच्या तोंडातून सिगरेटचा धूर निघावा, त्याप्रमाणे आमच्या तोंडातून वाफ निघत होती. त्या थंडीमुळे माझं डोकं दुखायला लागलं आणि नाक, कान थंड पडले. अजून सूर्योदय व्हायचा होता. सूर्याच्या प्रकाशात अतिशय सुंदर दिसणारी कसोलची नदी पहाटे नकारात्मक आणि भीतीदायक वाटत होती. खळ-खळ पाण्याचा आवाज नकोसा वाटत होता. आम्हाला तयारी करून कसोलचा कॅंप सोडायचा होता आणि तोशच्या कॅंपवर जायचं होतं. आम्ही सगळेजण फ्रेश झालो आणि आपापल्या बॅग घेऊन स्टोअर रूमच्या समोरच्या ग्राउंडवर तयारी करायला लागलो. फुटपाथवर एखादा सामान विकणारा बसावा, त्याप्रमाणे आम्ही सगळेजण आपापल्या बॅग उघडून इतरांची पर्वा न करता तयारी करत होतो. 'आपल्याला बघून कोण काय विचार करेल ?' असा प्रश्न सुद्धा आम्हाला तेव्हा पडला नव्हता. खरंतर ट्रिप सुरू झाल्यापासून आम्ही फक्त आमच्या अकरा जणांची व्यवस्था कशी चांगली होऊ शकेल याचाच विचार करत होतो. इतर लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण कसा या ट्रिपचा आनंद घेऊ शकू याचाच विचार आणि प्लॅनिंग आम्ही करत होतो. कसोलचा कॅंप सोडल्यावर आम्हाला तोश या ठिकाणी जायचं होतं. तोशचा कॅंप म्हणजे आमचा आराम करण्याचा दिवस होता. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला खीरगंगाच्या ट्रेकसाठी निघायचं होतं. त्यामुळे कसोलचा कॅंप सोडण्याच्या वेळी आम्ही कासवाच्या गतीने पॅकिंग करत होतो.
तयारी होईपर्यंत नाश्त्याचे टेबल लागले. आमची पॅकिंग झाली आणि आम्ही नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन नाश्ता करायला लागलो. त्याचवेळी तिथे साठ-सत्तर पायऱ्या उतरून एक छोटासं कुटुंब आलं. ६५ च्या जवळपास असलेला एक म्हातारा माणूस जो फक्त वर-वरूनच म्हातारा दिसत होता. त्याची पत्नी आणि मुलगा, सून व नातू कसोलच्या ट्रीपवर आले होते. त्या माणसाकडे पाहून आम्ही अंदाज लावत होतो की हा माणूस रिटायर्ड मिल्ट्री ऑफिसर असावा. फॉर्मल पॅन्ट, टी-शर्ट, खाली स्पोर्ट्स शूज घातलेला हा म्हातारा माणूस कसोलला कसा आला ? आम्ही हाच विचार करत होतो. कारण कसोल-तोष या जागा फॅमिली लायक नाहीत, असा आमचा समज होता. कदाचित आमच्याप्रमाणेच हा माणूस सुद्धा खूप जास्त लोकांचा विचार न करता आपली ट्रीप एन्जॉय करणाऱ्या लोकांपैकी असावा. ६५ वर्षाच्या या तरुणाकडे पाहून आम्हालाच प्रेरणा मिळत होती. नाश्ता करत असताना आमचं मराठी बोलणं ऐकून ते कुटुंब स्वतः आमच्याशी बोलायला लागलं. आपल्या भाषेचे लोकं कुठेही भेटले की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो आणि आपण स्वतःहून त्या लोकांशी बोलायला लागतो, हा आमचाही अनुभव होता. या टूरमध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी चार-पाच मराठी भाषिक भेटत गेले. थोड्यावेळ त्यांच्याशी बोलून आम्ही आपलं सामान घेऊन कॅंप सोडण्यासाठी निघालो. कसोलला आलो तेव्हा साठ-सत्तर पायऱ्या सामानासहित उतरतांना विशेष काही वाटलं नाही. परंतु आता त्या पायर्यांकडे पाहून 'इतक्या पायऱ्या कशा चढायच्या ?' हा प्रश्न प्रत्येक पायरीवर आम्हाला दिसत होता ! तरीही आपापल्या दोन-दोन बॅग उचलून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली.
मी अर्ध्या पायर्या चढलो आणि दम लागला म्हणून एका ठिकाणी थांबलो. तेव्हा समोरून एक बाई तिच्या लहान मुलाला कडेवर घेऊन पायर्या उतरत होती. माझ्यापासून दोन पायऱ्या वरती असतांना तिचा तोल जाऊ लागला. मी तिच्या एका हातातलं सामान आणि लहान मुलाला माझ्याजवळ घेतलं. "आप पहले उतर जाइये" असं म्हणून तिला एक दोन पायऱ्या खाली उतरू दिलं आणि नंतर तिच्याजवळ पुन्हा तिचा मुलगा व सामान दिलं. तिने स्मितहास्य करत "Thank you" म्हंटलं आणि मी पुढे चढयला लागलो. आपण जर कुठे जंगलात फिरत असलो किंवा पाहाडा वर चढत असलो तर वाटेत भेटणार्या लोकांना मदत करायची. कारण त्यांच्या धन्यवाद किंवा थँक यु या शब्दांमुळेही आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपला थकवा नाहीसा होऊन आपण पुढे चढायला लागतो. हा माझा नव्हे आमच्या सर्वांचाच अनुभव आहे. पूर्ण पायऱ्या चढून आल्यावर खूप दम लागला होता. सामान गाडीच्या बाजूला ठेवून आम्ही सर्व आपापल्या जागेवर शांत उभे होतो. या साठ-सत्तर पायऱ्या चढून वर येणे म्हणजे खीरगंगा ट्रेकची पूर्वतयारी होती. आम्ही गाडीत बॅग ठेवल्या आणि तोश कॅंपच्या रस्त्याला लागलो. कसोल ते तोशचा प्रवास फारच कमी वेळाचा होता. परंतु हिमालयातील शेरपा आणि ड्रायव्हर लोकांचं महत्व आम्हाला पटवून देणारा होता. कारण एकावेळी एकच गाडी जाऊ शकेल एवढ्या लहान रस्त्यावरून आमच्या गाडीचा ड्रायव्हर अतिशय बिंधास्तपणे गाडी चालवत होता. गाडीचं चाक बरेच वेळा अगदी रस्त्याच्या काठावर असायचं. थोडाही तोल गेला तर गाडी सरळ खाई मध्ये जाईल अशी पूर्ण स्थिती होती. काही काही वळणं फारच भयानक होते, त्या वळणावरून गाडी जात असताना अदितीताई देवाचं नाव घ्यायची. तेव्हा गाडीचा ड्रायव्हर विनोदाने म्हणायचा "यहा पे भगवान कुछ नही कर सकता जो करना है मै ही करुंगा" असा भयंकर रस्ता पार केल्यावर आम्ही तोश कॅंपची पाटी शोधत होतो. बऱ्याच वेळानंतर आम्हाला एक छोटीशी पाटी दिसली. त्यावर 'हिमट्रेक तोश' लिहिलेलं होतं. गाडी थांबली आणि आम्ही कॅंप साईट पाहायला गेलो. कॅंपवर शांतता होती. पहिले आम्हाला वाटलं की इथे कोणीच नसेल पण तिथे व्यवस्था करणारे दोन-तीन मुलं होते. त्यांच्याशी बोलणं झाल्यावर आणि आपली राहण्याची व्यवस्था इथेच आहे हे कळल्यावर आम्ही बॅग घेऊन खाली उतरलो. हा कॅंप कसोल कॅंपपेक्षा लहान असून या कॅंपवर इतर कोणीच नव्हतं. 'कदाचित बाकी लोक यायचे असतील' असं आम्हाला वाटलं. आम्ही टेंटममधे सामान ठेवलं आणि कोवळ्या उन्हाचा आनंद घेण्यासाठी बाहेर आलो.
कसोल आणि तोशच्या कॅंपमधे अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे इथली सर्विस. कसोलच्या कॅंपमधे आम्हाला नाश्ता आणि जेवण करण्यासाठी ग्राउंड वर जावं लागत होतं तर तोशच्या कॅंपमधे इथला मुलगा "भाई जी खाना तयार है" असं सांगायला येत होता आणि स्वतः आमचे जेवण आणून देत होता. होळीचे दिवस असल्यामुळे हिमाचल प्रदेशातील लोकं पाच ते सहा दिवस रंग खेळतात. कसोलला जाताना आणि नंतर तोशला येताना रस्त्यात लागणाऱ्या छोट्या-छोट्या गावातले लोकं रंग खेळताना दिसत होते. हिमाचल प्रदेशातील गोऱ्या आणि स्वच्छ त्वचेचे लोक रंग लागल्यावर अधिकच सुंदर दिसत होते. तोशच्या कॅंपवरसुद्धा काही मुलं-मुली रंग खेळत होते. त्यानंतर त्यांच्यापैकीच एक मुलगा आम्हालाही रंग लावायला आला आणि त्याने आम्हाला विचारलं "भाईजी थंडाई पिओगे ?" आम्ही त्याला नाही असं उत्तर दिलं. त्यानंतर थोड्या वेळपर्यंत ते लोक रंग खेळत होते. आम्ही टेंटमधे जाऊन पसरलो. चिन्मय माझ्या बाजूला झोपला होता आणि मी मोबाईलमधले रात्री पासून आलेले मॅसेज पाहत होतो. तेवढ्यात एक मुलगा एका मोठ्या ताटात काही पेले घेऊन आला. त्यात थंडाईच्या नावावर आणलेलं मसाला दूध होतं. मी त्यातला एक पेला घेतला आणि दूध प्यायलो. चिन्मय माझ्याकडे सतत पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरून मला त्याची मनस्थिती समजली आणि आता याची थोडी मस्करी करावी म्हणून मी "या थंडाईत काही मजा नाही" हे एकच वाक्य दोन तीन वेळा बोललो. त्यामुळे चिन्मय फार घाबरला होता. थोड्यावेळ टेंटमधे आराम केल्यावर संध्याकाळी आम्ही फोटो काढायला बाहेर निघालो. आमच्या टेंटपासून १०-१५ फुट अंतरावर बांबूचं रेलिंग होतं. त्यापुढे दरी होती आणि खाली एक नदी दिसत होती. दरीनंतर मोठा पर्वत दिसत होता आणि त्यामागे असलेल्या बर्फाच्या पर्वतात खीरगंगाचा ट्रेक होता. पहाडी भागातील वैशिष्ट्य म्हणजे जेवढ्या लवकर तिथे दिवस होतो तेवढ्याच लवकर तिथे रात्रसुद्धा होते. आम्ही फोटो काढून आल्यावर हळूहळू रातकिड्यांच्या आवाज ऐकू यायला लागले. अंधार पडू लागला काही वेळानंतर रात्रीच्या जेवणासाठी कॅंपवरच्या मुलांने आवाज दिला. आम्ही जेवण केलं. त्यानंतर शेकोटी करून बसलो. गाडीचा ड्रायव्हर ज्ञानसुद्धा जेवण करून तिथे आला. रात्री भयंकर थंड हवा होती. पूर्ण कॅंपवर फक्त आमचाच ग्रुप असल्यामुळे सकाळ जेवढी सुंदर वाटत होती, तेवढीच रात्र भयावह वाटत होती. रातकिड्यांचे किरकिर असे आवाज, पक्ष्यांचे आवाज, हवेचा आवाज यामुळे एखाद्या हॉरर सिनेमातील सीन शूट होतो आहे असा मला वाटत होतं.
आमच्या गाडीचा ड्रायव्हर ज्ञान हा शेरपा होता. तो आम्हाला शेरपा लोकांबद्दल माहिती द्यायला लागला. कोण असतात शेरपा लोकं ? शेरपा लोकं म्हणजे पहाडात फिरणारे लोकं होय. ट्रेकला आलेले प्रवासी, आर्मीचे सैनिक किंवा जंगल फिरणारे लोकं यांना फिरतांना मार्गदर्शन करणारे माणसं म्हणजे शेरपा. पहाडामधे शेरपाचं महत्व इतकं आहे की त्यांच्याशिवाय आर्मीचे सैनिक सुद्धा पहाडात किंवा जंगलात प्रवेश करत नाही. ट्रेक असतात तेव्हा हे शेरपा लोक ४०-४० किलो वजन पाठीवर घेऊन प्रवास्यांपेक्षा जास्त वेगाने पहाडावर चढून जातात. एकदा चढून जाण्याचे पाच किंवा सहा हजार रुपये एका शेरपाला द्यावे लागतात. ज्ञानने आम्हाला शेरपा लोकांबद्दल इतकी माहिती दिल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशीच्या ट्रेकमधे शेरपा लोकांना पाहण्यासाठी उत्सुक झालो होतो. त्यानंतर मयुरेशदाने आम्हाला काही भुताटकी गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आमची स्थिती अजूनच गंभीर झाली होती. कॅंपवरचं वातावरण बघता 'रात्री आपण गाडीत झोपू' असाही विचार आम्ही केला होता. शेवटी आम्ही टेंटमधेच झोपायला गेलो. रात्री जसजशी थंडी वाढत होती, तसतसाच वारा पण खूप भयंकर होत होता. सगळेच टेंट खूप हलत होते. वाटत होतं की एखादा टेन्ट उडून जाईल पण तसं काही झालं नाही. थोडी भीती मनात ठेवून आम्ही सगळे झोपलो, पण त्या रात्रीसारखी गाढ झोप पूर्ण टूरमधे आम्हाला लागली नव्हती. सकाळी मला थोडी लवकर जाग आली आणि मी टेंटमधून बाहेर आलो. समोरच बांबूच्या रेलिंगवर एक मोठा गरुड बसला होता. मी खिशातून मोबाईल काढणार तेवढ्यात त्याने आपले विशाल पंख पसरवले आणि मोठी झेप घेतली. त्याचे पंख पाहून मी सुद्धा थोडा घाबरलो होतो. थोड्याच वेळात सगळे उठले. आम्ही तयारी केली आणि नाश्ता करण्यासाठी समोर गेलो. तोशच्या कॅंपवरून आम्हाला खीरगंगा ट्रेकसाठी निघायचं होतं. सगळ्या बॅग गाडीत ठेवल्यावर ज्ञान आम्हाला ट्रेक सुरु होणार त्या ठिकाणी घेऊन गेला.
बाकी गोष्टी पुढील भागात
© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८
Monday, April 11, 2022
हिमगाथा : भाग ३
कसोल कँप आणि पारूल राणा
१७ मार्चला सकाळी आम्ही हॉटेल ग्रेसमधून पोटभर नाश्ता करून पुढच्या प्रवासासाठी निघालो. खरं तर तेव्हा हॉटेल सोडवत नव्हते. पण आम्हीच स्वतःच्या मनाला पुढच्या प्रवासाचं आकर्षण दाखवून हॉटेल सोडण्यासाठी तयार केलं. आता आम्हाला शॉल कारखान्याला भेट द्यायची होती. आतापर्यंत भरपूर खरेदी आम्ही करून ठेवली होती. पण प्रवास करत असतांना एखाद्या ठिकाणी भेट देणे आणि तिथून रिकाम्या हातानी परत येणे हा नियम आम्हाला लागू होत नव्हता. त्यामुळे शॉल कारखान्यासमोर गाडी थांबली की बॅगमधील जास्तीचे पैसे पाकीटात टाकूनच खाली पाय ठेवायचा असं आम्ही मनोमन ठरवलं होतं. कारखान्यासमोर थांबण्याआधी आम्ही रस्त्यात एका पूलावर थांबलो. पूर्ण लोखंडी बांधकाम असलेला हा पूल मनालीपासून काहीशा अंतरावर होता. पूलावर हिमाचल प्रदेशातील पारंपरिक कापडी तोरण बांधलेलं होतं. आम्ही फक्त तिथे फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. पण पूलावर उतरल्यावर तिथली हवा, कोवळं ऊन आणि खालून वाहणाऱ्या पाण्याचा 'खळखळ' असा आवाज यामुळे फोटोच्या विचाराचा काही क्षणांकरीता विसर पडला आणि आम्ही त्या निसर्गसौंदर्यात रमलो. सकाळच्या सूर्याचे किरणं शरीराला सौम्य ऊब देत होते तर पुलावरच्या कापडी तोरणाला उडवत येणारी थंड पहाडी हवा शरीराला गारवा देत होती. मी थोड्या वेळ गॉगल काढून डोळ्यांना त्या गार वाऱ्याचा स्पर्श होवू दिला. त्या पूलावर एकावेळी एकच गाडी जावू शकेल इतकीच जागा होती. त्यामुळे फोटो काढतांना जेव्हा एखादी गाडी यायची तेव्हा आम्ही सगळे पूलाच्या अगदी बाजूला काठावर उभं राहायचो. एक गाडी तर माझ्या जरकिनला थोडी घासून गेली. तिथेसुद्धा आम्ही खूप फोटो काढले. मयुरेशदाने तर माझा एक स्लोमोशन वीडियो काढला. तो वीडियो बघितल्यावर मला दक्षिणी सिनेमातील नायक झाल्यासारखं वाटलं.
पूलावर फोटो काढणं झाल्यावर आम्ही शॉल कारखान्याकडे निघालो. गाडी कारखान्यासमोर थांबली आणि आम्ही कारखाना बघितला तेव्हा लक्षात आलं की तो कारखाना फक्त शॉलचा नसून सगळ्याच प्रकारच्या गरम कपड्यांचा होता. तिथे विकल्या जाणारे सर्व कपडे तिथेच बनत असल्यामुळे आम्हाला बघण्यासाठी क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही भरपूर प्रमाणात बघायला मिळाली. बाबांसाठी स्वेटर व मफलर घेतल्यावर आईसाठी स्वेटर घेतांना अदितीताई आणि इंद्रायणीला सोबत घेतलं. मग विविध स्वेटरचे इंद्रायणीवर प्रयोग करून झाल्यावर आईसाठीसुद्धा स्वेटर आणि मफलर घेतलं. कोणतीही खरेदी करतांना स्त्रियांना स्वतःसोबत ठेवल्याने चांगल्या क्वालिटीचं सामान घेतल्या जातं, अशी माझी खात्री पटली. तिथे आम्ही सर्वांनीच आपल्या आई-बाबांसाठी खरेदी केली. आपण कुठेही फिरायला गेलो आणि तिथे आई-बाबांसाठी काही खरेदी केली की घरी गेल्यावर त्या वस्तू त्यांना दाखवण्याचा आनंद व उत्साह खरेदी केल्याच्या क्षणापासून वाढत जातो. असा अनेकवेळा घेतलेला अनुभव मी शॉल कारखान्यात पुन्हा घेतला.
खरेदी झाल्यावर आम्ही कसोल गावाकडे जाण्यास निघालो. कसोल हे अतिशय लहान गाव होतं आणि गावापेक्षा मोठं तिथलं मार्केट होतं. आधी आम्हाला कसोल गावाच्या पलीकडे असलेल्या गुरुद्वारा आणि राम मंदीराला भेट द्यायची होती. त्यामुळे आम्ही कसोल गाव मागे सोडून राम मंदीराजवळ थांबलो. महाराष्ट्रातील बहिरम, माहूर किंवा अमरावतीतील अंबादेवी मंदीराजवळ जशी दुकानांची गर्दी आणि यात्रा भरल्यासारखं वातावरण असतं तसं तिथे होतं. ती सर्व गर्दी पार करून आम्ही राम मंदीरात पोहोचलो. दर्शन केल्यावर गुरुद्वारा किंवा मंदीरातील लंगरमधे जेवण करण्याचं ठरलं होतं. पण गुरुद्वारातील गर्दी बघता मंदीरात जेवण करणं जास्त सोयीचं होतं. त्यामुळे आम्ही लंगरच्या ठिकाणी गेलो. स्वतःसाठी एक ताट आणि पेला घेऊन आम्ही खाली टाकलेल्या फाऱ्यांवर बसलो. लगेच अनुक्रमे भात, भाजी, वरण घेऊन लोकं आले आणि भसकन पूर्ण ताट भरून जावं अशा वेगात तिन्ही पदार्थ वाढले. सर्वांनाच खूप भूक लागली होती त्यामुळे अन्नाला नमस्कार करून पहिला घास घेतला तर वरण भयंकर गरम आहे हे हातापेक्षा जीभेला जास्त जाणवलं. भयंकर गरम पण चविष्ट असा रामाचा प्रसाद घेतल्यावर आम्ही आपापले ताटं धुवायला गेलो तर नळातून येणारं पाणीसुद्धा खूपच गरम नव्हे उकळतच होतं. जेवण झाल्यावर आम्ही खाली आलो तर त्या मंदीरातील पालखी बघितली. पालखी उचलणाऱ्या सगळ्या लोकांनी हिमाचली टोप्या घातल्या होत्या. पालखी मंदीरातील प्रत्येक देवासमोर तीन वेळा झुकत होती आणि नंतर पुढे जात होती. पुढे गुरुद्वाऱ्यासमोर असलेल्या एका दुकानातून डोक्याला बांधायला केशरी कपडा घेतला. त्या दुकानात खूप गर्दी होती. पण तरीही दुकानातील पंजाबी काकू येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी हसतमुखाने बोलत होत्या. मी आणि प्रथमेश मागे राहिलो होतो, बाकी सगळे पार्किंगपर्यंत पोहोचले होते. गुरुद्वाऱ्यातील तलवारींचे दुकानं बघत-बघत आम्हीसुद्धा पार्किंगपर्यंत पोहोचलो.
गाडीत बसून आम्ही सगळे कसोल कॅंपकडे निघालो. कसोल मार्केटपासून काही अंतरावर हिमट्रेक नावाची कॅंपसाइट होती. तिथे टेंटमधे आमचा एक दिवसाचा मुक्काम होता. सर्व सामान काढून उतरलो तर ६०-७० दगडी पायऱ्या खाली उतरून नदीच्या बाजूला एका सपाट जागेवर आमचे टेंट होते. तिथलं वातावरण आणि टेंट बघून उत्साह वाढत होता, पण सामान घेऊन इतक्या पायऱ्या उतरण्याचा विचार करताच उत्साह लगेच कमीसुद्धा होत होता. शेवटी आम्ही सामान घेऊन खाली उतरायला सुरवात केली. त्या सगळ्या दगडी पायऱ्या उतरून खाली पोहोचल्यावर आम्ही सगळ्या बॅग्स एका ठिकाणी ठेवल्या. आराध्य टेंटची चौकशी करायला गेला. मी, अथर्व आणि इंद्रायणी बॅग्सजवळ बसलो होतो तेव्हा आमच्या बाजूने एक मुलगी गेली. कॉलवर बोलता-बोलता म्हणाली,"Hello sir I am Parul Rana and I am a girl." तिचं हे वाक्य ऐकून आम्ही हसलो आणि अथर्व म्हणाला,"काय भैताड मुलगी आहे..." आमच्या माहितीप्रमाणे 'पारूल' हे नाव मुलीलाच देतात. आता तिच्या गावात पारूल नावाचे मुलं असतील तर गोष्ट वेगळी ! आम्हाला तीन टेंट भेटले. जावून बघितलं तर त्यात आमचं सामान किंवा आम्ही राहू शकत होतो. त्यामुळे खाली असलेल्या स्टोर रूममधे सर्वांचं सामान राहिल आणि आवश्यक तेवढी एक छोटी बॅग स्वतःसोबत टेंटमधे घ्यावी असं ठरवून आम्ही इतर लोकांकडे न बघता सगळं सामान काढायला सुरवात केली. आवश्यक ते सामान वेगळं काढून सगळेजण नदीमधल्या मोठ्या दगडांवर जावून बसलो. तिथे ठेवलेले एक-दोन खेळ खेळल्यावर नदीच्या पाण्यात फोटो काढणं सुरु झालं. इंद्रायणी, सर्वेश, आराध्य दगडांवर नाचत होते. आमच्यापासून काही दगडं सोडून बसलेला एक माणूस 'लाइव स्केचिंग' करत होता. मी थोड्यावेळ त्याला बघितलं आणि नंतर एका जागी शांत बसलो. समोर वेगात वाहणारी नदी, बाजूला मोठे दगडं आणि वाळू नंतर थोडं गवत आणि त्यात २०-२५ टेंट अशी आमच्या राहण्याची जागा होती. जस-जशी रात्र होत होती, तस-तसा पारा खाली घसरत होता.
ऋषीदादा आणि प्रथमेश मार्केटमधे जावून रंग घेवून आले. थंडी वाढत होती. नदीच्या काठावर जिथे सपाट जागा होती तिथे शेकोटी आणि छोटे स्टूल ठेवून बसण्याची व्यवस्था केली होती. शेकोटीजवळ बरेच मुलं-मुली बसले होते. आम्हीसुद्धा तिथे जावून बसलो. काही वेळानंतर तिथे मगाशी उल्लेख केलेली मुलगी 'पारूल राणा' आली आणि एका छोट्या स्टूलवर बसली. तिच्या हातात एक छोटी गिटार होती. मी सोडून आमचा पूर्ण ग्रुप रंग खेळत होता. पारूल राणाने तिथे बसलेल्या सर्वांना परिचय विचारला. "मैं अमरावती, महाराष्ट्र से हूँ" असं सांगितल्यावर तिथे बसलेल्या काहीजणांचा चेहरा एकदम खुलला. त्यात काहीजण अमरावतीचे होते तर काही पुणे व मुंबईचे मराठी भाषिक होते. त्यानंतर पारूल राणा स्वतःबद्दल सांगायला लागली. Apple Company तील स्वतःची नोकरी सोडून हिमाचल प्रदेशात फिरणे आणि येणाऱ्या प्रवास्यांसाठी कॅंप व राहण्याची व्यवस्था करणे असं तिने स्वतःचं काम सुरु केलं. रील लाइफमधे असे काही पात्र असतात की जे चांगल्या कंपनीतील नोकरी सोडून स्वतःची आवड जपतात, पण रियल लाइफमधे असे लोकं क्वचितच दिसतात त्यातली एक म्हणजे ही पारूल राणा. ती दिसायला जेवढी सुंदर होती, तेवढाच तिचा आवाजही गोड होता. काही बाबतीत मुलांनासुद्धा पुरुन उरेल अशी मुलगी म्हणजे पारूल राणा. तिच्याशी बोलल्यावर आम्हाला कळलं मगाशी आम्ही जिला 'भैताड मुलगी' समजत होतो, ती या पूर्ण कॅंप मालकिण होती. त्यानंतर ती स्वतः गिटार वाजवून गायला लागली. तिचा आवाज ऐकून इतरत्र फिरत असलेले सगळेजण तिथे येवून बसू लागले. त्यानंतर आम्ही 'आफरीन' या गाण्याची फरमाइश केली आणि तिच्यासोबत सगळेच गाऊ लागले. नंतर थोड्यावेळ आम्ही सगळे नाचलो. त्यात पुष्पा सिनेमाचे गाणे आणि ऋषीदादा आमचा कोरियोग्राफर होता.
जेवण केल्यावर प्रत्येकाने स्टोर रूममधे जावून कपडे बदलले. झोपायची तयारी झाली. एका टेंटमधे चार लोकं झोपतील असं ठरल्यावर ऋषीदादा, मयुरेशदा, चिन्मय आणि मी असे आम्ही चारजण एका टेंटमधे शिरलो. रात्री थंडीचे अस्तित्व बघता आम्ही टेंटमधे स्वेटर जरकिन घातल्यावरसुद्धा बल्ब सुरु ठेवला होता. बल्बचा उजेड एकदम चेहऱ्यावर पडत असल्यामुळे मी पहिल्यांदा रात्रभर चश्मा लावून झोपलो. हिमाचलमधे सूर्याचे किरणं सरळ बर्फावर पडतात आणि त्यावरून रिफ्लेक्ट होवून शरीरावर पडतात त्यामुळे शरीराचा झाकलेला भाग वगळता अन्य भागावर काळ्यारंगाची लेयर येते. त्यामुळे हिमाचली लोकं शरीरावर भरपूर क्रीम लावतात आणि क्रीम लावलं नाही तर शरीराचा रंग बदलतो. या रंग बदलण्याच्या प्रक्रियेचे शिकार आम्ही सगळे झालो आणि त्यात मी तर जास्तच झालो. हाच तो विचित्र परिणाम !
बाकी गोष्टी पुढील भागात...
© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८
Saturday, April 9, 2022
श्रीरामांकडून काय शिकावं ?
'श्रीराम' हे नाव ओठांवर आलं की सध्या संपूर्ण भारतात राम जन्मोत्सव साजरा होत असल्याचं पावन चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. इतक्या वर्षांपासून विचार, इच्छा, आंदोलनं यामध्ये बंदिस्त असलेलं राम मंदीराचं स्वप्न आता अयोध्येच्या भूमीवर साकार होतांना आपण बघतो आहोत. भारतभर विविध उपक्रमातून राम भक्तीचा जन्म होतो आणि त्यामुळे दाही दिशांना पसरणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची जाणीव आपल्याला होते. समृद्धतेचं वातावरण निर्माण होतं. परंतु फुलबागेसारख्या सजलेल्या भारतात काही काटेरी झाडांचं वाढत जाणारं अस्तित्व मनात सारखं रुतत राहतं. समाजात वाढत असलेला जातीवाद, अतिशय खालच्या पातळीला गेलेलं राजकरण, जातीवाद व धर्मवाद यामुळे निर्माण होणारा द्वेष, स्वार्थ व अहंकाराखाली दबून नष्ट होत असलेली तत्वनिष्ठा, स्त्रिया, बालक, वृद्धांवरील अत्याचार असं सर्व रोज वर्तमानपत्रातून वाचल्यावर वाल्मिकी रामायणात वाचलेलं रामराज्य पुन्हा निर्माण होईल का ? असा प्रश्न उत्पन्न होतो. खरं तर या सर्व समस्यांचं मूळ मानवात वाढत असलेला द्वेष व अहंकार आहे. असं मला वाटतं. रामराज्य पाहिजे असेल तर सर्वप्रथम रामायणात सांगितलेला रामाचा एक गुण आपल्याला अंगीकारावा लागेल तो म्हणजे 'समरसता'. समरसता म्हणजे दैनंदिन जीवन जगतांना समाजात कोणताही भेद न बाळगता अंगीकारलेला समता भाव. फक्त मानवच नाही तर संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक जीवासाठी रामाकडे प्रेम व समतेची भावना आहे. त्यामुळे रामाने सांगितलेला समरसतेचा अर्थ अधिक व्यापक आहे. रामाची समरसता समजून घेण्यासाठी आपल्याला रामायणातील काही प्रसंग अभ्यासावे लागतील.
अयोध्याकांड -
खरं तर रामायणातील समरसतेचा परिचय आपल्याला राम जन्मापूर्वीच होतो. राजा दशरथ पुत्रकामेष्टि यज्ञ करत असतात आणि तेव्हा ते यज्ञात सहभागी होण्यासाठी सर्व वर्णाच्या अधिकाऱ्यांना आणि मुख्य लोकांना बोलवितात. तिथे वर्णानुसार भोजनाची व्यवस्था नसून सहभोजनाची व्यवस्था असते. रामाचा जन्म ज्या राज्यात होणार आहे, तिथे सामाजिक समरसता नसेल असं होवूच शकत नाही. 'रामाला समरसतेचा गुण स्वतःच्या वडिलांकडून मिळाला आहे' असही आपण म्हणू शकतो.
पुढे राजा दशरथाची आज्ञा व आशीर्वाद घेऊन राम, सीता व लक्ष्मण वनात जाण्यासाठी निघतात. दशरथाचा मंत्री सुमंत रामाला अयोध्येच्या बाहेर सोडून देणार असतो. राम अयोध्येतून चालले हे कळल्यावर फक्त राजपरिवारातील किंवा उच्च वर्गातील लोक व्याकुळ होत नाहीत तर समस्त समाज व्याकुळ होतो.('थांब सुमंता थांबवी रे रथ' या गीत रामायणातील कवितेत ग. दि. माडगुळकरांनी वरील प्रसंगाचे अतिशय हृदयस्पर्शी वर्णन केले आहे.) त्या रात्री अयोध्येतल्या कुठल्याही घरात अग्नी प्रज्वलित झाला नाही. याचं कारण म्हणजे रामाची समरसता. व्याकुळ होणाऱ्या प्रजेवरून आपण जाणू शकतो की रामाने अयोध्येतल्या लोकांना किती प्रेम लावले असावे. असे अनेक प्रसंग रामायणात आहेत. अयोध्या सोडली आणि राम श्रृंगवेरपूरात आले. तिथे निषादराज गुहने त्यांचे स्वागत केलं. अयोध्येसारख्या बलाढ्य आणि समृद्ध राज्याचे राजकुमार राम एका छोट्या भोई राजाच्या झोपडीत आश्रय घेतात. निषादराज गुह त्यांची सेवा करतो. राम सुद्धा निषादाला भावाप्रमाणे प्रेम देतात. हे सर्व घडत असतांना निषादराज गुहचं 'निषाद' असणं रामसेवेच्या किंवा राम भक्तीच्या आड कधीच आलं नाही. पुढे केवट आणि राम भेटीचा प्रसंग आहे. केवट रामाचे पाय धुण्याची इच्छा व्यक्त करतो. तेव्हा राम आनंदाने तयार होतात. रामाला स्पर्श करणं, रामाच्या सानिध्यात काही वेळ राहून प्रेम मिळविणं ही केवटाची इच्छा राम जाणून असतात. राम केवटाच्या इच्छेचा व प्रेमाचा सन्मान करतांना दिसतात. पुढे अयोध्येत परतल्यावर निषादराज गुह व केवट यांना राज्याभिषेक सोहळ्याला बोलविणारे राम सुद्धा आपण बघतो.
अरण्यकांड -
सीताहरण झालं आणि राम, लक्ष्मण सीतेला शोधत अरण्य पायी तुडवत होते. पुढे त्यांना रक्तबंबाळ झालेले गिद्धराज जटायू दिसले. "रावणाने छळ करून सीतेचे हरण केले..." घडलेली पूर्ण घटना सांगून जटायूने प्राण त्यागले. जटायूला पित्याचे स्थान देणारे राम तिथे आदर्श पुत्राप्रमाणे जटायूचा यथोचित अंत्यसंस्कार करतात. विषयप्रवेश करतांना मी व्यापक समरसतेचा उल्लेख केला होता. फक्त मानवच नाही तर पशुपक्षी यांच्याबद्दल सुद्धा अतीव प्रेम रामाजवळ होतं. ही बाब 'राम जटायू' प्रसंगातून स्वतः श्रीराम आपल्याला सांगतात. त्यानंतर घडलेला शबरी भेटीचा प्रसंग सर्वज्ञातच आहे. रोज रामाच्या प्रतिक्षेत आपली झोपडी स्वच्छ करणारी, विविध फळे तोडून आणणारी शबरी प्रत्यक्ष राम समोर उभे आहेत हे पाहून भावविभोर होते. राम सुद्धा तिला "आई..." म्हणून आवाज देतात. शबरीने दिलेली उष्टी बोरं आनंदाने खातात. नंतर शबरीला मोक्षमार्गाचा उपदेशसुद्धा करतात. या उपदेशात शबरीचं स्त्री असणं किंवा जातीनं भिल्ल असणं याचा कोणताही अडसर येत नाही. शुद्ध मनाने केलेल्या भक्तीसमोर उणं-उष्टं, लहान-मोठं, जात-धर्म हे सर्व गौण असतं. हीच गोष्ट श्रीराम लक्ष्मणासह आपल्यालाही शबरी भेटीच्या प्रसंगातून पटवून देतात.
किष्किंधाकांड -
सीतेला शोधत शोधत राम-लक्ष्मण ऋष्यमूक पर्वतापर्यंत आले. वनात सुग्रीव, हनुमान, जाम्बवंत आणि वानरसेनेची भेट झाली. सुग्रीव सुद्धा राज्य व पत्नी गमवून बसला होता. सुग्रीवासोबत घडलेल्या घटना ऐकून राम त्याला मदत करण्याचं वचन देतात आणि सुग्रीव-वाली संघर्षात वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य मिळविण्यास सहाय्य करतात. एवढच नाही तर पुढे वानरसेनेच्या साथीने आपले कार्य पूर्णत्वास नेतात. वानर ही एक वनवासी जमात होती. मानवांच्या तुलनेत संस्कार व राहणीमान याबाबतीत जरा अप्रगत असलेली जंगलातील जमात. अशा सर्व वनवासी व सामान्य लोकांना सहाय्य करण्याची आणि त्यांना संघटीत करून राष्ट्रकार्य उभारण्याची अत्यंत महत्वाची शिकवण राम आपल्याला या प्रसंगातून देतात.
सुंदरकांड -
रामाची अंगठी सीतेला देऊन हनुमंताने लंका उध्वस्त केली. "रामाशी युद्ध करणे योग्य नाही" अशा भूमिकेमुळे विभीषणाला रावणाने लंकेतून हाकलून दिलं. लंका सोडल्यावर विभीषण रामाला शरण आला. खरं तर विभीषण काही असहाय्य किंवा पीडित नव्हता. राजपरिवारात वाढलेला आणि एका बलाढ्य राज्याचा मंत्री म्हणजे रावण बंधू विभीषण होय. मग समरसतेशी किंवा समानतेशी या प्रसंगाचा काय संबंध ? असा प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होऊ शकतो. पण रामाने अंगीकारलेली समरसता किंवा समान भाव इतका व्यापक आहे की त्यात शत्रू-मित्र, सामान्य-असामान्य, गरीब-श्रीमंत, देव-दानव, मानव-पशुपक्षी या सर्वांसाठी समान प्रेम आहे. त्यामुळे विभीषण हा जरी परकीय आहे, रावणाचा भाऊ आहे, राक्षसकुळातला आहे पण त्याचे मन शुद्ध आहे, भक्ती पवित्र आहे हे सर्व राम जाणतात. म्हणून विभीषणाचा सुद्धा सन्मान करून पुढे त्याला लंकेचं राज्य देतांना राम दिसतात. शुद्ध मनाने भक्ती करणाऱ्या प्रत्येक सजीवाचा राम स्वीकार करतात. त्यामुळे राम सर्वांना आपलेसे वाटतात. ही बाब या प्रसंगातून आपण जाणली पाहिजे. पुढे राम अयोध्येत परतल्यावरसुद्धा सामाजिक समरसतेचे अनेक प्रसंग रामायणात घडलेले आहेत. त्यातील एक प्रसंग असा की अयोध्येत शरयू किनारी स्नान करण्यासाठी तीन प्रकारचे घाट होते. पहिला घाट महिलांसाठी, दुसरा घाट पुरुष व पशुंसाठी आणि तिसरा घाट राजपरिवारातील लोकांसाठी होता. परंतु सिंहासनारूढ झाल्यावर रामाने महिलांचा घाट वेगळा ठेऊन राजपरिवारातील लोकांचा घाट व सामान्य लोकांचा घाट एकत्र केला. राजपरिवार आणि सामान्य प्रजा यांच्यातील भेद कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेला हा रामायणातील महत्वाचा प्रसंग आहे.
निषादराज गुह, केवट, जटायू, शबरी, वानर आणि शेवटी विभीषण या सर्व प्रसंगांचा अभ्यास केल्यावर एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की 'रामायणातील समरसता' हा जन्माचा विषय नसून कर्माचा विषय आहे. खुद्द महर्षी वाल्मिकी हे जन्माने कोळी होते आणि कर्माने दारोडेखोर होते. पण पुढे ते आपलं कर्म बदलतात. भक्तीमार्ग स्वीकारतात आणि नंतर त्यांची व रामाची भेट होते. फक्त भेटच होत नाही तर रामाची पुढची पिढी घडविण्याचा अद्वितीय अधिकार वाल्मिकींना प्राप्त होतो. हा प्रसंग सुद्धा रामायणातील समरसतेचं एक उदाहरण आहे. वाल्मिकी रामायणात रामाचं आत्मीय प्रेम आणि समत्वाचे उदाहरण ठरतील असे अनेक प्रसंग आहेत. खरं तर संपूर्ण रामायण म्हणजे समरसता व एकात्मभावाची शिकवण देणारा एक अद्भुत ग्रंथ आहे. रावण नावाच्या एका बलाढ्य शत्रूशी राम नावाच्या एका महामानवाने सर्व सामान्य लोकांना सोबत घेऊन लढलेलं एक युद्ध म्हणजे रामायण. त्यामुळे रामराज्य उभारण्यासाठी आधी आपल्याला रामायणातले समरसता व एकात्मभाव ही मूल्य अंगीकारावी लागतील. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मानवता व एकात्मता जपणारा आणि जगणारा एक आदर्श समाज परमेश्वराला मागितला. संत ज्ञानेश्वर हे कृष्णभक्त होते पण त्यांनी जे मागणं मागितलं ते रामराज्य होतं. रामायणात सांगितलेला रामाचा एकात्मभाव ज्ञानदेवांनी अंगीकारला होता. त्यामुळेच भेद व द्वेष विरहीत भावनेतून सृष्टीतील प्रत्येक घटकासाठी ज्ञानदेव मागणं मागू शकतात. रामाचा एकात्मभाव अंगीकारण्यासाठी सर्व मानवनिर्मित भेदातून मुक्त व्हावं लागेल. राम या सर्व भेदातून मुक्त होते म्हणूनच शबरीने दिलेली बोरं खाऊ शकले. द्वेष आणि अहंकार विरहीत जीवन जगू शकले. इतक्या संदर्भांचा आधार घेऊन पुन्हा पुन्हा समरसता व एकात्मभाव सांगण्याचं तात्पर्य एवढच की ग्रंथातले आणि मंदीरातले राम आता हृदयात ठेवण्याची गरज आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात राम दिसतील तेव्हाच इतर सर्व भेद नष्ट होऊन शेवटी केवळ भक्त शिल्लक राहतील. भक्त एकत्र आल्यावर रामराज्य निर्माण होतं हे आपण रामायणात बघितलं आहे. 'प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यावर ध्येय गाठता येतं.' असा संदेश देणारी कथा म्हणजे रामकथा आहे. म्हणून शेवटी एवढच लिहितो की रामभक्त निर्माण झाले तर समरसता व एकात्मभाव निश्चितच निर्माण होईल कारण भक्त कधी विभक्त नसतात !
© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८
Sunday, April 3, 2022
हिमगाथा : भाग २
१४ तारखेला संध्याकाळी आम्ही दिल्लीवरून झिंगबसने मनालीसाठी निघालो. दिल्ली ते मनाली प्रवास सुरु झाला. रात्री चमकणारी दिल्ली अधिकच सुंदर दिसत होती, मात्र रस्त्यावरील गाड्यांची गर्दी काही कमी झाली नव्हती. रस्त्यावर गाड्यांची गर्दी असूनसुद्धा आमचा झिंगबसचा ड्रायवर बिंधास्तपणे वेगात बस चालवत होता. आम्ही फक्त मागे जाणाऱ्या गाड्यांना बघत होतो. आधी आम्हाला वाटलं होतं की बस आमच्या ११ लोकांसाठीच असेल पण आराध्यने सांगितल्यावर कळलं की मनालीला जाणाऱ्या ६० प्रवास्यांपैकी आम्ही ११ प्रवासी होतो. प्रवास सुरु झाला आणि आम्ही 'डम्बशराड्स' खेळायला सुरवात केली. पण थोड्याच वेळात बसमधील ड्रायवरसोबत असलेल्या इसमाने आमचा खेळ बंद करायला सांगितलं. कारण ६० लोकांपैकी आमच्या ११ जणांचा आवाज जरा जास्तच येत होता. दिल्लीवरून बसमधे दक्षिण भारतीय तामिळ भाषिक ५-६ लोकांचा एक ग्रुप बसला होता. त्यातील एक माणूस रामानंद सागर यांच्या रामायणातील रावणाप्रमाणे हसत होता. आधी आम्हाला त्याचं हसणं एंटरटेनिंग वाटलं, मात्र नंतर आम्ही त्याच्या हसण्यामुळे फार इरिटेट झालो. त्यातही मी आणि ऋषीदादा जास्त इरिटेट झालो कारण तो राक्षस आमच्या मागेच बसून हसत होता. त्याच्या हसण्यामुळे इरिटेट होवून शेवटी मी त्याचं 'रावण' असं नामकरण केलं. एक-दीड तास ते राक्षसी हास्य स्वतःच्या कानावर घेतल्यावर जेव्हा बस धाब्यावर थांबली तेव्हा आम्ही ड्रायवरकडे त्याची शिवीयुक्त अशी तक्रार केली. धाब्यावर दालमखनी आणि बटरनानचं मस्त जेवण केल्यावर जेव्हा आम्ही बसमधे बसलो तेव्हा त्या राक्षसाचं हसणं बंद झालं होतं. मनालीला पोहोचेपर्यंत तो पुन्हा हसला नाही आणि हसलाही असेल तर मनात किंवा स्वतःपुरताच हसला असेल.
जेवण झाल्यावर जवळपास सर्वच प्रवासी झोपले. माझी ऊंची आणि रुंदी दोन्ही जास्त असल्यामुळे मिळालेल्या जागेवर झोप लागणे अशक्य होते, त्यामुळे मी जागाच होतो. बस निघाली तेव्हा आम्हाला (प्रत्येकी एक) छोट्या पाण्याच्या बाटल्या मिळाल्या होत्या. जेवण झाल्यावरच माझ्याजवळचं पाणी संपलं होतं. बॅगमधली बाटलीसुद्धा रिकामी झाली होती. "आता पाणी कुठून आणावे ?" असा विचार मी करत होतो आणि तेव्हाच मागच्या लोकांच्या न उघडलेल्या पाण्याच्या बाटल्या गलंडत-गलंडत समोर आल्या. सर्वांचे डोळे बंद असल्याची खात्री पटल्यावर मी आमच्या दोन रिकाम्या बाटल्या खाली ठेवल्या आणि भरलेल्या दोन बाटल्या उचलून पाणी प्यायलो. ड्रायवरचं वेगात गाडी चालवणंसुद्धा माझ्या फायद्याचं ठरलं. पहाटे पाचच्या सुमारास गाडी एका ठिकाणी चहासाठी थांबली. बाहेर उतरल्यावर "हिमाचलमधे आपण आलो" अशी जाणीव झाली. सकाळची गुलाबी थंडी आणि सर्वत्र पसरलेलं धुकं जणू आमचं स्वागत करत होतं. तिथे चहा घेतला थोडे फोटो काढले आणि पुन्हा बसमधे बसलो. खरा हिमाचलचा प्रवास आता सुरु झाला होता. मोठ्या डोंगरातील छोट्या रस्त्यावरून बस जात होती तेव्हा निसर्गाला छायाचित्रांमधे कैद करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे मोबाईल बाहेर काढले. मनालीला जातांना आमच्यासोबत चालणारी प्राचीन व्यास (बियास) नदी बघितली. अशाप्रकारे निसर्गाचा आस्वाद घेत आणि स्वतःचा उत्साह वाढवित आम्ही मनालीला पोहोचलो. बसमधून उतरलो तर समोरच दुसरा ड्रायवर उभा होता. एक १३ सिटर छोटी बस आम्हाला हिमाचल प्रदेश फिरवणार होती. सर्व सामान त्यात टाकून आम्ही हॉटेलकडे निघालो.
हॉटेल आणि आसपासचं सौंदर्य बघितल्यावर "पैसा वसूल" असे शब्द जीभेवर आले. हॉटेलचं नाव 'ग्रेस इन' असं होतं. चारही बाजूने बर्फाचे पर्वत आणि मध्यभागी ४-५ हॉटेल्सचा समूह. त्यापैकी एक म्हणजे आमचं 'ग्रेस इन'. पूर्ण हॉटेल, त्यातील आम्हाला मिळालेल्या खोल्या, गॅलरीतून दिसणारा बर्फ अशा सर्वांचे फोटो आणि वीडियो मी घेतले. ८० टक्के लाकडी बांधकाम असलेल्या या हॉटेलमधे आम्ही दोन दिवस राहणार होतो. फ्रेश झाल्यावर पोटभर नाश्ता करून आम्ही मनाली फिरण्यासाठी निघालो. सर्वात पहिला स्पॉट म्हणजे हिडिंबा मंदीर होता. सरळ व ऊंच झाडांनी वेढलेलं आणि दगडी व लाकडी बांधकाम असलेलं हे प्राचीन मंदीर. महाभारत काळापासून हिडिंबा मंदीराची कथा सांगितली जाते. ऊंच झाडांसोबत अथर्व आणि सर्वेशने सर्वांचे खूप फोटो काढल्यावर आम्ही पुढे निघालो. बाहेर येतांना तिथले पांढरेशुभ्र ससे जवळ घेऊन पुन्हा फोटो काढले. त्यानंतर तिथले अजून एक-दोन छोटे खेळ खेळल्यावर आमची गाडी वशिष्ठ मंदीराकडे निघाली. अतिशय सुंदर आणि सुबक लाकडी नक्षीदार कलाकृतीने सजलेलं वशिष्ठ मंदीर होतं. मनालीतील मंदीरांचं वैशिष्ट्य म्हणजे लाकडी आणि दगडी बांधकाम, भरमसाठ कोरिवकाम पण मंदीराच्या गाभाऱ्यात फक्त एक किंवा दोन प्राचीन दगडी अवशेष बाकी मंदीर पूर्ण रिकामे. दोन्ही प्राचीन मंदीरं बघता-बघता दुपार झाली. मग आम्ही मॉल रोडला गेलो. तिथे पोहोचेपर्यंत सर्वांना भूक लागली होती त्यामुळे 'आशियाना' नावाच्या हॉटेलमधे गेलो. हे नाव सर्वांना लक्षात राहिल कारण जितकं चांगलं हॉटेल तितकच बेचव आणि भयंकर महाग तिथलं जेवण होतं. स्वतःच्या जीभेवर अशा भयंकर जेवणाचा अत्याचार करून आम्ही जेव्हा तिथून बाहेर निघालो तेव्हा मी त्या हॉटेलचा एक फोटो घेतला. अथर्वने त्या दुपारच्या जेवणाला 'शिटी लंच' असं नाव दिलं. त्यानंतर तिथलेच एक-दोन ठिकाणं पाहून आम्ही खरेदी करायला गेलो. मॉल रोड म्हणजे पुण्यातील तुळशी बाग किंवा नागपूरच्या बर्डीसारखा एरिया. दुकानांची रांग आणि प्रत्येक दुकानात भयंकर गर्दी. मी तिथल्या एका दुकानातून तीन 'हिमाचली टोप्या' घेतल्या. मॉल रोड मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे तिथला प्रत्येक दुकानदार (स्त्री अथवा पुरुष) तो स्वतः विकत असलेली वस्तू कशी निर्माण होते हे ग्राहकाला सांगतो. सर्वांची खरेदी झाली आणि आम्ही पुन्हा हॉटेलला परतलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला बर्फात खेळायला जायचं होतं. त्यामुळे रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न केला पण हॉटेलजवळचे बर्फाचे पर्वत रात्री अधिकच सुंदर दिसत होते. अंगावर येणारा थंडगार वारा मनाला एक वेगळाच आनंद देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून तयारी केली आणि बर्फाकडे निघालो. जस-जसे आम्ही हॉटेलपासून दूर जात होतो तस-तसा आम्हाला रस्त्यावर दिसणारा बर्फ वाढत जात होता. रस्त्यात एका ठिकाणी थांबून आम्ही बर्फात जाण्याआधी आवश्यक ते कपडे, हातमोजे आणि बूट घेतले. ते सर्व अंगावर चढवल्यावर प्रत्येकाचं वजन किमान एक किलो वाढल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर सोलांग व्हॅली क्रॉस करून आम्ही 'अटल टनल' बघितला. नऊ किलोमीटर पेक्षा जास्त लांब असलेला आणि बर्फाच्या पहाडात खोदलेला अतिशय भव्य बोगदा म्हणजे अटल टनल होय. पूर्ण अटल टनलचा जाता-येतांना वीडियो घेतला. अटल टनलनंतर येणारी लाहोल व्हॅलीमधे आम्ही बर्फावर खेळणार होतो. लाहोल व्हॅलीमधे एका ठिकाणी ड्रायवरने आम्हाला सोडलं. तिथून पुढे बर्फात एक-दीड किलोमीटर चालत जायचं होतं. जिथे आम्ही उतरलो त्या ठिकाणी नजर जाईल तिथपर्यंत फक्त पांढराशुभ्र बर्फ दिसत होता. चालतांना काही जागी पाय एकदम खाली जायचा तर काही जागी पाय घसरायचा. चारही बाजूंनी फक्त बर्फ आणि त्यामधून जाणारी चिनाब नदी जणू आम्हाला स्वतःजवळ बोलवित होते. तिथे गेल्या-गेल्या सगळ्या बॅग्स बाजूला ठेवून आम्ही एकामेकाला मनसोक्त बर्फ फेकून मारला. त्यानंतर मी थोड्यावेळ बर्फावर शांत पडून होतो. वर होतं अथांग पसरलेलं आकाश व खाली होता अथांग पसरलेला बर्फ आणि या दोघांमधे मुसाफिराप्रमाणे फिरणारे आम्ही सर्व. तिथे आम्हाला एक फोटोग्राफर भेटला. तो तिथे आलेल्या लोकांचे फोटो काढून तिथेच सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपीने देत होता. फोटोची किंमत कळल्यावर एक किंवा दोन फोटो काढण्याचं आम्ही ठरवलं. मग फोटोग्राफर पोज सांगायला लागला आणि आम्ही तो म्हणेल ती पोज द्यायला लागलो. एक वेळ अशीसुद्धा आली होती की जेव्हा आम्ही ते जाडे आणि गरम कपडे काढून आम्ही नेलेल्या पँट व टी शर्ट घालून फोटो काढले. चिनाब नदीचं पाणी भयंकर थंड होतं. १०-१५ सेकंदापेक्षा जास्त वेळ त्या पाण्यात हात ठेवणं अशक्य होतं. बर्फ इतका पांढराशुभ्र होता की गॉगल न घालता बघणं होत नव्हतं. सर्वांचे फोटो काढणं झाल्यावर जेव्हा आम्ही फोटो बघितले तर कोणाचे २० तर कोणाचे १५ असे फोटोज होते. अतिशय सुंदर फोटो असल्यामुळे सर्वच फोटोज घेण्यासाठी आम्ही तयार झालो. माझे स्वतःचे त्यात २४ फोटोज होते. त्यानंतर पुन्हा मी, ऋषीदादा, सर्वेश, प्रथमेश, अथर्व आणि आराध्य चिनाब नदीजवळ जावून शांत बसलो. तिथले काही चोपडे दगड घेतले. संध्याकाळी नदीजवळ येणारा पक्ष्यांचा आवाज ऐकून खूप शांत व प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर टायरवर बसून बर्फावरून घसरत येणे अशा काही बालिश एक्टिविटी करून आम्ही हॉटेलला परत जाण्यास निघालो.
आमच्यापैकी काहीजण पुन्हा मॉल रोडला खरेदी करण्यासाठी गेले. परंतु चिनाब नदीजवळ येणारा पक्ष्यांचा आवाजाचा सुंदर अनुभव मला मॉल रोडच्या गर्दीत जावून खराब करायचा नव्हता. त्यामुळे मीसुद्धा ऋषीदादा, प्रथमेश, मयुरेशदा आणि चिन्मयसोबत हॉटेलला आलो आणि दिवसभरातल्या महत्वपूर्ण मुद्द्यांची डायरित नोंद केली. दिवसभर फिरल्याने आलेला थकवा दूर करण्यासाठी त्यारात्री हॉटेलवाल्यांनी आमच्यासाठी मस्त शेकोटी आणि गाण्याची व्यवस्था केली होती. ती मनालीतील आमची शेवटची रात्र होती. येणारी सकाळ म्हणजे मनाली सोडण्याची सकाळी होणार होती. त्यामुळे त्या रात्री आम्ही पुन्हा मनालीतील वातावरणाचा आनंद घेतला. मनालीच्या बर्फाचा आनंद घेतल्यावर आणि भरपूर फोटो काढून घेतल्यावर एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू शकतो की पैसा म्हणजे आनंद नाही ही गोष्ट सत्य आहेच, पण पैस्यामुळे आनंदप्राप्तीच्या मार्गांपर्यंत आपण पोहोचू शकतो. शेवटी प्रत्येक माणसाची आनंदाची व्याख्या आणि आनंदप्राप्तीची पद्धत वेगळी असते. बर्फात खेळतांना आणि फिरतांना आनंद तर खूप मिळाला, पण त्याचा असा एक विचित्र परिणाम होईल हे आम्हाला माहित नव्हतं.
बाकी गोष्टी पुढील भागात...
© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८
Subscribe to:
Comments (Atom)