Followers

Thursday, April 21, 2022

हिमगाथा : भाग ४

 तोशचा कॅंप

कसोलची पहाट लक्षात राहण्यासारखी होती. रात्रभर टेंटमधे बल्ब सुरु असल्यामुळे मी चश्मा लावून झोपलो होतो. त्यामुळे झोप बरोबर झालीच नव्हती. पहाटे आम्ही टेंटच्या बाहेर आलो तर सर्वत्र रक्त गोठविणारी थंडी होती. न कळत आमच्या दातांचा सांगीतिक कार्यक्रम सुरु झाला. एखाद्या चेन स्मोकरच्या तोंडातून सिगरेटचा धूर निघावा, त्याप्रमाणे आमच्या तोंडातून वाफ निघत होती. त्या थंडीमुळे माझं डोकं दुखायला लागलं आणि नाक, कान थंड पडले. अजून सूर्योदय व्हायचा होता. सूर्याच्या प्रकाशात अतिशय सुंदर दिसणारी कसोलची नदी पहाटे नकारात्मक आणि भीतीदायक वाटत होती. खळ-खळ पाण्याचा आवाज नकोसा वाटत होता. आम्हाला तयारी करून कसोलचा कॅंप सोडायचा होता आणि तोशच्या कॅंपवर जायचं होतं. आम्ही सगळेजण फ्रेश झालो आणि आपापल्या बॅग घेऊन स्टोअर रूमच्या समोरच्या ग्राउंडवर तयारी करायला लागलो. फुटपाथवर एखादा सामान विकणारा बसावा, त्याप्रमाणे आम्ही सगळेजण आपापल्या बॅग उघडून इतरांची पर्वा न करता तयारी करत होतो. 'आपल्याला बघून कोण काय विचार करेल ?' असा प्रश्‍न सुद्धा आम्हाला तेव्हा पडला नव्हता. खरंतर ट्रिप सुरू झाल्यापासून आम्ही फक्त आमच्या अकरा जणांची व्यवस्था कशी चांगली होऊ शकेल याचाच विचार करत होतो. इतर लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण कसा या ट्रिपचा आनंद घेऊ शकू याचाच विचार आणि प्लॅनिंग आम्ही करत होतो. कसोलचा कॅंप सोडल्यावर आम्हाला तोश या ठिकाणी जायचं होतं. तोशचा कॅंप म्हणजे आमचा आराम करण्याचा दिवस होता. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला खीरगंगाच्या ट्रेकसाठी निघायचं होतं. त्यामुळे कसोलचा कॅंप सोडण्याच्या वेळी आम्ही कासवाच्या गतीने पॅकिंग करत होतो.

तयारी होईपर्यंत नाश्त्याचे टेबल लागले. आमची पॅकिंग झाली आणि आम्ही नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन नाश्ता करायला लागलो. त्याचवेळी तिथे साठ-सत्तर पायऱ्या उतरून एक छोटासं कुटुंब आलं. ६५ च्या जवळपास असलेला एक म्हातारा माणूस जो फक्त वर-वरूनच म्हातारा दिसत होता. त्याची पत्नी आणि मुलगा, सून व नातू कसोलच्या ट्रीपवर आले होते. त्या माणसाकडे पाहून आम्ही अंदाज लावत होतो की हा माणूस रिटायर्ड मिल्ट्री ऑफिसर असावा. फॉर्मल पॅन्ट, टी-शर्ट, खाली स्पोर्ट्स शूज घातलेला हा म्हातारा माणूस कसोलला कसा आला ? आम्ही हाच विचार करत होतो. कारण कसोल-तोष या जागा फॅमिली लायक नाहीत, असा आमचा समज होता. कदाचित आमच्याप्रमाणेच हा माणूस सुद्धा खूप जास्त लोकांचा विचार न करता आपली ट्रीप एन्जॉय करणाऱ्या लोकांपैकी असावा. ६५ वर्षाच्या या तरुणाकडे पाहून आम्हालाच प्रेरणा मिळत होती. नाश्ता करत असताना आमचं मराठी बोलणं ऐकून ते कुटुंब स्वतः आमच्याशी बोलायला लागलं. आपल्या भाषेचे लोकं कुठेही भेटले की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो आणि आपण स्वतःहून त्या लोकांशी बोलायला लागतो, हा आमचाही अनुभव होता. या टूरमध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी चार-पाच मराठी भाषिक भेटत गेले. थोड्यावेळ त्यांच्याशी बोलून आम्ही आपलं सामान घेऊन कॅंप सोडण्यासाठी निघालो. कसोलला आलो तेव्हा साठ-सत्तर पायऱ्या सामानासहित उतरतांना विशेष काही वाटलं नाही. परंतु आता त्या पायर्‍यांकडे पाहून 'इतक्या पायऱ्या कशा चढायच्या ?' हा प्रश्न प्रत्येक पायरीवर आम्हाला दिसत होता ! तरीही आपापल्या दोन-दोन बॅग उचलून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली.

मी अर्ध्या पायर्‍या चढलो आणि दम लागला म्हणून एका ठिकाणी थांबलो. तेव्हा समोरून एक बाई तिच्या लहान मुलाला कडेवर घेऊन पायर्‍या उतरत होती. माझ्यापासून दोन पायऱ्या वरती असतांना तिचा तोल जाऊ लागला. मी तिच्या एका हातातलं सामान आणि लहान मुलाला माझ्याजवळ घेतलं. "आप पहले उतर जाइये" असं म्हणून तिला एक दोन पायऱ्या खाली उतरू दिलं आणि नंतर तिच्याजवळ पुन्हा तिचा मुलगा व सामान दिलं. तिने स्मितहास्य करत "Thank you" म्हंटलं आणि मी पुढे चढयला लागलो. आपण जर कुठे जंगलात फिरत असलो किंवा पाहाडा वर चढत असलो तर वाटेत भेटणार्‍या लोकांना मदत करायची. कारण त्यांच्या धन्यवाद किंवा थँक यु या शब्दांमुळेही आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपला थकवा नाहीसा होऊन आपण पुढे चढायला लागतो. हा माझा नव्हे आमच्या सर्वांचाच अनुभव आहे. पूर्ण पायऱ्या चढून आल्यावर खूप दम लागला होता. सामान गाडीच्या बाजूला ठेवून आम्ही सर्व आपापल्या जागेवर शांत उभे होतो. या साठ-सत्तर पायऱ्या चढून वर येणे म्हणजे खीरगंगा ट्रेकची पूर्वतयारी होती. आम्ही गाडीत बॅग ठेवल्या आणि तोश कॅंपच्या रस्त्याला लागलो. कसोल ते तोशचा प्रवास फारच कमी वेळाचा होता. परंतु हिमालयातील शेरपा आणि ड्रायव्हर लोकांचं महत्व आम्हाला पटवून देणारा होता. कारण एकावेळी एकच गाडी जाऊ शकेल एवढ्या लहान रस्त्यावरून आमच्या गाडीचा ड्रायव्हर अतिशय बिंधास्तपणे गाडी चालवत होता. गाडीचं चाक बरेच वेळा अगदी रस्त्याच्या काठावर असायचं. थोडाही तोल गेला तर गाडी सरळ खाई मध्ये जाईल अशी पूर्ण स्थिती होती. काही काही वळणं फारच भयानक होते, त्या वळणावरून गाडी जात असताना अदितीताई देवाचं नाव घ्यायची. तेव्हा गाडीचा ड्रायव्हर विनोदाने म्हणायचा "यहा पे भगवान कुछ नही कर सकता जो करना है मै ही करुंगा" असा भयंकर रस्ता पार केल्यावर आम्ही तोश कॅंपची पाटी शोधत होतो. बऱ्याच वेळानंतर आम्हाला एक छोटीशी पाटी दिसली. त्यावर 'हिमट्रेक तोश' लिहिलेलं होतं. गाडी थांबली आणि आम्ही कॅंप साईट पाहायला गेलो. कॅंपवर शांतता होती. पहिले आम्हाला वाटलं की इथे कोणीच नसेल पण तिथे व्यवस्था करणारे दोन-तीन मुलं होते. त्यांच्याशी बोलणं झाल्यावर आणि आपली राहण्याची व्यवस्था इथेच आहे हे कळल्यावर आम्ही बॅग घेऊन खाली उतरलो. हा कॅंप कसोल कॅंपपेक्षा लहान असून या कॅंपवर इतर कोणीच नव्हतं. 'कदाचित बाकी लोक यायचे असतील' असं आम्हाला वाटलं. आम्ही टेंटममधे सामान ठेवलं आणि कोवळ्या उन्हाचा आनंद घेण्यासाठी बाहेर आलो.

कसोल आणि तोशच्या कॅंपमधे अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे इथली सर्विस. कसोलच्या कॅंपमधे आम्हाला नाश्ता आणि जेवण करण्यासाठी ग्राउंड वर जावं लागत होतं तर तोशच्या कॅंपमधे इथला मुलगा "भाई जी खाना तयार है" असं सांगायला येत होता आणि स्वतः आमचे जेवण आणून देत होता. होळीचे दिवस असल्यामुळे हिमाचल प्रदेशातील लोकं पाच ते सहा दिवस रंग खेळतात. कसोलला जाताना आणि नंतर तोशला येताना रस्त्यात लागणाऱ्या छोट्या-छोट्या गावातले लोकं रंग खेळताना दिसत होते. हिमाचल प्रदेशातील गोऱ्या आणि स्वच्छ त्वचेचे लोक रंग लागल्यावर अधिकच सुंदर दिसत होते. तोशच्या कॅंपवरसुद्धा काही मुलं-मुली रंग खेळत होते. त्यानंतर त्यांच्यापैकीच एक मुलगा आम्हालाही रंग लावायला आला आणि त्याने आम्हाला विचारलं "भाईजी थंडाई पिओगे ?" आम्ही त्याला नाही असं उत्तर दिलं. त्यानंतर थोड्या वेळपर्यंत ते लोक रंग खेळत होते. आम्ही टेंटमधे जाऊन पसरलो. चिन्मय माझ्या बाजूला झोपला होता आणि मी मोबाईलमधले रात्री पासून आलेले मॅसेज पाहत होतो. तेवढ्यात एक मुलगा एका मोठ्या ताटात काही पेले घेऊन आला. त्यात थंडाईच्या नावावर आणलेलं मसाला दूध होतं. मी त्यातला एक पेला घेतला आणि दूध प्यायलो. चिन्मय माझ्याकडे सतत पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरून मला त्याची मनस्थिती समजली आणि आता याची थोडी मस्करी करावी म्हणून मी "या थंडाईत काही मजा नाही" हे एकच वाक्य दोन तीन वेळा बोललो. त्यामुळे चिन्मय फार घाबरला होता. थोड्यावेळ टेंटमधे आराम केल्यावर संध्याकाळी आम्ही फोटो काढायला बाहेर निघालो. आमच्या टेंटपासून १०-१५ फुट अंतरावर बांबूचं रेलिंग होतं. त्यापुढे दरी होती आणि खाली एक नदी दिसत होती. दरीनंतर मोठा पर्वत दिसत होता आणि त्यामागे असलेल्या बर्फाच्या पर्वतात खीरगंगाचा ट्रेक होता. पहाडी भागातील वैशिष्ट्य म्हणजे जेवढ्या लवकर तिथे दिवस होतो तेवढ्याच लवकर तिथे रात्रसुद्धा होते. आम्ही फोटो काढून आल्यावर हळूहळू रातकिड्यांच्या आवाज ऐकू यायला लागले. अंधार पडू लागला काही वेळानंतर रात्रीच्या जेवणासाठी कॅंपवरच्या मुलांने आवाज दिला. आम्ही जेवण केलं. त्यानंतर शेकोटी करून बसलो. गाडीचा ड्रायव्हर ज्ञानसुद्धा जेवण करून तिथे आला. रात्री भयंकर थंड हवा होती. पूर्ण कॅंपवर फक्त आमचाच ग्रुप असल्यामुळे सकाळ जेवढी सुंदर वाटत होती, तेवढीच रात्र भयावह वाटत होती. रातकिड्यांचे किरकिर असे आवाज, पक्ष्यांचे आवाज, हवेचा आवाज यामुळे एखाद्या हॉरर सिनेमातील सीन शूट होतो आहे असा मला वाटत होतं.

आमच्या गाडीचा ड्रायव्हर ज्ञान हा शेरपा होता. तो आम्हाला शेरपा लोकांबद्दल माहिती द्यायला लागला. कोण असतात शेरपा लोकं ? शेरपा लोकं म्हणजे पहाडात फिरणारे लोकं होय. ट्रेकला आलेले प्रवासी, आर्मीचे सैनिक किंवा जंगल फिरणारे लोकं यांना फिरतांना मार्गदर्शन करणारे माणसं म्हणजे शेरपा. पहाडामधे शेरपाचं महत्व इतकं आहे की त्यांच्याशिवाय आर्मीचे सैनिक सुद्धा पहाडात किंवा जंगलात प्रवेश करत नाही. ट्रेक असतात तेव्हा हे शेरपा लोक ४०-४० किलो वजन पाठीवर घेऊन प्रवास्यांपेक्षा जास्त वेगाने पहाडावर चढून जातात. एकदा चढून जाण्याचे पाच किंवा सहा हजार रुपये एका शेरपाला द्यावे लागतात. ज्ञानने आम्हाला शेरपा लोकांबद्दल इतकी माहिती दिल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशीच्या ट्रेकमधे शेरपा लोकांना पाहण्यासाठी उत्सुक झालो होतो. त्यानंतर मयुरेशदाने आम्हाला काही भुताटकी गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आमची स्थिती अजूनच गंभीर झाली होती. कॅंपवरचं वातावरण बघता 'रात्री आपण गाडीत झोपू' असाही विचार आम्ही केला होता. शेवटी आम्ही टेंटमधेच झोपायला गेलो. रात्री जसजशी थंडी वाढत होती, तसतसाच वारा पण खूप भयंकर होत होता. सगळेच टेंट खूप हलत होते. वाटत होतं की एखादा टेन्ट उडून जाईल पण तसं काही झालं नाही. थोडी भीती मनात ठेवून आम्ही सगळे झोपलो, पण त्या रात्रीसारखी गाढ झोप पूर्ण टूरमधे आम्हाला लागली नव्हती. सकाळी मला थोडी लवकर जाग आली आणि मी टेंटमधून बाहेर आलो. समोरच बांबूच्या रेलिंगवर एक मोठा गरुड बसला होता. मी खिशातून मोबाईल काढणार तेवढ्यात त्याने आपले विशाल पंख पसरवले आणि मोठी झेप घेतली. त्याचे पंख पाहून मी सुद्धा थोडा घाबरलो होतो. थोड्याच वेळात सगळे उठले. आम्ही तयारी केली आणि नाश्ता करण्यासाठी समोर गेलो. तोशच्या कॅंपवरून आम्हाला खीरगंगा ट्रेकसाठी निघायचं होतं. सगळ्या बॅग गाडीत ठेवल्यावर ज्ञान आम्हाला ट्रेक सुरु होणार त्या ठिकाणी घेऊन गेला.

बाकी गोष्टी पुढील भागात

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

4 comments:

  1. मस्तच, पुढील भागाची उत्सुकता

    ReplyDelete
  2. Good,interesting simple free flowing language presents the beautiful picture of Nature. Bravo go ahead. ....

    ReplyDelete
  3. Tosh was amazing. Kheerganga was the cherry on the top. Can't wait to read Kheerganga's day.

    ReplyDelete