बहरलेल्या पिकांतूनी
वाऱ्यासम धावत होताक्रांती करण्यासाठी तो
मातीत शस्त्रे पेरत होता
रक्ताळ लाल माती त्याने
घरात ठेवून पूजली होती
उध्वस्त करेल गोरी सत्ता
गाठ मनाशी बांधली होती
ध्येयपूर्तीसाठी आता
गृह त्यागाची वेळ आली
भगत छाव्याला तेव्हा
पंजाब सिंहाची भेट झाली
पाहणी करण्या भारताची
सायमन कमीशन आले
सायमन परत जा स्वदेशी
ही गर्जना हिंदलोकी चाले
सॉंडर्सचा आदेश होता
लाठीचा भडीमार झाला
लालाजी पडले खाली
मोर्चा तो मागे हटला
हिंसेला उत्तर देण्यास
आता हिंसाच करणार
रक्ताळ लाल रस्त्याला
आम्ही रक्तानेच धुणार
बहिऱ्यांना ऐकविण्यासाठी
आपण मोठ्यानेच बोलू
'इंकलाब'चा नारा देऊन
सगळे आनंदात डोलू
शेवटची घडी आली
'रंग दे बसंती' गाऊया
चला फासावर लटकून
आपण अमर होऊया
© गंधार कुलकर्णी
९१५८४१६९९८