'ख्रिसमस' आणि 'न्यू ईयर' आले की 'पार्टी' आणि 'एन्जॉय' हे दोन शब्द अनेकांच्या जीभेवर नाचत असतात. केक कापणे, हॉटेलमध्ये जाणे, मित्रांसोबत 'गेट टूगेदर' करणे, फटाके फोडणे, बाहेर गावी फिरायला जाणे किंवा घरी परिवारासोबत नवीन वर्ष साजरे करणे, यापैकी काही तरी 'प्लान' लोकं ठरवतात आणि 'एन्जॉय' करतात. काही उदार अंतःकरणाचे लोकं अनाथालय, वृद्धाश्रम, दिव्यांग लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत सुद्धा नवीन वर्ष मनवतात. अनेक लोकं तर "ही आपली पद्धत नाही" असं म्हणून ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी अगदी कोरडीच मनवतात.
पण 'पार्टी' करणे म्हणजे 'खाओ-पीओ-नाचो-गाओ' एवढेच आहे का ? किंवा असं केल्यानेच आपण 'एन्जॉय' केला असं प्रत्येकाला वाटतं का ? असा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला तर त्याचं उत्तर 'नाही' असच मिळणार. खरं तर 'पार्टी' आणि 'एन्जॉय' या दोन शब्दांना आपण खूपच मर्यादित करून ठेवलं आहे. 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' यानुसार वरील दोन शब्दांचे अर्थ, कल्पना, मत आणि विचार हे प्रत्येक व्यक्तीचे भिन्न असू शकतात. एखादा माणूस घराच्या अंगणात कोवळया उन्हात शांत बसून राहील, एखादा मुलगा नवीन वर्षात वाचायच्या पुस्तकांची यादी बनवेल, एखादी बाई घरात शांत बसून तिच्या आवडीचे गाणे गुणगुणत राहील, कोणी नवीन कपडे घेतील, कोणी घराची स्वच्छता करतील, कोणी आपल्या शिक्षकांना भेटायला जातील, असेही 'प्लान' अनेकांच्या 'न्यू ईयर'चे असतील आणि हाच त्यांचा 'एन्जॉय' असेल. अनेक लोकं असेही असतील की जे नवीन वर्ष अगदी एकटे राहून मनवतील. आपल्याला एकटे आणि शांत राहणारे लोकं 'बोरिंग' वाटतात, पण ते त्यांच्या ठिकाणी खूप 'एन्जॉय' करतात, असही असू शकतं. अनेक लोकं असेही असतील की जे रोजच्या पेक्षा काहीच वेगळं करणार नाहीत, तरीही प्रसन्न दिसतील. 'एन्जॉय' शब्दाची व्याख्या ही प्रत्येक व्यक्तीची वेगळीच !यातून अजून एक विषय समोर येतो, तो म्हणजे "कलाकार किंवा साहित्यिक लोकं थोडे वेगळेच असतात" असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो. पण ते लोकं वेगळे का असतात ? असा प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारत असू. या विषयाचा संबंध सुद्धा 'एन्जॉय' करण्याशीच आहे. कलाकार आणि साहित्यिक लोकं आपल्याला वेगळे वाटतात कारण ते त्यांच्या कलेसोबत कोणत्याही साधारण मनुष्यापेक्षा जास्त 'एन्जॉय' करत असतात. बरेच लोकं एकाच प्रकारचे कपडे घालतात. आपल्याला ही गोष्ट विचित्र वाटते, पण ते त्या कपड्यांमध्ये 'एन्जॉय' करत असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की यावर्षी 'ख्रिसमस' आणि 'न्यू ईयर'ला आपल्याला कोणी शांत बसलेला किंवा जल्लोष करत नसलेला मनुष्य दिसला तर तो 'पार्टी' आणि 'एन्जॉय' करत नाही असं समजू नये. उलट 'जीओ और जीने दो' हे तत्वज्ञान अंमलात आणून आपण आपली 'पार्टी' करावी आणि इतरांना त्यांची 'पार्टी' करू द्यावी. कारण प्रत्येकाचा वेगळा 'एन्जॉय' आणि प्रत्येकाची वेगळी 'पार्टी' !
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!
© गंधार विश्राम कुलकर्णी
दि. २२ डिसेंबर २०२०
Good
ReplyDeleteFrom Dr.S.M.Hadole
खुप छान🙏
ReplyDeleteछान विचार
ReplyDeleteखूपच सुंदर sir
ReplyDelete