Followers

Sunday, April 3, 2022

हिमगाथा : भाग २

१४ तारखेला संध्याकाळी आम्ही दिल्लीवरून झिंगबसने मनालीसाठी निघालो. दिल्ली ते मनाली प्रवास सुरु झाला. रात्री चमकणारी दिल्ली अधिकच सुंदर दिसत होती, मात्र रस्त्यावरील गाड्यांची गर्दी काही कमी झाली नव्हती. रस्त्यावर गाड्यांची गर्दी असूनसुद्धा आमचा झिंगबसचा ड्रायवर बिंधास्तपणे वेगात बस चालवत होता. आम्ही फक्त मागे जाणाऱ्या गाड्यांना बघत होतो. आधी आम्हाला वाटलं होतं की बस आमच्या ११ लोकांसाठीच असेल पण आराध्यने सांगितल्यावर कळलं की मनालीला जाणाऱ्या ६० प्रवास्यांपैकी आम्ही ११ प्रवासी होतो. प्रवास सुरु झाला आणि आम्ही 'डम्बशराड्स' खेळायला सुरवात केली. पण थोड्याच वेळात बसमधील ड्रायवरसोबत असलेल्या इसमाने आमचा खेळ बंद करायला सांगितलं. कारण ६० लोकांपैकी आमच्या ११ जणांचा आवाज जरा जास्तच येत होता. दिल्लीवरून बसमधे दक्षिण भारतीय तामिळ भाषिक ५-६ लोकांचा एक ग्रुप बसला होता. त्यातील एक माणूस रामानंद सागर यांच्या रामायणातील रावणाप्रमाणे हसत होता. आधी आम्हाला त्याचं हसणं एंटरटेनिंग वाटलं, मात्र नंतर आम्ही त्याच्या हसण्यामुळे फार इरिटेट झालो. त्यातही मी आणि ऋषीदादा जास्त इरिटेट झालो कारण तो राक्षस आमच्या मागेच बसून हसत होता. त्याच्या हसण्यामुळे इरिटेट होवून शेवटी मी त्याचं 'रावण' असं नामकरण केलं. एक-दीड तास ते राक्षसी हास्य स्वतःच्या कानावर घेतल्यावर जेव्हा बस धाब्यावर थांबली तेव्हा आम्ही ड्रायवरकडे त्याची शिवीयुक्त अशी तक्रार केली. धाब्यावर दालमखनी आणि बटरनानचं मस्त जेवण केल्यावर जेव्हा आम्ही बसमधे बसलो तेव्हा त्या राक्षसाचं हसणं बंद झालं होतं. मनालीला पोहोचेपर्यंत तो पुन्हा हसला नाही आणि हसलाही असेल तर मनात किंवा स्वतःपुरताच हसला असेल.

जेवण झाल्यावर जवळपास सर्वच प्रवासी झोपले. माझी ऊंची आणि रुंदी दोन्ही जास्त असल्यामुळे मिळालेल्या जागेवर झोप लागणे अशक्य होते, त्यामुळे मी जागाच होतो. बस निघाली तेव्हा आम्हाला (प्रत्येकी एक) छोट्या पाण्याच्या बाटल्या मिळाल्या होत्या. जेवण झाल्यावरच माझ्याजवळचं पाणी संपलं होतं. बॅगमधली बाटलीसुद्धा रिकामी झाली होती. "आता पाणी कुठून आणावे ?" असा विचार मी करत होतो आणि तेव्हाच मागच्या लोकांच्या न उघडलेल्या पाण्याच्या बाटल्या गलंडत-गलंडत समोर आल्या. सर्वांचे डोळे बंद असल्याची खात्री पटल्यावर मी आमच्या दोन रिकाम्या बाटल्या खाली ठेवल्या आणि भरलेल्या दोन बाटल्या उचलून पाणी प्यायलो. ड्रायवरचं वेगात गाडी चालवणंसुद्धा माझ्या फायद्याचं ठरलं. पहाटे पाचच्या सुमारास गाडी एका ठिकाणी चहासाठी थांबली. बाहेर उतरल्यावर "हिमाचलमधे आपण आलो" अशी जाणीव झाली. सकाळची गुलाबी थंडी आणि सर्वत्र पसरलेलं धुकं जणू आमचं स्वागत करत होतं. तिथे चहा घेतला थोडे फोटो काढले आणि पुन्हा बसमधे बसलो. खरा हिमाचलचा प्रवास आता सुरु झाला होता. मोठ्या डोंगरातील छोट्या रस्त्यावरून बस जात होती तेव्हा निसर्गाला छायाचित्रांमधे कैद करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे मोबाईल बाहेर काढले. मनालीला जातांना आमच्यासोबत चालणारी प्राचीन व्यास (बियास) नदी बघितली. अशाप्रकारे निसर्गाचा आस्वाद घेत आणि स्वतःचा उत्साह वाढवित आम्ही मनालीला पोहोचलो. बसमधून उतरलो तर समोरच दुसरा ड्रायवर उभा होता. एक १३ सिटर छोटी बस आम्हाला हिमाचल प्रदेश फिरवणार होती. सर्व सामान त्यात टाकून आम्ही हॉटेलकडे निघालो.

हॉटेल आणि आसपासचं सौंदर्य बघितल्यावर "पैसा वसूल" असे शब्द जीभेवर आले. हॉटेलचं नाव 'ग्रेस इन' असं होतं. चारही बाजूने बर्फाचे पर्वत आणि मध्यभागी ४-५ हॉटेल्सचा समूह. त्यापैकी एक म्हणजे आमचं 'ग्रेस इन'. पूर्ण हॉटेल, त्यातील आम्हाला मिळालेल्या खोल्या, गॅलरीतून दिसणारा बर्फ अशा सर्वांचे फोटो आणि वीडियो मी घेतले. ८० टक्के लाकडी बांधकाम असलेल्या या हॉटेलमधे आम्ही दोन दिवस राहणार होतो. फ्रेश झाल्यावर पोटभर नाश्ता करून आम्ही मनाली फिरण्यासाठी निघालो. सर्वात पहिला स्पॉट म्हणजे हिडिंबा मंदीर होता. सरळ व ऊंच झाडांनी वेढलेलं आणि दगडी व लाकडी बांधकाम असलेलं हे प्राचीन मंदीर. महाभारत काळापासून हिडिंबा मंदीराची कथा सांगितली जाते. ऊंच झाडांसोबत अथर्व आणि सर्वेशने सर्वांचे खूप फोटो काढल्यावर आम्ही पुढे निघालो. बाहेर येतांना तिथले पांढरेशुभ्र ससे जवळ घेऊन पुन्हा फोटो काढले. त्यानंतर तिथले अजून एक-दोन छोटे खेळ खेळल्यावर आमची गाडी वशिष्ठ मंदीराकडे निघाली. अतिशय सुंदर आणि सुबक लाकडी नक्षीदार कलाकृतीने सजलेलं वशिष्ठ मंदीर होतं. मनालीतील मंदीरांचं वैशिष्ट्य म्हणजे लाकडी आणि दगडी बांधकाम, भरमसाठ कोरिवकाम पण मंदीराच्या गाभाऱ्यात फक्त एक किंवा दोन प्राचीन दगडी अवशेष बाकी मंदीर पूर्ण रिकामे. दोन्ही प्राचीन मंदीरं बघता-बघता दुपार झाली. मग आम्ही मॉल रोडला गेलो. तिथे पोहोचेपर्यंत सर्वांना भूक लागली होती त्यामुळे 'आशियाना' नावाच्या हॉटेलमधे गेलो. हे नाव सर्वांना लक्षात राहिल कारण जितकं चांगलं हॉटेल तितकच बेचव आणि भयंकर महाग तिथलं जेवण होतं. स्वतःच्या जीभेवर अशा भयंकर जेवणाचा अत्याचार करून आम्ही जेव्हा तिथून बाहेर निघालो तेव्हा मी त्या हॉटेलचा एक फोटो घेतला. अथर्वने त्या दुपारच्या जेवणाला 'शिटी लंच' असं नाव दिलं. त्यानंतर तिथलेच एक-दोन ठिकाणं पाहून आम्ही खरेदी करायला गेलो. मॉल रोड म्हणजे पुण्यातील तुळशी बाग किंवा नागपूरच्या बर्डीसारखा एरिया. दुकानांची रांग आणि प्रत्येक दुकानात भयंकर गर्दी. मी तिथल्या एका दुकानातून तीन 'हिमाचली टोप्या' घेतल्या. मॉल रोड मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे तिथला प्रत्येक दुकानदार (स्त्री अथवा पुरुष) तो स्वतः विकत असलेली वस्तू कशी निर्माण होते हे ग्राहकाला सांगतो. सर्वांची खरेदी झाली आणि आम्ही पुन्हा हॉटेलला परतलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला बर्फात खेळायला जायचं होतं. त्यामुळे रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न केला पण हॉटेलजवळचे बर्फाचे पर्वत रात्री अधिकच सुंदर दिसत होते. अंगावर येणारा थंडगार वारा मनाला एक वेगळाच आनंद देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून तयारी केली आणि बर्फाकडे निघालो. जस-जसे आम्ही हॉटेलपासून दूर जात होतो तस-तसा आम्हाला रस्त्यावर दिसणारा बर्फ वाढत जात होता. रस्त्यात एका ठिकाणी थांबून आम्ही बर्फात जाण्याआधी आवश्यक ते कपडे, हातमोजे आणि बूट घेतले. ते सर्व अंगावर चढवल्यावर प्रत्येकाचं वजन किमान एक किलो वाढल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर सोलांग व्हॅली क्रॉस करून आम्ही 'अटल टनल' बघितला. नऊ किलोमीटर पेक्षा जास्त लांब असलेला आणि बर्फाच्या पहाडात खोदलेला अतिशय भव्य बोगदा म्हणजे अटल टनल होय. पूर्ण अटल टनलचा जाता-येतांना वीडियो घेतला. अटल टनलनंतर येणारी लाहोल व्हॅलीमधे आम्ही बर्फावर खेळणार होतो. लाहोल व्हॅलीमधे एका ठिकाणी ड्रायवरने आम्हाला सोडलं. तिथून पुढे बर्फात एक-दीड किलोमीटर चालत जायचं होतं. जिथे आम्ही उतरलो त्या ठिकाणी नजर जाईल तिथपर्यंत फक्त पांढराशुभ्र बर्फ दिसत होता. चालतांना काही जागी पाय एकदम खाली जायचा तर काही जागी पाय घसरायचा. चारही बाजूंनी फक्त बर्फ आणि त्यामधून जाणारी चिनाब नदी जणू आम्हाला स्वतःजवळ बोलवित होते. तिथे गेल्या-गेल्या सगळ्या बॅग्स बाजूला ठेवून आम्ही एकामेकाला मनसोक्त बर्फ फेकून मारला. त्यानंतर मी थोड्यावेळ बर्फावर शांत पडून होतो. वर होतं अथांग पसरलेलं आकाश व खाली होता अथांग पसरलेला बर्फ आणि या दोघांमधे मुसाफिराप्रमाणे फिरणारे आम्ही सर्व. तिथे आम्हाला एक फोटोग्राफर भेटला. तो तिथे आलेल्या लोकांचे फोटो काढून तिथेच सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपीने देत होता. फोटोची किंमत कळल्यावर एक किंवा दोन फोटो काढण्याचं आम्ही ठरवलं. मग फोटोग्राफर पोज सांगायला लागला आणि आम्ही तो म्हणेल ती पोज द्यायला लागलो. एक वेळ अशीसुद्धा आली होती की जेव्हा आम्ही ते जाडे आणि गरम कपडे काढून आम्ही नेलेल्या पँट व टी शर्ट घालून फोटो काढले. चिनाब नदीचं पाणी भयंकर थंड होतं. १०-१५ सेकंदापेक्षा जास्त वेळ त्या पाण्यात हात ठेवणं अशक्य होतं. बर्फ इतका पांढराशुभ्र होता की गॉगल न घालता बघणं होत नव्हतं. सर्वांचे फोटो काढणं झाल्यावर जेव्हा आम्ही फोटो बघितले तर कोणाचे २० तर कोणाचे १५ असे फोटोज होते. अतिशय सुंदर फोटो असल्यामुळे सर्वच फोटोज घेण्यासाठी आम्ही तयार झालो. माझे स्वतःचे त्यात २४ फोटोज होते. त्यानंतर पुन्हा मी, ऋषीदादा, सर्वेश, प्रथमेश, अथर्व आणि आराध्य चिनाब नदीजवळ जावून शांत बसलो. तिथले काही चोपडे दगड घेतले. संध्याकाळी नदीजवळ येणारा पक्ष्यांचा आवाज ऐकून खूप शांत व प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर टायरवर बसून बर्फावरून घसरत येणे अशा काही बालिश एक्टिविटी करून आम्ही हॉटेलला परत जाण्यास निघालो.

आमच्यापैकी काहीजण पुन्हा मॉल रोडला खरेदी करण्यासाठी गेले. परंतु चिनाब नदीजवळ येणारा पक्ष्यांचा आवाजाचा सुंदर अनुभव मला मॉल रोडच्या गर्दीत जावून खराब करायचा नव्हता. त्यामुळे मीसुद्धा ऋषीदादा, प्रथमेश, मयुरेशदा आणि चिन्मयसोबत हॉटेलला आलो आणि दिवसभरातल्या महत्वपूर्ण मुद्द्यांची डायरित नोंद केली. दिवसभर फिरल्याने आलेला थकवा दूर करण्यासाठी त्यारात्री हॉटेलवाल्यांनी आमच्यासाठी मस्त शेकोटी आणि गाण्याची व्यवस्था केली होती. ती मनालीतील आमची शेवटची रात्र होती. येणारी सकाळ म्हणजे मनाली सोडण्याची सकाळी होणार होती. त्यामुळे त्या रात्री आम्ही पुन्हा मनालीतील वातावरणाचा आनंद घेतला. मनालीच्या बर्फाचा आनंद घेतल्यावर आणि भरपूर फोटो काढून घेतल्यावर एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू शकतो की पैसा म्हणजे आनंद नाही ही गोष्ट सत्य आहेच, पण पैस्यामुळे आनंदप्राप्तीच्या मार्गांपर्यंत आपण पोहोचू शकतो. शेवटी प्रत्येक माणसाची आनंदाची व्याख्या आणि आनंदप्राप्तीची पद्धत वेगळी असते. बर्फात खेळतांना आणि फिरतांना आनंद तर खूप मिळाला, पण त्याचा असा एक विचित्र परिणाम होईल हे आम्हाला माहित नव्हतं.

बाकी गोष्टी पुढील भागात...

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

4 comments:

  1. Day 2 Done. प्रत्येक भागासोबत उत्सुकता वाढतेय आणि परत ते क्षण अनुभवता येतायेत. Great as always, Gandhar!

    ReplyDelete
  2. अतिशय सुरेख वर्णन 🤩

    ReplyDelete
  3. मस्त वर्णन छान असेच लिहीत जा

    ReplyDelete