'जंगल सफारी' म्हंटल की सर्वात आधी आपल्यापैकी बहुतांच्या डोक्यात 'जंगलात जावून वाघाला पाहणे' एवढाच विचार येतो. दोन वर्षा आधीपर्यंत मी सुद्धा अश्या लोकांपैकी एक होतो. सहा वर्षांआधी आम्ही उत्तराखंड राज्य भ्रमंतीसाठी गेलो होतो. त्यात नैनीताल, कौसानी, राणीखेत, हरिद्वार आणि कॉर्बेट अभयारण्य इतके ठिकाणं फिरण्याचा 'टूर पॅकेज' होता. जिम कॉर्बेट या शिकाऱ्याने लिहिलेल्या कॉर्बेट जंगलातील वाघांच्या रोमांचक कथा मी वाचल्या असल्यामुळे मला इतर ठिकाणांपेक्षा कॉर्बेट जंगलाचं आकर्षण थोडं जास्त होतं. 'टूर पॅकेज'मध्ये असलेले जवळपास अर्धे ठिकाणं पाहून झाल्यावर आम्ही कॉर्बेट जंगल पाहण्यासाठी गेलो. जुकाजो महाराणी नावाच्या हॉटेलमध्ये सर्वांचे बूकिंग्स होते. पोहोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जंगल सफारी होती. हॉटेल जंगलातच असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रत्येक खोलीपर्यंत जंगली प्राण्यांचे आवाज अतिशय स्पष्ट ऐकू येत होते. त्या आवाजांमुळे माझी प्राणी बघण्याची आणि त्यातही वाघ बघण्याची इच्छा अजूनच तीव्र होत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगल सफारी सुरू झाली. दळण दळणाऱ्या चक्कीतल्या माणसाच्या अंगावर पीठ उडावं, तशी समोर चालणाऱ्या जिप्सीमुळे जंगलातली धूळ आमच्या अंगावर उडत होती. हरणांचे कळप, वेगवेगळे पक्षी, जंगलातून वाहणारी नदी, एका झाडाच्या फांदीवर बसलेला मोठा गरूड, जंगलातले इतके विविध घटक बघितल्यावर सुद्धा गाडीत बसलेल्या सर्वांच्या नजरांना वाघाचीच वाट होती. जिप्सी पूर्ण जंगलभर फिरली आणि वाघ बघण्यासाठी जिप्सीत बसलेलो आम्ही वाघाच्या पंज्यांचे ठसे पाहून हॉटेलमध्ये उतरलो.
उत्तराखंड टूर झाला. दोन वर्षाआधी मी एका काव्यलेखन कार्यशाळेसाठी शाहनूर अभयारण्यात गेलो होतो. अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाने आयोजित केलेली तीन दिवसाची कार्यशाळा होती. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जंगल आणि नरनाळा किल्ला पाहण्यासाठी निघणार होतो. पुन्हा आम्ही सर्वजण 'वाघ दिसेल का ?' याविषयी चर्चा करत होतो. तेव्हा आम्हाला पाहून विद्यापीठाच्या मराठी विभागातले प्राध्यापक डॉ. हेमंत खडके सर म्हणाले,"मित्रांनो जंगल सफारीला जातांना तुम्ही फक्त वाघ पाहायला गेले आणि वाघ नाही तर तुम्ही नाराज व्हाल, पण तुम्हाला जर जंगल सफारीचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जंगल पाहायला जा" थोड्याच वेळात जिप्सी सुरू झाली आणि आम्ही खऱ्या अर्थाने जंगल पाहायला निघालो. जंगलातील थंडगार हवा, गर्द हिरव्या झाडातून डोकावणारा पहाटेचा सूर्य, हरणांचे कळप, झाडाच्या शेंड्यावर बसलेले बगळ्यांचे थवे असं सर्व बघत असतांना, जिप्सी थांबली, समोर पायवाटेवर वाघाचे पंज्यांचे ठसे होते. नेहमीप्रमाणे मी त्या ठस्यांचे फोटो घेतले आणि जिप्सी समोर निघाली. त्यानंतर नरनाळा किल्ला बघून आम्ही परतलो. तीन तासांच्या जंगल सफारीत मी २०० पेक्षा जास्त फोटो घेतले. त्यात पाण्यात दिसणाऱ्या झाडाच्या प्रतिबिंबापासून तर किल्ल्यात लटकलेल्या वटवाघूळांपर्यंत प्रत्येक घटक आणि आम्ही अनुभवलेल्या आनंदाचा प्रत्येक क्षण मी कॅमेरात साठवून ठेवला.© गंधार विश्राम कुलकर्णी
दि. ०२ फेब्रुवारी २०२१
संपर्क : ९१५८४१६९९८
वाघ असा न तसा दिसतोच, शहानुरला 'विठ्ठल' वाघ पाहिला
ReplyDeleteSunder mahiti ahe.
ReplyDeleteChan
ReplyDeleteगंधार.. शेवटची 2 वाक्य... खरं आनंद सांगून गेली. लिहीत रहा. ✍️💐👏👏👏
ReplyDeleteOutstanding opinion
ReplyDeleteलेख फार चांगले आहे पाठविलेल्या बद्दल धन्यवाद.
ReplyDelete