Followers

Saturday, April 9, 2022

श्रीरामांकडून काय शिकावं ?


'श्रीराम' हे नाव ओठांवर आलं की सध्या संपूर्ण भारतात राम जन्मोत्सव साजरा होत असल्याचं पावन चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. इतक्या वर्षांपासून विचार, इच्छा, आंदोलनं यामध्ये बंदिस्त असलेलं राम मंदीराचं स्वप्न आता अयोध्येच्या भूमीवर साकार होतांना आपण बघतो आहोत. भारतभर विविध उपक्रमातून राम भक्तीचा जन्म होतो आणि त्यामुळे दाही दिशांना पसरणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची जाणीव आपल्याला होते. समृद्धतेचं वातावरण निर्माण होतं. परंतु फुलबागेसारख्या सजलेल्या भारतात काही काटेरी झाडांचं वाढत जाणारं अस्तित्व मनात सारखं रुतत राहतं. समाजात वाढत असलेला जातीवाद, अतिशय खालच्या पातळीला गेलेलं राजकरण, जातीवाद व धर्मवाद यामुळे निर्माण होणारा द्वेष, स्वार्थ व अहंकाराखाली दबून नष्ट होत असलेली तत्वनिष्ठा, स्त्रिया, बालक, वृद्धांवरील अत्याचार असं सर्व रोज वर्तमानपत्रातून वाचल्यावर वाल्मिकी रामायणात वाचलेलं रामराज्य पुन्हा निर्माण होईल का ? असा प्रश्न उत्पन्न होतो. खरं तर या सर्व समस्यांचं मूळ मानवात वाढत असलेला द्वेष व अहंकार आहे. असं मला वाटतं. रामराज्य पाहिजे असेल तर सर्वप्रथम रामायणात सांगितलेला रामाचा एक गुण आपल्याला अंगीकारावा लागेल तो म्हणजे 'समरसता'. समरसता म्हणजे दैनंदिन जीवन जगतांना समाजात कोणताही भेद न बाळगता अंगीकारलेला समता भाव. फक्त मानवच नाही तर संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक जीवासाठी रामाकडे प्रेम व समतेची भावना आहे. त्यामुळे रामाने सांगितलेला समरसतेचा अर्थ अधिक व्यापक आहे. रामाची समरसता समजून घेण्यासाठी आपल्याला रामायणातील काही प्रसंग अभ्यासावे लागतील.

अयोध्याकांड -

खरं तर रामायणातील समरसतेचा परिचय आपल्याला राम जन्मापूर्वीच होतो. राजा दशरथ पुत्रकामेष्टि यज्ञ करत असतात आणि तेव्हा ते यज्ञात सहभागी होण्यासाठी सर्व वर्णाच्या अधिकाऱ्यांना आणि मुख्य लोकांना बोलवितात. तिथे वर्णानुसार भोजनाची व्यवस्था नसून सहभोजनाची व्यवस्था असते. रामाचा जन्म ज्या राज्यात होणार आहे, तिथे सामाजिक समरसता नसेल असं होवूच शकत नाही. 'रामाला समरसतेचा गुण स्वतःच्या वडिलांकडून मिळाला आहे' असही आपण म्हणू शकतो. 

पुढे राजा दशरथाची आज्ञा व आशीर्वाद घेऊन राम, सीता व लक्ष्मण वनात जाण्यासाठी निघतात. दशरथाचा मंत्री सुमंत रामाला अयोध्येच्या बाहेर सोडून देणार असतो. राम अयोध्येतून चालले हे कळल्यावर फक्त राजपरिवारातील किंवा उच्च वर्गातील लोक व्याकुळ होत नाहीत तर समस्त समाज व्याकुळ होतो.('थांब सुमंता थांबवी रे रथ' या गीत रामायणातील कवितेत ग. दि. माडगुळकरांनी वरील प्रसंगाचे अतिशय हृदयस्पर्शी वर्णन केले आहे.) त्या रात्री अयोध्येतल्या कुठल्याही घरात अग्नी प्रज्वलित झाला नाही. याचं कारण म्हणजे रामाची समरसता. व्याकुळ होणाऱ्या प्रजेवरून आपण जाणू शकतो की रामाने अयोध्येतल्या लोकांना किती प्रेम लावले असावे. असे अनेक प्रसंग रामायणात आहेत. अयोध्या सोडली आणि राम श्रृंगवेरपूरात आले. तिथे निषादराज गुहने त्यांचे स्वागत केलं. अयोध्येसारख्या बलाढ्य आणि समृद्ध राज्याचे राजकुमार राम एका छोट्या भोई राजाच्या झोपडीत आश्रय घेतात. निषादराज गुह त्यांची सेवा करतो. राम सुद्धा निषादाला भावाप्रमाणे प्रेम देतात. हे सर्व घडत असतांना निषादराज गुहचं 'निषाद' असणं रामसेवेच्या किंवा राम भक्तीच्या आड कधीच आलं नाही. पुढे केवट आणि राम भेटीचा प्रसंग आहे. केवट रामाचे पाय धुण्याची इच्छा व्यक्त करतो. तेव्हा राम आनंदाने तयार होतात. रामाला स्पर्श करणं, रामाच्या सानिध्यात काही वेळ राहून प्रेम मिळविणं ही केवटाची इच्छा राम जाणून असतात. राम केवटाच्या इच्छेचा व प्रेमाचा सन्मान करतांना दिसतात. पुढे अयोध्येत परतल्यावर निषादराज गुह व केवट यांना राज्याभिषेक सोहळ्याला बोलविणारे राम सुद्धा आपण बघतो.

अरण्यकांड -

सीताहरण झालं आणि राम, लक्ष्मण सीतेला शोधत अरण्य पायी तुडवत होते. पुढे त्यांना रक्तबंबाळ झालेले गिद्धराज जटायू दिसले. "रावणाने छळ करून सीतेचे हरण केले..." घडलेली पूर्ण घटना सांगून जटायूने प्राण त्यागले. जटायूला पित्याचे स्थान देणारे राम तिथे आदर्श पुत्राप्रमाणे जटायूचा यथोचित अंत्यसंस्कार करतात. विषयप्रवेश करतांना मी व्यापक समरसतेचा उल्लेख केला होता. फक्त मानवच नाही तर पशुपक्षी यांच्याबद्दल सुद्धा अतीव प्रेम रामाजवळ होतं. ही बाब 'राम जटायू' प्रसंगातून स्वतः श्रीराम आपल्याला सांगतात. त्यानंतर घडलेला शबरी भेटीचा प्रसंग सर्वज्ञातच आहे. रोज रामाच्या प्रतिक्षेत आपली झोपडी स्वच्छ करणारी, विविध फळे तोडून आणणारी शबरी प्रत्यक्ष राम समोर उभे आहेत हे पाहून भावविभोर होते. राम सुद्धा तिला "आई..." म्हणून आवाज देतात. शबरीने दिलेली उष्टी बोरं आनंदाने खातात. नंतर शबरीला मोक्षमार्गाचा उपदेशसुद्धा करतात. या उपदेशात शबरीचं स्त्री असणं किंवा जातीनं भिल्ल असणं याचा कोणताही अडसर येत नाही. शुद्ध मनाने केलेल्या भक्तीसमोर उणं-उष्टं, लहान-मोठं, जात-धर्म हे सर्व गौण असतं. हीच गोष्ट श्रीराम लक्ष्मणासह आपल्यालाही शबरी भेटीच्या प्रसंगातून पटवून देतात.

किष्किंधाकांड -

सीतेला शोधत शोधत राम-लक्ष्मण ऋष्यमूक पर्वतापर्यंत आले. वनात सुग्रीव, हनुमान, जाम्बवंत आणि वानरसेनेची भेट झाली. सुग्रीव सुद्धा राज्य व पत्नी गमवून बसला होता. सुग्रीवासोबत घडलेल्या घटना ऐकून राम त्याला मदत करण्याचं वचन देतात आणि सुग्रीव-वाली संघर्षात वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य मिळविण्यास सहाय्य करतात. एवढच नाही तर पुढे वानरसेनेच्या साथीने आपले कार्य पूर्णत्वास नेतात. वानर ही एक वनवासी जमात होती. मानवांच्या तुलनेत संस्कार व राहणीमान याबाबतीत जरा अप्रगत असलेली जंगलातील जमात. अशा सर्व वनवासी व सामान्य लोकांना सहाय्य करण्याची आणि त्यांना संघटीत करून राष्ट्रकार्य उभारण्याची अत्यंत महत्वाची शिकवण राम आपल्याला या प्रसंगातून देतात.

सुंदरकांड -

रामाची अंगठी सीतेला देऊन हनुमंताने लंका उध्वस्त केली. "रामाशी युद्ध करणे योग्य नाही" अशा भूमिकेमुळे विभीषणाला रावणाने लंकेतून हाकलून दिलं. लंका सोडल्यावर विभीषण रामाला शरण आला. खरं तर विभीषण काही असहाय्य किंवा पीडित नव्हता. राजपरिवारात वाढलेला आणि एका बलाढ्य राज्याचा मंत्री म्हणजे रावण बंधू विभीषण होय. मग समरसतेशी किंवा समानतेशी या प्रसंगाचा काय संबंध ? असा प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होऊ शकतो. पण रामाने अंगीकारलेली समरसता किंवा समान भाव इतका व्यापक आहे की त्यात शत्रू-मित्र, सामान्य-असामान्य, गरीब-श्रीमंत, देव-दानव, मानव-पशुपक्षी या सर्वांसाठी समान प्रेम आहे. त्यामुळे विभीषण हा जरी परकीय आहे, रावणाचा भाऊ आहे, राक्षसकुळातला आहे पण त्याचे मन शुद्ध आहे, भक्ती पवित्र आहे हे सर्व राम जाणतात. म्हणून विभीषणाचा सुद्धा सन्मान करून पुढे त्याला लंकेचं राज्य देतांना राम दिसतात. शुद्ध मनाने भक्ती करणाऱ्या प्रत्येक सजीवाचा राम स्वीकार करतात. त्यामुळे राम सर्वांना आपलेसे वाटतात. ही बाब या प्रसंगातून आपण जाणली पाहिजे. पुढे राम अयोध्येत परतल्यावरसुद्धा सामाजिक समरसतेचे अनेक प्रसंग रामायणात घडलेले आहेत. त्यातील एक प्रसंग असा की अयोध्येत शरयू किनारी स्नान करण्यासाठी तीन प्रकारचे घाट होते. पहिला घाट महिलांसाठी, दुसरा घाट पुरुष व पशुंसाठी आणि तिसरा घाट राजपरिवारातील लोकांसाठी होता. परंतु सिंहासनारूढ झाल्यावर रामाने महिलांचा घाट वेगळा ठेऊन राजपरिवारातील लोकांचा घाट व सामान्य लोकांचा घाट एकत्र केला. राजपरिवार आणि सामान्य प्रजा यांच्यातील भेद कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेला हा रामायणातील महत्वाचा प्रसंग आहे. 

निषादराज गुह, केवट, जटायू, शबरी, वानर आणि शेवटी विभीषण या सर्व प्रसंगांचा अभ्यास केल्यावर एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की 'रामायणातील समरसता' हा जन्माचा विषय नसून कर्माचा विषय आहे. खुद्द महर्षी वाल्मिकी हे जन्माने कोळी होते आणि कर्माने दारोडेखोर होते. पण पुढे ते आपलं कर्म बदलतात. भक्तीमार्ग स्वीकारतात आणि नंतर त्यांची व रामाची भेट होते. फक्त भेटच होत नाही तर रामाची पुढची पिढी घडविण्याचा अद्वितीय अधिकार वाल्मिकींना प्राप्त होतो. हा प्रसंग सुद्धा रामायणातील समरसतेचं एक उदाहरण आहे. वाल्मिकी रामायणात रामाचं आत्मीय प्रेम आणि समत्वाचे उदाहरण ठरतील असे अनेक प्रसंग आहेत. खरं तर संपूर्ण रामायण म्हणजे समरसता व एकात्मभावाची शिकवण देणारा एक अद्भुत ग्रंथ आहे. रावण नावाच्या एका बलाढ्य शत्रूशी राम नावाच्या एका महामानवाने सर्व सामान्य लोकांना सोबत घेऊन लढलेलं एक युद्ध म्हणजे रामायण. त्यामुळे रामराज्य उभारण्यासाठी आधी आपल्याला रामायणातले समरसता व एकात्मभाव ही मूल्य अंगीकारावी लागतील. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मानवता व एकात्मता जपणारा आणि जगणारा एक आदर्श समाज परमेश्वराला मागितला. संत ज्ञानेश्वर हे कृष्णभक्त होते पण त्यांनी जे मागणं मागितलं ते रामराज्य होतं. रामायणात सांगितलेला रामाचा एकात्मभाव ज्ञानदेवांनी अंगीकारला होता. त्यामुळेच भेद व द्वेष विरहीत भावनेतून सृष्टीतील प्रत्येक घटकासाठी ज्ञानदेव मागणं मागू शकतात. रामाचा एकात्मभाव अंगीकारण्यासाठी सर्व मानवनिर्मित भेदातून मुक्त व्हावं लागेल. राम या सर्व भेदातून मुक्त होते म्हणूनच शबरीने दिलेली बोरं खाऊ शकले. द्वेष आणि अहंकार विरहीत जीवन जगू शकले. इतक्या संदर्भांचा आधार घेऊन पुन्हा पुन्हा समरसता व एकात्मभाव सांगण्याचं तात्पर्य एवढच की ग्रंथातले आणि मंदीरातले राम आता हृदयात ठेवण्याची गरज आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात राम दिसतील तेव्हाच इतर सर्व भेद नष्ट होऊन शेवटी केवळ भक्त शिल्लक राहतील. भक्त एकत्र आल्यावर रामराज्य निर्माण होतं हे आपण रामायणात बघितलं आहे. 'प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यावर ध्येय गाठता येतं.' असा संदेश देणारी कथा म्हणजे रामकथा आहे. म्हणून शेवटी एवढच लिहितो की रामभक्त निर्माण झाले तर समरसता व एकात्मभाव निश्चितच निर्माण होईल कारण भक्त कधी विभक्त नसतात !

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८

6 comments:

  1. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचन्द्र उत्कृष आकृतलेले चरित्र वर्णन ...👌🏽🙏🏽 #जय श्रीराम

    ReplyDelete
  2. खूप छान,
    जय श्री राम

    ReplyDelete
  3. राम चरित्र आणि समसरता याविषयी विवेचनाचा अभिनंदनीय प्रयत्न !!

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिले.पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.💐💐💐

    संजय पितळे अमरावती.

    ReplyDelete
  5. वा गंधार, अप्रपतिम व अभ्यासपुर्ण लेख

    ReplyDelete