Followers

Monday, December 21, 2020

प्रत्येकाची वेगळी 'पार्टी' !

 'ख्रिसमस' आणि 'न्यू ईयर' आले की 'पार्टी' आणि 'एन्जॉय' हे दोन शब्द अनेकांच्या जीभेवर नाचत असतात. केक कापणे, हॉटेलमध्ये जाणे, मित्रांसोबत 'गेट टूगेदर' करणे, फटाके फोडणे, बाहेर गावी फिरायला जाणे किंवा घरी परिवारासोबत नवीन वर्ष साजरे करणे, यापैकी काही तरी 'प्लान' लोकं ठरवतात आणि 'एन्जॉय' करतात. काही उदार अंतःकरणाचे लोकं अनाथालय, वृद्धाश्रम, दिव्यांग लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत सुद्धा नवीन वर्ष मनवतात. अनेक लोकं तर "ही आपली पद्धत नाही" असं म्हणून ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी अगदी कोरडीच मनवतात.

पण 'पार्टी' करणे म्हणजे 'खाओ-पीओ-नाचो-गाओ' एवढेच आहे का ? किंवा असं केल्यानेच आपण 'एन्जॉय' केला असं प्रत्येकाला वाटतं का ? असा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला तर त्याचं उत्तर 'नाही' असच मिळणार. खरं तर 'पार्टी' आणि 'एन्जॉय' या दोन शब्दांना आपण खूपच मर्यादित करून ठेवलं आहे. 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' यानुसार वरील दोन शब्दांचे अर्थ, कल्पना, मत आणि विचार हे प्रत्येक व्यक्तीचे भिन्न असू शकतात. एखादा माणूस घराच्या अंगणात कोवळया उन्हात शांत बसून राहील, एखादा मुलगा नवीन वर्षात वाचायच्या पुस्तकांची यादी बनवेल, एखादी बाई घरात शांत बसून तिच्या आवडीचे गाणे गुणगुणत राहील, कोणी नवीन कपडे घेतील, कोणी घराची स्वच्छता करतील, कोणी आपल्या शिक्षकांना भेटायला जातील, असेही 'प्लान' अनेकांच्या 'न्यू ईयर'चे असतील आणि हाच त्यांचा 'एन्जॉय' असेल. अनेक लोकं असेही असतील की जे नवीन वर्ष अगदी एकटे राहून मनवतील. आपल्याला एकटे आणि शांत राहणारे लोकं 'बोरिंग' वाटतात, पण ते त्यांच्या ठिकाणी खूप 'एन्जॉय' करतात, असही असू शकतं. अनेक लोकं असेही असतील की जे रोजच्या पेक्षा काहीच वेगळं करणार नाहीत, तरीही प्रसन्न दिसतील. 'एन्जॉय' शब्दाची व्याख्या ही प्रत्येक व्यक्तीची वेगळीच !

यातून अजून एक विषय समोर येतो, तो म्हणजे "कलाकार किंवा साहित्यिक लोकं थोडे वेगळेच असतात" असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो. पण ते लोकं वेगळे का असतात ? असा प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारत असू. या विषयाचा संबंध सुद्धा 'एन्जॉय' करण्याशीच आहे. कलाकार आणि साहित्यिक लोकं आपल्याला वेगळे वाटतात कारण ते त्यांच्या कलेसोबत कोणत्याही साधारण मनुष्यापेक्षा जास्त 'एन्जॉय' करत असतात. बरेच लोकं एकाच प्रकारचे कपडे घालतात. आपल्याला ही गोष्ट विचित्र वाटते, पण ते त्या कपड्यांमध्ये 'एन्जॉय' करत असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की यावर्षी 'ख्रिसमस' आणि 'न्यू ईयर'ला आपल्याला कोणी शांत बसलेला किंवा जल्लोष करत नसलेला मनुष्य दिसला तर तो 'पार्टी' आणि 'एन्जॉय' करत नाही असं समजू नये. उलट 'जीओ और जीने दो' हे तत्वज्ञान अंमलात आणून आपण आपली 'पार्टी' करावी आणि इतरांना त्यांची 'पार्टी' करू द्यावी. कारण प्रत्येकाचा वेगळा 'एन्जॉय' आणि प्रत्येकाची वेगळी 'पार्टी' !

नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!

© गंधार विश्राम कुलकर्णी
दि. २२ डिसेंबर २०२०

Friday, November 13, 2020

स्वच्छता : संस्कृती आणि संस्कार

 (खालील लेख अध्ययन समाचार 'सृजनोत्सव' दिवाळी २०२०च्या विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे)


दिवाळी आता थोड्याच दिवसांवर आली आहे. दिवाळी म्हंटल की सर्वात पहिलं काम म्हणजे घर स्वच्छ करणे. सर्वच लोकं घराची स्वच्छता करतात, रंगरंगोटी करतात, घरातल्या अनेक जुन्या वस्तू बदलवून त्याच्या जागी नवीन वस्तू आणतात, थोडक्यात म्हणजे घर टापटिप व निटनेटके करतात. पण दिवाळीसाठी घर स्वच्छ करणे इतकं गरजेचं का आहे ? या प्रश्नाचं उत्तर भारतीय संस्कृती व संस्कारात आहे. भारतीय मान्यतेनुसार स्वच्छ व प्रसन्न ठिकाणी लक्ष्मीचा व सरस्वतीचा वास असतो. दिवाळीची स्वच्छता करण्यामागे सुद्धा हिच मान्यता असावी. त्यामुळे अनेक लोकं दिवाळीच्या पाच दिवसात झाडणी व फड्याची सुद्धा पूजा करतात. झाडणीलाही लक्ष्मी मानलं जातं. तसेच अभ्यंग स्नान करणे, उटणे लावणे हे प्रकार सुद्धा मानवी शरीराच्या स्वच्छतेसाठीच आहेत. प्रत्येक धर्मात पूजा, ध्यान-धारणा करण्याआधी शुचिर्भूत होणे, बाहेरून घरात येण्याआधी हात-पाय धुणे या सर्व गोष्टी स्वच्छतेचं महत्व सांगणाऱ्या आहेत. भारत देशाला स्वच्छतेचा खूप मोठा इतिहास आहे. त्याचे काही उदाहरणं खालीलप्रमाणे -


स्वच्छता म्हणजे भारतीय संस्कृतीच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे. प्राचीन भारतीय सिंधू संस्कृतीतील नगरांमध्ये भव्य स्नानगृहे, सांडपाण्याच्या झाकणबंद नाल्या आढळल्या आहेत. वैदिक साहित्यामध्ये सुद्धा घरातली स्वच्छता, आध्यात्मिक सोवळे, शौच, स्नान यासंबंधित नियम आखून दिले आहेत. त्यानंतर भारतात उदयास आलेल्या मौर्य साम्राज्यात सुद्धा स्वच्छतेवर भर दिलेला दिसतो. चाणक्यांनी आपल्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथात समृद्ध राज्य उभारण्यासाठी शेती, व्यवसाय, राजकारण, स्वच्छता, समाज या सोबत १७० विषयांवर भाष्य केले आहे. अर्थशास्त्राच्या ८व्या व ३६व्या प्रकरणात राज्यातील स्वच्छतेचे नियम व नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षा याबाबत माहिती लिहिली आहे. मौर्य, गुप्त, विजयनगर या साम्राज्यांत पाणी व स्वच्छता या घटकांवर जास्त लक्ष दिल्याचे उल्लेख आहेत. इस्लाम राजवटीच्या काळात संतांनी आपल्या साहित्यातून स्वच्छतेविषयी प्रबोधन केल्याचे आढळते. पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. संत गाडगेबाबांनी गावोगावी जावून स्वच्छतेचे महत्व समाजाला पटवून दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 'ग्रामगीता' हा ग्रंथ लिहून खेड्यापासून-राष्ट्राच्या समृद्धतेसाठी स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे.

आताच्या नवीन भारतात अण्णा हजारे, बिंदेश्वर पाठक या समाजसेवकांनी स्वच्छतेच्या नवीन चळवळी उभारल्या आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे 'स्वच्छतेचे पालन करणे' ही बाब संपूर्ण मानव जातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक झाली आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकांची जीवन पद्धती, मान्यता, चाली-रीती म्हणजे संस्कृती होय. या व्याख्येनुसार बघितले तर प्राचीन भारतापासून आताच्या अत्याधुनिक भारतापर्यंत लोकांच्या जीवन पद्धतीत 'स्वच्छता' हा घटक कायम आहे. त्यामुळे स्वच्छता ही आपली संस्कृती आहे. असे म्हंटल्यास वावगे होणार नाही. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत १६ प्रकारचे संस्कार सांगितले आहेत. पण मानवी जीवनात स्वच्छतेचे महत्व बघता स्वच्छता म्हणजे आपला १७ वा संस्कार आहे, असे आपण निश्चितच म्हणू शकतो. त्यामुळे स्वच्छता म्हणजे भारतीयांची संस्कृती व भारतीयांवरील संस्कार आहे, असे मी मानतो.

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

Friday, October 23, 2020

मागणे

आई जगदंबे । आलो तुझ्या दारी ।
सेवेस स्वीकारी । या भक्ताच्या ।।

नाम तुझे माते । वाचेवरी येता ।
लाभे प्रसन्नता । माझ्या मनी ।।

बुद्धिस दे माझ्या । प्रकाश ज्ञानाचा ।
तम अज्ञानाचा । संपवूनी ।।

अनिष्ट सवयी । न लागो स्वभावी ।
संगत लाभावी । विद्वानांची ।।

क्रोध मोह माया । हरुनी तू घ्यावी ।
शक्तिसह द्यावी । विनम्रता ।।

कुबुध्दीचा नाश । सज्जनांची सेवा ।
एवढाच द्यावा । आशीर्वाद ।।

मागणे अंतिम । मागतो गंधार ।
राहो तुझे कर । माझ्या शिरी ।।

© गंधार वि. कुलकर्णी
दि. २३ ऑक्टोबर २०२०
संपर्क : ९१५८४१६९९८

Thursday, October 1, 2020

लोगोथेरेपी, अस्तित्ववाद व गांधीवाद

महात्मा गांधी स्वातंत्र्यपूर्व भारतीय राजकरणातील एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांचे आपण समर्थन करू शकतो, त्यांच्यावर टिका करू शकतो, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. भारतीय नेत्यांना हक्काचे राजकीय व्यासपीठ १८८५ साली मिळाले. परंतू १९२० पर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा लढा विशिष्ट नेत्यांपर्यंतच मर्यादित असल्याचे जाणवते. त्याला काही कारणे सुद्धा होती. वर्तमानपत्रातून ब्रिटिश शासनावर टिका करणे, शस्त्र हाती घेऊन शासनावर दबाव आणणे सामान्य जनतेला शक्य नव्हते. त्यामुळे सामान्य जनतेचा स्वातंत्र्य लढ्यात आवश्यक तसा सहभाग झाला नव्हता. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर भारतीय राजकरणात व कॉंग्रेसमध्ये महात्मा गांधींचे पाय पक्के होत गेले आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला आंदोलनाचे स्वरूप मिळाले. नवीन संकल्पना व नवीन पद्धतींचा अवलंब स्वातंत्र्य आंदोलनात होवू लागला.

१९४०-१९५० या काळात युरोपात 'अस्तित्ववाद' ही संकल्पना जोर पकडू लागली. भारतावर ब्रिटिश शासन असल्यामुळे युरोपात उदयास आलेल्या संकल्पना झिरपत-झिरपत भारतात येऊ लागल्या. किर्कगार्ड, दास्त्रावस्की, नीत्शे या तत्ववेत्त्यांनी अस्तित्ववादावर भरपूर विवेचन केले. पण त्यानंतर आलेल्या विक्टर फ्रॅंकल या मनोचिकित्सकाने अस्तित्ववादावर जे लिखाण केले, ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीचे होते. त्यांनी आपल्या 'मॅन्स सर्च फॉर मीनिंग' या पुस्तकात 'लोगोथेरेपी' विषयी लिखाण केले. मनुष्याच्या जीवनच्या अस्तित्वाचा शोध घेणारी ही एक उपचार पद्धती आहे. 'अस्तित्ववाद' या संकल्पनेचे विवेचन करतांना विक्टर फ्रॅंकलने लोगोथेरेपीचा आधार घेतला आहे. लोगोथेरेपीमध्ये मनुष्याला स्वतःच्या कर्तव्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो. 'मानवाला कर्तव्यनिष्ठ बनवणे' हा या लोगोथेरेपीचा हेतू आहे, असं सुद्धा आपण म्हणू शकतो.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला आंदोलनाचे स्वरूप मिळण्यासाठी आणि भारतीय समाजात अस्तित्ववादाचा शिरकाव होण्यासाठी गांधीवादी विचारधारेचा खूप महत्वाचा वाटा आहे. पहिल्या परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे १९२० पर्यंत सामान्य जनता पूर्णपणे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली नव्हती. पण महात्मा गांधींच्या आंदोलनामुळे सामान्य लोकांना त्यांच्या अस्तित्वाची व कर्तव्याची जाणीव झाली आणि जो माणूस बंदूक धरण्यास घाबरत होता, तो हातात मीठ घेऊन स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाला. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलन हे जनआंदोलन झाले. सामान्य लोकांना त्यांच्या अस्तित्वाची व शक्तीची जाणीव होण्यासाठी गांधीवाद व गांधी आंदोलन महत्वाचे ठरले. कर्तव्याच्या वाटेने अस्तित्वाचा शोध घेणारी लोगोथेरपी होती आणि कर्तव्य व अस्तित्वाची जाणीव करून देणारी गांधीवादी विचारधारा होती. त्यामुळे लोगोथेरेपी, अस्तित्ववाद व गांधीवाद या संकल्पना कुठेतरी जुळतांना दिसतात. वर-वर बघता सर्व विचारधारा आपल्याला भिन्न दिसतात परंतू सर्वांच्या मुळाशी एकच संकल्पना असते ती म्हणजे अस्तित्व. जगातली प्रत्येक विचारधारा, प्रत्येक क्रांती, चळवळ, आंदोलन या सर्वांच्या मुळाशी अस्तित्वाची लढाई असल्याचे जाणवते. त्यामुळे 'लोगोथेरेपी' व 'गांधीवाद' यांचा जन्म होण्यासाठी सुद्धा 'अस्तित्ववाद' ही संकल्पना कारणीभूत ठरली आहे, असं आपण म्हणू शकतो.

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८

Monday, August 10, 2020

मेळघाटात कुठेतरी...

लॉकडाउन सुरू होऊन जवळ-जवळ पाच महीने होत आहेत. परीक्षांचे निर्णय घड्याळाच्या पेंडुलम सारखे लटकलेले आहे. रोज सिनेमा बघणे सुद्धा कंटाळवाणे झाले. जे छंद आहेत जसे चित्र काढणे, कविता लिहिणे, वाचन करणे यासाठी मनस्थिती आणि वेळेचं गणित जुळणं अतिशय आवश्यक असतं. अश्यावेळी बोर होत असलं की आजीकडे जाणं, वाड्यात टाइमपास करणं आणि याचाही कंटाळ आला तर थोड्यावेळ अभ्यास करणं अशी दिनचर्या सध्या झाली आहे. गेल्या ३-४ दिवसापासून माझ्या खूप चांगल्या मित्रांपैकी एक असलेल्या माझ्या मामीसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची चर्चा सुरू होती. पण दिवस निश्चित होत नव्हता. शनिवार-रविवार जनता कर्फ्यू असतो. शनिवारचा पूर्ण दिवस घरात घालवला आणि रविवारी सकाळी मी मामीकडे गेलो. "कुठे जायचं ?" याच प्रश्नावर आमची गाडी थांबली होती. शेवटी ठरलं की दुपारी ३ वाजता कुठेतरी जायचं. घड्याळ पाहिले तर १ वाजला होता, मी लगेच मामीकडून घरी गेलो आणि जेवण करून मी व आई तयार झालो.

दुपारी ३ वाजता दोन मोठ्या गाड्या घेऊन आम्ही सात लोकं मेळघाटाच्या रस्त्याला लागलो. अजूनही कोणत्या ठिकाणी आम्ही जात होतो, हे कोणालाच माहीत नव्हतं. मी पण "कुठे जायचं ?" हा प्रश्न बाजूला केला आणि सातपुड्याचा घाट, गर्द हिरवे जंगल आणि झाडांच्या वरच्या भागाला झाकणाऱ्या धुक्याचा आनंद घ्यायला लागलो. एखादे चांगले ठिकाण दिसले की गाडी थांबवायची आणि फोटो काढून पुढे जायचं. कितीतरी महिन्यांपासून घरात असल्यामुळे मेळघाटातल्या ओलसर बोचऱ्या हवेचा त्वचेला विसर पडला होता. पण आता त्या हवेचा आनंद फक्त त्वचा नव्हे, तर मन सुद्धा घेत होतं. ३-४ ठिकाणी थांबून फोटो काढले. एका ठिकाणी सोबत आणलेला आणि थोडा कोमट झालेला चहा घेतला. त्यावेळी भूरभूर येणाऱ्या पावसामुळे तो कोमट चहासुद्धा आनंद देत होता. पुढे एका छोट्या मंदीराजवळ थांबून सोबत आणलेला कच्च्या चिवड्याचा आस्वाद घेतला. 

संध्याकाळचे ६ वाजले होते. आम्ही परत यायला निघलो. पहाडी भागात लवकर अंधार पडतो, हे माहीत असल्यामुळे आम्ही स्वतःचा मोह आवरून घराकडे निघलो. उजेडात जे धुकं मनाला आनंद देत होतं, आता अंधारात तेच गाडी चालवतांना त्रास द्यायला लागलं. अंधार, धुकं आणि त्यात गाडीचे लाइट्स यामुळे समोरचा रस्ता बरोबर दिसत नव्हता. शेवटी त्या धुक्यातून आम्ही बाहेर आलो आणि गावात पोहोचलो. १५-२० मिनीटांत आम्ही घरी पोहोचणार होतो. पण आता "कुठे जायचं ?" आणि "आम्ही कुठे गेलो होतो ?" या दोन प्रश्नांचे उत्तरे माझ्याकडे होते. कधी-कधी काहीच नियोजन न करता बाहेर फिरून येणे, यातूनही खूप आनंद मिळतो. मन फ्रेश होतं, ऊर्जा मिळते आणि शांतताही मिळते. आजही मला कोणी विचारलं, "तुम्ही रविवारी कुठे गेले होते ?" तर मला ठिकाण सांगता येणार नाही. फक्त एवढच सांगता येईल, "फ्रेश होण्यासाठी गेलो होतो मेळघाटात कुठेतरी..."

© गंधार वि. कुळकर्णी
दि. १० ऑगस्ट २०२०

Thursday, August 6, 2020

भक्त हनुमान

पूर्ववत अयोध्या सजली
दरबार भरला रामाचा
माळ देई जानकी माता
सन्मान करी हनुमानाचा

घेतली ती माळ मारुतीने
मणी त्यातले तोडून पाही
निराश होऊनी फेकतो सारे
कारण त्यातही राम नाही

पण मला सांग तू हनुमाना
राम आहेत का या देहात ?
रावण बंधू प्रश्न विचारी
पवनसुताला दरबारात

फाडुनी छाती हनुमंताने
उत्तर दिधले विभीषणाला
नसा-नसात, या हृदयात
ठेविले आहे मी रामाला

मनात भक्ती आणिक
चेहऱ्यावर आनंद आला
हनुमंताच्या हृदयी जेव्हा
श्रीरामाचा जन्म झाला

पाहुनी भक्ती या भक्ताची
रामाला वाटे अभिमान
आशिष घेऊनी श्रीरामाचा
चिरंजीव झाला हनुमान

© गंधार विश्राम कुलकर्णी
दि. ०६ ऑगस्ट २०२०

Friday, July 10, 2020

देशमुख सर आणि त्यांचा 'भांजा'...

२५ जूनला माझा वाढदिवस झाला, पण २६ तारखेला सुद्धा खूप लोकांच्या शुभेच्छा येत होत्या. संध्याकाळी आईच्या मोबाईलवर एक कॉल आला, तो थोडा अस्वस्थ करणारा ठरला. आईचे बंधू आणि माझे मामा, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांना कँसर झाला आणि डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. ही गोष्ट कळल्यावर आई, बाबा आणि मी अस्वस्थ झालो होतो. काही सुचत नव्हते. त्याच अस्वस्थतेत आम्ही झोपायला गेलो, पण झोप येत नव्हती. डोळे बंद केले तर देशमुख सरांसोबतच्या आठवणी स्पष्ट दिसू लागल्या.

मी नुकताच १० व्या वर्गात गेलो होतो. देशमुख सर त्यावेळी प्राचार्य म्हणून आमच्या संस्थेच्या महाविद्यालयात रुजू झाले होते. कडक प्रेसचा शर्ट-पँट घालून प्राचार्य कक्षेत खुर्चीवर बसून आपले काम करत राहायचे. समोर १५-१६ खुर्च्या आणि त्यांच्या मोठ्या टेबलवर त्यांचा लाल पाषाणाचा गणपती ठेवलेला असायचा. कॉलेजमध्ये आल्यावर सर्वांना आवाज देत यायचे. प्राध्यापकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना रागवणारे आणि तितक्याच हक्काने जवळ घेणारे पहिलेच प्रचार्य मी बघत होतो. एखाद्या विद्यार्थ्याला एखादी गोष्ट समजावून सांगतांना लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवून देशमुख सर प्राचार्यांच्या भूमिकेतून क्षणातच मित्राच्या भूमिकेत येत असत. कॉलेजच्या ग्राउंडवर गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असतांना, मागे उभे असलेले देशमुख सर गमतीने म्हणायचे, "पायजो रे बा, गरीबाची गाडी आहे मागे". १० वी ची सराव परीक्षा झाली आणि माझा बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू झाला. "भांजे कितने परसेंट चाहिए १० वी में ?" देशमुख सरांनी विचारले. मी म्हणलो, "८० च्या जवळपास". तेव्हा सर मला थोडे रागवतच बोलले, "आपले प्रत्येक वाक्य अगदी स्पष्ट असायला हवे भांजे. स्पष्ट बोलण्यावरून आपले विचार आणि आत्मविश्वास लोकांना दिसत असतो. नेहमी स्पष्ट बोलायचं." १० वी, ११ वी, १२ वी आणि बी.ए. च्या सर्व परीक्षांचे पेढे देशमुख सर अतिशय आनंदाने घेत असत. पहिला पेढा ते स्वतः मला देत आणि नंतर माझ्या हातून स्वतः घेत असत. अमरावती विद्यापीठात सर कुलसचिव पदावर गेले. त्या नंतर जेव्हाही मी विद्यापीठाच्या कोणत्याही कार्यक्रमाला गेलो, की देशमुख सर "भांजे-भांजे" म्हणत जवळ घ्यायचे. इतर लोकं तेव्हा आश्चर्याने बघायचे. २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात घरच्या एका कार्यक्रमाला देशमुख सर आले होते. कॉलेजच्या काही वादांमुळे मी थोडा अस्वस्थ होतो. तेव्हा सुद्धा नेहमीप्रमाणे जवळ घेत मला म्हणाले, "भांजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. प्रतिक्रिया देण्यापेक्षा क्रिया करण्यावर भर द्यायचा. अशी क्रिया करायची की समोरच्या व्यक्तीला आपण लक्षात राहिलो पाहिजे." देशमुख सरांच्या प्रत्येक वाक्यात खूप ऊर्जा असायची. ते प्रत्येकाला इतक्या जिव्हाळ्याने जवळ घेत होते, की नाराज व्यक्ती आनंदीत व्हायची आणि रागात असलेली व्यक्ती शांत होऊन जायची. इतकी प्रभावी 'जादू की झप्पी' तर मुन्नाभाईला सुद्धा भेटली नसेल, जी मला अनेकवेळा देशमुख सर द्यायचे. देशमुख सरांची आणि माझी शेवटची भेट १७-१८ जानेवारी २०१९ ला झाली. "बेधडक आणि बिनधास्तपणे राजासारखी प्रत्येक गोष्ट करायची. तुला खूप समोर जायचं आहे" मी सरांना नमस्कार केला. "२४ जानेवारीला मुंबई विद्यापीठात कुलसचिवाच्या खुर्चीवर बसतो आहे" असं सांगून, जाण्याआधी माझे आजोबा दादासाहेब तारे यांचा आशीर्वाद घेतला, आई-बाबांची भेट घेतली आणि नंतर गाडीत बसले.

त्यानंतर कधी फोनवरून तर कधी whatsapp वर सरांशी बोलणं व्हायचं. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही देशमुख सरांशी संपर्कात होतो. २ जुलैला संध्याकाळी सर झोपले असतांना, संजय काकांनी त्यांचा एक फोटो काढून आम्हाला पाठवला. शरीरात इतका त्रास होत असतांनाही देशमुख सर अतिशय शांत झोपलेले होते. नंतर काही तासांनी सर गेल्याचे कळले. त्यारात्री आम्हाला कोणालाच जेवण गेलं नाही. आपले आयुष्य खूप विचित्र आहे. या आयुष्यात आपल्याला काही असे लोकं भेटतात, की जे अत्यंत कमी वेळात आपल्या जवळचे होऊन जातात. त्यांच्या बोलण्याचा, वागण्याचा आपल्यावर खूप लवकर परिणाम होत असतो. देशमुख सर सुद्धा अश्या लोकांपैकी एक होते. अतिशय बेधडक, बिनधास्त आणि राजासारखे जीवन जगणारे व्यक्तिमत्व. शेवटच्या ४-५ दिवसातही "आता हे दिवस सुद्धा जगून पाहू" असे देशमुख सरांचे वाक्य होते. इतका संघर्ष, इतकी मेहनत करून सत्ता आणि संपत्ती मिळवावी आणि जेव्हा खरं आयुष्य जगायला सुरवात करावी, तेव्हा आयुष्यानेच असा दगा करावा. अश्यावेळी ५४ वर्षाचं आयुष्य सुद्धा क्षणभंगूर वाटायला लागतं. आपल्या जीवनात येणारे लोकं परागकणांप्रमाणे असतात. काळाच्या हवेसोबत ते निघून जातात, पण मागे सुगंधासारख्या आठवणी ठेवून जातात. अजयमामांच्या जाण्याने 'परागकणांचे हवेतील क्षणिक वास्तव्य' आणि 'माणसाचे क्षणभंगूर जीवन' या दोन विषयांची तुलना करण्याकडे मी वळल्या गेलो. कॉलेजच्या ऑफिसमधील अजयमामांचा गणपती ३ जुलैला आम्ही घरी घेऊन आलो. अजयमामा जिथेही असतील तिथून नक्कीच त्यांच्या गणपतीकडे आणि 'भांज्या'कडे लक्ष ठेवत असतील.

© गंधार विश्राम कुलकर्णी
दिनांक - १० जुलै २०२०

Sunday, July 5, 2020

ऋणानुबंध

२ मे २०१२ ला आपल्या स्व. छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालयात डॉ. अजय प्रभाकरराव देशमुख हे प्राचार्यपदी रुजू झाले होते. तेव्हा आम्हा सर्व परिवाराची माझे दादा यांचा ८१ वा वाढदिवस व सौ. आईचा ७५ वा वाढदिवस यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी चाललेली होती. सर्वच कार्यक्रमांमध्ये देशमुख सरांचा सक्रिय सहभाग होता. ७ मे ते १३ मे २०१२ व्याख्यान, गाण्याचा कार्यक्रम, नृत्याचा कार्यक्रम व वाढदिवसानिमित्त सर्वांना एक दिवस स्नेहभोजन देण्यात आले होते. १३ मे ला दादांच्या वाढदिवशी अंजनगाव-सुर्जी येथील प.पू. श्री. जितेंद्रनाथ महाराजांचे आशीर्वादपर प्रवचन होते. त्यादिवशी देशमुख सरांसोबत अनिहा वहिनी सुद्धा कार्यक्रमाला आल्या होत्या. तेव्हा सरांनी माझी वहिनींशी ओळख करून दिली आणि त्यांना सांगितले की जयश्री माझ्या लहान बहिणीसमान आहे. मला कोण आनंद झाला म्हणून सांगते, आणि तेव्हा पासून न चुकता अगदी आमची रक्षाबंधन व भाऊबीज माझ्या घरी साजरी होवू लागली. तेव्हा पासून "अहो सर" या शब्दांची जागा "अरे दादा" या शब्दांनी घेतली.

त्यानंतर अजयदादा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात बी.सी.यू.डी. डायरेक्टर म्हणून रुजू झालेत. काही काळानंतर विद्यापीठाचे कुलसचिव झालेत. विद्यापीठात 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा होती. तेव्हा मी आणि गंधार कार्यशाळेसाठी गेलो होतो. समारोपीय कार्यक्रमाला अजयदादा आले होते. कार्यक्रम आटोपल्यावर दादा मला व गंधारला चहा घेण्यासाठी गेस्ट हाऊसला घेऊन गेलेत. घरी जाण्यास निघालो तेव्हा आम्ही नेलेली माझ्या भावाची गाडी पाहून अजयदादाला फार आश्चर्य वाटले. मग त्याने मला एका मागून एक चार प्रश्न विचारले.
१. जयूताई तुझी कार कुठे आहे ?
२. काय झाले ? विश्राम कुठे आहेत ?
३. घरी सर्व ठीक आहे नं ?
४. तुला काही आर्थिक अडचण आहे का ?
त्यावर मी शांतपणे त्याला सांगितले, "मी माझ्याच कारमध्ये येणार होते, पण वेळेवर चाक पंक्चर झाले. कार्यशाळेला उशीर झाला असता म्हणून मी निलेशची कार घेऊन आले. विश्राम घरीच आहेत. सर्व चांगले आहे. मला अजिबातच आर्थिक अडचण नाही." त्यानंतर दादाला थोडे रिलॅक्स वाटले. केवढी ही आपुलकी ! बापरे, मी किती सुखावले ! आणि हे फक्त माझ्याच बाबतीत नाही तर त्याच्या संपर्कात जो कोणी येईल, त्याला एकदा आपले मानले की मग त्याच्यासाठी काहीही करायला तयार असायचा.

कधी मी त्याला "अजयदादा" म्हणायची तर कधी "अजूदादा", कधी "बडेभैया" तर कधी फक्त "दादू". कधी विद्यापीठातील मीटिंग, कार्यशाळा, परिषद तर कधी परिवारातील कार्यप्रसंग अजूदादाची भेट व्हायचीच. २४ जानेवारी २०१९ ला अजय दादा मुंबई विद्यापीठात कुलसचिव या पदावर रुजू झाला. माझा आनंद गगनात मावेना. माझा भाऊ यशाची उच्च शिखरे चढत होता. अतिशय महत्वाकांक्षी, कुशल प्रशासक, धाडसी निर्णय क्षमता असणारा, बेधडक काम करणारा, मोठी स्वप्ने बघणारा, दुसऱ्यांना आधार देणारा. "काही चिंता करू नकोस, होऊन जाईल तुझे काम" असे सतत म्हणणारा. अशी किती विशेषणं लावावित त्याला ? मागच्या वर्षी मुंबईच्या परिषदेला त्याने मला बोलविले होते. पण माझे दादा(बाबा) अॅडमिट असल्यामुळे मी जावू शकले नाही. सतत दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा माझा भाऊ स्वतःबद्दल कधीही काहीच सांगत नसे. दिसायचा पण सतत आनंदी, उत्साही, काम करण्यासाठी तत्पर. त्यामुळे कोणाला वाटणारही नाही की, याची प्रकृती ठीक नाही किंवा याला काही त्रास होतो आहे.

लॉकडाउनमध्ये माझे त्याच्याशी बरेचदा बोलणे झाले होते. आपण विचारले तरी नेहमी सांगायचा, "सगळं तर चांगलं आहे. तब्बेतीला काय झालं ? तब्बेत चांगलीच आहे." फार संघर्षमय जीवन होते त्याचे. प्रचंड महत्वाकांक्षी आणि कामामध्ये नेहमी मग्न यामुळे कदाचित त्याचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असावे. एकाएकी त्याला अस्वस्थ वाटत असल्यामुळे ६ जून २०२० ला त्याने स्वतःचा पूर्ण चेकअप केला. ७ जूनला रिपोर्ट आलेत आणि तेही फारच धक्कादायक. त्याला स्वादुपिंडाचा कर्करोग झाला व तो लास्ट स्टेजमध्ये होता. त्यात काविळ झाला. त्यामुळे कीमोथेरेपी करता आली नाही. हे सर्व मला २६ जूनच्या रात्री कळले. मला प्रचंड धक्का बसला. मी फारसे कोणाला न विचारता सरळ त्यालाच फोन केला. फोन उचलल्या गेला नाही. नंतर अजयदादाचाच फोन आला. पण त्यावर त्याचे भाऊ संजयदादा बोलले. अजयदादा टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती होता. पण तो खूप हिमतीचा आहे. त्याची ईच्छाशक्ती दांडगी आहे. म्हणून तो या सर्वांतून बाहेर येईल. असे मला वाटत होते. इकडे माझी परमेश्वरालाही त्याच्या प्रकृती स्वास्थासाठी प्रार्थना सुरूच होती. पण २७ जूनला दुपारी १ वाजता मला फोनवरून कळले की डॉक्टरांनी त्याला घरी जाण्यास सांगितले आणि त्याची हिम्मत खचली. इकडे मी प्रचंड अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थतेत सर्व घरात फिरत राहिले. काही सुचत नव्हते. कोरोना, लॉकडाउनमुळे ईच्छा असूनही मी त्याच्या भेटीला जावू शकत नव्हते.

माझ्या मनावरचा ताण वाढला आणि मी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर मी देवाला सतत माझ्या भावासाठी प्रार्थना करत होती. २ जुलैला दुपारी मी परत संजय दादांशी बोलले. पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मन परत सुन्न झाले आणि रात्री ८:४० ला अजयदादाची प्राणज्योत मालवली असा संदेश आला. काय म्हणावे याला ? का रे बाबा असा सर्वांच्या नेत्रात अश्रू आणून निघून गेलास ? ७ जुलै हा अजयदादाचा जन्मदिवस. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला मी सर्वात आधी त्याला फोन करायची. पण या ७ जुलैला शुभेच्छांऐवजी अश्यापद्धतीचे लेखन अजयदादासाठी करावे लागेल. असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता.

© डॉ. जयश्री विश्राम कुलकर्णी
दिनांक - ०६ जुलै २०२०

Monday, June 15, 2020

आदर्श संपल्यावर...

काल दुपारी सिनेसृष्टीतील अतिशय चर्चीत आणि यशस्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी आली. सर्व देश या बातमीने हादरून गेला. सर्वांनी श्रद्धांजली द्यायला सुरवात केली. सोशल मीडियाच्या प्रत्येक माध्यमाचा वापर करून प्रत्येक व्यक्ती स्वतःचे दुःख व्यक्त करत आहे. काल ही विचित्र बातमी आल्यावर मी सुद्धा इतर लोकांप्रमाणे थोडा उदास झालो. दिवसभर फक्त त्याच्याशी संबंधीत बातम्या पाहात होतो. काही वेळानी मृतदेहाचे फोटो सुद्धा पाहिले. जो व्यक्ती अनेक युवकांचा आदर्श आहे, जो व्यक्ती स्वतःच्या सिनेमाद्वारे संपूर्ण देशाला प्रेरणा देतो, त्यानेच अश्याप्रकारे स्वतःचे जीवन संपवावे. अशी घटना पाहून जे प्रश्न निर्माण झाले, त्याचाच विचार करत मी पहाटे ५ वाजेपर्यंत जागा होतो.

आपण एखाद्या व्यक्तीला आदर्श का मानतो ? या प्रश्नाचे भरपूर उत्तरे मिळतील. एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्या विचारांशी जुळणारे असतात, जीवनातला संघर्ष, जीवनातले प्रसंग आपल्या जीवनाशी मिळते-जुळते असतात, एखाद्याची जीवन जगण्याच्या पद्धतीमुळेही आपण त्याला आदर्श मानतो, असे अनेक मुद्दे सांगता येतील. प्रत्येक व्यक्तीनुसार हे मुद्दे बदलू शकतात. आजच्या युगात 'एखाद्या व्यक्तीला आदर्श मानून स्वतःचे जीवन जगणे' ही बाब मोठ्या प्रमाणात आढळते. पण ज्या व्यक्तीला आपण आदर्श मानतो आणि प्रेरणा घेऊन जगतो, त्यानेच आत्महत्या केली तर पुढे काय ? हा प्रश्न परत निर्माण होतो. यामुळे तणाव वाढतो. म्हणून 'तणाव' सुद्धा इतर काही आजारांप्रमाणे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पसरणारा आजार आहे. असं आपण म्हणू शकतो.

आज आपण(यामध्ये युवक जास्त प्रमाणात) मित्र शोधायला बाहेर जातो, स्वतःच्या मनातल्या गोष्टी बोलायला सुद्धा बाहेरचे मित्र शोधतो, मग खरे मित्र कोण, निखळ मैत्री कोणाची, अश्या अनेक परीक्षा करून मित्र आपण बनवतो. 'बाहेरचे मित्र वाढले आणि घरातले संवाद कमी झाले' यामुळे सुद्धा तणाव वाढतो. असं मला वाटतं. संवाद कमी झाला आणि मनमोकळेपणाने व्यक्त होणे सुद्धा कमी झाले. त्याचा परिणाम म्हणून अशी एखादी आत्महत्या झाली की सगळे लोकं 'व्यक्त होण्याच्या' मुद्द्याला धरून भाषण द्यायला सुरवात करतात आणि काही दिवसांनी स्थिती परत 'जैसे थे' ! बाहेर मित्र शोधणे, मग मैत्रीमध्ये विश्वास पाहिजे, त्यासाठी मित्रांसोबत सहवास पाहिजे. या सर्व खटपटी करतांना आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे विश्वास, निरपेक्ष प्रेम आणि भरपूर सहवास असलेले दोन मित्र आपल्या घरातच असतात. ते म्हणजे आपले आई-वडील. आपल्याला तणाव असला की एकदा आई-वडीलांना सांगा. त्यांनी प्रेमानी डोक्यावरून फिरवलेल्या हाताच्या स्पर्शाने सुद्धा आपला तणाव कमी होतो. कितीही तणाव असला, वाईट परिस्थिती असली, वाईट विचार मनात आलेत, तरीही आपल्या लोकांसाठी जीवंत राहण्याचा आणि जीवन जगण्याचा आदर्श आई-वडीलांपेक्षा चांगल्याप्रकारे इतर कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे बाहेरचे आदर्श संपल्यावर सुद्धा घरातले आदर्श आपल्याला उपाय व प्रेरणा देऊ शकतात. फक्त आपण त्यांच्या पर्यंत गेलो पाहिजे.

© गंधार कुलकर्णी
दि. १५ जून २०२०

Friday, June 12, 2020

तारे जमीन पर - एक आठवण

या 'लॉकडाउन'मध्ये अभ्यास बऱ्यापैकी मागे पडला आणि रोज वेगवेगळे सिनेमे बघणे सुरू आहे. रोज रात्री एखादा सिनेमा पाहायचा आणि दुसऱ्या दिवशी जेवतांना त्यावर चिकित्सा करायची अशी दिनचर्या आता झाली आहे. कविता, कथा, चित्रकला या सोबतच सिनेमा बघणे हा सुद्धा माझा छंद म्हणायला हवा. आज सुद्धा मी नेहमी प्रमाणे कोणाता सिनेमा पाहायचा हे ठरवत होतो तेव्हा 'झी-सिनेमा' या चॅनलवर 'तारे जमीन पर' हा सिनेमा नुकताच लागला होता. तिथेच माझी सिनेमाची शोध मोहीम संपली आणि मी रिमोट बाजूला ठेवले. सिनेमा तर सुरू होताच, पण सोबत मला माझे शाळेतले दिवस आठवले. आता 'तारे जमीन पर' माझ्या अतिशय आवडत्या सिनेमांपैकी एक आहे. पण जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला होता. तेव्हा मी या सिनेमाच्या नावानी सुद्धा चिडायचो.

२००७ साली हा सिनेमा रिलीज झाला. मी तेव्हा पाचव्या वर्गात होतो. सिनेमा हिट झाला. पण शाळेत माझी प्रसिद्धी जास्त झाली. त्याचे कारण म्हणजे शाळेच्या हजेरीत माझे नाव 'गंधार विश्राम कुलकर्णी' असले तरी शाळेत मी 'दादासाहेब तारेंचा नातू' म्हणून ओळखल्या जायचो. या ओळखीचे फायदे खुप होते. पण सिनेमा आल्यामुळे आता मला सगळे 'तारे जमीन पर' म्हणून चिडवू लागले. त्यामुळे सिनेमा न पाहता तो फ्लॉप व्हावा अशी प्रार्थना मी करत होतो. चिडवण्याच्या प्रकरणात दोन-तीन मुलांना मी मनसोक्त बदाडले सुद्धा. पण त्याचा उलटा परिणाम म्हणजे शिक्षकांनाही माझी चिड माहीत झाली. त्यामुळे घरी मी नेहमी इरिटेट होऊनच येत होतो. खुप महिन्यांनंतर हे प्रकरण थांबले. चिडणे-चिडवणे सुद्धा बंद झाले होते.

१० वी मध्ये असतांना आजोबां मला इंग्रजीचा 'होमवर्क' करून देत होते. ११ वी पासून कला शाखा घेतल्यामुळे मी आजोबांचं खुप मार्गदर्शन घ्यायला लागलो. आजोबांचा संघर्ष आणि सर्वांचे जीवन सुधारण्याची तळमळ मला समजत होती. आता मला 'दादासाहेब तारेंचा नातू' या ओळखीचे महत्व समजत होते. बी. ए. पूर्ण होता होता 'दादासाहेब तारेंचा नातू' स्वतःच्या नावानी ओळखल्या जावू लागला. एम. ए. मध्ये ही ओळख पूर्ण विद्यापीठात झाली. या गोष्टीचा आंनद सर्वात जास्त आजोबांना होता. 'तारे' या नावाचे महत्व मला समजल्यामुळे शाळेतले मित्रांचे चिडवणे आता परत व्हावे असे वाटते. कधी मित्र भेटतात तेव्हा एखाद्याने 'तारे जमीन पर' म्हंटलं की मला आनंद वाटतो. हे सर्व लिहिण्याचे तात्पर्य काय ? तर ते असे की काही व्यक्ती आणि काही सिनेमे अनेक गोष्टी शिकवून जातात. आपल्याला ते सिनेमे आणि व्यक्तींसोबतचे क्षण जगता आले पाहिजे. घरातल्या व्यक्तींसोबत जगण्यासाठी वेळ काढा मित्रांनो. कारण सिनेमा आपण पुन्हा पाहू शकतो, पण गेलेल्या व्यक्तींच्या आपल्यासोबत फक्त आठवणी असतात, सहवास नाही.

© गंधार कुलकर्णी
दि. १२ जून २०२०

Thursday, May 7, 2020

माझ्याशी चंद्र बोलला...


लॉकडाउनच्या सूट्या अजून वाढल्या आणि आता या वाढलेल्या सूट्यांमध्ये काय करावं ? हा विचार करत मी खिडकीजवळ बसलो होतो. पौर्णिमेची रात्र होती. आकाशात दिसणारा गोल-पिवळटसर चंद्र पाहून असं वाटलं की तो मला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग मी सुद्धा चंद्राकडे जरा लक्ष दिलं आणि लॉकडाउनचा विचार बाजूला होऊन एका दुसऱ्याच विचाराचा जन्म झाला. आता मी चंद्राशीच बोलायला लागलो. "काय आहे तुझ्याकडे ? स्वतःचा प्रकाश नाही, सूर्यासारखे तेज नाही, अफाट अशा भूभागाला प्रकाशित करणारे किरणेही नाहीत, फक्त काही खड्डे आणि शीतलता या शिवाय तुझ्याकडे आहे तरी काय ?" या सूट्यांमुळे अस्वस्थ झालेलं माझं मन आता चंद्रावर बरसत होतं. चंद्राला असे वेडे वाकडे प्रश्न विचारून मी माझं लक्ष मोबाईलकडे वळवले.

थोड्या वेळानी एक आवाज आला "माझ्याकडे सूर्यासारखे कोणतेच गुण नसतील. पण ज्या आरश्यात तुम्ही रोज स्वतःला बघत राहता. त्या आरश्याचा एक गुण माझ्यात आहे." असे वाक्य कानी पडताच मी थोडा दचकलो. "आता हा चंद्र खरच आपल्याशी बोलतो की काय !" असं मी स्वतःशीच बडबडलो. एवढ्यात परत आवाज आला, "आणि तो एकमेव गुण म्हणजे परावर्तीत करण्याचा. माझ्याकडे सूर्याची किरणे नाहीत. पण त्याच किरणांना परावर्तीत करणे मला उत्तम प्रकारे जमतं. माझ्यावरही अनेक डाग आहेत. पण तुझ्यासारख्या कवींच्या कवितेत प्रेम व्यक्त करतांना माझाच वापर केला जातो. 'सौंदर्य' हा शब्द चंद्रासाठीच तुम्ही वापरता. आता तुम्हा माणसांना सुद्धा माझ्याकडून 'साधेपणा' आणि 'प्रत्येक चांगल्या गोष्टीला परावर्तीत करणे' हे दोन गुण शिकण्याची गरज आहे."

आता तो आवाज थांबला होता आणि चंद्र सुद्धा आकाशात स्तब्ध होता. पण मी वेगळ्याच विचारात अडकलो होतो. आपण कितीही आणि काहीही मिळवले तरी 'साधेपणा' आणि 'प्रेमाला परावर्तीत करण्याची कला' या दोन गोष्टी 'साधे पण यशस्वी' जीवन जगण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. "हेच सूत्र चंद्र मला सांगण्याचा प्रयत्न करत होता का ?" असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला आणि घड्याळ पाहिले तर रात्रीचे अडीच वाजले होते. त्यामुळे सगळ्या चर्चा संपवून मनातच चंद्राला शुभ रात्री म्हंटल आणि मी झोपायला गेलो.

© गंधार कुलकर्णी
दि. ०७ मे २०२०

Wednesday, April 22, 2020

अभंग

मंत्राने होतसे । वाणीची शुद्धता ।
जीवा सुखविणे । श्रेष्ठ भक्ती ।।

आत्मज्ञान असे । जीवनाचे ज्ञान ।
मिळवूनी त्यास । संतोषावे ।।

समाजाची सेवा । राष्ट्रासाठी कार्य ।
जगाचा उद्धार । कर्म खरे ।।

सांगतो गंधार । विसरावे भेद ।
जपावी सर्वांनी । मानवता ।।

© गंधार कुलकर्णी
दि. २२ एप्रिल २०२०

Friday, April 17, 2020

परिवर्तन

ते तर जीवन नव्हतेच
जे मी जगत होतो
व्यक्त होण्या आधीच
शब्द मी गिळत होतो

न कधी आसवे आले
न मन मोकळे झाले
निर्जीव दगडा प्रमाणे
मीच मला भासत होतो

कधी निखळ हसलो नाही
मित्रांसोबत बसलो नाही
विचारांत अडकून एकटा
स्वतःशीच बोलत होतो

आज मी बाहेर निघालो
वाऱ्यासवे थोडा झुंजलो
सूर्याच्या किरणांना आता
त्वचेवर मी पाळत होतो

दुनियेला सोडून आलो
प्रश्नांना गाढून आलो
स्वतःला ओळखून मी
स्वतःसाठी जगत होतो

© गंधार कुलकर्णी
दि. १७ एप्रिल २०२०

Monday, January 6, 2020

बोलका रंगमंच

दरवाज्याची उघडझाप झाली
मृत आशांना जाग फक्त आली
कोणीच न राहता आता वाली
व्याकुळ रंगमंच जाहला खाली

आशेचा किरण मावळून
गवाक्षावर रातपक्षी बसून
अंधारमय अंत:करणावर हसून
जातो एकांतात सोबत करून

उधळी मज पोखरते दिवसरात
लिलावी बोली रूतते वक्षात
एकटा पडलो वर्तमानी तमात
म्हणून जातो भूतकाळी उजेडात

तिथे नटसम्राट मज भेटला,
रायगडही जागा झाला,
मी सांगितले मेघदूताला
महत्व माझे सांग या जगाला

नाही मी मंच फक्त लाकडाचा
संचय मी अनेक कला-गुणांचा
आरसा असे मानवी जीवनाचा
आधार अनेकांच्या भावनांचा

इथे मी घडविले आहे नटांना
हसविले-रडविले प्रेक्षकांना
जगविले आहे संस्कृतिंना
सांभाळले आहे गत स्मृतींना

मुठ्ठीत घेऊनी संपूर्ण विश्वाला
आणिले भूमीवर चंद्र सूर्याला
चिडून मंच बोलला पडद्याला
"अजूनही जीवन आहे रंगमंचाला"

© गंधार कुलकर्णी