Followers

Friday, November 30, 2018

मशाल

रोज हसण्याची मागणी तुझी
व्यथा माझी कशी सांगू तुला
आसवे ही माझी व्यर्थ नाही पण
बाजार दुःखाचा मी मांडू कशाला

तेच ते चेहरे दिसतात रोजच
उरात तीच वीज कडकडते
योग्य वेळेची प्रतीक्षा मला
आता हा राग नासवू कशाला

जीवन जणू हे शतरंज झाले
मी पण वेडा राजा खेळलो
माझाच प्यादा मात देऊन गेला
विरोधी वजीर मी मारू कशाला

माझे चालले रोज मलाच सावरणे
तुझ्या डोळ्यातले पाणी पुसू कसे मी
धीर देणारे शब्दच घाव देऊन गेले
समजुतीचे शब्द आता मागू कशाला

परत निघेल मिटविण्यास अंधार सारा
परत एकदा लावेल मी समुद्रात ज्वाळा
माझी मशाल ही सरणातल्या लाकडाची
चुलीतल्या काड्यांना मी घाबरू कशाला

© गंधार कुलकर्णी

No comments:

Post a Comment