Followers

Saturday, November 23, 2024

गरम पोळी आपल्या घरी खावी !

लक्ष्मी पूजन आणि तुळशीचे लग्न झाले की लग्नाच्या तिथी सुरु होतात. कधी कधी तर एकाच महिन्यात दहा-बारा लग्नात किंवा लग्नानंतरच्या स्वागत समारंभात जावं लागतं. मग अशा ठिकाणी अनेक लोकं भेटतात आणि अनेक लोकांच्या विविध विचित्र सवयीसुद्धा बघायला मिळतात. कधी कधी आपल्याही डोक्यात कोणतेच विचार नसलेत की आपण समोरच्या लोकांचं निरीक्षण करायला लागतो आणि त्यात काही विचित्र वाटलं तर त्याचा विचारही करायला लागतो. कामाच्या व्यस्ततेत तर असं निरीक्षण वगैरे काही होत नाही. पण शनिवारच्या संध्याकाळी एखाद्या ठिकाणी जाण्याचा योग आला आणि तिथे जर असं काही आढळलं तर मग विचारचक्र सुरु होऊन अशा लेखांचा जन्म होतो.

काल संध्याकाळी आम्ही एका लग्नात गेलो होतो. आता लग्न म्हंटलं की अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यात काही पदार्थांमध्ये विविधताही बघायला मिळते. प्रत्येक लग्नात काही ठराविक पदार्थांसमोर तो पदार्थ मिळविण्यासाठी लोकांची धडपड सुरु असते. उदा. पाणीपुरी, नूडल्स, आइसक्रीम आणि गरम पोळी. कालच्या लग्नातसुद्धा गरम पोळी मिळविण्यासाठी होणारा एक छोटासा संघर्ष मी बघितला. कालच्या लग्नात पोळ्यांचे दोन टेबल लावलेले होते. त्यात एका ठिकाणी गरम पोळ्या करून ठेवलेल्या होत्या तर बाजूलाच दुसऱ्या टेबलवर तव्यावरची टम्म फुगलेली पोळी थेट ताटात मिळत होती. तिथेच गरम पोळी मिळविण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली होती. मी तिथे गेलो तर माझ्यासमोर सूट-बूट घातलेले आणि जरा सभ्य वाटणारे दोन माणसं उभे होते. पोळ्यावाल्या बाईने एक पोळी गरम केली आणि त्या दोघांपैकी एकाच्या ताटात पोळी टाकणार इतक्यात दुसऱ्या माणसाने "मी पण इथे उभा आहे, आधी मला पोळी द्या" असं म्हणून थोडा वाद घातला. तिथला वाद बघून मी बाजूच्या टेबलवरील भांड्यातील थोडी कोमट झालेली पोळी घेऊन माझं जेवण पूर्ण केलं आणि आम्ही घरी आलो.

आता असे कित्येक प्रसंग प्रत्येक लग्नात घडतात आणि आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपलं काम करतो, जसं मीसुद्धा केलं. पण कधी अशा घटनांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण किती आत्मकेंद्रित व स्वार्थी होत आहोत. खाण्याची हौस असणारे आणि आवडीने प्रत्येक पदार्थाचा आस्वाद आणि आनंद घेणारे खूप लोकं मी बघितले आहे. पण असे वाद बघितल्यावर, गरम पोळी मिळाली नाही किंवा पोळी दुसऱ्याला आधी मिळाली म्हणून एखाद्या समारंभात वाद करण्याइतके आपण संकुचित विचारांचे आणि वृत्तीचे होत आहोत का ? असा प्रश्न मनात निर्माण होतो. आपल्या घरी गरम पोळीवर तूप घेऊन खाणे ही गोष्ट वेगळी आहे, पण तशीच गरम पोळी आपल्याला सगळीकडे मिळालीच पाहिजे, असा हट्ट करणे, हे किती मूर्खपणाचं लक्षण आहे.

विषय गरम पोळीवरून सुरु झाला, पण आपण कधी या गोष्टीचा विचार करतो का की अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणे, वाद करणे याचा किती वाईट परिणाम आपल्या मनावर आणि तब्बेतीवर होऊ शकतो. सुख आणि समाधान अनुभवण्यासाठीच आयुष्यभर आपण धडपड करत असतो. पण अशा क्षुल्लक गोष्टींना अति-महत्त्व देऊन आपण चिडचिड करत असू तर सुख आणि समाधान मिळणे तर दूरच उलट आपल्यामध्ये नकारात्मकता वाढत जाते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण काही तरी वाईट शोधत रहातो आणि त्या गोष्टीचा आनंद घेण्यापासून मुकतो. अशी वृत्ती वाढत गेली तर काही क्षणांसाठी का होईना पण इतर लोकं आपल्याकडून दुखावले जातात. इतर लोकांचं सोडा पण अशा विचित्र वृत्तीमुळे आपल्या स्वतःच्या जीवनातील शांतता नक्कीच भंग होते. त्यामुळे एक सुखी, समाधानी, शांत व चांगलं जीवन जगण्यासाठी तरी आपण अशा विचित्र सवयी नव्हे चोचले कमी करावे आणि चांगलं जीवन जगण्याची सवय स्वतःला लावावी.

आणि तरीही गरम पोळी खाण्याची इच्छा झाल्यास, इतरांच्या समारंभात राडा न करता, प्रत्येकाने स्वतःला जशी लागेल तशी गरम पोळी आपल्या घरी खावी !

© गंधार कुळकर्णी
  ९१५८४१६९९८

Friday, May 17, 2024

आठवणीतली विजुकाकू

उन्हाळ्याच्या सूट्या सुरू असल्यामुळे निवांतपणे घरातले कामं करता येतात. २ मे चा दिवससुद्धा असाच होता. सकाळी मी आणि विश्राम घरातले कामं करत होतो. गंधार परीक्षेच्या कामासाठी कॉलेजमध्ये गेला होता. स्वयंपाक घरातले कामं झाल्यावर मी मोबाईल बघितला तर त्यात आशुदादाचा मेसेज आला होता. मेसेज वाचून विजुकाकू गेल्याचं कळलं. २३ तारखेपासून दवाखान्यात भरती असलेली विजुकाकू आमच्यातून निघून गेली होती. मन सुन्न झालं होतं. पहिले रामकाका, नंतर माझे वडील (दादा), त्यानंतर माझी आई आणि आता काकू या सर्वांच्या जाण्यामुळे परिवारातील चैतन्य, वैभव, आधार निघून गेला होता. संध्याकाळी ५ वाजता काकुची अंतिम विधी होणार होती. आम्ही १२:३० वाजता घरून निघालो. प्रवासात असतांना रस्त्यावरील झाडांप्रमाणे प्रत्येक जुनी आठवण डोळ्यांपुढे येत होती आणि क्षणात धूसर होत होती.

१९९५ च्या जुलै महिन्यात माझं लग्न विश्रामसोबत जुळल्यावर, मला पहिली साड़ी देणारी विजुकाकू एकदम माझ्या डोळ्यासमोर आली आणि माझे डोळे पाणावले. १९९७ साली गंधारचा जन्म झाला तेव्हा रामकाका आणि विजुकाकू अमेरिकेला गेले होते. दादांनी रामकाकांना गंधारच्या जन्माची बातमी कळवली. तेव्हा विजुकाकुला इतका आनंद झाला की तिने अमेरिकेतून गंधारसाठी ड्रेस आणले होते. गंधार चार महिन्याचा होता तेव्हा विश्रामचा फार मोठा अपघात झाला. आजही ते दिवस आठवले की अंगावर काटा उठतो. पण अशा कठीण काळातसुद्धा विजुकाकू अतिशय खंबीरपणे आमच्यासोबत होती. अपघाताच्या स्थळावरून विश्रामला नागपूरच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेव्हा आम्ही दवाखान्यात पोहोचण्याआधी विजुकाकू तिथे उपस्थित होती. पुढे आमच्या संघर्षाच्या काळातसुद्धा विजुकाकुने विश्रामचा मुलाप्रमाणे सांभाळ केला.

पुढे आमच्या घरांचे वास्तु, गंधारचा उपनयन संस्कार या सगळ्या आनंदाच्या क्षणी तारे व कुलकर्णी परिवारातील वडीलधाऱ्या व्यक्तींप्रमाणे रामकाका व विजुकाकू आम्हाला आशीर्वाद द्यायला उपस्थित होते. रामकाका व काकुंमुळे आमचा मंगेशकर परिवाराशी संबंध आला आणि मला पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतावर संशोधन करण्याची परवानगी मिळाली. संशोधनाचे कार्य सुरू असतांना दादा आणि रामकाका माझ्यासोबत होते. पण जेव्हा या संशोधन प्रबंधावरील पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा दादा आणि रामकाकांची उणीव विजुकाकुने भरून काढली. माझ्या आग्रहासाठी विजुकाकू, आशुदादा आणि मनीषा वहिनीने त्यांच्या नागपूरच्या घरी पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा संपन्न करून घेतला. तेव्हा विजुकाकुने स्वतः माझ्या 'हृदय संगीत' पुस्तकाचे प्रकाशन केले होते. पुढे एकदा विजुकाकू भारती मंगेशकर (हृदयनाथ मंगेशकरांच्या पत्नी) यांना आमच्या घरी घेऊन आली होती. तो दिवस तर फारच अविस्मरणीय आणि अवर्णनीय आहे.

कोरोनानंतर विजुकाकू अतिशय थकली होती. तरीही मोठ्या महाराजांच्या (भाऊसाहेब शेवाळकर) पुण्यतिथीला स्वतः इथे यायची आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्व विधी करून घायची. माझ्याकडे या पुण्यतिथी उत्सवात ब्राम्हणांना सोवळ्यात वाढण्याचं काम असतं. सर्व काम झाल्यावर आमचे जेवणं होईपर्यंत समोर थांबणारी विजुकाकू, अधून-मधून माझी आणि विश्रामची गंमतसुद्धा करायची. गंधारने लिहिलेल्या लेख व कवितांचे तिला फार कौतुक होते. गंधारने रामकाकांवर लिहिलेली कविता विजुकाकू सर्वांना आवर्जून दाखवत असे.

विजुकाकू उत्कृष्ट शिक्षिका झाली असती, असे माझे दादा मला नेहमी सांगायचे. कारण काकुला मुलांना शिकविणे फार आवडत होते. पण रामकाकांचा एवढा मोठा व्याप, नावलौकीक, त्यात घरातील सण, उत्सव त्यामुळे घरात सतत पाहुण्यांची वर्दळ असायची. शेवाळकरांचा हा डोलारा सांभाळत असतांना  विजुकाकुने आपली आवड बाजूला ठेवली. कारण रामकाकांच्या चेहऱ्यावरील आनंद तिला सर्वात जास्त महत्वाचा होता.
एकदा रामनवमीच्या उत्सवाला काकू अचलपूरला आली असतांना, घरी जेवायला आली, आम्हा तिघांनाही खूप आनंद झाला. पुढे उत्सवाचे काम करतांना ती माझ्याकडे कौतुकाने बघत होती, मग मी काकूच्या गळ्यात पडून माझा लोभ करुन घेतला.

'नेहमी सर्वांचं कौतुक करणारी, नेहमी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी विजुकाकू आज आपल्यात नाही.' या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. अजूनही असं वाटतं की मोठ्या महाराजांच्या उत्सवाच्या दोन दिवसआधी काकुचा फोन येईल आणि ती म्हणेल,"तुम्हाला तिघांना इकडेच यायचं आहे बरं !" असं असलं तरी यावेळी मोठ्या महाराजांच्या उत्सवात डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसलेली विजुकाकू आता तिथे दिसणार नाही. याचं दुःख नेहमीकरीता राहिल...

© डॉ. जयश्री विश्राम कुलकर्णी
संपर्क क्र. - ९२८४५८३७९७