Followers

Friday, November 11, 2022

सूटीतील सोन्याचा दिवस

कोरोनाची दीर्घ सूटी लागल्यापासून आम्ही सर्व घरातच बसून होतो. १६ मार्च पासून सर्व बंद झालं आणि एक-दोन दिवसातच घर नकोसे व्हायला लागले. पण काही उपाय नसल्याने पुढच्या एक-दोन दिवसात माझ्या दिनचर्येत मोठा बदल झाला, नव्हे तो मीच केला. विचित्ररात्रयोग व अवेळीनिद्रायोग अशा दोन योगांचा माझ्या कुंडलीत शिरकाव झाला आणि पहाटे ४ वाजता झोपणे, सकाळी ११ वाजता उठणे, पाहिलेले सिनेमे पुन्हा पुन्हा पाहून कंटाळाशी झुंज देणाऱ्या मनाला थोडे रमवून घेणे हेच सुरू होतं. दिवसातून एकदा थोडा अभ्यास करून अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न मी करत होतो. 'Whatsapp वर आलेले कोडे सोडवणे' हा एक नवीन उपक्रम तिघांच्याही दिनचर्येचा भाग झाला होता. आई-बाबांनी केलेल्या विविध पदार्थांवर रोज ताव मारणे सुद्धा सुरू होते. अशातच २३ मार्चला दुपारी हर्षू काकाचे "येशु ख्रिस्तावर कविता करतो का ?", "आवडली तर यु ट्युबवर येईल" असे मेसेज आले. मी सुद्धा होकार दिला आणि कवितेसाठी विचारप्रक्रिया सुरू झाली. ख्रिस्ताची माहिती मिळवण्याची मोहीम मी हाती घेतली. रात्रीपर्यंत 'ख्रिस्त दिसतो मला' असे शीर्षक ठरले. 

२४ मार्चचा दिवस येशू ख्रिस्ताचे दोन सिनेमे, त्याच्या जीवनावरील अनेक प्रसंग व लियोनार्डो दा विंसीने रेखाटलेले चित्र अभ्यासण्यात गेला. रात्रीपर्यंत सुद्धा शीर्षकापुढे पेन काही गेला नाही. जेवण झाल्यावर कुसुमाग्रजांचे विशाखा व समिधा हे दोन काव्यसंग्रह चाळलेत. ख्रिस्त दिसतो, पण कुठे दिसतो ? कोणामध्ये दिसतो ? असा विचार करत असतांना पहिल्या काही ओळी जन्माला आल्यात आणि समाजातील असहाय्य स्त्रीमध्ये मला ख्रिस्त दिसला. तेव्हा रात्रीचे ३:३० वाजले होते. दुसऱ्या दिवशी 'The Last Supper' या प्रसंगाचा संबंध आजच्या वृद्ध माणसाच्या अंतिम स्थितीशी जोडून त्यावर दुसरे कडवे लिहून झाले. सद्य परिस्थितीत वर्तमान आणि भविष्याच्या प्रश्नामध्ये अडकलेला तरूण व क्रुसाच्या प्रतिमा एकत्रित झाल्या. कविता पूर्ण झाली होती पण मी असमाधानी होतो. २५ तारखेला संध्याकाळी कविता हर्षू काकाला पाठवली. आता परत कवितेची डागडुजी सुरू होऊन तिसऱ्या कडव्यात बदल केला. आजही आपल्याला ख्रिस्त समजला नाही असा शेवट करून, जुडासाचा दोष स्वतःवर घेउन कविता पूर्ण झाली. ही कवितेची प्रक्रिया चालू असतांना 'क्रुसाच्या कविता' या यू ट्यूब चॅनलचे संचालक डॉ. अमित त्रिभुवन ह्यांच्या सोबत संपर्क साधला होता. त्यामुळे २६ तारखेला सकाळी त्यांना कविता, अल्पपरिचय व एक फोटो Whatsapp वर पाठवला.

२७ तारखेला सकाळी उठलो तेव्हा कवितेचा वीडियो यू ट्यूब चॅनलवर आल्याचे नोटिफिकेशन स्क्रीनवर झळकत होते. Whatsapp, Facebook वर वीडियोची लिंक पाठवली. दिवसभर सर्वांचे कौतुकाचे मेसेज येत होते. वीडियो पाहण्याऱ्यांची संख्या वाढत होती. अनेक विद्वान व अभ्यासू लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. संध्याकाळी हिस्लॉप कॉलेजचे माजी प्रचार्य डॉ. सुभाष पाटील सरांसोबत बोलणे झाले. वृद्ध बापासाठी येशूच्या प्रतिमेचा उपयोग त्यांना विशेष आवडला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील एक विद्वान व्यक्ती म्हणजे डॉ. अनुपमा उजगरे यांच्याशी भरपूर चर्चा झाली. सूर्याने एखाद्या छोट्या दिव्यासोबत उजेडाची चर्चा करावी तसा अनुभव मला डॉ. अनुपमा उजगरेंसोबत बोलतांना आला. रात्री अमित सरांनी दिवसभरात आलेल्या प्रतिक्रिया मला पाठवल्या. त्यात विजय कोल्हटकरांचा (समाजशास्त्रज्ञ डॉ. उषादेवी कोल्हटकर यांचे पती) मेसेज होता. आई-बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि इतक्या विद्वान लोकांच्या प्रतिक्रिया पाहून, एका नवीन विषयावर कविता केल्याचे समाधान डोळ्याच्या वाटेने अलगद गालावर उतरले. त्या रात्री सुद्धा मी उशीरा झोपलो. पण झोप न येण्याचे कारण होते सूटीतील सोन्याचा दिवस जगल्याचे समाधान...

© गंधार कुळकर्णी
  ९१५८४१६९९८

Saturday, September 17, 2022

शनिवारची संध्याकाळ...

हिमाचल प्रदेशचा टूर होवून बरेच महिने झाले. माइंड फ्रेश झाल्यामुळे आम्ही पुन्हा आपापल्या कामाला लागलो. त्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या सर्व महिन्यात सतत काहीना काही कार्यक्रम सुरुच होते. मित्राचं लग्न, भावाची मुंज, विविध कार्यक्रमांचे निवेदनं, सोबतच महाविद्यालयीन कामं आणि नेट-सेट परीक्षेचा न संपणारा अभ्यास. गेल्या वर्षापेक्षा या वर्षामध्ये महाविद्यालयाचे कामसुद्धा खूप वाढले होते. सकाळी एम. ए. च्या वर्गांवर दोन लेक्चर आणि दुपारी बी. ए. च्या वर्गांवर तीन लेक्चर असे दररोज पाच लेक्चर मी घ्यायला लागलो. त्यासाठी स्वतःच्या जुन्या नोट्स आणि पुस्तकांना पुन्हा चाळणं सुरु झालं. आधी रविवार म्हंटलं की 'मामाच्या घरी जाणं', 'मित्रांच्या घरी चक्कर मारणं' किंवा 'सिनेमा बघायला जाणं' यापैकी काही तरी मी करायचो. पण आता खूप जास्त व्यस्ततेमुळे मी सोमवारच्या सकाळपासूनच 'रविवार कधी येईल ?' असा प्रश्न स्वतःला विचारायचो.

मध्यंतरी काही दिवस तर व्यस्ततेची सीमा ओलांडणारे ठरले ! अनंत चतुर्दशीच्या आधीचा दिवस म्हणजे ८ सप्टेंबर २०२२ (गुरुवार) भयंकर व्यस्ततेचा व धावपळीचा होता. वरच्या परिच्छेदात उल्लेख केल्याप्रमाणे सकाळी एम. ए. चे लेक्चर चांगलेच ताकतीने घेतले. त्यानंतर घरी येऊन घाई-घाईत जेवलो आणि दुसऱ्या महाविद्यालयात बी. ए. चे लेक्चर घ्यायला गेलो. दुपारचे तीन लेक्चरसुद्धा सकाळप्रमाणेच ताकतीने झाले. घरी येतांना एका मंदीरात जायचं होतं. तेही काम झालं आणि मी व आई घरी पोहोचलो. त्याच दिवशी अचलपूरातील एका गणेश मंडळाने महिलांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजन मंडळात माझा जीवलग मित्र असल्यामुळे त्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे घरी आल्यावर फ्रेश झालो आणि थोडा नाश्ता करून कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी निघालो. दोन-अडीच तासाचा अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. कार्यक्रम चांगला झाला या आनंदात बिट्टया आणि वांगे-बटाट्याच्या मसालेदार भाजीवर मी चांगलाच ताव मारला. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबरला गणपती विसर्जनाची सूटी होती. पण त्या दिवशीसुद्धा मी माझ्या मावशीकडे होतो. तिच्या घरी जेवण होवून गणपती विसर्जन करून घरी यायला संध्याकाळचे पाच वाजले. गणपती विसर्जनाची सूटी पण अशीच गेली.

घरी आल्यावर थोडा अभ्यास केला आणि तो दिवससुद्धा संपला. मग उजाडला शनिवार ! पुन्हा सकाळी आणि दुपारी लेक्चर झाले. संध्याकाळी घरी आल्यावर मी थकलेलोच होतो. गेल्या तीन-चार महिन्यांपासून आमच्या घरी मांजरीचे तीन पिल्लं रहायला आहेत. आम्ही रोज त्यांना कॅट फूड आणि दूध देतो. पण खूप थकून आल्यावर त्या तीन पिल्लांना कॅट फूड आणि दूध देणं म्हणजे एखाद्या लंगरमध्ये वाढण्या एवढं मोठं काम वाटतं. अर्ध्या तासाची नित्य उपासनासुद्धा मोठ्या होम-हवनाप्रमाणे भासते. तरीही हे दोन्ही कामं झाले आणि त्यानंतर मी निवांत बसलो. दुसरा दिवस म्हणजे रविवार आणि त्या दिवशी काहीच काम नाही, फक्त आराम ! असा विचार मी करत होतो. "उद्या दिवसभर आराम करायचा आणि पुन्हा सोमवारपासून कामाला लागायचं." असं मी स्वतःशीच बोललो. खरं तर "आराम केल्यावर माइंड फ्रेश होतो आणि नंतर काम करण्याची मजा येते" असं आपण नेहमी म्हणतो. पण याच वाक्याची दुसरी बाजू म्हणजे मनसोक्त आराम करण्याची मजा खूप थकल्यावरच येते ! अशीच विचित्र गोष्ट शनिवार आणि रविवारची आहे. रविवारच्या सूटीचा आनंद आपल्याला 'शनिवारची संध्याकाळ' देत असते, कारण रविवारनंतर आपल्याला व्यस्त करणारा सोमवार पुन्हा येतच असतो. त्यामुळे रविवारच्या आधी आपण 'शनिवारची संध्याकाळ' जगायला हवी.

© गंधार कुलकर्णी
दि. १७-०९-२०२२

Sunday, August 14, 2022

तिरंगा अमुचा

अंधार सर्वत्र पसरला भयंकर
निराश्रित धावत होते भराभर
फाळणीच्या घावाने झाले जे बेघर
स्वीकार करण्या तेव्हा तयांचा
आकाशी फडकत होता तिरंगा अमुचा

शत्रूने प्रयास केला त्यानंतर
पुन्हा हल्ले केले त्यांनी भूमीवर
रणसंग्राम झाला पुन्हा कश्मीरावर
करण्या अंत तेव्हा त्या म्लेंच्छांचा
सैन्यासह लढत होता तिरंगा अमुचा

पडली दुष्ट नजर जेव्हा स्त्रीवर
जाहले घाव जेव्हा निर्भयावर
जेव्हा हा भारत उतरला रस्त्यावर
ज्योत पेटवून मार्ग शोधत न्यायाचा
अश्रुतून ढळत होता तिरंगा अमुचा

अधिकार मिळवूनी विश्वचषकावर
सोनपदकांना भारताने जिंकल्यावर
मात करूनी कोविडच्या संकटावर
वेध घेण्या कलामांच्या स्वप्नांचा
मंगळावर उतरत होता तिरंगा अमुचा

कधी सजतो सैनिकांच्या कपड्यावर
कधी डोलतो शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर
राज्य करतो भारतीयांच्या मनावर
साजरा करण्या उत्सव स्वातंत्र्याचा
घरोघरी फडकतो बघा तिरंगा अमुचा

© गंधार कुलकर्णी
   ९१५८४१६९९८

Saturday, May 7, 2022

आई

रात्री बसते कुशीत घेऊनी
अधांतरी भिंतीस रेटूनी
पहाटे थोड्यावेळ निजते
ती आपली आई असते

कधी परी आणते नभातून
चंद्राशी ठेवते नाते जोडून
दमल्यावरही अंगाई गाते
ती आपली आई असते

दुःख मला न स्पर्शावे
डोळ्यात अश्रु न यावे
यासाठीच रोज झटते
ती आपली आई असते

नसतो ईश्वर प्रत्येक गृही
म्हणून घरात असते आई
निरपेक्ष प्रेमाचे बीज पेरते
ती आपली आई असते

लेकरांसाठीच झिजते
लेकरांसाठीच जगते
स्वतःचे जीवन विसरते
ती आपली आई असते

© गंधार कुलकर्णी
  ९१५८४१६९९८

Friday, April 22, 2022

हिमगाथा : भाग ५

खीरगंगा ट्रेक

तोशच्या कॅंपवरून आम्ही सकाळी खीरगंगा ट्रेकसाठी निघालो. कॅंपसाईट सोडल्यावर आमचा पहिला स्टॉप बारशायनी गावाजवळ होता. त्या ठिकाणी आम्हाला ट्रेकिंगसाठी आवश्यक असलेले बूट आणि काड्या घ्यायच्या होत्या. बूट आणि काड्या घेतल्यावर तिथे डिपॉझिट म्हणून आमच्यापैकी चारजणांचे बूट दुकानात ठेवून घेतले. आता सगळ्यांच्या जवळ एक-एक लाकडी काडी आणि पाठीवर बॅग होती. वेगवेगळ्या टुरिस्ट स्पॉटवर बिझनेस कसा होऊ शकतो हे आम्ही बघत होतो. साधी लाकडी काडी जी कोणत्यातरी झाडाची तोडलेली असेल त्याचे आम्हाला भाडे द्यावे लागत होते. आता खीरगंगाच्या ट्रेकला सुरुवात झाली. गगन नावाचा मुलगा आमचा गाईड होता. एकोणीस वर्षाचा हा मुलगा साठ-सत्तर लोकांच्या ग्रुपला घेऊन खीरगंगाचा ट्रॅक करणार होता. कसोलच्या कॅंपवर भेटलेले एक-दोन मुलांचे ग्रुप आम्हाला ट्रेकला जाताना पुन्हा भेटले. साठ-सत्तर लोकांमध्ये आमच्या अकराजणांची ओळख व्हावी म्हणून आम्ही होळीचे रंग चेहऱ्यावर लावण्याचा ठरवलं. त्याप्रमाणे सर्वेश आणि आराध्यने सर्वांना रंगाचा एक-एक टिक्का आणि गालावर दोन दोन बोट लावले. आम्ही सर्वांनी आर्मी कलरच्या टी-शर्ट घालण्याचा ठरवलं होतं. त्यामुळे आमच्यापैकी कोणी मागे राहिला तर दुरूनच ओळखणं शक्य होत होते. तसेच अथर्वने सगळ्यांना आवाज देण्यासाठी 'मनी हिस्ट' या प्रसिद्ध वेबसीरिजमधल्या पात्रांचे नावं दिले होते. आमच्यापैकी अथर्व, प्रथमेश आणि ऋषीदादा यांना चालण्याची खूप सवय होती. अथर्व आणि प्रथमेश तर पट्टीचे ट्रेकर्स होते आणि ऋषीदादाला मेळघाटात २०-२० किलोमीटर रोज चालण्याची सवय होती. या तिघांच्या तुलनेत आम्ही ट्रेकिंगसाठी फारच नवीन होतो. त्यामुळे त्या तिघांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आम्ही पुढे-पुढे जात होतो. चालत असताना वाटेत दिसणाऱ्या हिमाचली केसाळ कुत्र्यांना अथर्व गोंजारत होता.

जस-जसे आम्ही वर चालत होतो तस-तसे रस्त्याचे रूपांतर पायवाटेत होत होतं. ट्रेक पूर्ण करता येईल की नाही ? वरचं तापमान कसं असेल ? तापमान आपल्याला सहन होईल की नाही ? टेंटमधे राहता येईल की नाही ? असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन आम्ही एक-एक पाऊल पुढे टाकत होतो. सुरुवातीला तर ऋषीदादा आणि अथर्व यांच्यात पुढे जाण्याची स्पर्धा सुरू होती. कधी-कधी तर ते गाईडच्यासुद्धा समोर जात होते. समोरचा रस्ता गाईडला विचारून ते पुढे जाऊन आमच्यासाठी थांबत होते. हळूहळू आमच्यातील उत्साहाचं प्रमाण कमी होऊन थकव्याचं प्रमाण वाढत होतं. आम्ही मनालीत होतो तेव्हाच अथर्वने आम्हाला ट्रॅकमध्ये येणाऱ्या समस्यांची पूर्वकल्पना दिली होती. आपल्याला किती थकवा येऊ शकतो ? चालतांना कोणत्या समस्या येऊ शकतात ? हे सर्व त्याने आधीच सांगितलं होतं. त्यामुळे चालताना अथर्वचा प्रत्येक शब्द आम्हाला आठवत होता. धूळ आणि ऊन यामुळे पाऊल टाकणे कठीण होत होते. या सर्व गोष्टीची कल्पना अथर्वने आम्हाला दिली होती. त्याने सांगितलेली एक गोष्ट मला जास्त लक्षात राहिली ती म्हणजे "पहिला एक तास तुम्हाला वाटेल की आपण कशालाच या ट्रेकला आलो, तेव्हाच आपल्याला आपली पूर्ण शक्ती लावायची आहे. त्यानंतर आपल्या शरीराला सवय होऊन जाईल आणि नंतर चालणं कठीण वाटणार नाही." आम्ही एक-एक पाऊल समोर टाकत होतो पाठीवर बॅग असल्यामुळे टी-शर्ट मागून पूर्ण भिजली होती. आमच्या पावलांचा आवाजा सोबत पार्वती नदीच्या पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. पहाडातल्या आणि जंगलातल्या नद्या रात्री फार भयावह वाटतात मात्र सूर्यकिरणांचा त्यांना स्पर्श होताच अतिशय सुंदर दिसतात. कसोलच्या कॅंपवर भयावह वाटणारी नदी आता अतिशय सुंदर दिसत होती. स्वच्छ पांढरं शुभ्र पाणी खरोखरच खीरीसारखं दिसत होतं. दगडांना चिरुन निघालेले छोटे-छोटे झरे जागोजागी दिसत होते. नदी पार करण्यासाठी असलेला एक लाकडी अरुंद पूल बघितल्यावर अंगावर रोमांच उभे झाले. चालत असताना आम्हाला छोटे-छोटे महादेवाचे मंदिर दिसत होते. खरंच हिमाचल म्हणजे देवभूमी ! इथल्या लोकांची भगवान शंकरावर नितांत श्रद्धा आहे.

या ट्रेकमधला आमचा पहिला महत्वाचा स्टॉप म्हणजे रुद्रनाग होता. सत्तरजणांचा ग्रुप म्हटलं की काही लोकं समोर, काही लोकं मागे अशी आमची स्थिती होती. त्यामुळे आम्ही रुद्रनागला पोचल्यावर इतर लोकं येईपर्यंत त्या ठिकाणी थांबलो. सत्तरजणांचा ग्रुप होता त्यामुळे ठराविक अंतरावर एका ठिकाणी सर्वांना एकत्रित येणे गरजेचे होते. मागे राहिलेले लोकं येईपर्यंत आम्ही तिथे काही फोटो काढले आणि त्यानंतर पुन्हा सत्तरजणांचा ग्रुप पुढे चालायला लागला. दुपारी साडेचारच्या सुमारास आम्ही नाकथानला पोहोचलो त्या ठिकाणी लिंबूपाणी, चहा बिस्किट घेतल्यावर पुन्हा पुढे चालायला लागलो. पुन्हा थंडी जाणवायला लागली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी बॅगमधले स्वेटर काढले नाकथान वरून ट्रेकचा अंतिम स्पॉट सहा किलोमीटर अंतरावर होता आणि त्या सहा किलोमीटर पैकी शेवटचे दोन ते अडीच किलोमीटर अगदी उभी चढाई होती. परंतु आता पायांना सतत चालण्याची सवय झाली होती त्यामुळे थकवा येत नव्हता. जेवढे आम्ही वर चढत होतो तेवढेच आजूबाजूचे दृश्य अधिक सुंदर दिसत होते. ते निसर्ग सौंदर्य पाहून आम्हाला वर चढण्यासाठी ऊर्जा मिळत होती. हवेत एक बोचरा गारवा आला होता. त्या थंड हवेमुळे मला विदर्भातल्या बोचऱ्या थंडीची आठवण आली. अंधार पडत होता आणि त्यासोबतच वाढत असलेली थंडी यामुळे आमचा चालणं अधिक कठीण होऊ लागलं होतं. सगळेच एकमेकांचा उत्साह वाढवत होते "one step at a time" असं म्हणून सगळेजण समोर जात होते. त्यामुळे मागे असलेल्यांचा पण उत्साह वाढत होता. पुढे आम्ही अजून एका ठिकाणी थांबलो. तिथे एक छोटा ब्रेक घेतला आणि आम्हाला प्रेरक ठरणारी एक गावातली बाई भेटली. अथर्व तिच्याशी बोलत होता. तिच्याशी बोलल्यावर आम्हाला कळलं की कॅंप साइटवर तिचं एक छोटं कॅन्टीन आहे आणि रोज कॅन्टीनचं सामान वर नेण्यासाठी ती बाई रोज हा पहाड आपल्या पायांनी तुडवते. आमच्यासाठी जो ट्रेक होता ते म्हणजे या बाईचं दैनंदिन काम होतं. जे आम्ही एक दिवस करणार होतो ते काम ही बाई रोज करत होती. स्वतःच्या मोठ्या मुलाला शाळेत पाठवून लहान मुलाला सोबत घेऊन पहाड चढणारी ही बाई आमच्या पूर्ण ग्रुपसाठी प्रेरक ठरली. तिच्याशी बोलल्यावर आम्ही आमच्या ट्रेकमधल्या सर्वात कठीण टप्पा चढण्यासाठी सज्ज झालो आणि पुढे निघालो. शेवटच्या दोन किलोमीटरची चढाई पार करण्यासाठी आमची पूर्ण शक्ती पणाला लागणार होती आणि आम्ही ती लावली. एकदाचा शेवटचा दगड चढलो आणि खीरगंगाच्या शिखरावर पाय ठेवला. शिखरावर आल्यावर प्रत्येकाला आपल्या हृदयाचे ठोके अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते. आम्ही एका ठिकाणी बसलो आणि समोरचा निसर्ग पाहू लागलो.

सूर्य मावळत असल्यामुळे भगवं, पिवळं, निळं झालेलं आभाळ खीरगंगा शिखरावर आमचे स्वागत करत होतं. तो धुलीवंदनचा दिवस होता आणि आम्ही रंग खेळण्याआधी निसर्गच रंग खेळला आहे असं त्या आभाळाकडे पाहून वाटत होतं. कितीतरी वेळ आम्ही फक्त त्या आभाळाकडे बघत होतो अनेक रंगाने सजलेलं आभाळ, त्यात बर्फानी माखलेले पर्वत, सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि त्यात असलेले आमचे टेंट इतकं सुंदर दृश्य पाहून आमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात नकळत अश्रू तरुन गेले. सकाळपासूनचा थकवा एका क्षणात नष्ट झाला. त्यानंतर आम्ही टेंटमध्ये जाऊन बसलो. एक-दिड तास मनसोक्त गप्पा केल्यावर खीरगंगाचं वैशिष्ट्य असलेला गरम पाण्याचा झरा पाहायला गेलो. साठ ते सत्तर पायऱ्या चढून गेल्यावर जाऊन बघतो तर तिथे खूप गर्दी झाली होती. त्यामुळे आम्ही फक्त गरम पाण्यात पाय टाकून बसलो. गरम पाण्याने पाय शेकले जात होते, त्यामुळे तिथून उठण्याची इच्छा होत नव्हती. बाहेरच्या बोचऱ्या थंडीमध्ये नैसर्गिक गरम पाण्याचा शरीराला होणारा स्पर्श अधिक हवाहवासा वाटत होता. काही वेळानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो आणि पुन्हा कॅम्प साईट वर आलो. "शेकोटीची तयारी सुरू आहे" असं तिथल्या व्यवस्थापकाने सांगितल्यावर आम्ही पटापट चांगल्या जागा बळकावल्या. तिथे डीजे सुद्धा सुरू होता. पण त्यावर आम्हाला हवे तसे गाणे वाजत नव्हते. थोड्यावेळ ते गाणे सहन केल्यानंतर ऋषीदादाने सूत्र स्वतःच्या हातात घेतले आणि पुष्पा सिनेमातल्या गाण्यांवर आम्ही सगळे नाचायला लागलो. ऋषीदादाचा नाच पाहून सगळे अवाक झाले आणि आमच्यासोबत येऊन नाचायला लागले. पुष्पा सिनेमातील 'सामी सामी' गाण्याने तर वेगळाच समा बांधला ! आम्ही जेवायला बसलो तेव्हा ऋषीदादाच्या नाचण्याने प्रभावित झालेले बरेच लोकं आमच्याशी येऊन बोलत होते. आराध्यला तर राजस्थानी, पंजाबी, केरळी असे दोन-तीन मित्रही भेटले. ती पौर्णिमेची रात्र होती, बसल्या बसल्या कविता लिहावी असा तो चंद्र अतिशय सुंदर व आकर्षक दिसत होता. अशा धमाकेदार पद्धतीने पूर्ण दिवस घालवल्यावर आम्ही आपापल्या टेंटमध्ये झोपायला गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच उठून खीरगंगाच्या गरम पाण्याकडे गेलो. तिथे जाऊन मनसोक्त अंघोळ केली. त्यावेळी तिथली पौराणिक कथाही आम्हाला समजली. गणपती, कार्तिकेय, महादेव आणि पार्वती यांची ती पौराणिक कथा आहे. त्या कथेमुळेच ही जागा इतकी प्रसिद्ध आहे. गरम पाण्यात चांगलं वाटत होतं, परंतु बाहेर ऑक्सिजन अतिशय कमी असल्यामुळे चालताना आणि बोलताना सुद्धा खूप दम लागत होता. सकाळची तिथली शांतता आणि प्रसन्नता दैवी स्वरूपाची होती. खाली उतरल्यावर आमचा परतीचा प्रवास सुरु होणार होता. त्यामुळे सकाळी सर्व तयारी करून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. उतरतांनाच्या सूचना अथर्वने सगळ्यांना आधीच दिल्या होत्या. त्यामुळे न थांबता सर्वजण खाली उतरत होते. खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा आमचा गाईड गगन एका विशिष्ट अंतरापर्यंत आमच्यासोबत होता. त्यानंतर आम्ही स्वतःहूनच उतरायला लागलो. गेल्या चोवीस तासापासून आम्ही कोणीच घरच्यांशी बोललो नव्हतो. त्यामुळे खाली उतरत असताना जिथे नेटवर्क मिळेल तिथून आधी घरच्यांना फोन करायचा असा आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे नेटवर्क मिळाल्यावर सर्वांनीच आपापल्या घरी कळवलं. खाली उतरतांना आमच्या सर्वांच्याच चेहर्‍यावर कधी न मिळणारा आनंद आणि समाधान होतं. "आपण अद्वितीय आणि अविस्मरणीय अनुभव सोबत घेऊन चाललो आहोत" अशी भावना सर्वांचीच होती. मात्र सर्वांपैकी आमच्या तीन बहिणींचा आनंद जास्त असेल कारण साठ-सत्तरजणांच्या पूर्ण ग्रुपमध्ये फक्त पंधरा-सोळा मुली होत्या आणि त्यातही इंद्रायणी, राधा व अदितीताई इतर मुलींपेक्षा जास्त सक्रिय होत्या. राधा तर प्रथमेश आणि ऋषीदादाच्या बरोबरीने चढत होती. येताना आम्ही साडेतीन तासातच खाली उतरलो आमच्या गाडीचा ड्रायव्हर ज्ञान गाडी घेऊन आम्हाला आधी सोडलं त्याच ठिकाणी उभा होता. आम्ही सर्वजण गाडीत बसलो आणि 'हर हर महादेव'चा गजर करून परतीचा प्रवास सुरू केला. ज्ञान आम्हाला कुल्लूच्या स्टॉप पर्यंत सोडणार होता.

बाकी गोष्टी पुढील भागात...

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

Thursday, April 21, 2022

हिमगाथा : भाग ४

 तोशचा कॅंप

कसोलची पहाट लक्षात राहण्यासारखी होती. रात्रभर टेंटमधे बल्ब सुरु असल्यामुळे मी चश्मा लावून झोपलो होतो. त्यामुळे झोप बरोबर झालीच नव्हती. पहाटे आम्ही टेंटच्या बाहेर आलो तर सर्वत्र रक्त गोठविणारी थंडी होती. न कळत आमच्या दातांचा सांगीतिक कार्यक्रम सुरु झाला. एखाद्या चेन स्मोकरच्या तोंडातून सिगरेटचा धूर निघावा, त्याप्रमाणे आमच्या तोंडातून वाफ निघत होती. त्या थंडीमुळे माझं डोकं दुखायला लागलं आणि नाक, कान थंड पडले. अजून सूर्योदय व्हायचा होता. सूर्याच्या प्रकाशात अतिशय सुंदर दिसणारी कसोलची नदी पहाटे नकारात्मक आणि भीतीदायक वाटत होती. खळ-खळ पाण्याचा आवाज नकोसा वाटत होता. आम्हाला तयारी करून कसोलचा कॅंप सोडायचा होता आणि तोशच्या कॅंपवर जायचं होतं. आम्ही सगळेजण फ्रेश झालो आणि आपापल्या बॅग घेऊन स्टोअर रूमच्या समोरच्या ग्राउंडवर तयारी करायला लागलो. फुटपाथवर एखादा सामान विकणारा बसावा, त्याप्रमाणे आम्ही सगळेजण आपापल्या बॅग उघडून इतरांची पर्वा न करता तयारी करत होतो. 'आपल्याला बघून कोण काय विचार करेल ?' असा प्रश्‍न सुद्धा आम्हाला तेव्हा पडला नव्हता. खरंतर ट्रिप सुरू झाल्यापासून आम्ही फक्त आमच्या अकरा जणांची व्यवस्था कशी चांगली होऊ शकेल याचाच विचार करत होतो. इतर लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण कसा या ट्रिपचा आनंद घेऊ शकू याचाच विचार आणि प्लॅनिंग आम्ही करत होतो. कसोलचा कॅंप सोडल्यावर आम्हाला तोश या ठिकाणी जायचं होतं. तोशचा कॅंप म्हणजे आमचा आराम करण्याचा दिवस होता. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला खीरगंगाच्या ट्रेकसाठी निघायचं होतं. त्यामुळे कसोलचा कॅंप सोडण्याच्या वेळी आम्ही कासवाच्या गतीने पॅकिंग करत होतो.

तयारी होईपर्यंत नाश्त्याचे टेबल लागले. आमची पॅकिंग झाली आणि आम्ही नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन नाश्ता करायला लागलो. त्याचवेळी तिथे साठ-सत्तर पायऱ्या उतरून एक छोटासं कुटुंब आलं. ६५ च्या जवळपास असलेला एक म्हातारा माणूस जो फक्त वर-वरूनच म्हातारा दिसत होता. त्याची पत्नी आणि मुलगा, सून व नातू कसोलच्या ट्रीपवर आले होते. त्या माणसाकडे पाहून आम्ही अंदाज लावत होतो की हा माणूस रिटायर्ड मिल्ट्री ऑफिसर असावा. फॉर्मल पॅन्ट, टी-शर्ट, खाली स्पोर्ट्स शूज घातलेला हा म्हातारा माणूस कसोलला कसा आला ? आम्ही हाच विचार करत होतो. कारण कसोल-तोष या जागा फॅमिली लायक नाहीत, असा आमचा समज होता. कदाचित आमच्याप्रमाणेच हा माणूस सुद्धा खूप जास्त लोकांचा विचार न करता आपली ट्रीप एन्जॉय करणाऱ्या लोकांपैकी असावा. ६५ वर्षाच्या या तरुणाकडे पाहून आम्हालाच प्रेरणा मिळत होती. नाश्ता करत असताना आमचं मराठी बोलणं ऐकून ते कुटुंब स्वतः आमच्याशी बोलायला लागलं. आपल्या भाषेचे लोकं कुठेही भेटले की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो आणि आपण स्वतःहून त्या लोकांशी बोलायला लागतो, हा आमचाही अनुभव होता. या टूरमध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी चार-पाच मराठी भाषिक भेटत गेले. थोड्यावेळ त्यांच्याशी बोलून आम्ही आपलं सामान घेऊन कॅंप सोडण्यासाठी निघालो. कसोलला आलो तेव्हा साठ-सत्तर पायऱ्या सामानासहित उतरतांना विशेष काही वाटलं नाही. परंतु आता त्या पायर्‍यांकडे पाहून 'इतक्या पायऱ्या कशा चढायच्या ?' हा प्रश्न प्रत्येक पायरीवर आम्हाला दिसत होता ! तरीही आपापल्या दोन-दोन बॅग उचलून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली.

मी अर्ध्या पायर्‍या चढलो आणि दम लागला म्हणून एका ठिकाणी थांबलो. तेव्हा समोरून एक बाई तिच्या लहान मुलाला कडेवर घेऊन पायर्‍या उतरत होती. माझ्यापासून दोन पायऱ्या वरती असतांना तिचा तोल जाऊ लागला. मी तिच्या एका हातातलं सामान आणि लहान मुलाला माझ्याजवळ घेतलं. "आप पहले उतर जाइये" असं म्हणून तिला एक दोन पायऱ्या खाली उतरू दिलं आणि नंतर तिच्याजवळ पुन्हा तिचा मुलगा व सामान दिलं. तिने स्मितहास्य करत "Thank you" म्हंटलं आणि मी पुढे चढयला लागलो. आपण जर कुठे जंगलात फिरत असलो किंवा पाहाडा वर चढत असलो तर वाटेत भेटणार्‍या लोकांना मदत करायची. कारण त्यांच्या धन्यवाद किंवा थँक यु या शब्दांमुळेही आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपला थकवा नाहीसा होऊन आपण पुढे चढायला लागतो. हा माझा नव्हे आमच्या सर्वांचाच अनुभव आहे. पूर्ण पायऱ्या चढून आल्यावर खूप दम लागला होता. सामान गाडीच्या बाजूला ठेवून आम्ही सर्व आपापल्या जागेवर शांत उभे होतो. या साठ-सत्तर पायऱ्या चढून वर येणे म्हणजे खीरगंगा ट्रेकची पूर्वतयारी होती. आम्ही गाडीत बॅग ठेवल्या आणि तोश कॅंपच्या रस्त्याला लागलो. कसोल ते तोशचा प्रवास फारच कमी वेळाचा होता. परंतु हिमालयातील शेरपा आणि ड्रायव्हर लोकांचं महत्व आम्हाला पटवून देणारा होता. कारण एकावेळी एकच गाडी जाऊ शकेल एवढ्या लहान रस्त्यावरून आमच्या गाडीचा ड्रायव्हर अतिशय बिंधास्तपणे गाडी चालवत होता. गाडीचं चाक बरेच वेळा अगदी रस्त्याच्या काठावर असायचं. थोडाही तोल गेला तर गाडी सरळ खाई मध्ये जाईल अशी पूर्ण स्थिती होती. काही काही वळणं फारच भयानक होते, त्या वळणावरून गाडी जात असताना अदितीताई देवाचं नाव घ्यायची. तेव्हा गाडीचा ड्रायव्हर विनोदाने म्हणायचा "यहा पे भगवान कुछ नही कर सकता जो करना है मै ही करुंगा" असा भयंकर रस्ता पार केल्यावर आम्ही तोश कॅंपची पाटी शोधत होतो. बऱ्याच वेळानंतर आम्हाला एक छोटीशी पाटी दिसली. त्यावर 'हिमट्रेक तोश' लिहिलेलं होतं. गाडी थांबली आणि आम्ही कॅंप साईट पाहायला गेलो. कॅंपवर शांतता होती. पहिले आम्हाला वाटलं की इथे कोणीच नसेल पण तिथे व्यवस्था करणारे दोन-तीन मुलं होते. त्यांच्याशी बोलणं झाल्यावर आणि आपली राहण्याची व्यवस्था इथेच आहे हे कळल्यावर आम्ही बॅग घेऊन खाली उतरलो. हा कॅंप कसोल कॅंपपेक्षा लहान असून या कॅंपवर इतर कोणीच नव्हतं. 'कदाचित बाकी लोक यायचे असतील' असं आम्हाला वाटलं. आम्ही टेंटममधे सामान ठेवलं आणि कोवळ्या उन्हाचा आनंद घेण्यासाठी बाहेर आलो.

कसोल आणि तोशच्या कॅंपमधे अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे इथली सर्विस. कसोलच्या कॅंपमधे आम्हाला नाश्ता आणि जेवण करण्यासाठी ग्राउंड वर जावं लागत होतं तर तोशच्या कॅंपमधे इथला मुलगा "भाई जी खाना तयार है" असं सांगायला येत होता आणि स्वतः आमचे जेवण आणून देत होता. होळीचे दिवस असल्यामुळे हिमाचल प्रदेशातील लोकं पाच ते सहा दिवस रंग खेळतात. कसोलला जाताना आणि नंतर तोशला येताना रस्त्यात लागणाऱ्या छोट्या-छोट्या गावातले लोकं रंग खेळताना दिसत होते. हिमाचल प्रदेशातील गोऱ्या आणि स्वच्छ त्वचेचे लोक रंग लागल्यावर अधिकच सुंदर दिसत होते. तोशच्या कॅंपवरसुद्धा काही मुलं-मुली रंग खेळत होते. त्यानंतर त्यांच्यापैकीच एक मुलगा आम्हालाही रंग लावायला आला आणि त्याने आम्हाला विचारलं "भाईजी थंडाई पिओगे ?" आम्ही त्याला नाही असं उत्तर दिलं. त्यानंतर थोड्या वेळपर्यंत ते लोक रंग खेळत होते. आम्ही टेंटमधे जाऊन पसरलो. चिन्मय माझ्या बाजूला झोपला होता आणि मी मोबाईलमधले रात्री पासून आलेले मॅसेज पाहत होतो. तेवढ्यात एक मुलगा एका मोठ्या ताटात काही पेले घेऊन आला. त्यात थंडाईच्या नावावर आणलेलं मसाला दूध होतं. मी त्यातला एक पेला घेतला आणि दूध प्यायलो. चिन्मय माझ्याकडे सतत पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरून मला त्याची मनस्थिती समजली आणि आता याची थोडी मस्करी करावी म्हणून मी "या थंडाईत काही मजा नाही" हे एकच वाक्य दोन तीन वेळा बोललो. त्यामुळे चिन्मय फार घाबरला होता. थोड्यावेळ टेंटमधे आराम केल्यावर संध्याकाळी आम्ही फोटो काढायला बाहेर निघालो. आमच्या टेंटपासून १०-१५ फुट अंतरावर बांबूचं रेलिंग होतं. त्यापुढे दरी होती आणि खाली एक नदी दिसत होती. दरीनंतर मोठा पर्वत दिसत होता आणि त्यामागे असलेल्या बर्फाच्या पर्वतात खीरगंगाचा ट्रेक होता. पहाडी भागातील वैशिष्ट्य म्हणजे जेवढ्या लवकर तिथे दिवस होतो तेवढ्याच लवकर तिथे रात्रसुद्धा होते. आम्ही फोटो काढून आल्यावर हळूहळू रातकिड्यांच्या आवाज ऐकू यायला लागले. अंधार पडू लागला काही वेळानंतर रात्रीच्या जेवणासाठी कॅंपवरच्या मुलांने आवाज दिला. आम्ही जेवण केलं. त्यानंतर शेकोटी करून बसलो. गाडीचा ड्रायव्हर ज्ञानसुद्धा जेवण करून तिथे आला. रात्री भयंकर थंड हवा होती. पूर्ण कॅंपवर फक्त आमचाच ग्रुप असल्यामुळे सकाळ जेवढी सुंदर वाटत होती, तेवढीच रात्र भयावह वाटत होती. रातकिड्यांचे किरकिर असे आवाज, पक्ष्यांचे आवाज, हवेचा आवाज यामुळे एखाद्या हॉरर सिनेमातील सीन शूट होतो आहे असा मला वाटत होतं.

आमच्या गाडीचा ड्रायव्हर ज्ञान हा शेरपा होता. तो आम्हाला शेरपा लोकांबद्दल माहिती द्यायला लागला. कोण असतात शेरपा लोकं ? शेरपा लोकं म्हणजे पहाडात फिरणारे लोकं होय. ट्रेकला आलेले प्रवासी, आर्मीचे सैनिक किंवा जंगल फिरणारे लोकं यांना फिरतांना मार्गदर्शन करणारे माणसं म्हणजे शेरपा. पहाडामधे शेरपाचं महत्व इतकं आहे की त्यांच्याशिवाय आर्मीचे सैनिक सुद्धा पहाडात किंवा जंगलात प्रवेश करत नाही. ट्रेक असतात तेव्हा हे शेरपा लोक ४०-४० किलो वजन पाठीवर घेऊन प्रवास्यांपेक्षा जास्त वेगाने पहाडावर चढून जातात. एकदा चढून जाण्याचे पाच किंवा सहा हजार रुपये एका शेरपाला द्यावे लागतात. ज्ञानने आम्हाला शेरपा लोकांबद्दल इतकी माहिती दिल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशीच्या ट्रेकमधे शेरपा लोकांना पाहण्यासाठी उत्सुक झालो होतो. त्यानंतर मयुरेशदाने आम्हाला काही भुताटकी गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आमची स्थिती अजूनच गंभीर झाली होती. कॅंपवरचं वातावरण बघता 'रात्री आपण गाडीत झोपू' असाही विचार आम्ही केला होता. शेवटी आम्ही टेंटमधेच झोपायला गेलो. रात्री जसजशी थंडी वाढत होती, तसतसाच वारा पण खूप भयंकर होत होता. सगळेच टेंट खूप हलत होते. वाटत होतं की एखादा टेन्ट उडून जाईल पण तसं काही झालं नाही. थोडी भीती मनात ठेवून आम्ही सगळे झोपलो, पण त्या रात्रीसारखी गाढ झोप पूर्ण टूरमधे आम्हाला लागली नव्हती. सकाळी मला थोडी लवकर जाग आली आणि मी टेंटमधून बाहेर आलो. समोरच बांबूच्या रेलिंगवर एक मोठा गरुड बसला होता. मी खिशातून मोबाईल काढणार तेवढ्यात त्याने आपले विशाल पंख पसरवले आणि मोठी झेप घेतली. त्याचे पंख पाहून मी सुद्धा थोडा घाबरलो होतो. थोड्याच वेळात सगळे उठले. आम्ही तयारी केली आणि नाश्ता करण्यासाठी समोर गेलो. तोशच्या कॅंपवरून आम्हाला खीरगंगा ट्रेकसाठी निघायचं होतं. सगळ्या बॅग गाडीत ठेवल्यावर ज्ञान आम्हाला ट्रेक सुरु होणार त्या ठिकाणी घेऊन गेला.

बाकी गोष्टी पुढील भागात

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

Monday, April 11, 2022

हिमगाथा : भाग ३

कसोल कँप आणि पारूल राणा

१७ मार्चला सकाळी आम्ही हॉटेल ग्रेसमधून पोटभर नाश्ता करून पुढच्या प्रवासासाठी निघालो. खरं तर तेव्हा हॉटेल सोडवत नव्हते. पण आम्हीच स्वतःच्या मनाला पुढच्या प्रवासाचं आकर्षण दाखवून हॉटेल सोडण्यासाठी तयार केलं. आता आम्हाला शॉल कारखान्याला भेट द्यायची होती. आतापर्यंत भरपूर खरेदी आम्ही करून ठेवली होती. पण प्रवास करत असतांना एखाद्या ठिकाणी भेट देणे आणि तिथून रिकाम्या हातानी परत येणे हा नियम आम्हाला लागू होत नव्हता. त्यामुळे शॉल कारखान्यासमोर गाडी थांबली की बॅगमधील जास्तीचे पैसे पाकीटात टाकूनच खाली पाय ठेवायचा असं आम्ही मनोमन ठरवलं होतं. कारखान्यासमोर थांबण्याआधी आम्ही रस्त्यात एका पूलावर थांबलो. पूर्ण लोखंडी बांधकाम असलेला हा पूल मनालीपासून काहीशा अंतरावर होता. पूलावर हिमाचल प्रदेशातील पारंपरिक कापडी तोरण बांधलेलं होतं. आम्ही फक्त तिथे फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. पण पूलावर उतरल्यावर तिथली हवा, कोवळं ऊन आणि खालून वाहणाऱ्या पाण्याचा 'खळखळ' असा आवाज यामुळे फोटोच्या विचाराचा काही क्षणांकरीता विसर पडला आणि आम्ही त्या निसर्गसौंदर्यात रमलो. सकाळच्या सूर्याचे किरणं शरीराला सौम्य ऊब देत होते तर पुलावरच्या कापडी तोरणाला उडवत येणारी थंड पहाडी हवा शरीराला गारवा देत होती. मी थोड्या वेळ गॉगल काढून डोळ्यांना त्या गार वाऱ्याचा स्पर्श होवू दिला. त्या पूलावर एकावेळी एकच गाडी जावू शकेल इतकीच जागा होती. त्यामुळे फोटो काढतांना जेव्हा एखादी गाडी यायची तेव्हा आम्ही सगळे पूलाच्या अगदी बाजूला काठावर उभं राहायचो. एक गाडी तर माझ्या जरकिनला थोडी घासून गेली. तिथेसुद्धा आम्ही खूप फोटो काढले. मयुरेशदाने तर माझा एक स्लोमोशन वीडियो काढला. तो वीडियो बघितल्यावर मला दक्षिणी सिनेमातील नायक झाल्यासारखं वाटलं.

पूलावर फोटो काढणं झाल्यावर आम्ही शॉल कारखान्याकडे निघालो. गाडी कारखान्यासमोर थांबली आणि आम्ही कारखाना बघितला तेव्हा लक्षात आलं की तो कारखाना फक्त शॉलचा नसून सगळ्याच प्रकारच्या गरम कपड्यांचा होता. तिथे विकल्या जाणारे सर्व कपडे तिथेच बनत असल्यामुळे आम्हाला बघण्यासाठी क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही भरपूर प्रमाणात बघायला मिळाली. बाबांसाठी स्वेटर व मफलर घेतल्यावर आईसाठी स्वेटर घेतांना अदितीताई आणि इंद्रायणीला सोबत घेतलं. मग विविध स्वेटरचे इंद्रायणीवर प्रयोग करून झाल्यावर आईसाठीसुद्धा स्वेटर आणि मफलर घेतलं. कोणतीही खरेदी करतांना स्त्रियांना स्वतःसोबत ठेवल्याने चांगल्या क्वालिटीचं सामान घेतल्या जातं, अशी माझी खात्री पटली. तिथे आम्ही सर्वांनीच आपल्या आई-बाबांसाठी खरेदी केली. आपण कुठेही फिरायला गेलो आणि तिथे आई-बाबांसाठी काही खरेदी केली की घरी गेल्यावर त्या वस्तू त्यांना दाखवण्याचा आनंद व उत्साह खरेदी केल्याच्या क्षणापासून वाढत जातो. असा अनेकवेळा घेतलेला अनुभव मी शॉल कारखान्यात पुन्हा घेतला.

खरेदी झाल्यावर आम्ही कसोल गावाकडे जाण्यास निघालो. कसोल हे अतिशय लहान गाव होतं आणि गावापेक्षा मोठं तिथलं मार्केट होतं. आधी आम्हाला कसोल गावाच्या पलीकडे असलेल्या गुरुद्वारा आणि राम मंदीराला भेट द्यायची होती. त्यामुळे आम्ही कसोल गाव मागे सोडून राम मंदीराजवळ थांबलो. महाराष्ट्रातील बहिरम, माहूर किंवा अमरावतीतील अंबादेवी मंदीराजवळ जशी दुकानांची गर्दी आणि यात्रा भरल्यासारखं वातावरण असतं तसं तिथे होतं. ती सर्व गर्दी पार करून आम्ही राम मंदीरात पोहोचलो. दर्शन केल्यावर गुरुद्वारा किंवा मंदीरातील लंगरमधे जेवण करण्याचं ठरलं होतं. पण गुरुद्वारातील गर्दी बघता मंदीरात जेवण करणं जास्त सोयीचं होतं. त्यामुळे आम्ही लंगरच्या ठिकाणी गेलो. स्वतःसाठी एक ताट आणि पेला घेऊन आम्ही खाली टाकलेल्या फाऱ्यांवर बसलो. लगेच अनुक्रमे भात, भाजी, वरण घेऊन लोकं आले आणि भसकन पूर्ण ताट भरून जावं अशा वेगात तिन्ही पदार्थ वाढले. सर्वांनाच खूप भूक लागली होती त्यामुळे अन्नाला नमस्कार करून पहिला घास घेतला तर वरण भयंकर गरम आहे हे हातापेक्षा जीभेला जास्त जाणवलं. भयंकर गरम पण चविष्ट असा रामाचा प्रसाद घेतल्यावर आम्ही आपापले ताटं धुवायला गेलो तर नळातून येणारं पाणीसुद्धा खूपच गरम नव्हे उकळतच होतं. जेवण झाल्यावर आम्ही खाली आलो तर त्या मंदीरातील पालखी बघितली. पालखी उचलणाऱ्या सगळ्या लोकांनी हिमाचली टोप्या घातल्या होत्या. पालखी मंदीरातील प्रत्येक देवासमोर तीन वेळा झुकत होती आणि नंतर पुढे जात होती. पुढे गुरुद्वाऱ्यासमोर असलेल्या एका दुकानातून डोक्याला बांधायला केशरी कपडा घेतला. त्या दुकानात खूप गर्दी होती. पण तरीही दुकानातील पंजाबी काकू येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी हसतमुखाने बोलत होत्या. मी आणि प्रथमेश मागे राहिलो होतो, बाकी सगळे पार्किंगपर्यंत पोहोचले होते. गुरुद्वाऱ्यातील तलवारींचे दुकानं बघत-बघत आम्हीसुद्धा पार्किंगपर्यंत पोहोचलो.

गाडीत बसून आम्ही सगळे कसोल कॅंपकडे निघालो. कसोल मार्केटपासून काही अंतरावर हिमट्रेक नावाची कॅंपसाइट होती. तिथे टेंटमधे आमचा एक दिवसाचा मुक्काम होता. सर्व सामान काढून उतरलो तर ६०-७० दगडी पायऱ्या खाली उतरून नदीच्या बाजूला एका सपाट जागेवर आमचे टेंट होते. तिथलं वातावरण आणि टेंट बघून उत्साह वाढत होता, पण सामान घेऊन इतक्या पायऱ्या उतरण्याचा विचार करताच उत्साह लगेच कमीसुद्धा होत होता. शेवटी आम्ही सामान घेऊन खाली उतरायला सुरवात केली. त्या सगळ्या दगडी पायऱ्या उतरून खाली पोहोचल्यावर आम्ही सगळ्या बॅग्स एका ठिकाणी ठेवल्या. आराध्य टेंटची चौकशी करायला गेला. मी, अथर्व आणि इंद्रायणी बॅग्सजवळ बसलो होतो तेव्हा आमच्या बाजूने एक मुलगी गेली. कॉलवर बोलता-बोलता म्हणाली,"Hello sir I am Parul Rana and I am a girl." तिचं हे वाक्य ऐकून आम्ही हसलो आणि अथर्व म्हणाला,"काय भैताड मुलगी आहे..." आमच्या माहितीप्रमाणे 'पारूल' हे नाव मुलीलाच देतात. आता तिच्या गावात पारूल नावाचे मुलं असतील तर गोष्ट वेगळी ! आम्हाला तीन टेंट भेटले. जावून बघितलं तर त्यात आमचं सामान किंवा आम्ही राहू शकत होतो. त्यामुळे खाली असलेल्या स्टोर रूममधे सर्वांचं सामान राहिल आणि आवश्यक तेवढी एक छोटी बॅग स्वतःसोबत टेंटमधे घ्यावी असं ठरवून आम्ही इतर लोकांकडे न बघता सगळं सामान काढायला सुरवात केली. आवश्यक ते सामान वेगळं काढून सगळेजण नदीमधल्या मोठ्या दगडांवर जावून बसलो. तिथे ठेवलेले एक-दोन खेळ खेळल्यावर नदीच्या पाण्यात फोटो काढणं सुरु झालं. इंद्रायणी, सर्वेश, आराध्य दगडांवर नाचत होते. आमच्यापासून काही दगडं सोडून बसलेला एक माणूस 'लाइव स्केचिंग' करत होता. मी थोड्यावेळ त्याला बघितलं आणि नंतर एका जागी शांत बसलो. समोर वेगात वाहणारी नदी, बाजूला मोठे दगडं आणि वाळू नंतर थोडं गवत आणि त्यात २०-२५ टेंट अशी आमच्या राहण्याची जागा होती. जस-जशी रात्र होत होती, तस-तसा पारा खाली घसरत होता.

ऋषीदादा आणि प्रथमेश मार्केटमधे जावून रंग घेवून आले. थंडी वाढत होती. नदीच्या काठावर जिथे सपाट जागा होती तिथे शेकोटी आणि छोटे स्टूल ठेवून बसण्याची व्यवस्था केली होती. शेकोटीजवळ बरेच मुलं-मुली बसले होते. आम्हीसुद्धा तिथे जावून बसलो. काही वेळानंतर तिथे मगाशी उल्लेख केलेली मुलगी 'पारूल राणा' आली आणि एका छोट्या स्टूलवर बसली. तिच्या हातात एक छोटी गिटार होती. मी सोडून आमचा पूर्ण ग्रुप रंग खेळत होता. पारूल राणाने तिथे बसलेल्या सर्वांना परिचय विचारला. "मैं अमरावती, महाराष्ट्र से हूँ" असं सांगितल्यावर तिथे बसलेल्या काहीजणांचा चेहरा एकदम खुलला. त्यात काहीजण अमरावतीचे होते तर काही पुणे व मुंबईचे मराठी भाषिक होते. त्यानंतर पारूल राणा स्वतःबद्दल सांगायला लागली. Apple Company तील स्वतःची नोकरी सोडून हिमाचल प्रदेशात फिरणे आणि येणाऱ्या प्रवास्यांसाठी कॅंप व राहण्याची व्यवस्था करणे असं तिने स्वतःचं काम सुरु केलं. रील लाइफमधे असे काही पात्र असतात की जे चांगल्या कंपनीतील नोकरी सोडून स्वतःची आवड जपतात, पण रियल लाइफमधे असे लोकं क्वचितच दिसतात त्यातली एक म्हणजे ही पारूल राणा. ती दिसायला जेवढी सुंदर होती, तेवढाच तिचा आवाजही गोड होता. काही बाबतीत मुलांनासुद्धा पुरुन उरेल अशी मुलगी म्हणजे पारूल राणा. तिच्याशी बोलल्यावर आम्हाला कळलं मगाशी आम्ही जिला 'भैताड मुलगी' समजत होतो, ती या पूर्ण कॅंप मालकिण होती. त्यानंतर ती स्वतः गिटार वाजवून गायला लागली. तिचा आवाज ऐकून इतरत्र फिरत असलेले सगळेजण तिथे येवून बसू लागले. त्यानंतर आम्ही 'आफरीन' या गाण्याची फरमाइश केली आणि तिच्यासोबत सगळेच गाऊ लागले. नंतर थोड्यावेळ आम्ही सगळे नाचलो. त्यात पुष्पा सिनेमाचे गाणे आणि ऋषीदादा आमचा कोरियोग्राफर होता.

जेवण केल्यावर प्रत्येकाने स्टोर रूममधे जावून कपडे बदलले. झोपायची तयारी झाली. एका टेंटमधे चार लोकं झोपतील असं ठरल्यावर ऋषीदादा, मयुरेशदा, चिन्मय आणि मी असे आम्ही चारजण एका टेंटमधे शिरलो. रात्री थंडीचे अस्तित्व बघता आम्ही टेंटमधे स्वेटर जरकिन घातल्यावरसुद्धा बल्ब सुरु ठेवला होता. बल्बचा उजेड एकदम चेहऱ्यावर पडत असल्यामुळे मी पहिल्यांदा रात्रभर चश्मा लावून झोपलो. हिमाचलमधे सूर्याचे किरणं सरळ बर्फावर पडतात आणि त्यावरून रिफ्लेक्ट होवून शरीरावर पडतात त्यामुळे शरीराचा झाकलेला भाग वगळता अन्य भागावर काळ्यारंगाची लेयर येते. त्यामुळे हिमाचली लोकं शरीरावर भरपूर क्रीम लावतात आणि क्रीम लावलं नाही तर शरीराचा रंग बदलतो. या रंग बदलण्याच्या प्रक्रियेचे शिकार आम्ही सगळे झालो आणि त्यात मी तर जास्तच झालो. हाच तो विचित्र परिणाम !

बाकी गोष्टी पुढील भागात...

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

Saturday, April 9, 2022

श्रीरामांकडून काय शिकावं ?


'श्रीराम' हे नाव ओठांवर आलं की सध्या संपूर्ण भारतात राम जन्मोत्सव साजरा होत असल्याचं पावन चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. इतक्या वर्षांपासून विचार, इच्छा, आंदोलनं यामध्ये बंदिस्त असलेलं राम मंदीराचं स्वप्न आता अयोध्येच्या भूमीवर साकार होतांना आपण बघतो आहोत. भारतभर विविध उपक्रमातून राम भक्तीचा जन्म होतो आणि त्यामुळे दाही दिशांना पसरणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची जाणीव आपल्याला होते. समृद्धतेचं वातावरण निर्माण होतं. परंतु फुलबागेसारख्या सजलेल्या भारतात काही काटेरी झाडांचं वाढत जाणारं अस्तित्व मनात सारखं रुतत राहतं. समाजात वाढत असलेला जातीवाद, अतिशय खालच्या पातळीला गेलेलं राजकरण, जातीवाद व धर्मवाद यामुळे निर्माण होणारा द्वेष, स्वार्थ व अहंकाराखाली दबून नष्ट होत असलेली तत्वनिष्ठा, स्त्रिया, बालक, वृद्धांवरील अत्याचार असं सर्व रोज वर्तमानपत्रातून वाचल्यावर वाल्मिकी रामायणात वाचलेलं रामराज्य पुन्हा निर्माण होईल का ? असा प्रश्न उत्पन्न होतो. खरं तर या सर्व समस्यांचं मूळ मानवात वाढत असलेला द्वेष व अहंकार आहे. असं मला वाटतं. रामराज्य पाहिजे असेल तर सर्वप्रथम रामायणात सांगितलेला रामाचा एक गुण आपल्याला अंगीकारावा लागेल तो म्हणजे 'समरसता'. समरसता म्हणजे दैनंदिन जीवन जगतांना समाजात कोणताही भेद न बाळगता अंगीकारलेला समता भाव. फक्त मानवच नाही तर संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक जीवासाठी रामाकडे प्रेम व समतेची भावना आहे. त्यामुळे रामाने सांगितलेला समरसतेचा अर्थ अधिक व्यापक आहे. रामाची समरसता समजून घेण्यासाठी आपल्याला रामायणातील काही प्रसंग अभ्यासावे लागतील.

अयोध्याकांड -

खरं तर रामायणातील समरसतेचा परिचय आपल्याला राम जन्मापूर्वीच होतो. राजा दशरथ पुत्रकामेष्टि यज्ञ करत असतात आणि तेव्हा ते यज्ञात सहभागी होण्यासाठी सर्व वर्णाच्या अधिकाऱ्यांना आणि मुख्य लोकांना बोलवितात. तिथे वर्णानुसार भोजनाची व्यवस्था नसून सहभोजनाची व्यवस्था असते. रामाचा जन्म ज्या राज्यात होणार आहे, तिथे सामाजिक समरसता नसेल असं होवूच शकत नाही. 'रामाला समरसतेचा गुण स्वतःच्या वडिलांकडून मिळाला आहे' असही आपण म्हणू शकतो. 

पुढे राजा दशरथाची आज्ञा व आशीर्वाद घेऊन राम, सीता व लक्ष्मण वनात जाण्यासाठी निघतात. दशरथाचा मंत्री सुमंत रामाला अयोध्येच्या बाहेर सोडून देणार असतो. राम अयोध्येतून चालले हे कळल्यावर फक्त राजपरिवारातील किंवा उच्च वर्गातील लोक व्याकुळ होत नाहीत तर समस्त समाज व्याकुळ होतो.('थांब सुमंता थांबवी रे रथ' या गीत रामायणातील कवितेत ग. दि. माडगुळकरांनी वरील प्रसंगाचे अतिशय हृदयस्पर्शी वर्णन केले आहे.) त्या रात्री अयोध्येतल्या कुठल्याही घरात अग्नी प्रज्वलित झाला नाही. याचं कारण म्हणजे रामाची समरसता. व्याकुळ होणाऱ्या प्रजेवरून आपण जाणू शकतो की रामाने अयोध्येतल्या लोकांना किती प्रेम लावले असावे. असे अनेक प्रसंग रामायणात आहेत. अयोध्या सोडली आणि राम श्रृंगवेरपूरात आले. तिथे निषादराज गुहने त्यांचे स्वागत केलं. अयोध्येसारख्या बलाढ्य आणि समृद्ध राज्याचे राजकुमार राम एका छोट्या भोई राजाच्या झोपडीत आश्रय घेतात. निषादराज गुह त्यांची सेवा करतो. राम सुद्धा निषादाला भावाप्रमाणे प्रेम देतात. हे सर्व घडत असतांना निषादराज गुहचं 'निषाद' असणं रामसेवेच्या किंवा राम भक्तीच्या आड कधीच आलं नाही. पुढे केवट आणि राम भेटीचा प्रसंग आहे. केवट रामाचे पाय धुण्याची इच्छा व्यक्त करतो. तेव्हा राम आनंदाने तयार होतात. रामाला स्पर्श करणं, रामाच्या सानिध्यात काही वेळ राहून प्रेम मिळविणं ही केवटाची इच्छा राम जाणून असतात. राम केवटाच्या इच्छेचा व प्रेमाचा सन्मान करतांना दिसतात. पुढे अयोध्येत परतल्यावर निषादराज गुह व केवट यांना राज्याभिषेक सोहळ्याला बोलविणारे राम सुद्धा आपण बघतो.

अरण्यकांड -

सीताहरण झालं आणि राम, लक्ष्मण सीतेला शोधत अरण्य पायी तुडवत होते. पुढे त्यांना रक्तबंबाळ झालेले गिद्धराज जटायू दिसले. "रावणाने छळ करून सीतेचे हरण केले..." घडलेली पूर्ण घटना सांगून जटायूने प्राण त्यागले. जटायूला पित्याचे स्थान देणारे राम तिथे आदर्श पुत्राप्रमाणे जटायूचा यथोचित अंत्यसंस्कार करतात. विषयप्रवेश करतांना मी व्यापक समरसतेचा उल्लेख केला होता. फक्त मानवच नाही तर पशुपक्षी यांच्याबद्दल सुद्धा अतीव प्रेम रामाजवळ होतं. ही बाब 'राम जटायू' प्रसंगातून स्वतः श्रीराम आपल्याला सांगतात. त्यानंतर घडलेला शबरी भेटीचा प्रसंग सर्वज्ञातच आहे. रोज रामाच्या प्रतिक्षेत आपली झोपडी स्वच्छ करणारी, विविध फळे तोडून आणणारी शबरी प्रत्यक्ष राम समोर उभे आहेत हे पाहून भावविभोर होते. राम सुद्धा तिला "आई..." म्हणून आवाज देतात. शबरीने दिलेली उष्टी बोरं आनंदाने खातात. नंतर शबरीला मोक्षमार्गाचा उपदेशसुद्धा करतात. या उपदेशात शबरीचं स्त्री असणं किंवा जातीनं भिल्ल असणं याचा कोणताही अडसर येत नाही. शुद्ध मनाने केलेल्या भक्तीसमोर उणं-उष्टं, लहान-मोठं, जात-धर्म हे सर्व गौण असतं. हीच गोष्ट श्रीराम लक्ष्मणासह आपल्यालाही शबरी भेटीच्या प्रसंगातून पटवून देतात.

किष्किंधाकांड -

सीतेला शोधत शोधत राम-लक्ष्मण ऋष्यमूक पर्वतापर्यंत आले. वनात सुग्रीव, हनुमान, जाम्बवंत आणि वानरसेनेची भेट झाली. सुग्रीव सुद्धा राज्य व पत्नी गमवून बसला होता. सुग्रीवासोबत घडलेल्या घटना ऐकून राम त्याला मदत करण्याचं वचन देतात आणि सुग्रीव-वाली संघर्षात वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य मिळविण्यास सहाय्य करतात. एवढच नाही तर पुढे वानरसेनेच्या साथीने आपले कार्य पूर्णत्वास नेतात. वानर ही एक वनवासी जमात होती. मानवांच्या तुलनेत संस्कार व राहणीमान याबाबतीत जरा अप्रगत असलेली जंगलातील जमात. अशा सर्व वनवासी व सामान्य लोकांना सहाय्य करण्याची आणि त्यांना संघटीत करून राष्ट्रकार्य उभारण्याची अत्यंत महत्वाची शिकवण राम आपल्याला या प्रसंगातून देतात.

सुंदरकांड -

रामाची अंगठी सीतेला देऊन हनुमंताने लंका उध्वस्त केली. "रामाशी युद्ध करणे योग्य नाही" अशा भूमिकेमुळे विभीषणाला रावणाने लंकेतून हाकलून दिलं. लंका सोडल्यावर विभीषण रामाला शरण आला. खरं तर विभीषण काही असहाय्य किंवा पीडित नव्हता. राजपरिवारात वाढलेला आणि एका बलाढ्य राज्याचा मंत्री म्हणजे रावण बंधू विभीषण होय. मग समरसतेशी किंवा समानतेशी या प्रसंगाचा काय संबंध ? असा प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होऊ शकतो. पण रामाने अंगीकारलेली समरसता किंवा समान भाव इतका व्यापक आहे की त्यात शत्रू-मित्र, सामान्य-असामान्य, गरीब-श्रीमंत, देव-दानव, मानव-पशुपक्षी या सर्वांसाठी समान प्रेम आहे. त्यामुळे विभीषण हा जरी परकीय आहे, रावणाचा भाऊ आहे, राक्षसकुळातला आहे पण त्याचे मन शुद्ध आहे, भक्ती पवित्र आहे हे सर्व राम जाणतात. म्हणून विभीषणाचा सुद्धा सन्मान करून पुढे त्याला लंकेचं राज्य देतांना राम दिसतात. शुद्ध मनाने भक्ती करणाऱ्या प्रत्येक सजीवाचा राम स्वीकार करतात. त्यामुळे राम सर्वांना आपलेसे वाटतात. ही बाब या प्रसंगातून आपण जाणली पाहिजे. पुढे राम अयोध्येत परतल्यावरसुद्धा सामाजिक समरसतेचे अनेक प्रसंग रामायणात घडलेले आहेत. त्यातील एक प्रसंग असा की अयोध्येत शरयू किनारी स्नान करण्यासाठी तीन प्रकारचे घाट होते. पहिला घाट महिलांसाठी, दुसरा घाट पुरुष व पशुंसाठी आणि तिसरा घाट राजपरिवारातील लोकांसाठी होता. परंतु सिंहासनारूढ झाल्यावर रामाने महिलांचा घाट वेगळा ठेऊन राजपरिवारातील लोकांचा घाट व सामान्य लोकांचा घाट एकत्र केला. राजपरिवार आणि सामान्य प्रजा यांच्यातील भेद कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेला हा रामायणातील महत्वाचा प्रसंग आहे. 

निषादराज गुह, केवट, जटायू, शबरी, वानर आणि शेवटी विभीषण या सर्व प्रसंगांचा अभ्यास केल्यावर एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की 'रामायणातील समरसता' हा जन्माचा विषय नसून कर्माचा विषय आहे. खुद्द महर्षी वाल्मिकी हे जन्माने कोळी होते आणि कर्माने दारोडेखोर होते. पण पुढे ते आपलं कर्म बदलतात. भक्तीमार्ग स्वीकारतात आणि नंतर त्यांची व रामाची भेट होते. फक्त भेटच होत नाही तर रामाची पुढची पिढी घडविण्याचा अद्वितीय अधिकार वाल्मिकींना प्राप्त होतो. हा प्रसंग सुद्धा रामायणातील समरसतेचं एक उदाहरण आहे. वाल्मिकी रामायणात रामाचं आत्मीय प्रेम आणि समत्वाचे उदाहरण ठरतील असे अनेक प्रसंग आहेत. खरं तर संपूर्ण रामायण म्हणजे समरसता व एकात्मभावाची शिकवण देणारा एक अद्भुत ग्रंथ आहे. रावण नावाच्या एका बलाढ्य शत्रूशी राम नावाच्या एका महामानवाने सर्व सामान्य लोकांना सोबत घेऊन लढलेलं एक युद्ध म्हणजे रामायण. त्यामुळे रामराज्य उभारण्यासाठी आधी आपल्याला रामायणातले समरसता व एकात्मभाव ही मूल्य अंगीकारावी लागतील. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मानवता व एकात्मता जपणारा आणि जगणारा एक आदर्श समाज परमेश्वराला मागितला. संत ज्ञानेश्वर हे कृष्णभक्त होते पण त्यांनी जे मागणं मागितलं ते रामराज्य होतं. रामायणात सांगितलेला रामाचा एकात्मभाव ज्ञानदेवांनी अंगीकारला होता. त्यामुळेच भेद व द्वेष विरहीत भावनेतून सृष्टीतील प्रत्येक घटकासाठी ज्ञानदेव मागणं मागू शकतात. रामाचा एकात्मभाव अंगीकारण्यासाठी सर्व मानवनिर्मित भेदातून मुक्त व्हावं लागेल. राम या सर्व भेदातून मुक्त होते म्हणूनच शबरीने दिलेली बोरं खाऊ शकले. द्वेष आणि अहंकार विरहीत जीवन जगू शकले. इतक्या संदर्भांचा आधार घेऊन पुन्हा पुन्हा समरसता व एकात्मभाव सांगण्याचं तात्पर्य एवढच की ग्रंथातले आणि मंदीरातले राम आता हृदयात ठेवण्याची गरज आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात राम दिसतील तेव्हाच इतर सर्व भेद नष्ट होऊन शेवटी केवळ भक्त शिल्लक राहतील. भक्त एकत्र आल्यावर रामराज्य निर्माण होतं हे आपण रामायणात बघितलं आहे. 'प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यावर ध्येय गाठता येतं.' असा संदेश देणारी कथा म्हणजे रामकथा आहे. म्हणून शेवटी एवढच लिहितो की रामभक्त निर्माण झाले तर समरसता व एकात्मभाव निश्चितच निर्माण होईल कारण भक्त कधी विभक्त नसतात !

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८

Sunday, April 3, 2022

हिमगाथा : भाग २

१४ तारखेला संध्याकाळी आम्ही दिल्लीवरून झिंगबसने मनालीसाठी निघालो. दिल्ली ते मनाली प्रवास सुरु झाला. रात्री चमकणारी दिल्ली अधिकच सुंदर दिसत होती, मात्र रस्त्यावरील गाड्यांची गर्दी काही कमी झाली नव्हती. रस्त्यावर गाड्यांची गर्दी असूनसुद्धा आमचा झिंगबसचा ड्रायवर बिंधास्तपणे वेगात बस चालवत होता. आम्ही फक्त मागे जाणाऱ्या गाड्यांना बघत होतो. आधी आम्हाला वाटलं होतं की बस आमच्या ११ लोकांसाठीच असेल पण आराध्यने सांगितल्यावर कळलं की मनालीला जाणाऱ्या ६० प्रवास्यांपैकी आम्ही ११ प्रवासी होतो. प्रवास सुरु झाला आणि आम्ही 'डम्बशराड्स' खेळायला सुरवात केली. पण थोड्याच वेळात बसमधील ड्रायवरसोबत असलेल्या इसमाने आमचा खेळ बंद करायला सांगितलं. कारण ६० लोकांपैकी आमच्या ११ जणांचा आवाज जरा जास्तच येत होता. दिल्लीवरून बसमधे दक्षिण भारतीय तामिळ भाषिक ५-६ लोकांचा एक ग्रुप बसला होता. त्यातील एक माणूस रामानंद सागर यांच्या रामायणातील रावणाप्रमाणे हसत होता. आधी आम्हाला त्याचं हसणं एंटरटेनिंग वाटलं, मात्र नंतर आम्ही त्याच्या हसण्यामुळे फार इरिटेट झालो. त्यातही मी आणि ऋषीदादा जास्त इरिटेट झालो कारण तो राक्षस आमच्या मागेच बसून हसत होता. त्याच्या हसण्यामुळे इरिटेट होवून शेवटी मी त्याचं 'रावण' असं नामकरण केलं. एक-दीड तास ते राक्षसी हास्य स्वतःच्या कानावर घेतल्यावर जेव्हा बस धाब्यावर थांबली तेव्हा आम्ही ड्रायवरकडे त्याची शिवीयुक्त अशी तक्रार केली. धाब्यावर दालमखनी आणि बटरनानचं मस्त जेवण केल्यावर जेव्हा आम्ही बसमधे बसलो तेव्हा त्या राक्षसाचं हसणं बंद झालं होतं. मनालीला पोहोचेपर्यंत तो पुन्हा हसला नाही आणि हसलाही असेल तर मनात किंवा स्वतःपुरताच हसला असेल.

जेवण झाल्यावर जवळपास सर्वच प्रवासी झोपले. माझी ऊंची आणि रुंदी दोन्ही जास्त असल्यामुळे मिळालेल्या जागेवर झोप लागणे अशक्य होते, त्यामुळे मी जागाच होतो. बस निघाली तेव्हा आम्हाला (प्रत्येकी एक) छोट्या पाण्याच्या बाटल्या मिळाल्या होत्या. जेवण झाल्यावरच माझ्याजवळचं पाणी संपलं होतं. बॅगमधली बाटलीसुद्धा रिकामी झाली होती. "आता पाणी कुठून आणावे ?" असा विचार मी करत होतो आणि तेव्हाच मागच्या लोकांच्या न उघडलेल्या पाण्याच्या बाटल्या गलंडत-गलंडत समोर आल्या. सर्वांचे डोळे बंद असल्याची खात्री पटल्यावर मी आमच्या दोन रिकाम्या बाटल्या खाली ठेवल्या आणि भरलेल्या दोन बाटल्या उचलून पाणी प्यायलो. ड्रायवरचं वेगात गाडी चालवणंसुद्धा माझ्या फायद्याचं ठरलं. पहाटे पाचच्या सुमारास गाडी एका ठिकाणी चहासाठी थांबली. बाहेर उतरल्यावर "हिमाचलमधे आपण आलो" अशी जाणीव झाली. सकाळची गुलाबी थंडी आणि सर्वत्र पसरलेलं धुकं जणू आमचं स्वागत करत होतं. तिथे चहा घेतला थोडे फोटो काढले आणि पुन्हा बसमधे बसलो. खरा हिमाचलचा प्रवास आता सुरु झाला होता. मोठ्या डोंगरातील छोट्या रस्त्यावरून बस जात होती तेव्हा निसर्गाला छायाचित्रांमधे कैद करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे मोबाईल बाहेर काढले. मनालीला जातांना आमच्यासोबत चालणारी प्राचीन व्यास (बियास) नदी बघितली. अशाप्रकारे निसर्गाचा आस्वाद घेत आणि स्वतःचा उत्साह वाढवित आम्ही मनालीला पोहोचलो. बसमधून उतरलो तर समोरच दुसरा ड्रायवर उभा होता. एक १३ सिटर छोटी बस आम्हाला हिमाचल प्रदेश फिरवणार होती. सर्व सामान त्यात टाकून आम्ही हॉटेलकडे निघालो.

हॉटेल आणि आसपासचं सौंदर्य बघितल्यावर "पैसा वसूल" असे शब्द जीभेवर आले. हॉटेलचं नाव 'ग्रेस इन' असं होतं. चारही बाजूने बर्फाचे पर्वत आणि मध्यभागी ४-५ हॉटेल्सचा समूह. त्यापैकी एक म्हणजे आमचं 'ग्रेस इन'. पूर्ण हॉटेल, त्यातील आम्हाला मिळालेल्या खोल्या, गॅलरीतून दिसणारा बर्फ अशा सर्वांचे फोटो आणि वीडियो मी घेतले. ८० टक्के लाकडी बांधकाम असलेल्या या हॉटेलमधे आम्ही दोन दिवस राहणार होतो. फ्रेश झाल्यावर पोटभर नाश्ता करून आम्ही मनाली फिरण्यासाठी निघालो. सर्वात पहिला स्पॉट म्हणजे हिडिंबा मंदीर होता. सरळ व ऊंच झाडांनी वेढलेलं आणि दगडी व लाकडी बांधकाम असलेलं हे प्राचीन मंदीर. महाभारत काळापासून हिडिंबा मंदीराची कथा सांगितली जाते. ऊंच झाडांसोबत अथर्व आणि सर्वेशने सर्वांचे खूप फोटो काढल्यावर आम्ही पुढे निघालो. बाहेर येतांना तिथले पांढरेशुभ्र ससे जवळ घेऊन पुन्हा फोटो काढले. त्यानंतर तिथले अजून एक-दोन छोटे खेळ खेळल्यावर आमची गाडी वशिष्ठ मंदीराकडे निघाली. अतिशय सुंदर आणि सुबक लाकडी नक्षीदार कलाकृतीने सजलेलं वशिष्ठ मंदीर होतं. मनालीतील मंदीरांचं वैशिष्ट्य म्हणजे लाकडी आणि दगडी बांधकाम, भरमसाठ कोरिवकाम पण मंदीराच्या गाभाऱ्यात फक्त एक किंवा दोन प्राचीन दगडी अवशेष बाकी मंदीर पूर्ण रिकामे. दोन्ही प्राचीन मंदीरं बघता-बघता दुपार झाली. मग आम्ही मॉल रोडला गेलो. तिथे पोहोचेपर्यंत सर्वांना भूक लागली होती त्यामुळे 'आशियाना' नावाच्या हॉटेलमधे गेलो. हे नाव सर्वांना लक्षात राहिल कारण जितकं चांगलं हॉटेल तितकच बेचव आणि भयंकर महाग तिथलं जेवण होतं. स्वतःच्या जीभेवर अशा भयंकर जेवणाचा अत्याचार करून आम्ही जेव्हा तिथून बाहेर निघालो तेव्हा मी त्या हॉटेलचा एक फोटो घेतला. अथर्वने त्या दुपारच्या जेवणाला 'शिटी लंच' असं नाव दिलं. त्यानंतर तिथलेच एक-दोन ठिकाणं पाहून आम्ही खरेदी करायला गेलो. मॉल रोड म्हणजे पुण्यातील तुळशी बाग किंवा नागपूरच्या बर्डीसारखा एरिया. दुकानांची रांग आणि प्रत्येक दुकानात भयंकर गर्दी. मी तिथल्या एका दुकानातून तीन 'हिमाचली टोप्या' घेतल्या. मॉल रोड मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे तिथला प्रत्येक दुकानदार (स्त्री अथवा पुरुष) तो स्वतः विकत असलेली वस्तू कशी निर्माण होते हे ग्राहकाला सांगतो. सर्वांची खरेदी झाली आणि आम्ही पुन्हा हॉटेलला परतलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला बर्फात खेळायला जायचं होतं. त्यामुळे रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न केला पण हॉटेलजवळचे बर्फाचे पर्वत रात्री अधिकच सुंदर दिसत होते. अंगावर येणारा थंडगार वारा मनाला एक वेगळाच आनंद देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून तयारी केली आणि बर्फाकडे निघालो. जस-जसे आम्ही हॉटेलपासून दूर जात होतो तस-तसा आम्हाला रस्त्यावर दिसणारा बर्फ वाढत जात होता. रस्त्यात एका ठिकाणी थांबून आम्ही बर्फात जाण्याआधी आवश्यक ते कपडे, हातमोजे आणि बूट घेतले. ते सर्व अंगावर चढवल्यावर प्रत्येकाचं वजन किमान एक किलो वाढल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर सोलांग व्हॅली क्रॉस करून आम्ही 'अटल टनल' बघितला. नऊ किलोमीटर पेक्षा जास्त लांब असलेला आणि बर्फाच्या पहाडात खोदलेला अतिशय भव्य बोगदा म्हणजे अटल टनल होय. पूर्ण अटल टनलचा जाता-येतांना वीडियो घेतला. अटल टनलनंतर येणारी लाहोल व्हॅलीमधे आम्ही बर्फावर खेळणार होतो. लाहोल व्हॅलीमधे एका ठिकाणी ड्रायवरने आम्हाला सोडलं. तिथून पुढे बर्फात एक-दीड किलोमीटर चालत जायचं होतं. जिथे आम्ही उतरलो त्या ठिकाणी नजर जाईल तिथपर्यंत फक्त पांढराशुभ्र बर्फ दिसत होता. चालतांना काही जागी पाय एकदम खाली जायचा तर काही जागी पाय घसरायचा. चारही बाजूंनी फक्त बर्फ आणि त्यामधून जाणारी चिनाब नदी जणू आम्हाला स्वतःजवळ बोलवित होते. तिथे गेल्या-गेल्या सगळ्या बॅग्स बाजूला ठेवून आम्ही एकामेकाला मनसोक्त बर्फ फेकून मारला. त्यानंतर मी थोड्यावेळ बर्फावर शांत पडून होतो. वर होतं अथांग पसरलेलं आकाश व खाली होता अथांग पसरलेला बर्फ आणि या दोघांमधे मुसाफिराप्रमाणे फिरणारे आम्ही सर्व. तिथे आम्हाला एक फोटोग्राफर भेटला. तो तिथे आलेल्या लोकांचे फोटो काढून तिथेच सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपीने देत होता. फोटोची किंमत कळल्यावर एक किंवा दोन फोटो काढण्याचं आम्ही ठरवलं. मग फोटोग्राफर पोज सांगायला लागला आणि आम्ही तो म्हणेल ती पोज द्यायला लागलो. एक वेळ अशीसुद्धा आली होती की जेव्हा आम्ही ते जाडे आणि गरम कपडे काढून आम्ही नेलेल्या पँट व टी शर्ट घालून फोटो काढले. चिनाब नदीचं पाणी भयंकर थंड होतं. १०-१५ सेकंदापेक्षा जास्त वेळ त्या पाण्यात हात ठेवणं अशक्य होतं. बर्फ इतका पांढराशुभ्र होता की गॉगल न घालता बघणं होत नव्हतं. सर्वांचे फोटो काढणं झाल्यावर जेव्हा आम्ही फोटो बघितले तर कोणाचे २० तर कोणाचे १५ असे फोटोज होते. अतिशय सुंदर फोटो असल्यामुळे सर्वच फोटोज घेण्यासाठी आम्ही तयार झालो. माझे स्वतःचे त्यात २४ फोटोज होते. त्यानंतर पुन्हा मी, ऋषीदादा, सर्वेश, प्रथमेश, अथर्व आणि आराध्य चिनाब नदीजवळ जावून शांत बसलो. तिथले काही चोपडे दगड घेतले. संध्याकाळी नदीजवळ येणारा पक्ष्यांचा आवाज ऐकून खूप शांत व प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर टायरवर बसून बर्फावरून घसरत येणे अशा काही बालिश एक्टिविटी करून आम्ही हॉटेलला परत जाण्यास निघालो.

आमच्यापैकी काहीजण पुन्हा मॉल रोडला खरेदी करण्यासाठी गेले. परंतु चिनाब नदीजवळ येणारा पक्ष्यांचा आवाजाचा सुंदर अनुभव मला मॉल रोडच्या गर्दीत जावून खराब करायचा नव्हता. त्यामुळे मीसुद्धा ऋषीदादा, प्रथमेश, मयुरेशदा आणि चिन्मयसोबत हॉटेलला आलो आणि दिवसभरातल्या महत्वपूर्ण मुद्द्यांची डायरित नोंद केली. दिवसभर फिरल्याने आलेला थकवा दूर करण्यासाठी त्यारात्री हॉटेलवाल्यांनी आमच्यासाठी मस्त शेकोटी आणि गाण्याची व्यवस्था केली होती. ती मनालीतील आमची शेवटची रात्र होती. येणारी सकाळ म्हणजे मनाली सोडण्याची सकाळी होणार होती. त्यामुळे त्या रात्री आम्ही पुन्हा मनालीतील वातावरणाचा आनंद घेतला. मनालीच्या बर्फाचा आनंद घेतल्यावर आणि भरपूर फोटो काढून घेतल्यावर एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू शकतो की पैसा म्हणजे आनंद नाही ही गोष्ट सत्य आहेच, पण पैस्यामुळे आनंदप्राप्तीच्या मार्गांपर्यंत आपण पोहोचू शकतो. शेवटी प्रत्येक माणसाची आनंदाची व्याख्या आणि आनंदप्राप्तीची पद्धत वेगळी असते. बर्फात खेळतांना आणि फिरतांना आनंद तर खूप मिळाला, पण त्याचा असा एक विचित्र परिणाम होईल हे आम्हाला माहित नव्हतं.

बाकी गोष्टी पुढील भागात...

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

Saturday, March 26, 2022

हिमगाथा : भाग १

बैतुलवरून प्रवास करणारे :

मी : गंधार कुलकर्णी
ऋषीदादा : मामेभाऊ
सर्वेश : मामेभाऊ
राधा : मावसबहिण

पुण्यावरून प्रवास करणारे :

अथर्व : मामेभाऊ
आराध्य : मामेभाऊ
इंद्रायणी : मावसबहिण
अदितीताई : मावसबहिण
मयुरेशदा : जावई
चिन्मय : मयुरेशदाचा भाऊ
प्रथमेश : मयुरेशदाचा भाऊ

कोरोनाकाळात लिहिलेल्या जवळपास माझ्या सर्वच लेखांची सुरवात 'कोरोना' या शब्दाने झाली आहे. याला तुम्ही कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्तितीमुळे आलेलं फ्रस्ट्रेशन सुद्धा म्हणू शकता. महाविद्यालयीन कामं, अभ्यास आणि जणू मानवी शरीराचाच एक भाग बनलेलं मास्क यामुळे मी फार कंटाळलो होतो. "कुठे तरी बाहेर फिरायला जायचं" अशी चर्चा घरात तीन-चार महिन्यापासून सुरु होती. असं सर्व असतांना एका दुपारी ऋषीदादाचा कॉल आला आणि त्याने हिमाचल प्रदेश टूरविषयी सांगितलं. "मार्च महिन्याचं शेड्यूल पाहून सांगतो" असं त्याला सांगून मी कॉल बंद केला. कारण आतापर्यंत असे अनेक प्लान्स बनले पण काहीना काही कारणांमुळे माझं जाणं होत नव्हतं. अगदी जवळ असलेल्या मेळघाटात सुद्धा मी जावू शकलो नव्हतो. पण यावेळी पहिल्या कॉलपासूनच माझी टूरवर जाण्याची इच्छा होती आणि सर्व कामं सोडून स्वतःला वेळ देण्याची गरज सुद्धा वाटत होती. आई-बाबांना या टूरविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी पण "हो जावून ये" असं म्हंटलं आणि माझं टूरवर जाण्याचं पक्क झालं. तेव्हापासून दर एक-दोन दिवसाआड ऋषीदादा, सर्वेश आणि माझी टूरबद्दल चर्चा होवू लागली, सामानाची यादी बनू लागली, नवीन खरेदी सुद्धा झाली. बॅग भरणं सुरु झालं आणि कपड्यांच्या आधी मी डायरी बॅगमध्ये ठेवली. 'हिमगाथा' लिहिण्याच्या विचाराचा जन्म तेव्हाच झाला होता. शेवटी निघण्याचा दिवस उजाडला. १३ मार्च या दिवशी दुपारी बैतुल स्टेशनवरून आमची गाडी होती. सकाळी ११च्या सुमारास आम्ही घरून निघालो.

बैतुल रस्त्याला लागल्यावर पिवळ्या गवतामुळे आणि निष्पर्ण झाडांमुळे उन्हाचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवत होतं. पण त्यात अधून मधून लाल-गुलाबी-केशरी झालेले पळसाचे झाडं पाहून थोडं बरंही वाटत होतं. गाडीत आम्ही चौघं सामानसहित एकदम फिटोफिट बसलो होतो, त्यामुळे मान आणि डोळ्यांशिवाय इतर कोणत्याही प्रकारची हालचाल अशक्य होती. दुपारी १च्या सुमारास आम्ही बैतुलला पोहोचलो. स्टेशनवर गाडी यायला वेळ असल्यामुळे ऋषीदादाने घरून आणलेला धापड्यांचा डबा उघडला आणि तेव्हापासून आमच्या पूर्ण प्रवासातला एक अतिशय महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे 'दणकून खाणं' सुरू झाली. थोड्यावेळात गाडी आली. आम्ही गाडीत बसलो आणि दिल्लीचा प्रवास सुरु झाला. सामान घेऊन आत गेलो तर दोन्ही बर्थवर एक बाई आणि एक माणूस झोपले होते. आमचे दोन मिडल आणि दोन अप्पर असे बर्थ असल्यामुळे आम्हाला लगेच आडवं व्हावं लागलं आणि प्रवासात सर्वजण बसून मस्त पत्ते खेळण्याचा आमचा बेत सुद्धा आडवा झाला. शेवटी मी आणि ऋषीदादा अप्पर बर्थवर गेलो आणि खाली झोपलेल्या दांपत्त्याचे बंद डोळे उघडण्याची वाट बघू लागलो.

स्टेशनवर काढलेला फोटो लगेच स्टेटसवर टाकून "आम्ही टूरसाठी निघालो" ही गोष्ट जगजाहीर केली. एक-दीड तास गेल्यावर आम्हाला खाली बसायला भेटलं. मगाशी खाली झोपलेलं दांपत्त्य जागं झालं होतं. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांचं अडनाव खंडेलवाल आहे हे कळलं. चेहऱ्यावरून अतिशय धार्मिक दिसणारे खंडेलवाल काका-काकू मथुरेला जात होते. काहीवेळानंतर आम्ही दरवाज्याजवळ जावून एक-दोन चांगले फोटो घेतले आणि आपण प्रवास करतोय अशी जाणीव स्वतःलाच करून दिली. खंडेलवाल काका-काकू आमच्यासोबत फार कंफर्टेबल नव्हते हे माझ्या लक्षात आलं. मात्र आम्ही त्यांच्यासोबत बऱ्यापैकी कंफर्टेबल होतो. गाडीतल्या इतर लोकांचं निरीक्षण करण्यात आम्ही मग्न असल्यामुळे कोणी कितीही अनकंफर्टेबल असला तरी आम्ही कंफर्टेबल होतो. संध्याकाळी खंडेलवाल काका-काकूचे इतर नातेवाईक मधल्या एका स्टेशनवरून बसले. दुपारभर शांत असलेले खंडेलवाल काका-काकू संध्याकाळी एकदम बोलायला लागले. तेव्हा मला दोन पीढीतला फरक जाणवला. फेसबूक आणि व्हाट्सएप यामुळे इतक्या अनोळखी लोकांशी आपण जुळतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी बोलायला आताच्या तरुणांना फार वेळ लागत नाही. तेच आधीच्या पीढीतले लोकं एकदम कोणाशी बोलत नाही. स्वभावातील फरक सुद्धा असू शकतो. यावर विचार करत असतांना ऑर्डर केलेलं जेवण आलं, त्यामुळे सगळे विचार बाजूला सारून आम्ही जेवणावर फोकस केला.

रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा गाडीचे चाक आणि रुळाच्या घर्षणाचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. मी काही गाणे ऐकले. नंतर दिवसभरातले मुद्दे डायरीत लिहिले आणि डोळे बंद करणार तेवढ्यात घोरण्याचा आवाज आला. खाली बघितलं तर काही लोकांची स्पर्धा सुरू झाली होती. शेवटी मी इयरफोन कानातच लावून ठेवले आणि झोपण्याचा प्रयत्न केला. सकाळी ७ वाजता आम्ही दिल्ली स्टेशनला पोहोचलो. अतिशय भव्य नव्या दिल्लीचं स्टेशन आणि त्यापेक्षा जास्त तिथे असलेली लोकांची गर्दी. आम्ही स्टेशनच्या बाहेर येताच टॅक्सीवाल्यांनी आम्हाला घेरलं होतं. ज्या मास्कचा मला अचलपूरात कंटाळ आला होता, आता ते मास्क लावणे आवश्यक झाले होते. आम्हाला लोकं चालतांना दिसत नसून धावतांनाच दिसत होते. आमच्याप्रमाणे जो चालत असेल तो दिल्लीचा रहिवासी नाही असं मी मानत होतो. दिल्ली स्टेशनसमोर एका रस्त्याच्या छोट्या बोळीमध्ये गुड डे नावाचं हॉटेल होतं. आम्ही चालत-चालत हॉटेल शोधत होतो. जेव्हा ती छोटी बोळ दिसली तेव्हा "हॉटेल कसं असेल ?" असा एक चिंताजनक प्रश्न मनात निर्माण झाला. कारण त्या बोळीत एकावेळी एकच माणूस जावू शकेल एवढीच जागा होती. आम्ही समोर-समोर चालत गेलो आणि हॉटेल बघितलं तेव्हा बरं वाटलं. बोळीच्या मानाने हॉटेल खूपच चांगलं होतं.

हॉटेल गुड डे मध्ये आमच्या तीन खोल्या होत्या. खोलीत जावून मोठ्या बेडवर आम्ही सामान ठेवलं नव्हे आपटलच ! अंघोळ वगैरे होईपर्यंत आमचे बाकीचे भाऊलोकं (पुण्यावरून निघालेले) पोहोचले. सर्वांचं एकामेकांना बिलगणं झालं आणि आम्ही दिल्लीतले प्रसिद्ध छोले-कुल्चे खायला निघालो. सकाळी बघितलेली गर्दी आता अजूनच वाढलेली वाटत होती. पुन्हा गल्ल्या-बोळीतून फिरत-फिरत आम्ही छोले कुल्चे मिळतात त्या ठिकाणी पोहोचलो. 'राधेश्याम छोले कुल्चे' अशी मोठी पाटी लागली होती. ते छोटं हॉटेल लोकांनी खचाखच भरलेलं होतं. जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून लोकं छोले कुल्चे खात होते. छोले म्हणजे काळ्या चण्याची झणझणीत उसळ आणि कुल्चे म्हणजे मोठ्या आकाराची पुरी पण त्यात आतमध्ये पनीर किंवा चीज लावून बनवतात. इतक्या दिवसांपासून चालू असलेल्या भाकरी, भाजी आणि वरणाच्या डायटचा या प्रवासात पूर्णत: विसर पडणार आहे हे पहिल्याच दिवशी असा भयंकर नाश्ता केल्यावर मला जाणवलं. पोटभर छोले कुल्चे आणि त्यावर मोठ्या कुल्लड़भर लस्सी पिल्यावर "आता संध्याकाळपर्यंत काहीच खायचं नाही" असं आम्ही सर्वांनीच ठरवलं. नाश्ता झाल्यावर आम्ही मेट्रो स्टेशन पर्यंत चालतच गेलो. मेट्रोमधून प्रवास करतांना जितका आनंद होतो, त्यापेक्षाही जास्त आनंद मेट्रो स्टेशनवरील स्वच्छता आणि नियमांचं पालन करणाऱ्या लोकांना पाहून होतो. मेट्रोतून उतरल्यावर "पहिले कुठे जायचं ?" अशी चर्चा सुरू होती. आम्हाला बाजूला 'दिल्ली पब्लिक लायब्ररी' दिसली आणि सर्वात आधी तिथेच आम्ही गेलो.

लायब्ररीसमोर फोटो काढले आणि आत शिरलो. "विजिट के लिए आए है" असं सांगितल्यावर तिथल्या माणसाने आम्हाला लायब्ररीचं प्रत्येक दालन दाखवलं. अलीबाबासमोर पूर्ण खजाना असावा त्याप्रमाणे माझ्यासमोर पुस्तकं होती. १९५१ साली स्थापन झालेल्या या लायब्ररीच्या दिल्लीत चार शाखा आहेत. भारतात प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत या लायब्ररीत येते. दिल्लीत कुठेच लाभणार नाही अशी शांतात त्या लायब्ररीत आम्हाला लाभली. फिरते ग्रंथालय, लहान मुलांना वाचनाची सवय लागावी म्हणून एक वेगळी चळवळ असे विविध उपक्रम ही लायब्ररी घेत असते. "टूरचे ९ दिवस इथेच घालवावे." असाही विचार आम्ही केला होता. शेवटी पुस्तकांच्या खूप जास्त मोहात न पडता आम्ही तिथून लाल किल्ल्याकडे निघालो. लाल किल्ला आणि समोर चांदनी चौक रोड होता. आता इथेच आमचा राहिलेला दिवस जाणार होता. लाल किल्ला लोकांसाठी बंद असल्यामुळे आम्ही बाहेरूनच काही फोटो काढले. तिथेही दिल्ली दर्शन करवून देणारे गाडीवाले आमच्याभोवती गर्दी करतच होते. लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा दिसला आणि आम्ही सगळं विसरलो. आम्ही भरभरून तिरंग्याला बघितलं. वाऱ्याच्या मिठीत जावून नृत्य करणारा तिरंगा बघून एक वेगळा आनंद होत होता.

त्याच रस्त्यावर समोर जैन मंदीर होतं. त्यानंतर हिंदू मंदीर आणि त्यानंतर गुरुद्वारा होता. एकाच रस्त्यावर तीन वेगवेगळे धार्मिक स्थळं आम्ही बघितले. त्यापैकी आम्ही गुरुद्वारामधे सर्वाधिक वेळ घालवला. गुरुद्वारात गेल्यावर दर्शन केलं आणि थोडावेळ तिथेच बसलो. दिव्यांचा झगमगाट, स्वच्छता, सतत सुरू असलेलं अतिशय सुंदर भजन आणि अतिशय नम्रपणे सगळ्या सेवा देणारे लोकं. मनाला प्रसन्नता आणि समाधान देणारा हा अनुभव घेवून आम्ही पुढे 'पराठेवाली गली'कडे निघालो. तिथे पोहोचल्यावर पराठ्यांच्या सुगंधामुळे "संध्याकाळपर्यंत काहीच खायचं नाही" हा आमचा निर्णय बदलला आणि तिथे आम्ही भेंडी, मिर्ची आणि मिक्सवेज असे तीन वेगवेगळे पराठे खाल्ले. इतकं खाल्ल्यावर चालणं अशक्य असल्यामुळे तिथून गाडीकरून आम्ही पुन्हा हॉटेलला आलो आणि आराम केला. संध्याकाळी दिल्लीवरून मनालीला जाण्यासाठी वॉल्वोबसचं बुकिंग होतं. 'मजनू का टीला' या जागी आमची बस येणार होती. संध्याकाळी आम्ही जरा लवकरच हॉटेल सोडून 'मजनू का टीला'कडे निघालो. कोणासाठीच न थांबणारा दिल्लीचा ट्राफिक बघत आम्ही झिंगबसमध्ये बसलो आणि मनालीसाठी निघालो. दिल्लीत फिरतांना अनेकजण कुतुब मीनार, लाल किल्ला, जंतर मंतर वगैरे बघतात. पण दिल्लीचा आणि दिल्लीच्या लोकांचा अनुभव घ्यायचा असेल तर गल्ल्या-बोळीतील दिल्ली बघावी. 'ये जवानी है दिवानी' सिनेमातील रणबीर कपूरच्या डायलॉगप्रमाणे दिल्ली माणसाला धावणं, उडणं, पडणं शिकविते पण थांबणं शिकवित नाही. असं मला वाटतं.

बाकी गोष्टी पुढील भागात...

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८
दि. २७ मार्च २०२२

Tuesday, February 15, 2022

एक अपूर्ण भेट...

 १७ डिसेंबर २०२१ आईच्या पुस्तकाचं प्रकाशन पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या हातून झालं. त्याही पूर्वीपासून लतादीदींच्या भेटीचा योग जुळवून आणण्यासाठी आई-बाबांचे प्रयत्न सुरूच होते. "दीदींच्या भेटीचा प्रयत्न करूया" असं पंडितजीसुद्धा बोलले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात लतादीदींना दवाखान्यात भरती करण्यात आलं. अनेक लोकांप्रमाणे आम्हीसुद्धा देवाकडे दीदींचे आयुष्य मागत होतो. पण देवालासुद्धा आता लतादीदीचं गाणं प्रत्यक्ष ऐकायचं असावं आणि ६ फेब्रूवारी २०२२ रोजी सकाळी दीदी गेल्याची बातमी आली. बातमी ऐकून आम्ही तिघंही अस्वस्थ झालो. त्यादिवशी घरातला टी.व्ही. पुर्ण वेळ सुरु होता. फक्त जेवायचं म्हणून जेवण झालं. टी.व्ही.वर लतादीदींच्या आठवणी आणि गाणे दाखवणं सुरु होतं. संध्याकाळी दीदींच्या अंत्यविधी होत असतांना पंडितजींचा उदास चेहरा आणि भीरभीरती नजर पाहून आम्हालासुद्धा अनाथ झाल्यासारखं वाटत होतं. तो दिवस गेला. रात्री झोप येत नव्हती. "एक भेट तरी व्हायला हवी होती" असं माझच मन मला म्हणत होतं. त्यारात्री खूप वेळ झोप लागलीच नाही.

दीदीचं पार्थिव शरीर शिवाजी पार्कमध्ये नेत असतांना हजारो लोकं रस्त्यावर उभे होते. तेवढेच लोकं तिच्या गाडीच्या मागेही चालत होते. अनेक लोकांनी फुलांचा वर्षाव केला. सर्वच लोकांचे डोळे त्यावेळी पाणावलेले होते. "मृत्यू असावा तर असा !" मी मनातच बोललो. गायक म्हणून लतादीदीबद्दल काही लिहायचं किंवा बोलायचं म्हंटलं तर 'भारतरत्न लता मंगेशकर' या तीन शब्दांशिवाय पुढे जाता येत नाही. यातच लतादीदीची श्रेष्ठता आहे. आपण लतादीदीला 'गानसम्राज्ञी' असंही म्हणतो. परंतु 'गानसम्राज्ञी' होण्याआधी दीदी एक व्यक्ती म्हणूनही कशी श्रेष्ठ होती ? या प्रश्नावर आपण चिंतन करायला हवं. ऐन तारुण्यात व्रतस्त आणि संघर्षमय जीवन जगून दीदीने स्वतःचा परिवार पुन्हा उभा केला. स्वतःसोबत तिने सर्व भावंडांनाही समोर आणलं. मोठ्या बहिणीला आपण आईचं स्थान देत असतो, त्याचं कारण समजून घ्यायचं असेल तर दीदीचं जीवन आपण अभ्यासलं पाहिजे. सिनेमासाठी पार्श्वगायन करतांना दीदी पायात चप्पल घालत नसे. कारण ती गायन करत नसून संगीतकलेची पूजा व उपासना करायची. एखादं कार्य उत्तमप्रकारे करण्यासाठी ते कार्य करणारा आधी समाधानी होणं आवश्यक असतं. दीदी स्वतःला समाधान मिळेपर्यंत गायनासाठी पूर्ण शक्ती लावायची. स्वतःच्या कार्याबद्दल प्रेम, निष्ठा आणि समर्पणभाव हे गुण दीदीकडून आत्मसात करायला हवे. लतादीदी व्यक्तीपेक्षा कार्याला श्रेष्ठ मानायची त्यामुळेच अनेकवेळा तिने वयाने लहान पण कार्याने मोठे असलेल्या लोकांचेसुद्धा आशीर्वाद घेतले आहे. दीदीजवळ असलेली ही नम्रता बघून तिचा मोठेपणा कळतो.

अतिशय प्रतिकुल परिस्थिती बघितल्यामुळे दीदीला सदैव हसत राहण्याची सवय झाली असावी. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर शांतता किंवा हास्य हे दोन भाव नेहमी असायचे. लतादीदीने अनेक लोकांशी मनाचं नातं जोडलं होतं. सचिन तेंडुलकर व राज ठाकरे यांना दीदी मुलं मानत. माझे आजोबा डॉ. राम शेवाळकर यांना दीदी 'बाबा' म्हणून आवाज देत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीदीने भाऊ मानलं होतं. अशा अनेक लोकांना दीदीचं प्रेम लाभलं. फक्त मोठ्या पदावर असलेले किंवा असामान्य लोकं नव्हे तर अतिशय सामान्य लोकांनासुद्धा संपूर्ण मंगेशकर कुटुंबाकडून प्रेम आणि वात्सल्य लाभलं आहे. दीदीची  देशभक्ती सर्व जगाला कळेल असे अनेक प्रसंग घडले आहेत. अनेकवेळा दीदीने स्वतःच्या कार्यक्रमांचे पैसे खेळाडू, सैनिक आणि पीडितांसाठी दिले आहेत. दीदीने स्वतःसाठी आलेले अनेक गाणे नवोदित गायकांकडे पाठविले. जगातील सर्व घडामोडींची माहिती लतादीदी घेत असत. शेवटपर्यंत लतादीदी तरुण गायकांना 'फेसबूक' आणि 'ट्विटर' वरून प्रोत्साहन व आशीर्वाद देत होती. संपूर्ण जगासाठी असामान्य असलेली लतादीदी वैयक्तीक जीवनात आपल्या सर्वांप्रमाणे सामान्य जीवन जगत होती.

मला संगीतकलेचे ज्ञान नाही, पण गाणे ऐकायला आवडतात आणि लोकांच्या जीवनकथांचे वाचन करण्याची आवड आहे. त्यामुळे लतादीदीबद्दल जे थोडं वाचलं आणि विविध मुलाखतीतून ऐकलं त्यावरील चिंतन या लेखामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ६ फेब्रूवारी २०२२ ला लतादीदी देहरूपाने आपल्यातून निघून गेली, पण 'लता मंगेशकर' या नावाची कधी न संपणारी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण सृष्टीत पसरली आहे. प्रत्येकजण गायन करू शकत नाही, परंतु लतादीदीच्या व्यक्तिमत्वातील विविध गुण आत्मसात करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. लतादीदीचे अजरामर गाणे आपल्याला जगण्यास मदत करतात, पण लतादीदीच्या जीवनातील प्रसंग आपल्याला जगणं शिकवू शकतात. २००६ साली राम आजोबा(डॉ. राम शेवाळकर) यांच्या अमृतमोहोत्सवी कार्यक्रमामध्ये आम्हाला लतादीदीचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्याची संधी लाभली. त्यानंतर विविध मुलाखती व लेखांमधून लतादीदीची अपूर्ण भेट झाली. जर आता लतादीदीला प्रत्यक्ष भेटता आलं असतं तर ही अपूर्ण भेट पूर्णत्वास गेली असती आणि दीदीकडून बरच काही शिकायला मिळालं असतं.

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

Sunday, February 13, 2022

मास्टर दीनानाथांची हृदया - भारतरत्न लता मंगेशकर

 स्वरांना स्त्रीचा जन्म घेण्याची इच्छा झाली आणि २८ सप्टेंबर १९२९ ला लतादीदींचा जन्म झाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर यांना एकूण पाच अपत्य झालीत. असा सप्तसुरांचा मंगेशकर परिवार. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची जेष्ठ कन्या दीदी ही त्यांची अतिशय लाडकी होती. त्यामुळे दीनानाथ, दीदीला हृदया म्हणत असत. पण तिचे व्यावहारिक नाव 'हेमा' होते. 'भावबंधन' नाटकात दीदीने 'लतिका'ची भूमिका केली होती. या नाटकामुळे प्रभावित होऊन दीनानाथ यांनी दीदीचे नाव 'लता' ठेवले. लता म्हणजे 'वेल' वेल ही भिंतीच्या किंवा झाडाच्या आधाराने वाढत असते. पण आता या वेलीनेच सर्व परिवाराला आधार दिला. कारण १९४२ मध्ये मास्टर दीनानाथ यांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण परिवाराची पालनपोषणाची जबाबदारी १३ वर्षांच्या लतादीदीवर आली. तेव्हा तिला दीनानाथांचे सन्मित्र, मास्टर विनायकांनी आधार दिला. सुरुवातीला दीदीला मराठी चित्रपटातून गायिका आणि अभिनेत्री म्हणून काम करावे लागले. १९४२ सालचा 'पहिली मंगळागौर' या चित्रपटात दीदीने अभिनय केला व एक गाणंही गायलं होतं. १९४४ मध्ये दीदी मास्टर विनायकांसोबत मुंबईत आल्यात आणि उस्ताद अमानत अली खाँ यांचेकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेत. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूपश्चात तिला बराच संघर्ष करावा लागला. या दरम्यान तिला गुलाम हैदर यांनी बरीच मदत केली.


१९४८ मध्ये मजदूर चित्रपटात तिने पहिलं हिंदी गाणं गायलं. १९४९ मध्ये 'महल' साठी हिंदी गाणं गायलं आणि त्यानंतर १९५० पासून मात्र लतादीदींना मोठ्या संगीतकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. जसे अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, एस्. डी. बर्मन, खय्याम, सलील चौधरी, मदन-मोहन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, पंडित हृदयनाथ मंगेशकर ते आत्ताचे ए. आर. रहमान पर्यंत. दीदींनी सर्व संगीतकारांसोबत काम केले. सोबतच अनेक दिग्गज गायकांसोबत गाणे गायले. जसे हेमंत कुमार, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, मन्ना डे, किशोरकुमार, सुरेश वाडकर ते आताचे उदित नारायण पर्यंत. तीस हजाराहून अधिक एकूण ३६ भाषांमध्ये दीदींनी गाणी गायली आहेत. जसे विविध गीतकार-संगीतकार, गायक-गायिकांसोबत काम केले. त्याचप्रमाणे विविध अभिनेत्री, जसे नर्गिस, मीनाकुमारी, मधुबाला, रेखा, हेमा मालिनी, परवीन बॉबी, झिनत अमान, रीना रॉय, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा, काजोलपर्यंत सर्वांना दीदीने आपला आवाज दिला आहे.

लतादीदीचा स्वच्छ, निकोप, मधुर स्वरांच्या आवाजाचं रहस्य काय असू शकतं ? का बरं दीदी इतरांपेक्षा वेगळी आहे ? याबद्दल श्रवण-चिंतन-मनन केलं तर असं लक्षात येतं की तिची संगीत कलेविषयीची निष्ठा, श्रद्धा, प्रामाणिकपणा, तपस्या, साधना या सर्व गोष्टी आहेत. प्रत्येक गाणं रेकॉर्ड करण्यापूर्वी ती स्वत: रियाज करून मनाचे समाधान झाल्यानंतरच गाणं रेकॉर्ड करत असे. मराठी सारखाच हिंदी, उर्दू भाषेचा अभ्यास तिने स्पष्ट शब्दोच्चारांसाठी केला होता. प्रत्येक सूर हा परफेक्ट लागलाच पाहिजे असा तिचा नियम होता. त्या चित्रपटातील प्रसंग, त्यामधील भावभावना, त्यातील अभिनेत्री, तिचा आवाज या सर्व गोष्टींचा विचार, चिंतन-मनन करून ते सर्व संस्कार ती आपल्या आवाजावर करत असे म्हणून ते गाणे गात असतांना प्रत्यक्ष ती अभिनेत्री स्वतः गाते आहे असं सर्वांनाच वाटायचं. मास्टर दीनानाथ यांच्या गळ्यातील सहजता दीदीच्या गळ्यात होती. त्यामुळे ताना सुद्धा तिच्या गळ्यातून सहजच निघत असत. दीदीच्या आवाजाची रेंज इतकी मोठी होती की ती हाय पीच मध्ये गायची त्यामुळे संगीतकारांना सुद्धा संगीत देताना भरपूर काम करता येऊ लागले. त्यांचा आवाका व्यापक होत गेला. गाणं रेकॉर्ड करताना दीदीच्या पायात कधीच चप्पल नसे. कारण ती प्रत्यक्ष सरस्वतीची पूजा करीत असे. प्रत्येक गायकाला दीदीचं श्रेष्ठत्व तिच्यासोबत गाणं रेकॉर्ड करतांनाच कळत होतं. कारण तिची योग्यताच तेवढी होती. उदाहरणादाखल मी या लेखात दोन गीतं देत आहे. एक म्हणजे 'अर्पण' चित्रपटातील 'लिखने वाले ने लिख डाले' या गीताचा राग मिश्र यमन कल्याण आणि मारुबिहाग आहे. सुरूवातीला 'लिखने वाले' दीदीने एकदम हाय पीच मध्ये गायलं आणि जेव्हा गीतातील सुरेश वाडकर यांचे कडवं आलं तेव्हा संगीत एकदम खाली उतरत आणल्या गेलं. यावरून आपल्याला दीदीची महानता आणि वेगळेपण दिसून येतं. त्याचप्रमाणे दुसरं गाणं म्हणजे 'बदलते रिश्ते' या चित्रपटातील 'मेरी सांसो को जो मेहेका रही है' हे गीत पुरीयाधनाश्री या रागातील आहे. हे गाणं सुरवातीला तारसप्तकात होतं आणि जेव्हा महेंद्र कपूर म्हणतात तेव्हा खालच्या सप्तकात गायल्या जातं. मला प्रत्येकच कलाकार वंदनीय आणि पूजनीय आहे. पण दीदी येथे सर्वश्रेष्ठ जाणवते.

संत ज्ञानेश्वर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही मंगेशकरांची श्रद्धास्थानं आहेत. या दोन महान लोकांनी जणू काही काव्य मंगेशकर भावंडांसाठी लिहीलीत. संत ज्ञानेश्वरांच्या विराण्या मुळातच गेय आहेत आणि मंगेशकर भावंडांनी त्यांना अजरामर करून ठेवले. दीदी देशभक्त होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवाजी महाराजांची गीतं गाऊन प्रत्येक गाण्याचे सोने दीदीने केले. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदीपर्यंत प्रत्येकाला दीदीचा भगिनीप्रमाणे स्नेह मिळाला. फक्त भारत देशातच नव्हे तर विदेशातही दीदी पूजनीय होती नव्हे राहणारच. अवघ्या जगावर आपल्या सुमधुर आवाजाने अधिराज्य गाजवणारी दीदी तपस्विनी होती. पितृछत्र हरपल्यानंतर परिवाराचे पालनपोषण करणारी दीदी, स्वतःसोबत आपल्या लहान भावंडांना ही पुढे नेण्यास प्रोत्साहन देणारी दीदी, आयुष्यभर कडक ब्रह्मचर्य व्रत पाळणारी दीदी, आपले संपूर्ण आयुष्य संगीत कलेला वाहून ऋषितुल्य जीवन जगणारी दीदी प्रत्यक्ष दैवी चमत्कारच होती. नोव्हेंबर २००६ मध्ये डॉ. रामकाका शेवाळकर यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या नागरिक सत्काराला लतादीदी नागपूरला आल्या होत्या. तेव्हा दीदींचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. त्याचं श्रेय माझे वडील दादासाहेब तारे आणि रामकाका शेवाळकर यांनाच आहे. तो दिवस आमच्या आयुष्यातील सुवर्ण दिवस आहे. दीदीने अपार कष्ट, संघर्ष करून संपूर्ण दुनियेला आपल्या गाण्यातून आनंद दिला. दीदी भरभरून जीवन जगलीस. आता परत 'लता मंगेशकर' होणे नाही. भूलोकीच्या आमच्यासारख्या सर्वांना दुःख सागरात लोटून आता स्वर्गातील लोकांना मात्र आनंद देणार आहेस. जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तो पर्यंत दीदीचं सुमधुर गाणं या विश्वात सर्वांना ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील. 'लतादीदी मंगेशकर' तुला आता दुसरा जन्म मिळू नये. तू आता परमेश्वराच्या चरणाशी बसून अमृताचे फळं चाखावीत आणि जगातल्या तुझ्या सर्व लेकरांना भरभरून आशीर्वाद द्यावेत. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुला विनम्र आदरांजली वाहते.
ॐ शांती

© डॉ. सौ. जयश्री विश्राम कुलकर्णी
संपर्क क्रमांक : ९२८४५८३७९७

Sunday, January 2, 2022

न्यू ईयर पार्टी

आज रविवार दि. २ जानेवारी २०२२ च्या 'जनमंगल' या साप्ताहिकामध्ये माझी 'न्यू ईयर पार्टी' ही लघुकथा प्रसिद्ध झाली.


३१ डिसेंबर २०१८, अचलपूर.

देशपांडे वाडा :

३१ डिसेंबरची रात्र म्हंटली की सगळीकडे फटाके, झगमगाट, पार्टी करणारे लोकं आणि रात्रीचे १२ वाजले की "Happy New Year !!" असं म्हणून आनंद मनवणारे लोकंही दिसतात. काही लोकं शांतपणेसुद्धा नवीन वर्षाचं स्वागत करतात. प्रत्येकाची वेगळी पद्धत ! कोणी पार्टी करून तर कोणी घरात बसून, कोणी एखादा अतरंगी निश्चय करून तर कोणी गेलेल्या वर्षाचा आढावा घेऊन येणाऱ्या नवीन वर्षात कळत-नकळत प्रवेश करतो. मीसुद्धा माझ्या काही मित्रांसोबत २०१८ ची साथ सोडून २०१९ चा हात धरायला मस्त तयारी करून निघालो.

"आई येतोss मी..."  मी सांगितलं.
"समरss जास्त उशीर करू नको. लवकरच घरी येशील." आई आतून म्हणाली.

मी गाडी काढली आणि निघालो. रस्त्यावर 'Good Bye 2018', 'Welcome 2019' असं लिहिलेलं होतं. काही घरं तर चक्क दिवाळीसारखे सजवलेली होती. फटाक्यांचे आवाज येत होते आणि त्या आवाजांच्या त्रासामुळे इकडे-तिकडे पळणारे कुत्रेही रस्त्याने दिसत होते. आजकाल माणसाचे सण-उत्सव साजरे होतात आणि त्याचा खूप जास्त त्रास मुक्या जनावरांना होतांना दिसतो. मोठ्या शहरांमध्ये याबाबतीत बरीच जागृती झालेली आहे. मात्र अचलपूरात असं काही सांगितल्यावर हसणारे लोकं जरा जास्त आहेत.

शास्त्री वाडा :

माझी गाडी शास्त्रींच्या वाड्यासमोर थांबली. मी आत गेलो तर श्रीकांत काका त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसून शेकोटीवर हात शेकत होते. त्यांची मुलगी तन्वी ही माझी अतिशय जवळची मैत्रीण आणि तिलाच घ्यायला मी शास्त्री वाड्यात आलो होतो.

"काका, तन्वी कुठे आहे ?" मी काकांजवळ बसत विचारलं.
"असेल आतमध्ये." काका म्हणाले. त्यांच्या बोलण्यावरून घरात काही तरी गडबड आहे असं मला वाटलं. मी बूट काढून आत गेलो. तन्वी आतल्या खोलीत चेहरा पाडून बसली होती.

"अरेss चलत नाही का पार्टीला ?" मी विचारलं.
"काय करू येऊन ? नवीन वर्षाच्या आधीच मी बाबांचा लेक्चर ऐकला. आता मूड नाही आहे." तन्वी म्हणाली.

काय घडलं असेल ते मला समजलं. शास्त्री काका म्हणजे अतिशय काटेकोरपणे भारतीय संस्कृतीला जपणारा माणूस. "आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून असतं. हे काय लावलं तुम्ही नवीन पोरांनी ? सगळी संस्कृती भ्रष्ट करता तुम्ही !" अशाप्रकारे काका तन्वीला बोलले असतील. शेवटी थोडं समजवून सांगितल्यावर तन्वी पार्टीत यायला तयार झाली आणि आम्ही निघालो. श्रीकांत काका थोडे डोळे वाटारूनच माझ्याकडे बघत होते.

आता आम्ही तिसऱ्या वाड्याकडे जायला निघालो. सागर कुलकर्णी या आमच्या मित्राचा तो वाडा. अचलपूर हे वाड्यांचं गाव. इथल्या वाडासंस्कृतीचे आणि प्रत्येक वाड्यातील वातावरणाचे तरुण साक्षीदार म्हणजे आम्ही तिघं मित्र.

कुलकर्णी वाडा :

आमची गाडी आता सागरच्या वाड्यासमोर थांबली. मी आणि तन्वी आत गेलो. या वाड्यातलं वातावरण एकदमच वेगळं होतं. सागर आणि त्याचे आई-बाबा तिघंही मस्त तयार होऊन हॉलमध्ये फोटो काढत होते.

"अरे या मुलांनो ! आपण सर्वजण फोटो काढू." आम्हाला बघून कुलकर्णी काका म्हणाले.
"हो-हो चला फोटो काढू आणि लगेच निघू." सागरनेही आम्हाला फोटो काढायला बोलवलं.

कुलकर्णी परिवार म्हणजे सगळेच सण-उत्सव मनवणारा परिवार. नेहमीच त्यांचा वाडा सजलेला असतो. एकदा तर आम्ही कुलकर्णी काकांच्या मित्राकडे शीर खुरमा खायला गेलो होतो. कोणताही प्रसंग असो सागरच्या वाड्यात काही तरी सेलिब्रेशन असतच.

आम्ही तीन-चार फोटो काढले आणि तिथून पार्टीच्या जागेवर जायला निघालो. "सांभाळून जा आणि मस्त एन्जॉय करा !!" कुलकर्णी काकू म्हणाल्या. काका आणि काकू दोघंही आम्ही निघत असतांना हसतमुखाने समोर उभे होते.

न्यू ईयर पार्टी :

आम्ही पार्टीच्या ठिकाणी पोहोचलो. काही मित्र भेटले आणि गप्पा, नाचणं, मस्ती करणं, फोटो काढणं असं सगळं सुरू झालं. सगळेजण वेगवेगळ्या कपड्यांमध्ये चमकत होते. प्रत्येकजण आपापल्या ग्रुपसोबत एन्जॉय करत होता. काही लोकं सोडले तर बाकी आमच्या ओळखीचेही नव्हते. पण तरी सर्व ऐकामेकांना स्मित हास्याने रिस्पॉन्स देत होते. पार्टीतला प्रत्येकजण आपल्या चिंता, कामं, जबाबदाऱ्या, बंधनं सोडून नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्सव साजरा करण्यासाठी तिथे आला होता, हे आम्हाला जाणवत होतं. १२ वाजले आणि सर्वांनी मोठ्या आवाजात "Happy New Year !!" म्हंटलं नव्हे आम्ही सर्व ओरडलोच !! आता सगळेच ऐकामेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होते.

घरी जाण्याची वेळ आली. सगळेजण निघायला लागले."अजून थोडं थांबू न यार, चांगलं वाटत आहे इथे" तन्वी म्हणाली. सागर त्यावर हसला आणि आम्ही पुन्हा तिथेच बसलो. तन्वी डोळे मिटून शांत बसली होती. तिची तिथून जाण्याची इच्छा नव्हती कारण घरी गेल्यावर पुन्हा शास्त्री काकांचं लेक्चर ऐकावं लागणार होतं. खरं तर तन्वीचा प्रश्न घरी जाण्याचा नसून पुन्हा त्या वातावरणात जाण्याचा होता. पार्टीमध्ये असलेली तन्वी आणि शास्त्री वाड्यातील तन्वी, दोघींमध्ये मला खूप फरक जाणवत होता.

"प्रेमासोबत थोडं स्वातंत्र्यही असलं तर प्रत्येक घरात पार्टीसारखं वातावरण निर्माण होवू शकतं. संस्कृती जपतांना प्रत्येकाला स्वतःचे विचारही जपता आले तर किती बरं होईल न !"

कदाचित तन्वीसुद्धा डोळे मिटून हाच विचार करत असेल...


© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८