Followers

Thursday, January 5, 2023

रस्त्यावर मिळालेली शिकवण...

 
सध्या सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये परीक्षेची धावपळ सुरू आहे. त्यात आमच्या महाविद्यालयातील परीक्षेची जबाबदारी आईकडे असल्यामुळे ही धावपळ आम्हाला जरा जास्तच जाणवते. रोज सकाळी आणि दुपारी दोन्ही शिफ्टमध्ये पेपर असल्यामुळे आई आणि मी सकाळी ८ वाजता घरून निघालो की सर्व कामं संपवून घरी यायला संध्याकाळचे ६ वाजतात. सकाळचा पेपर झाल्यावर बाबांनी आणलेला डबा आम्ही जेवतो आणि पुन्हा कामाला लागतो. परीक्षा केंद्र व्यवस्थित राहावं यासाठी अनेकवेळा आम्हाला स्वतःच्या मूळ स्वभावापेक्षा विरुद्ध वागावं लागतं. आपण कितीही मनमिळावू आणि बिनधास्त स्वभावाचे असलो तरीही आवश्यकतेपेक्षा जास्त कडकपणे वागावं लागतं. खरं तर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात एका बारीक धाग्याप्रमाणे जो फरक असतो तो कायम ठेवण्यासाठी असं वागावं लागतं. कॉलेजचे आणि परीक्षेचे कामं, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्या, ऐन कामाच्या वेळेत भेटायला येणारे अनेक लोकं, इतर महाविद्यालयातले मार्गदर्शन घ्यायला येणारे काही विद्यार्थी अशा सर्व गोष्टी पूर्ण करून आम्ही घरी येतो. गेल्या एक-दीड महिन्यांपासून वरीलप्रमाणे आमची दिनचर्या सुरू आहे. कधी कधी कामाच्या तणावामुळे थोडी चिड-चिड सुद्धा होते. दुनियादारीच्या नावाखाली मनाला पटत नसलेल्या गोष्टी कराव्या लागल्या की रात्री झोपण्यापूर्वी एक प्रश्न निर्माण होतो. "आपल्या स्वभावातील कृत्रिमता वाढत तर नाही चालली ?"

असं यंत्राप्रमाणे काम करत राहण्याचा आणि अतिशय व्यस्ततेच्या इतर दिवसांसारखा आजचाही दिवस असेल असं कॉलेजमधून निघतांना मला वाटलं. आई आणि मी कॉलेजमधून निघालो आणि परतवाड्यातील वाघामाता मंदिरासमोरून आमची गाडी जात असतांना मनाला आनंद व समाधान देणारा एक छोटासा प्रसंग घडला. वाघामाता मंदिराजवळ एक झोपडपट्टी आहे. बरेचदा संध्याकाळच्या वेळी झोपडपट्टीतील लहान मुलं खेळता-खेळता रस्त्यावर येतात. त्यामुळे तिथून जात असतांना गाडी थोडी हळूच चालवावी लागते. आजसुद्धा झोपडपट्टी समोरून जात असतांना मी गाडीची स्पीड कमी केली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने कुत्र्याचं एक छोटं पिल्लू हळूहळू चालत रस्ता पार करत होतं आणि त्याच बाजूने एक ट्रक भयंकर वेगात येत होता. तेवढ्यात झोपडपट्टीतील एका लहान घरातून एक लहान मुलगी रस्त्यावर धावत आली आणि कुत्र्याच्या पिल्लाला उचलून डिवाइडरपर्यंत घेऊन गेली. तिने डिवाइडरवर पिल्लाला सोडलं आणि पुन्हा धावत आपल्या घरात गेली. आम्ही गाडीतून हे सर्व बघत होतो. काही क्षणात घडलेला हा प्रसंग होता.

आम्ही घरी पोहोचलो. मी आणि आईने हा प्रसंग बाबांना सांगितला. आमच्या घरीसुद्धा एका मांजरीने काही महिन्याआधी तीन पिल्लं दिले. तेव्हापासून आम्ही त्यांना कॅटफूड आणि दूध देत आहोत. गाडीचा आवाज आला की तीनही पिल्लं धावत येतात, पायाशी खेळतात, बाबांसोबत पाळण्यावर बसतात. दिवसभरातील कामाचा थकवा या तीन पिल्लांना बघून निघून जातो, मन प्रसन्न होतं, चेहऱ्यावर आनंद येतो. असं का होतं ? याचा विचार आपण केला आहे का ? रोज आपण कित्येक लोकांसोबत वावरतो. त्यात गरीब, श्रीमंत, विद्वान, चतुर, चापलूस, मुफट अशा अनेक प्रकारचे लोकं असतात. तरीही त्यांच्यासोबत आपण ठराविक काळापेक्षा जास्त राहू शकत नाही. परंतु पक्षी किंवा प्राण्यांचा सहवास आपल्याला इरिटेड होत नाही. एखाद्या वेळेस आपण रस्त्यावर पडलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करू पण एखाद्या प्राण्याला गाडीमुळे काही दुखापत झाली तर आपल्याला काही क्षण तरी वाईट वाटतं.

आज अनेक लोकं माणसांपेक्षा जास्त प्राण्यांवर प्रेम करतात. या सर्व भावनिक भानगडीचं मुख्य कारण म्हणजे माणसांमध्ये घटत असलेली निरागसता व सरलता आणि वाढत असलेली कृत्रिमता आहे, असं मला वाटतं. माणसाचे पिल्लं मोठं झालं की त्याच्यातील निरागसता कमी होते आणि कृत्रिमता वाढते. परंतु प्राण्यांच्या पिल्लांबाबत असं होत नाही. खरं तर माणूस जितका उच्चशिक्षित, सुसंस्कृत, श्रीमंत व विद्वान होतो आहे, तितकी त्याच्यातील कृत्रिमता वाढत आहे. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या 'वाइज अँड अदरवाइज' या पुस्तकातील एका लेखामध्ये त्यांनी रस्त्यावरील एका भिकाऱ्याचं उदाहरण देऊन तो इतर श्रीमंत लोकांपेक्षा कसा जास्त सुखी आहे, हे सांगितलं आहे. प्राणी, पक्षी किंवा लहान मुलांकडे बघून आपल्याला आनंद होत नसतो तर आपल्याला आनंद देत असते त्यांच्यातील निरागसता व सरलता. 'झोपडपट्टीतील मुलगी आणि रस्त्यावरील कुत्र्याचं पिल्लू' हा प्रसंग जरी काही क्षणात घडलेला असला तरी त्यातून एक फार महत्वपूर्ण शिकवण मला मिळाली. सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी निरागसता व सरलता खूप आवश्यक आहे. जी त्या झोपडपट्टीतील मुलीमध्ये आणि रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लामध्ये होती.

© गंधार कुलकर्णी
५ जानेवारी २०२३

No comments:

Post a Comment