Followers

Tuesday, November 30, 2021

गेल्या काही दिवसांपासून

सवय तुझीच झाली आहे
गेल्या काही दिवसांपासून
गरज तुझी वाटते आहे
गेल्या काही दिवसांपासून

गॅलरीत तू दिसावी म्हणून
अनेक चकरा रोज मारतो
व्यर्थ पेट्रोल जाळतो आहे
गेल्या काही दिवसांपासून

रोज कॉलेजला येतो आता
तुझा सीनियर झाल्यामुळे
थोडा शिस्तीत राहतो आहे
गेल्या काही दिवसांपासून

तू प्रश्न विचारशील म्हणून
आधी उत्तरे तयार ठेवतो
पुस्तके बरेच वाचतो आहे
गेल्या काही दिवसांपासून

कधी उगाच हसतो आहे
कधी एकटा बसतो आहे
विचित्र असा वागतो आहे
गेल्या काही दिवसांपासून

तुझा विचार असतो मनी
रोज रात्री झोपण्यापूर्वी
स्वप्नातही तुला बघतो आहे
गेल्या काही दिवसांपासून

कित्येक गुलाब तोडले मी
फक्त तुलाच देण्यासाठी
काट्यांना हाती धरतो आहे
गेल्या काही दिवसांपासून

तुझ्यावर प्रेम करता करता
स्वतःवर प्रेम करू लागलो
जीवन जगणे शिकतो आहे
गेल्या काही दिवसांपासून

© गंधार वि. कुलकर्णी
दि. २७ नोव्हेंबर २०२१
संपर्क : ९१५८४१६९९८

Tuesday, November 16, 2021

यवतमाळला जातांना...

यावर्षी आमच्या घरचा महालक्ष्मी उत्सव सप्टेंबरमध्ये न होता दिवाळीमध्ये होईल असं ठरलं. त्याचं कारण म्हणजे कुलकर्णी परिवाराच्या कुंडलीत आणि शरीरात बसलेले कोरोना व डेंगू हे दोन राहू केतू. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आम्ही दिवाळी, पाडवा आणि पाडव्याच्याच दिवशी भाऊबीज आटोपून सहा नोव्हेंबरला सकाळी यवतमाळसाठी निघालो. खरं तर सकाळी सात वाजता निघायचं ठरलं होतं, पण पहाटे-पहाटे स्वतःचं बोचरं अस्तित्व दाखवणाऱ्या थंडीमुळे अंगावरील पांघरूण काढण्याची हिम्मत झाली नाही. परिणामी, आम्ही सकाळी नऊ वाजता घरुन निघालो. रस्त्यात पेट्रोल भरणे, हवा चेक करणे अशा खटपटी शिल्लक होत्याच.

शेवटी एकदाचा अचलपूरचा नाका सुटला आणि चांगला सपाट रस्तासुद्धा सुटला. त्यानंतर गाडीमधल्या प्रत्येक घटकाचा ''खडखड-खडखड'' असा आवाज होईल अशा रस्त्याचा प्रवास आम्ही यवतमाळला पोहोचेपर्यंत केला. रस्ता म्हणजे अगदी दिवाळीच्या अनारस्यांप्रमाणे खडबडीत होता. "वेगात गाडी चालवून तर दाखवा !" जणू असा चॅलेंज तो रस्ता आम्हाला करत होता. इयरफोन लावूनसुद्धा गाणे बरोबर ऐकू येत नव्हते. त्यामुळे मी गाणे ऐकणं सोडून बाहेरची हिरवळ, सकाळी तारांवर एका रांगेत बसलेले पक्षी, झाडांमधून येणारी सूर्यकिरणे या सर्वांचा आनंद घ्यायला लागलो.

खराब रस्त्यामध्ये थोडा-थोडा चांगला रस्तासुद्धा होता. एक-दोन वेळा तर गाडी चांगलीच उसळली. शेवटी आम्ही एकदाचं यवतमाळ गाठलं. गाडी घरासमोर थांबली आणि पूर्ण प्रवासभर सुरू असलेले सर्वच आवाज बंद झाले. सगळ्यांसोबत दोन दिवस मजेत घालवल्यानंतर आम्ही अचलपूरसाठी निघालो. यावेळी खराब रस्त्याचा विचारसुद्धा डोक्यात नव्हता. कारण यवतमाळला जातांना याच खराब रस्त्याने एक चांगली गोष्ट मला शिकविली होती. आपण कितीही घाई केली, कितीही वेगात गाडी चालविली तरीही ध्येयप्राप्तीचा प्रवास आवश्यक तेवढा वेळ घेईलच. मग तो प्रवास अचलपूर ते यवतमाळचा असो किंवा जीवनाचा असो. मार्ग कधी खराब असेल तर कधी चांगला असेल पण सातत्याने चालत राहणं हे आपलं काम आहे. शेवटी आपण फक्त प्रवास करणारे प्रवासी आहोत. ध्येय ठरवून चालत राहणं आपलं काम आहे. मात्र ध्येयावर नेऊन थांबविणारा कोणी तिसराच करत असतो. या आणि अशा सर्वच गोष्टी, तत्व किंवा विधानं आपल्याला ठाऊक असतात पण आपण त्यांना समजून घेत नाही म्हणूनच सगळा गोंधळ होतो.

© गंधार वि. कुलकर्णी
दि. १६ नोव्हेंबर २०२१
संपर्क : ९१५८४१६९९८

Monday, July 12, 2021

घरे

घरे,
पक्ष्यांची, माणसांची आणि देवांची
उध्वस्त झालीत काल आलेल्या भूकंपात.
जमीनदोस्त झालेली अनेक घरे दिसत होती
वाऱ्याने पडलेल्या खेळण्यातल्या
पत्त्यांच्या बंगल्यासारखी.

चार भिंतीआड सुरक्षित असलेली मुले
आता लोकांच्या घोळक्यात सुरक्षित होती.
विभक्तपणे जगणारे सगळे कुटुंब
रात्री रस्त्यावर संयुक्तपणे राहिले.
मात्र वर्षभर लोकांच्या गर्दीत राहणारा देव
रात्रभर एकटाच होता मोडलेल्या मंदीरात.
नेहमीपेक्षा अधिक अंध:कारमय वाटणारी ती रात्र
रस्त्यावरील लोकसमूहाने आणि झाडांवरील पक्षीसमूहाने
घालवली विखुरलेल्या स्वप्नांचे अवशेष बघत.

दुसऱ्या दिवशी तिथे आले
काही स्वच्छ कोरे खादीचे कपडे घातलेले व्यापारी
आणि करू लागले आश्वासने व स्वप्नांचा व्यापार.
तेव्हाच शब्दांची मोठी आलीशान
घरेही त्यांनी पीडितांसाठी उभारली.

नंतर बेघर आणि निर्वासितांच्या खिशातल्या रूपयाला
वर्गणी व देणगीच्या वाटा मोकळ्या झाल्या.
त्यातूनच जिर्णोद्धार झाला पडलेल्या मंदीराचा.
देवापुढे पुन्हा भक्तांची रांग जमू लागली.
पक्षी या लोकांसारखे नसल्यामुळे
त्यांनी स्वतःच आपले नवीन घरटे बांधून घेतले.

बेघर लोकांनी खादी वस्त्रातील व्यापाऱ्यांसोबत
केला मतांचा व्यापार आणि देवाच्या नवीन घरात
जाऊन लावले व्रत-वैकल्यांचे तोरण.
पण आजही त्यांच्या पडक्या घराच्या मलब्यावर
उगवत आहे फक्त हिरवे गवत.

© गंधार कुलकर्णी
दि. ०५ मे २०२१
९१५८४१६९९८

Tuesday, June 15, 2021

शब्दातून 'ननाई' मांडतांना...

जीवनात आपल्याला अनेक असे लोकं भेटतात की जे नात्याने आपल्या जवळ असतात पण परिस्थिती आणि घटनाप्रसंगांमुळे त्यांचा सहवास आपल्याला कमी लाभतो. अशाच काही लोकांपैकी एक म्हणजे माझी आजी ननाई. ननाईचं माहेरचं नाव 'कमल शेष' होतं. नंतर कुलकर्णी परिवारात आल्यावर ती 'रजनी कुलकर्णी' झाली. पुढे 'रजनीआई' आणि नंतर नातवांच्या बोबड्या उच्चारांमुळे 'रजनीआई' या शब्दाला 'ननाई' असं एक निराळं रूप लाभलं. तेव्हापासून रजनीआईला घरातले सर्वजण 'ननाई' म्हणू लागले. खरं तर मी ननाईसोबत फारच कमी राहिलो. महालक्ष्मीचे तीन दिवस, उन्हाळ्यातले दोन-तीन दिवस आणि काही कार्यप्रसंग असले तर तेव्हा तीन-चार दिवस. असे वर्षभरात आठ-नऊ दिवस मी ननाईसोबत घालवायचो. ननाईच्या या सर्व आठवणी शब्दातून मांडण्याचं प्रयोजन म्हणजे ५ जून २०२१ रोजी मध्यरात्री ननाई आम्हाला कायमची सोडून गेली. तेव्हापासून एखादा सिनेमा पडद्यावर यावा तसे ननाईसोबत घालवलेले सर्व क्षण डोळ्यांपुढे येऊ लागले.

महालक्ष्मीसाठी आम्ही यवतमाळच्या घरी पोहोचलो की हॉलमध्ये पलंगावर बसलेली ननाई "आला का रे बेटू !!" असं म्हणून जवळ घ्यायची. तुळशीसमोर ठिपक्यांची रांगोळी काढायची, महालक्ष्मीसाठी घरातल्या पांढऱ्या फुलांचा हार करायचा असला की तिचा ठरलेला पिवळा दोरा सुईतून ओवून मागायची. एकदा मी आणि ननाई बंगईवर बसलो होतो. नानाकाका कुंडीतल्या छोट्या झाडांना पाणी देत होते. तेव्हा ननाई मला म्हणाली,"आपण लावलेल्या झाडांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतली पाहिजे." आतापर्यंत तिने जे-जे झाडं लावले ते सर्व जगले. त्यामागे हेच कारण असावं. ननाईचं झाडांवर खूपच प्रेम होतं. अचलपूरच्या घरी लावायला सुद्धा तिने अनेक रोपं दिले होते. माणसांवर आणि झाडांवर समसमान प्रेम करणारे ननाईसारखे लोकं फार दुर्मिळ असतात. यवतमाळहून निघतांना घरच्या झाडाचे आंबे, पपई व घरी केलेला चिवडा नेहमी सोबत द्यायची. रोज प्राणायाम करायची, शेवटपर्यंत तिचे दोन्ही तळहात पायाच्या बोटांना टेकत होते. मात्र गेल्या एक-दीड वर्षापासून हृदय कमकुवत झाल्यामुळे ननाईचा व्यायाम बंद झाला होता.

ननाईला प्रत्येकाच्या कला-गुणांचं खूप कौतुक होतं. सगळेजण एकत्र जमले की "चला होऊ द्या न काही तरी" असं म्हणून ती प्रत्येकाला गायला लावायची. माझ्या कविता आवडीने वाचायची. आपले मुलं, सुना, नातवंड सगळे एकत्र डोळ्यासमोर बघितल्यावर स्वतःचं शारिरीक व मानसिक दुःख विसरून जायची. दोन वेळा पडल्यामुळे ननाईच्या एका पायात रॉड होता तर दुसऱ्या पायात बॉल होता. उठ-बस करतांना तिला त्रासही व्हायचा. तरी हसतमुखाने सर्वांच्या कार्यप्रसंगात ती सहभागी व्हायची. माझे आजोबा, सर्वात मोठे काका आणि आत्त्या यांचं अकाली जाणं ननाईने बघितलं, बाबांचा जीवघेणा अपघात आणि त्यांचा त्रास बघितला. हे सर्व बघून सुद्धा ननाई खचली नाही. जणू ती सर्वांना जीवन जगणं शिकवत होती. अतिशय लहान वयात ननाई राधास्वामी संप्रदायाशी जुळली. तेव्हापासून तिने राधास्वामी संप्रदायाच्या आचार-विचारांचे पालन केले. आपला धर्म व संस्कृती जपण्यासाठी आवश्यक ते सण-उत्सव ननाईने केले पण कोणत्याच गोष्टीचं अवडंबर तिने केलं नाही आणि दुसऱ्याला करायलाही लावलं नाही. धर्म आणि कर्माचा योग्य समतोल साधून ननाई सुखी व समाधानी जीवन जगली.

५ तारखेला ननाई गेली. तेव्हा काकांनी आम्हाला तिने लिहून ठेवलेलं एक पत्र दाखवलं. २०१२ साली लिहिलेल्या त्या पत्रात ननाईने लिहिलं होतं,"मी पूर्ण समाधानी आहे. माझी तेरवी, श्राद्ध काही करू नका. आप्तमंडळींना प्रेमाने जेऊ घाला. मला नेत्रदान, अवयवदान, देहदान करायची आहे." ८७ वर्षाचं वय आणि कोरोनाचं वातावरण बघता ननाईची नेत्रदान, देहदानाची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण बाकी सर्व तिच्या इच्छेप्रमाणे झालं. आज अनेक लोकं आधुनिक असण्याचा आव आणतात. मात्र फक्त पाश्चिमात्य होऊन बसतात. १९३४ सालचा जन्म असूनही ननाई विचारांनी अतिशय आधुनिक होती. 'अगदी साधं-सरळ जीवन जगून सुद्धा माणूस सुखी व समाधानी होऊ शकतो' ही शिकवण ननाई आम्हाला देऊन गेली. ननाई शेवटपर्यंत चालती-फिरती होती आणि हसतमुखाने गेली, या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे. मात्र आता यवतमाळच्या घरी गेल्यावर "आला का रे बेटू !!" असं म्हणून जवळ घेणारी ननाई तिथे नसणार, याचं दुःख नेहमीकरीता राहील...

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

Thursday, April 22, 2021

मी पुस्तक

हाती घेतल्या गेलो तेव्हा
खूप हर्षित झालो होतो
दुःखही खूप झाले कारण
न वाचता ठेवल्या गेलो होतो

एकच प्रश्न छळतो मला
माझा उपयोग कोणासाठी ?
धुळीतल्या कपाटासाठी
की मानवाच्या विकासासाठी

माझी भूमिका कशी बदलली
समजण्यास मी असमर्थ ठरलो
कधीकाळी ज्ञानभांडार होतो
पण आता रद्दी भंगार झालो

न कोणास केली चुगली
न कधी गाऱ्हाणे करतो
माझ्या या स्थितीवर उपाय
स्वत:लाच वाचून शोधतो

चंद्राचे नको जगणे मला
ज्यात कोणाचा स्पर्श नाही
मी तर बनेल पणतीचा दिवा
ज्ञानाचा उजेड देईल काही

अरे मानवा मला बघ जरा
किती रहस्यांनी भरलो आहे
तुम्ही तर सगळे संपून जाता
मी अजूनही उरलो आहे

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८

Sunday, April 11, 2021

परीक्षा

 'परीक्षा' एक असा विषय जो सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्ण व अंबानी प्रकरणानंतर सर्वाधिक चर्चेत आहे. याच विषयावर एक अल्पसा संवाद आज माझ्या घरात सुद्धा झाला. आज दुपारी मी UGC NET परीक्षेचा अभ्यास करत होतो. मला अभ्यास करतांना पाहून घरात काम करणाऱ्या बाईने सहजच विचारलं -

"अजून तुझी परीक्षा झालीच नाही का ?"
"नाही. पुढच्या महिन्यात परीक्षा आहे." मी सांगितलं.
"पण तुझं कॉलेज तर झालं न ?" पुन्हा तिच्याकडून दुसरा प्रश्न आला.
"अरे नाही, ही परीक्षा कॉलेजची नाही. सरकारी परीक्षा आहे. तसं पण माणसाच्या परीक्षा कधीच संपत नसतात." मी तिला हसून म्हणालो.
इथेच हा संवाद संपला आणि आम्ही दोघेही आपापल्या कामाला लागलो. शब्दांचा संवाद जरी संपला असला तरीही विचारांचा विवाद सुरू होता. गेल्या अनेक दिवसापासून परीक्षांच्या बातम्या वर्तमानपत्र व टी.व्ही. वर बघत होतो. त्यात टी.व्ही. वर एक बातमी अशी होती - 'परीक्षा होत नसल्यामुळे विद्यार्थ्याने केली आत्महत्या'. खरं तर टी.व्ही. वर दाखवण्यात येणाऱ्या घटनांमागे अनेक कारणं असू शकतात. त्यावर बोलायला नको. पण परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे ही बाब अगदी सत्य आहे.

माझी एम.ए.ची मार्च २०२० मध्ये होणारी अंतिम सत्राची परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये झाली. प्रत्येक वेळी परीक्षेचे वेळापत्रक यायचे आणि काही दिवसात पुन्हा रद्द व्हायचे. असं तीन वेळा झालं. एकदा तर एक पेपर होवून पूर्ण परीक्षा रद्द झाली. मी सुद्धा चिडायचो-रागवायचो. या सर्व गोंधळामुळे थोडा frustrate झालो होतो. त्यावेळी आई-बाबा एकच वाक्य बोलायचे - "जाऊदे, आपण असाच विचार करायचा की जे होतं ते चांगल्यासाठी होतं" सांगण्याचं तात्पर्य हेच की सकारात्मक विचार करून आणि संयम ठेवून अभ्यास करावा. कारण इतर सर्व परीक्षांपेक्षा मोठी परीक्षा म्हणजे सध्याची स्थिती आहे. "जाऊदे, आपण असाच विचार करायचा की जे होतं ते चांगल्यासाठी होतं" हे वाक्य आपण सर्वांनीच ऐकलं असेल किंवा "Life में कुछ भी हो सकता है" हे वाक्य सुद्धा ऐकलं असेल. दैनंदिन जीवनात असे अनेक वाक्य आपण घरातल्या व बाहेरच्या लोकांकडून ऐकत असतो. विचार केला तर वरील दोन वाक्य प्रत्येक माणसाला जागृत करण्याचे कार्य करतात. त्यामुळे कोणतेही विचित्र व उलट पाऊल उचलण्याआधी वरील दोन वाक्यांचा आधार घेऊन स्वतःशीच बोलण्याची सवय करायला हवी. सध्या कोरोना व लॉकडाउनमुळे घरातल्यांसोबत वेळ घालवून अशा सकारात्मक विचारांना अंमलात आणण्याची आपल्याकडे एक चांगली संधी आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरातच आपले प्रेरणास्त्रोत बसलेले असतात. फक्त आपण प्रेरणा घ्यायला शिकलो पाहिजे. सुरवातीच्या संवादात सांगितल्याप्रमाणे परीक्षा कधीच संपत नसतात. शाळा-महाविद्यालयाने घेतलेल्या असो, सरकारने घेतलेल्या असो किंवा जीवनाने घेतलेल्या असो, आपण परीक्षेला कसं सामोरे जातो हीच बाब महत्वाची आहे. शेवटी एवढच सांगतो की घरातल्यांसोबत वेळ घालवा परीक्षा देण्यासोबत परीक्षा जगणंही जमेल कारण माणसाच्या परीक्षा कधीच संपत नसतात.

© गंधार वि. कुलकर्णी
दि. १० एप्रिल २०२१

Thursday, March 25, 2021

आता थोडं झगडून घेऊ

जाचक अशा बंधनांशी
जुनाट साऱ्या रिवाजांशी
विभागलेल्या समाजाशी
नव्या बुद्धिने लढून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ

दृढ निश्चय करूया आता
प्रत्येक बाजी जिंकण्याचा
दुनियादारी बाजूस सारून
मनाप्रमाणे वागून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ

धैर्य बाळगून गरूडाचे
पिंजरे तोडूया मर्यादांचे
आलेत कितीही वादळे तरी
ढगांच्या वरती उडून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ

चिंता, पर्वा सोडून साऱ्या
डोळ्यात मोठे स्वप्ने पाळू
निडर होऊन एकदा तरी
जीवनाला पूर्ण जगून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ

© गंधार कुलकर्णी
दि. २२ मार्च २०२१



Tuesday, February 2, 2021

जंगल सफारी

 'जंगल सफारी' म्हंटल की सर्वात आधी आपल्यापैकी बहुतांच्या डोक्यात 'जंगलात जावून वाघाला पाहणे' एवढाच विचार येतो. दोन वर्षा आधीपर्यंत मी सुद्धा अश्या लोकांपैकी एक होतो. सहा वर्षांआधी आम्ही उत्तराखंड राज्य भ्रमंतीसाठी गेलो होतो. त्यात नैनीताल, कौसानी, राणीखेत, हरिद्वार आणि कॉर्बेट अभयारण्य इतके ठिकाणं फिरण्याचा 'टूर पॅकेज' होता. जिम कॉर्बेट या शिकाऱ्याने लिहिलेल्या कॉर्बेट जंगलातील वाघांच्या रोमांचक कथा मी वाचल्या असल्यामुळे मला इतर ठिकाणांपेक्षा कॉर्बेट जंगलाचं आकर्षण थोडं जास्त होतं. 'टूर पॅकेज'मध्ये असलेले जवळपास अर्धे ठिकाणं पाहून झाल्यावर आम्ही कॉर्बेट जंगल पाहण्यासाठी गेलो. जुकाजो महाराणी नावाच्या हॉटेलमध्ये सर्वांचे बूकिंग्स होते. पोहोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जंगल सफारी होती. हॉटेल जंगलातच असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रत्येक खोलीपर्यंत जंगली प्राण्यांचे आवाज अतिशय स्पष्ट ऐकू येत होते. त्या आवाजांमुळे माझी प्राणी बघण्याची आणि त्यातही वाघ बघण्याची इच्छा अजूनच तीव्र होत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगल सफारी सुरू झाली. दळण दळणाऱ्या चक्कीतल्या माणसाच्या अंगावर पीठ उडावं, तशी समोर चालणाऱ्या जिप्सीमुळे जंगलातली धूळ आमच्या अंगावर उडत होती. हरणांचे कळप, वेगवेगळे पक्षी, जंगलातून वाहणारी नदी, एका झाडाच्या फांदीवर बसलेला मोठा गरूड, जंगलातले इतके विविध घटक बघितल्यावर सुद्धा गाडीत बसलेल्या सर्वांच्या नजरांना वाघाचीच वाट होती. जिप्सी पूर्ण जंगलभर फिरली आणि वाघ बघण्यासाठी जिप्सीत बसलेलो आम्ही वाघाच्या पंज्यांचे ठसे पाहून हॉटेलमध्ये उतरलो.

उत्तराखंड टूर झाला. दोन वर्षाआधी मी एका काव्यलेखन कार्यशाळेसाठी शाहनूर अभयारण्यात गेलो होतो. अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाने आयोजित केलेली तीन दिवसाची कार्यशाळा होती. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जंगल आणि नरनाळा किल्ला पाहण्यासाठी निघणार होतो. पुन्हा आम्ही सर्वजण 'वाघ दिसेल का ?' याविषयी चर्चा करत होतो. तेव्हा आम्हाला पाहून विद्यापीठाच्या मराठी विभागातले प्राध्यापक डॉ. हेमंत खडके सर म्हणाले,"मित्रांनो जंगल सफारीला जातांना तुम्ही फक्त वाघ पाहायला गेले आणि वाघ नाही तर तुम्ही नाराज व्हाल, पण तुम्हाला जर जंगल सफारीचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जंगल पाहायला जा" थोड्याच वेळात जिप्सी सुरू झाली आणि आम्ही खऱ्या अर्थाने जंगल पाहायला निघालो. जंगलातील थंडगार हवा, गर्द हिरव्या झाडातून डोकावणारा पहाटेचा सूर्य, हरणांचे कळप, झाडाच्या शेंड्यावर बसलेले बगळ्यांचे थवे असं सर्व बघत असतांना, जिप्सी थांबली, समोर पायवाटेवर वाघाचे पंज्यांचे ठसे होते. नेहमीप्रमाणे मी त्या ठस्यांचे फोटो घेतले आणि जिप्सी समोर निघाली. त्यानंतर नरनाळा किल्ला बघून आम्ही परतलो. तीन तासांच्या जंगल सफारीत मी २०० पेक्षा जास्त फोटो घेतले. त्यात पाण्यात दिसणाऱ्या झाडाच्या प्रतिबिंबापासून तर किल्ल्यात लटकलेल्या वटवाघूळांपर्यंत प्रत्येक घटक आणि आम्ही अनुभवलेल्या आनंदाचा प्रत्येक क्षण मी कॅमेरात साठवून ठेवला.

खरं तर या दुसऱ्या जंगल सफारीत सुद्धा मला वाघ दिसला नव्हता. पण यावेळी मला जंगल बघितल्याचं समाधान होतं. कारण यावेळेस जंगल सफारी म्हणजे 'जंगलात जावून वाघाला पाहणे' एवढाच विचार डोक्यात नव्हता. अनेकदा आपण आपल्या आनंद प्राप्तीच्या स्त्रोतांना काही विचित्र अटी आणि बंधनात जखडून ठेवतो. त्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या आनंदाची 'क्वालिटी' आणि 'क्वांटिटी' कमी होते. उलट आनंद प्राप्तीचे स्त्रोत आपण मुक्त ठेवले तर आपण जास्त 'एन्जॉय' करतो. पहिल्या जंगल सफारीत 'वाघ दिसला पाहिजे' ही एक अट होती. त्यामुळे पूर्ण जंगल पाहून सुद्धा मी आनंदी व समाधानी नव्हतो. पण दुसऱ्या जंगल सफारीला जातांना वाघ दिसण्याची अट मनाला चिकटलेली नव्हती, त्यामुळे या जंगल सफारीतून मिळालेल्या आनंदाची 'क्वालिटी' आणि 'क्वांटिटी' निश्चितच जास्त होती. हे सर्व सांगण्याचं तात्पर्य म्हणजे उच्च प्रतीच्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आनंद प्राप्तीचे स्त्रोत मुक्त असायला हवेत.

© गंधार विश्राम कुलकर्णी
दि. ०२ फेब्रुवारी २०२१
संपर्क : ९१५८४१६९९८

Monday, January 4, 2021

दोन गळलेले सजीव


झाडावरचं पिवळं पान
जमिनीवर होतं पडलेलं
विशाल हिरव्या आईपासून
नाळ तुटून गळलेलं

शाखेवर डोलणारे पर्ण
मातीवर लोळत होते
वाऱ्यासवे लढले कसे
दगडांना ते सांगत होते

पाचोळ्यास जुळण्याआधी
परत पानाने पाहिले झाडाला
पुन्हा झाडावर जाईल का मी ?
थकले विचारूनी स्वतःला

पानाच्या जागी त्या शाखेवर
नव्या पालवीचे आगमन झाले
पाहुनी हे दृश्य पिवळे पान
निराश झाले, रागात आले

तिथे आला एक म्हातारा
घरातून जो होता गळलेला
नाते-संबंधाच्या तुरुंगातून
थकलेल्या पायांनी धावलेला

म्हातारा विचारतो पानास
रडल्याने मिळते का काही ?
तुझ्या अश्रूने कोरडी त्वचा
हिरवी आता होणार नाही

माझ्या जागी मुलगा आला
पालवी तुझ्या जागी आली
हेच समज भाग्य अपुले
हीच जीवनाची रीत झाली

बंधनमुक्त हे दुसरे जीवन
आता तरी तू जगून घे
तुझा चुरा होण्याआधी
दाही दिशांना उडून घे

© गंधार कुलकर्णी
दि. १ डिसेंबर २०२०