खीरगंगा ट्रेक
तोशच्या कॅंपवरून आम्ही सकाळी खीरगंगा ट्रेकसाठी निघालो. कॅंपसाईट सोडल्यावर आमचा पहिला स्टॉप बारशायनी गावाजवळ होता. त्या ठिकाणी आम्हाला ट्रेकिंगसाठी आवश्यक असलेले बूट आणि काड्या घ्यायच्या होत्या. बूट आणि काड्या घेतल्यावर तिथे डिपॉझिट म्हणून आमच्यापैकी चारजणांचे बूट दुकानात ठेवून घेतले. आता सगळ्यांच्या जवळ एक-एक लाकडी काडी आणि पाठीवर बॅग होती. वेगवेगळ्या टुरिस्ट स्पॉटवर बिझनेस कसा होऊ शकतो हे आम्ही बघत होतो. साधी लाकडी काडी जी कोणत्यातरी झाडाची तोडलेली असेल त्याचे आम्हाला भाडे द्यावे लागत होते. आता खीरगंगाच्या ट्रेकला सुरुवात झाली. गगन नावाचा मुलगा आमचा गाईड होता. एकोणीस वर्षाचा हा मुलगा साठ-सत्तर लोकांच्या ग्रुपला घेऊन खीरगंगाचा ट्रॅक करणार होता. कसोलच्या कॅंपवर भेटलेले एक-दोन मुलांचे ग्रुप आम्हाला ट्रेकला जाताना पुन्हा भेटले. साठ-सत्तर लोकांमध्ये आमच्या अकराजणांची ओळख व्हावी म्हणून आम्ही होळीचे रंग चेहऱ्यावर लावण्याचा ठरवलं. त्याप्रमाणे सर्वेश आणि आराध्यने सर्वांना रंगाचा एक-एक टिक्का आणि गालावर दोन दोन बोट लावले. आम्ही सर्वांनी आर्मी कलरच्या टी-शर्ट घालण्याचा ठरवलं होतं. त्यामुळे आमच्यापैकी कोणी मागे राहिला तर दुरूनच ओळखणं शक्य होत होते. तसेच अथर्वने सगळ्यांना आवाज देण्यासाठी 'मनी हिस्ट' या प्रसिद्ध वेबसीरिजमधल्या पात्रांचे नावं दिले होते. आमच्यापैकी अथर्व, प्रथमेश आणि ऋषीदादा यांना चालण्याची खूप सवय होती. अथर्व आणि प्रथमेश तर पट्टीचे ट्रेकर्स होते आणि ऋषीदादाला मेळघाटात २०-२० किलोमीटर रोज चालण्याची सवय होती. या तिघांच्या तुलनेत आम्ही ट्रेकिंगसाठी फारच नवीन होतो. त्यामुळे त्या तिघांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आम्ही पुढे-पुढे जात होतो. चालत असताना वाटेत दिसणाऱ्या हिमाचली केसाळ कुत्र्यांना अथर्व गोंजारत होता.
जस-जसे आम्ही वर चालत होतो तस-तसे रस्त्याचे रूपांतर पायवाटेत होत होतं. ट्रेक पूर्ण करता येईल की नाही ? वरचं तापमान कसं असेल ? तापमान आपल्याला सहन होईल की नाही ? टेंटमधे राहता येईल की नाही ? असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन आम्ही एक-एक पाऊल पुढे टाकत होतो. सुरुवातीला तर ऋषीदादा आणि अथर्व यांच्यात पुढे जाण्याची स्पर्धा सुरू होती. कधी-कधी तर ते गाईडच्यासुद्धा समोर जात होते. समोरचा रस्ता गाईडला विचारून ते पुढे जाऊन आमच्यासाठी थांबत होते. हळूहळू आमच्यातील उत्साहाचं प्रमाण कमी होऊन थकव्याचं प्रमाण वाढत होतं. आम्ही मनालीत होतो तेव्हाच अथर्वने आम्हाला ट्रॅकमध्ये येणाऱ्या समस्यांची पूर्वकल्पना दिली होती. आपल्याला किती थकवा येऊ शकतो ? चालतांना कोणत्या समस्या येऊ शकतात ? हे सर्व त्याने आधीच सांगितलं होतं. त्यामुळे चालताना अथर्वचा प्रत्येक शब्द आम्हाला आठवत होता. धूळ आणि ऊन यामुळे पाऊल टाकणे कठीण होत होते. या सर्व गोष्टीची कल्पना अथर्वने आम्हाला दिली होती. त्याने सांगितलेली एक गोष्ट मला जास्त लक्षात राहिली ती म्हणजे "पहिला एक तास तुम्हाला वाटेल की आपण कशालाच या ट्रेकला आलो, तेव्हाच आपल्याला आपली पूर्ण शक्ती लावायची आहे. त्यानंतर आपल्या शरीराला सवय होऊन जाईल आणि नंतर चालणं कठीण वाटणार नाही." आम्ही एक-एक पाऊल समोर टाकत होतो पाठीवर बॅग असल्यामुळे टी-शर्ट मागून पूर्ण भिजली होती. आमच्या पावलांचा आवाजा सोबत पार्वती नदीच्या पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. पहाडातल्या आणि जंगलातल्या नद्या रात्री फार भयावह वाटतात मात्र सूर्यकिरणांचा त्यांना स्पर्श होताच अतिशय सुंदर दिसतात. कसोलच्या कॅंपवर भयावह वाटणारी नदी आता अतिशय सुंदर दिसत होती. स्वच्छ पांढरं शुभ्र पाणी खरोखरच खीरीसारखं दिसत होतं. दगडांना चिरुन निघालेले छोटे-छोटे झरे जागोजागी दिसत होते. नदी पार करण्यासाठी असलेला एक लाकडी अरुंद पूल बघितल्यावर अंगावर रोमांच उभे झाले. चालत असताना आम्हाला छोटे-छोटे महादेवाचे मंदिर दिसत होते. खरंच हिमाचल म्हणजे देवभूमी ! इथल्या लोकांची भगवान शंकरावर नितांत श्रद्धा आहे.
या ट्रेकमधला आमचा पहिला महत्वाचा स्टॉप म्हणजे रुद्रनाग होता. सत्तरजणांचा ग्रुप म्हटलं की काही लोकं समोर, काही लोकं मागे अशी आमची स्थिती होती. त्यामुळे आम्ही रुद्रनागला पोचल्यावर इतर लोकं येईपर्यंत त्या ठिकाणी थांबलो. सत्तरजणांचा ग्रुप होता त्यामुळे ठराविक अंतरावर एका ठिकाणी सर्वांना एकत्रित येणे गरजेचे होते. मागे राहिलेले लोकं येईपर्यंत आम्ही तिथे काही फोटो काढले आणि त्यानंतर पुन्हा सत्तरजणांचा ग्रुप पुढे चालायला लागला. दुपारी साडेचारच्या सुमारास आम्ही नाकथानला पोहोचलो त्या ठिकाणी लिंबूपाणी, चहा बिस्किट घेतल्यावर पुन्हा पुढे चालायला लागलो. पुन्हा थंडी जाणवायला लागली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी बॅगमधले स्वेटर काढले नाकथान वरून ट्रेकचा अंतिम स्पॉट सहा किलोमीटर अंतरावर होता आणि त्या सहा किलोमीटर पैकी शेवटचे दोन ते अडीच किलोमीटर अगदी उभी चढाई होती. परंतु आता पायांना सतत चालण्याची सवय झाली होती त्यामुळे थकवा येत नव्हता. जेवढे आम्ही वर चढत होतो तेवढेच आजूबाजूचे दृश्य अधिक सुंदर दिसत होते. ते निसर्ग सौंदर्य पाहून आम्हाला वर चढण्यासाठी ऊर्जा मिळत होती. हवेत एक बोचरा गारवा आला होता. त्या थंड हवेमुळे मला विदर्भातल्या बोचऱ्या थंडीची आठवण आली. अंधार पडत होता आणि त्यासोबतच वाढत असलेली थंडी यामुळे आमचा चालणं अधिक कठीण होऊ लागलं होतं. सगळेच एकमेकांचा उत्साह वाढवत होते "one step at a time" असं म्हणून सगळेजण समोर जात होते. त्यामुळे मागे असलेल्यांचा पण उत्साह वाढत होता. पुढे आम्ही अजून एका ठिकाणी थांबलो. तिथे एक छोटा ब्रेक घेतला आणि आम्हाला प्रेरक ठरणारी एक गावातली बाई भेटली. अथर्व तिच्याशी बोलत होता. तिच्याशी बोलल्यावर आम्हाला कळलं की कॅंप साइटवर तिचं एक छोटं कॅन्टीन आहे आणि रोज कॅन्टीनचं सामान वर नेण्यासाठी ती बाई रोज हा पहाड आपल्या पायांनी तुडवते. आमच्यासाठी जो ट्रेक होता ते म्हणजे या बाईचं दैनंदिन काम होतं. जे आम्ही एक दिवस करणार होतो ते काम ही बाई रोज करत होती. स्वतःच्या मोठ्या मुलाला शाळेत पाठवून लहान मुलाला सोबत घेऊन पहाड चढणारी ही बाई आमच्या पूर्ण ग्रुपसाठी प्रेरक ठरली. तिच्याशी बोलल्यावर आम्ही आमच्या ट्रेकमधल्या सर्वात कठीण टप्पा चढण्यासाठी सज्ज झालो आणि पुढे निघालो. शेवटच्या दोन किलोमीटरची चढाई पार करण्यासाठी आमची पूर्ण शक्ती पणाला लागणार होती आणि आम्ही ती लावली. एकदाचा शेवटचा दगड चढलो आणि खीरगंगाच्या शिखरावर पाय ठेवला. शिखरावर आल्यावर प्रत्येकाला आपल्या हृदयाचे ठोके अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते. आम्ही एका ठिकाणी बसलो आणि समोरचा निसर्ग पाहू लागलो.
सूर्य मावळत असल्यामुळे भगवं, पिवळं, निळं झालेलं आभाळ खीरगंगा शिखरावर आमचे स्वागत करत होतं. तो धुलीवंदनचा दिवस होता आणि आम्ही रंग खेळण्याआधी निसर्गच रंग खेळला आहे असं त्या आभाळाकडे पाहून वाटत होतं. कितीतरी वेळ आम्ही फक्त त्या आभाळाकडे बघत होतो अनेक रंगाने सजलेलं आभाळ, त्यात बर्फानी माखलेले पर्वत, सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि त्यात असलेले आमचे टेंट इतकं सुंदर दृश्य पाहून आमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात नकळत अश्रू तरुन गेले. सकाळपासूनचा थकवा एका क्षणात नष्ट झाला. त्यानंतर आम्ही टेंटमध्ये जाऊन बसलो. एक-दिड तास मनसोक्त गप्पा केल्यावर खीरगंगाचं वैशिष्ट्य असलेला गरम पाण्याचा झरा पाहायला गेलो. साठ ते सत्तर पायऱ्या चढून गेल्यावर जाऊन बघतो तर तिथे खूप गर्दी झाली होती. त्यामुळे आम्ही फक्त गरम पाण्यात पाय टाकून बसलो. गरम पाण्याने पाय शेकले जात होते, त्यामुळे तिथून उठण्याची इच्छा होत नव्हती. बाहेरच्या बोचऱ्या थंडीमध्ये नैसर्गिक गरम पाण्याचा शरीराला होणारा स्पर्श अधिक हवाहवासा वाटत होता. काही वेळानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो आणि पुन्हा कॅम्प साईट वर आलो. "शेकोटीची तयारी सुरू आहे" असं तिथल्या व्यवस्थापकाने सांगितल्यावर आम्ही पटापट चांगल्या जागा बळकावल्या. तिथे डीजे सुद्धा सुरू होता. पण त्यावर आम्हाला हवे तसे गाणे वाजत नव्हते. थोड्यावेळ ते गाणे सहन केल्यानंतर ऋषीदादाने सूत्र स्वतःच्या हातात घेतले आणि पुष्पा सिनेमातल्या गाण्यांवर आम्ही सगळे नाचायला लागलो. ऋषीदादाचा नाच पाहून सगळे अवाक झाले आणि आमच्यासोबत येऊन नाचायला लागले. पुष्पा सिनेमातील 'सामी सामी' गाण्याने तर वेगळाच समा बांधला ! आम्ही जेवायला बसलो तेव्हा ऋषीदादाच्या नाचण्याने प्रभावित झालेले बरेच लोकं आमच्याशी येऊन बोलत होते. आराध्यला तर राजस्थानी, पंजाबी, केरळी असे दोन-तीन मित्रही भेटले. ती पौर्णिमेची रात्र होती, बसल्या बसल्या कविता लिहावी असा तो चंद्र अतिशय सुंदर व आकर्षक दिसत होता. अशा धमाकेदार पद्धतीने पूर्ण दिवस घालवल्यावर आम्ही आपापल्या टेंटमध्ये झोपायला गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच उठून खीरगंगाच्या गरम पाण्याकडे गेलो. तिथे जाऊन मनसोक्त अंघोळ केली. त्यावेळी तिथली पौराणिक कथाही आम्हाला समजली. गणपती, कार्तिकेय, महादेव आणि पार्वती यांची ती पौराणिक कथा आहे. त्या कथेमुळेच ही जागा इतकी प्रसिद्ध आहे. गरम पाण्यात चांगलं वाटत होतं, परंतु बाहेर ऑक्सिजन अतिशय कमी असल्यामुळे चालताना आणि बोलताना सुद्धा खूप दम लागत होता. सकाळची तिथली शांतता आणि प्रसन्नता दैवी स्वरूपाची होती. खाली उतरल्यावर आमचा परतीचा प्रवास सुरु होणार होता. त्यामुळे सकाळी सर्व तयारी करून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. उतरतांनाच्या सूचना अथर्वने सगळ्यांना आधीच दिल्या होत्या. त्यामुळे न थांबता सर्वजण खाली उतरत होते. खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा आमचा गाईड गगन एका विशिष्ट अंतरापर्यंत आमच्यासोबत होता. त्यानंतर आम्ही स्वतःहूनच उतरायला लागलो. गेल्या चोवीस तासापासून आम्ही कोणीच घरच्यांशी बोललो नव्हतो. त्यामुळे खाली उतरत असताना जिथे नेटवर्क मिळेल तिथून आधी घरच्यांना फोन करायचा असा आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे नेटवर्क मिळाल्यावर सर्वांनीच आपापल्या घरी कळवलं. खाली उतरतांना आमच्या सर्वांच्याच चेहर्यावर कधी न मिळणारा आनंद आणि समाधान होतं. "आपण अद्वितीय आणि अविस्मरणीय अनुभव सोबत घेऊन चाललो आहोत" अशी भावना सर्वांचीच होती. मात्र सर्वांपैकी आमच्या तीन बहिणींचा आनंद जास्त असेल कारण साठ-सत्तरजणांच्या पूर्ण ग्रुपमध्ये फक्त पंधरा-सोळा मुली होत्या आणि त्यातही इंद्रायणी, राधा व अदितीताई इतर मुलींपेक्षा जास्त सक्रिय होत्या. राधा तर प्रथमेश आणि ऋषीदादाच्या बरोबरीने चढत होती. येताना आम्ही साडेतीन तासातच खाली उतरलो आमच्या गाडीचा ड्रायव्हर ज्ञान गाडी घेऊन आम्हाला आधी सोडलं त्याच ठिकाणी उभा होता. आम्ही सर्वजण गाडीत बसलो आणि 'हर हर महादेव'चा गजर करून परतीचा प्रवास सुरू केला. ज्ञान आम्हाला कुल्लूच्या स्टॉप पर्यंत सोडणार होता.
बाकी गोष्टी पुढील भागात...
© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८
बढीया
ReplyDeleteप्रवासवर्णन खूपच रसाळ व छान केले आहे. प्रत्यक्ष अनुभव! किती अविस्मरणिय असेल!
ReplyDelete