Followers

Wednesday, October 17, 2018

गाविलगड हा विदर्भातील अतिशय प्राचीन किल्ला असून अत्यंत समृद्ध व उच्च दर्जाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. पण या किल्ल्याला इतिहासात जसे पाहिजे तसे महत्व मिळाले नाही. समाजातील एखाद्या उपेक्षित घटकाप्रमाणे या किल्ल्याची दशा झाली आहे. 'उपेक्षिताचे अंतरंग' या माझ्या कवितेत गाविलगड स्वतः आपला इतिहास सांगत आहे, अशी कल्पना करून मी ही कविता लिहिली आहे.

उपेक्षिताचे अंतरंग 

चहुकडे प्रचंड हा सातपुडा पसरला 
प्राचीन वैभवाचा रंग माझा ओसरला
पांडवांच्या पावलांनी पवित्र झालेला
वऱ्हाडाचा कधी मुकुटमणी ठरलेला
गाविलगड आता एकटाच रे उरला  - १

वाजती ढोल नगाडे साऱ्या गडात 
मी राहात होतो तेव्हा राजथाटात 
सजायचो कसा मी पूर्ण या पर्वतात 
पण सध्या गडासाठी वेळ कोणाला ?
गाविलगड आता एकटाच रे उरला  - २

कधी येथे यादवी होती माजली
कधी सुल्तानी फिरल्या तलवारी
कधी सत्ता गवळी राजांनी केली
आज वीरांची वाट माझ्या द्वाराला 
गाविलगड आता एकटाच रे उरला  - ३ 

मोगल आले कापत वेगाची धार 
गड विजयाचा एकच होता निर्धार
मी मोगलांचा जाहलो होउनी करार
आज मी शोधतो इमाद,अकबराला
गाविलगड आता एकटाच रे उरला  - ४

कधी स्मरतो मला छत्रपतींचा मराठा 
कधी गुंजतात इथे घोड्यांच्या टापा
कधी मी नाहतो सुरात तुतारीच्या
मला वाचविणारा मावळा कुठे गेला ? 
गाविलगड आता एकटाच रे उरला  - ५

अचानक आवाज गर्जला तोफांचा 
बारूद बरसले बंदुकातून इंग्रजांच्या
फितुरी हाच दोष ठरला नवाबाचा
म्हणूनीच तयांनी गड हा जिंकला
गाविलगड आता एकटाच रे उरला  - ६

आज कधी विजांच्या तलवारी चालतात 
कधी पावसाचे बाण गगनातून बरसतात 
माझे अस्तित्व सुद्धा लागले झिजायला 
सांग कधी विराम भेटणार या युद्धाला 
गाविलगड आता एकटाच रे उरला  - ७

मी पाहिले हात इतिहास घडविणारे
मी पाहिले हात इतिहासाला शोधणारे
पण हात कुठे आहेत इतिहास जपणारे ?
त्या हातांचीच प्रतीक्षा या उपेक्षिताला  
गाविलगड आता एकटाच रे उरला  - ८

© गंधार कुलकर्णी.

No comments:

Post a Comment